scorecardresearch

मागे राहिलेल्यांच्या कथा-व्यथा : न घातलेली साद!

एकदा भूकंप झाला की दुसऱ्याच क्षणी सर्व काही शांत होतं असं होत नाही. भूकंपानंतरही कंपनं सतत जाणवतात.

|| – डॉ. शुभांगी पारकर

रूढ अर्थानं मानसिक आजार नसलेल्या व्यक्तींच्या आत्महत्येची काही कारणं जाणून घेतली, तर अनेकांना वाटेल, की इतक्या छोटय़ा गोष्टीसाठी माणसं कशी काय आत्महत्या करू शकतात? अमुक प्रश्न कुणाशी बोलून सुटला नसता का? या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे. एखाद्याला कोणता तरी प्रश्न मांडून केवळ मन मोकळं करावंसं वाटण्यासारखी परिस्थिती केवळ घरातच नव्हे, तर इतरही ठिकाणी निर्माण करणं आपल्याला जमवायला हवं. ते प्रयत्नपूर्वक साध्य केल्यास संकटात पडलेल्याला आपलं म्हणणं कुणीतरी ऐकण्यासाठी साद नक्कीच घालावीशी वाटेल.

एकदा भूकंप झाला की दुसऱ्याच क्षणी सर्व काही शांत होतं असं होत नाही. भूकंपानंतरही कंपनं सतत जाणवतात. असाच काहीसा व्यक्तिगत अनुभव प्रियजनांच्या आत्महत्येनं होणाऱ्या मृत्यूनंतर अनेकांना येत असतो. आत्महत्येच्या प्रत्येक मृत्यूनंतर कमीतकमी सहा किंवा अधिक माणसं त्या प्रत्येक मृत्यूच्या कंपनांना कमी-जास्त प्रमाणात काही काळ सहन करत असतात. त्या शोकावर स्वत:हून आवर घालावा म्हटलं, तरी मनात वैषम्याचे कढ दाटून येतात. मनाला हे सगळं विसरायचीसुद्धा बंदी असते. ज्यांना या चमत्कारिक मृत्यूच्या अनुभवातून जायला लागतं त्यांना तो प्रसंग घडलाच नसता तर किती बरं झालं असतं असं प्रकर्षांनं वाटतं. माझे अनेक रुग्ण सांगतात, की कितीही प्रयत्न केले तरी विसरणं जमतच नाही. उलट त्या आठवणी गडद बनतात. योगेश्वर अभ्यंकरांनी लिहिलेल्या भावगीताच्या ओळी इथे नमूद कराव्याशा वाटतात

 ‘आठवणी दाटतात! धुके जसे पसरावे

जे घडले ते सगळे सांग कसे विसरावे’

असह्य वियोगाचा हा अनुभव स्मृतिपटलावरून आपसूक लुप्त झाला तर किती बरं, असं बऱ्याचजणांना वाटतं. मृत्यूच्या सामान्य शोकापलीकडे आत्महत्येचा जो भावुक चक्रव्यूह आहे तो भेदणं खूप कठीण जातं नातेवाईकांना.

आई (मालिनी), बाबा, रवींद्र आणि त्याची बहीण ज्योती यांचं सुटसुटीत चौकोनी शहरी कुटुंब. रवींद्र ज्योतीपेक्षा चार वर्षांनी लहान होता. ज्योती लहानपणापासून स्वतंत्र विचारांची आणि वृत्तीची. त्यामुळे भावनिकदृष्टय़ा आपल्या

