scorecardresearch

Premium

आयुष्याचा अर्थ : हे तर माझे गाणे ..

खरं म्हणजे आपण मनुष्य म्हणून या भूतलावर जन्माला येणे हेच मोठे आश्चर्य आहे असे मला वाटते. भले डार्विनचा उत्क्रांतीवादाचा नियम काही सांगो किंवा पौराणिक/ धर्मग्रंथ काहीही सांगोत! शरीरविज्ञानाचे शास्त्र आपल्या जन्मदात्या पिता व मातेच्या गुणसूत्रांनी आपण जन्माला येतो हे सांगत आहे, पण आपल्यात त्यांच्यातील काही ठरावीकच गुणसूत्रे का येतात याचे ठोस उत्तर मिळणे जरा कठीण.

आयुष्याचा अर्थ : हे तर माझे गाणे ..

दिलीप अनंत राऊत

खरं म्हणजे आपण मनुष्य म्हणून या भूतलावर जन्माला येणे हेच मोठे आश्चर्य आहे असे मला वाटते. भले डार्विनचा उत्क्रांतीवादाचा नियम काही सांगो किंवा पौराणिक/ धर्मग्रंथ काहीही सांगोत! शरीरविज्ञानाचे शास्त्र आपल्या जन्मदात्या पिता व मातेच्या गुणसूत्रांनी आपण जन्माला येतो हे सांगत आहे, पण आपल्यात त्यांच्यातील काही ठरावीकच गुणसूत्रे का येतात याचे ठोस उत्तर मिळणे जरा कठीण. आपल्या शारीरिक बांधणीचेही मला अप्रूप वाटते. योग्य ठिकाणी योग्य अवयवांची रचना! म्हणूनच आपला जन्म कारणी लागावा असे मनापासून वाटते. तसे होण्याचा प्रयत्न नकळत होत गेला आहे. आणि एकूणच आतापर्यंत जे आयुष्य जगलो ते पाहता वाटतं, की मी जे जे समोर आले ते स्वीकारले तोच माझ्या आयुष्याचा अर्थ झाला.

Infosys Narayana Murthy Consumer Brand
Narayan Murthy: ”लोकांना वाटते त्यांच्याकडे विशिष्ट फोन अन् घड्याळ असेल तर…,” नारायण मूर्तींनी यशस्वी ब्रँडसाठी दिल्या महत्त्वाच्या टिप्स
union minister nitin gadkari comment on casteism in harsh words
“जो जातीची गोष्ट करणार, त्याला लाथ पडणार,” नितीन गडकरी यांचे टीकास्त्र; म्हणाले…
January Rajyog 2024
तीन शुभ राजयोग बनल्याने तीन राशी होतील मालामाल, मिळणार गडगंज पैसा; वाचा, ज्योतिषशास्त्र काय सांगते…
qualify as marriage
दीर्घकाळ एकत्र राहण्यास लग्नाचा दर्जा मिळत नाही…

आपण ज्यांच्या पोटी जन्माला येतो त्यांचे संस्कार, सभोवतालचे वातावरण, शिक्षण व संगत यांचा आपल्या आयुष्यावर फार मोठा परिणाम होत असतो. मी राहात असलेले ठिकाण जरी आता शहरात आहे तरी अजूनही तिथे गावाचेच वातावरण आहे. त्यामुळे माझे प्राथमिक शिक्षण गावात, माध्यमिक शिक्षण शहरात व कॉलेजचे शिक्षण मुंबईला झाले. शालान्त परीक्षेत मला माझ्या अपेक्षेनुसार गुण मिळाले, पण इतर हुशार वर्गमित्र व मैत्रिणींना कमी गुण मिळाल्याने मी अनपेक्षितपणे शाळेत पहिला आलो आणि जीवनाला कलाटणी मिळाली. इथेच प्रचीती आली, की स्पर्धा किती विचित्र असू शकते.  पुढे काय करायचे याचा फारसा विचार केला नव्हता. मी वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