आई-वडिलांवर कधीच अवलंबून नव्हती. रवींद्र मात्र प्रेमळ आणि संवेदनशील. वडिलांपेक्षा आईकडे अधिक झुकलेला. लहानपणी साधं सूर्यास्ताचं चित्र काढायचं म्हटलं तरी किती प्रश्न त्याच्या मनात असायचे. त्याला आईचा सल्ला हवाच असायचा. त्यासाठी शेवटी त्याची आई त्याला सूर्यास्त दाखवण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर घेऊन गेली होती. सूर्यास्ताच्या वेळी दिसणारं आकाश आणि समुद्र, त्यावरची रंगांची उधळण हे सर्व व्यवस्थित पाहूनच रवींद्रनं त्याचं चित्र पूर्ण केलं होतं. अशा अनेक गोष्टी होत्या, की त्याला त्याच्या आईचं मार्गदर्शन हवंच असायचं. घरात बाबा आणि ज्योती त्याला मातृपुत्र म्हणूनच संबोधायचे. सुरुवातीला तो घरातला लहान म्हणून आईलाही त्याचे भावनिक लाड, कोडकौतुक करायला आवडायचं. पण हळूहळू तीही त्यानं स्वतंत्र विचार करावा, स्वत:चे निर्णय घ्यावे यासाठी सुचवू लागली. एक-दोनदा तिनं त्याला नकळत, मार्गदर्शन न करता एखादी गोष्ट तो स्वत: करतो का याचा सुगावा घेतला. पण पठ्ठय़ानं त्या गोष्टी केल्याच नाहीत आणि तो खूपच नाराज झाला. होईल मोठा झाल्यावर स्वतंत्र, करील विचार स्वत:हून असं सगळय़ांनाच वाटलं. असतात काही मुलं जात्याच हळवी. लागतो त्यांना आईचा पदर काही काळ आधारासाठी. अर्थात ज्योती मात्र सांगायची आईला, ‘‘अगं तो कुठे दूरवर अभ्यासासाठी राहायला गेला, तर त्यानं स्वतंत्र निर्णय नको का घ्यायला? तू खूप जास्त लाडावू नकोस त्याला. अ‍ॅडजस्ट नको का करायला त्यानं?’’             ती दोघंही भावंडं अभ्यासात अतिशय हुशार होती. बारावीनंतर ज्योतीनं अभियांत्रिकीला जायचं ठरवलं आणि ती दिल्लीत गेली. तीनएक वर्षांनंतर रवींद्रही आर्किटेक्चरला गेला आणि त्याला गुजरातला जावं लागलं. दोन आठवडय़ांनी शनिवार-रविवारची जोडसुटी घेऊन रवींद्र आईबाबांकडे येऊन राहायचा. मोठी सुटी असली तर ज्योतीही असायची कुटुंबात. छान नित्यक्रम सेट झाला होता. रवींद्रचं रोजच आईवडिलांबरोबर (आईबरोबर जास्त) मोबाइलवर संभाषण व्हायचं. त्याचा हळवेपणा आणि निरागसपणा आजही, वयाच्या अठरा वर्षांनंतरही तसाच होता. अलीकडे त्याचं मित्रमैत्रिणींचं वर्तुळ बऱ्यापैकी रुंदावत चाललं होतं. रवींद्र बोलका असला तरी लाजाळू होताच. त्यामुळे त्याचं ‘सोशल सर्कल’ विकसित व्हायला वेळ लागत होता. परीक्षेच्या दिवसांत तो ठरल्याप्रमाणे येऊ शकत नव्हता, पण आठवडा सुटीत मित्रमैत्रिणींत रमत चाललेला पाहून आईवडिलांना हायसं वाटायला लागलं होतं. तो व्हॉट्अ‍ॅपवर मित्रमंडळींसमवेतच्या डिनर वा पार्टीचे फोटो पाठवत असे. म्हणता म्हणता तो फायनल वर्षांला पोहोचला होता. आता जेव्हा वेळ मिळत असे तेव्हाच तो घरी येई. एकंदरीत सगळेजण आता आपापल्या कोषात स्थिरावले होते. आईसुद्धा मोबाइलवर वेळोवेळी चौकशी करत होती.  कॉलेजात एकंदरीत वातावरण अभ्यासमय होतं. एकत्र असूनही सगळे आपापल्यातच मग्न होते.

  त्या दिवशी शनिवार होता. दुपारचं जेवणखाण आटपून मालिनी तिच्या मैत्रिणीकडे गेल्या होत्या. त्या दोघी खरेदीला जाणार होत्या. दोघींचीही मुलं शिक्षणासाठी म्हणून दूर राहात होती. काही बारीक-बारीक जरुरीच्या गोष्टी त्यांच्यासाठी घ्यायच्या होत्या. त्या बाहेर पडणारच इतक्यात रवींद्रच्या वडिलांचा फोन आला मालिनींना, की लगेच घरी ये. त्यांना काही कळेना, काय झालं आहे. मालिनींनी घाबरून फोन मैत्रिणीकडे दिला. त्या दोघांचं फोनवर घाईतच संभाषण झालं आणि मैत्रिणीचा चेहरा गारठूनच गेला. त्या खूप बावरल्या होत्या, मनात भीतीचं काहूर माजलं होतं. घरी पोहोचताच रवींद्रच्या वडिलांनी मालिनींना खुर्चीत बसवून पाणी प्यायला दिलं. भरलेल्या आवाजात त्यांनी रवींद्र त्याच्या वसतिगृहाच्या खोलीत मृत सापडल्याची अर्ध्या तासापूर्वी त्यांना मिळालेली बातमी दिली. क्षणभर, अगदी क्षणभर, आपल्याला ऐकू आलं नसतं तर किती बरं झालं असतं.. त्या क्षणी आपल्याला काही समजायची क्षमता नसती तर किती बरं झालं असतं, असं मालिनींना वाटलं. स्थिरावलेलं जग पूर्ण ढवळून निघालं. सगळे नित्याचे सोपस्कार प्रथेनुसार पार पडले. रवींद्रचे आई-वडील आणि ज्योती सगळं यंत्रवत करत होते. या सगळय़ात रवींद्र क्षणाक्षणाला त्यांच्याबरोबरच होता. नाहीतरी त्याच्यासाठीच तर सगळं घडत होतं.

 अशा अस्वस्थ वातावरणात मनात ठुसठुसणारा प्रश्न, काय असं घडलं, की आपल्या सोज्वळ आणि अतिशय प्रेमळ मुलाला आपली आठवण ऐनवेळी आली नाही? एरवी सगळं सांगायचा. अगदी छोटय़ा छोटय़ा गोष्टीही सांगायचा. मित्राच्या वाढदिवसाला घेतलेल्या पेनाचा रंग कदाचित त्याला आवडणार नाही, म्हणून त्यानं पुन्हा शहराच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या दुकानात जाऊन ते पेन कसं बदललं, दोन तास फुकट गेले म्हणून किती वाईट वाटून राहिलं होतं त्याला.. मग आपण कसं समजावलं त्याला, याची कथा ज्योती आईवडिलांना सांगत होती. सगळीच भावविभोर झालेली. त्यांना एकमेकांनासुद्धा काही प्रश्न विचारता येत नव्हते. पोलीस केस झाली. त्यात अनेक प्रश्न पोलिसांनी विचारले होते. त्याला काही मानसिक आजार होता का? किंवा काही घडलं होतं का? अशीही विचारणा झाली. पण रवींद्रला तसा काही आजार कधी नव्हता. तो व्यवस्थित होता.

असाच महिना लोटला. अनेक लोक रवींद्रच्या आई-वडिलांना भेटून जात होते, दु:ख व्यक्त करत होते. हळहळत होते. त्या दिवशी संध्याकाळी रवींद्रच्या वर्गातील मित्र एकटाच घरी भेटायला आला होता. तो काही वेळ शांत बसला आणि त्यानं रवींद्रनं डायरीच्या कोऱ्या पानावर काढलेलं एक चित्र त्यांना दाखवलं. त्याच्या आत्महत्येच्या एक दिवस आधी तो त्या मित्राच्या खोलीत अभ्यासाला गेला होता. तेव्हा त्यानं ते चित्र रेखाटलं असावं. त्यात त्यानं एका मुलीचा सुंदर चेहरा काढला होता आणि तिला एक तरुण खूप दूरवरून ‘बाय-बाय’ करत होता. त्या मित्रानं त्यांना सांगितलं, की हे कारण आहे त्याच्या आत्महत्येचं. एक मुलगी त्याला खूप आवडत होती. पण त्याचं मन तिच्यावर जडलं होतं की नाही याचा अंदाज या मित्राला नव्हता. एक-दोन वेळा वसतिगृहाच्या मेसमध्ये त्यांनी चहा-नाश्ता एकत्र घेतला होता. अलीकडेच तिच्या आणि त्याच्या एका सिनियरच्या अफेअरची बातमी कॉलेजमध्ये पसरली होती. अगदी त्याच्या आत्महत्येच्या चार दिवसांपूर्वीचीच ती बातमी होती. आता त्याच्या आईवडिलांच्या लक्षात आलं, की त्यांचा निर्मळ मनाचा हळवा रवींद्र तो भावनिक आघात पेलू शकला नव्हता. एरवी नाराज झाला की दोन-चार दिवस तो अबोला धरायचा. पण या वेळी तो कायमसाठीच अबोल झाला होता. मालिनींनी आर्त हंबरडा फोडला. तिच्या निष्पाप लेकाला आपल्या मार्गदर्शनानं आतापर्यंत सांभाळून घेतलं होतं तिनं. तो कितीही रुसला तरी पुन्हा सावरायचा. पण त्याचा हा आघात, त्याची भावुकता या वेळी कोणालाच समजली नव्हती. आई, बाबा आणि ज्योती त्याच्या अशा जाण्यानं आणखी विमनस्क झाले. तो असा घायाळ होऊन, हृदयावरचा आघात एकटय़ानंच हृदयात दडवून निघून गेला होता याची हळहळ आज त्यांना अधिक जाणवत होती. 

 जेव्हा त्याला कुणाच्या तरी भावनिक आधाराची गरज होती, तेव्हा आपण त्याच्याजवळ नव्हतो. एकटाच किती कळवळला असेल तो. किती तडफडला असेल! त्या सगळय़ांच्या वेदना हे कारण कळल्यावर अधिक गडद झाल्या. त्यांचं मन आक्रंदून उठलं.

 खरं तर आत्महत्येनं मृत्यू स्वीकारणाऱ्या सगळय़ांनाच जगायचं नसतं हे तितकंसं खरं नाही. पण त्या वेळी होणारी ती असह्य वेदना त्यांना संपवायची असते. काही मंडळींना वाटतं, या व्यक्ती इतक्या आत्मकेंद्रित कशा होतात, की आपल्यानंतर आपल्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्याचं काय होईल, याचाही ती सारासार विचार करत नाहीत. पण मंडळी ते नेहमीच खरं नसतं. ही मंडळी मनातून गंभीरपणे आणि खोलवर दुखावलेली असतात. त्यामुळे असहाय्य आणि निराश झालेली असतात. आपल्या पसंतीनं ते आत्महत्या करतात असंही नाही. पण त्या वेळी ते सारासार विचार करायची क्षमता गमावून बसतात. विश्वास बसणार नाही, पण त्या क्षणी रवींद्रसारख्या पूर्ण ‘नॉर्मल’ असणाऱ्या व्यक्ती भावनेच्या भोवऱ्यात सापडतात. ते त्या वेळी स्वत:चा, स्वत:च्या भविष्याचा किंवा नातेवाईकांचा विचार करायच्या मन:स्थितीत नसतात. त्या वेळी ते अपार वेदनेच्या काळोख्या रात्रीत अचानक हरवलेले असतात. ‘कुठं पळू मी, कशी पळू मी, गेले मी हरवुनी, ‘सख्या रे घायाळ मी हरिणी’ अशी त्यांची भांबावलेली स्थिती असते. ही स्थिती तशी काही काळापुरतीच असते. या स्थितीत त्यांना आधार देणारा आणि प्रकाश दाखवणारा कुणी भेटला, तर ते बाहेर येतात आणि यानंतर आयुष्य व्यवस्थित जगतात. पण अशा स्थितीत त्यांना मदतीची हाक देता आली पाहिजे. आजकाल साद घालण्यासाठी हेल्पलाइन्सही आहेत. मृत्यूला साद घालणाऱ्या सर्व यातना या काही काळासाठीच होतात. त्या काळात मदतीचा हात किंवा प्रेमाचा आधार मिळाला, तर आपल्या माणसांत या व्यक्ती पुन्हा मागे वळतात, हे लक्षात ठेवायला पाहिजे. आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात जीवघेणे गोंधळलेले विचार अनेकदा येतात. आपल्या मनात निराशेचे विचार आले याचा अर्थ आयुष्य किंवा ती कठीण परिस्थिती खरंच हताशाजनक आहे असंही नाही. पुष्कळ वेळा आपल्या मनातील निर्थक विचारांचा कल्लोळ एखादी थोडीशी कठीण परिस्थिती अधिक गुंतागुंतीची भासवतो, असंभव भासवतो. पण थोडीशी सहनशीलता आणि समर्थ भावनिक आधाराच्या जोरावर मृत्यूसदृश परिस्थितीवर अनेकांनी मात केली आहे. रवींद्र जर एकटाच तळमळत राहिला नसता, थोडासा मोकळा झाला असता, आधाराचा हात मागता झाला असता, तर त्यालाही कळलं असतंच ना, की वाटावी तितकी ती परिस्थिती असह्य नव्हती. थोडा वेळ थांबून, वळून प्रासंगिक अवलोकन करता आलं, तर माणसाला पुढचं जगणं सहज सोपं होतं.

pshubhangi@gmail.com

हेल्पलाइन   हितगुज (मुंबई महानगर पालिका)

२४१३१२१२

इंडियन सायकियाट्रिक सोसायटी  १८००५३२०८०७

(संध्याकाळी ६ ते रात्री १२)

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Author dr shubhangi parkar mage rahilelya katha vyatha article mental illness persons some reasons for suicide akp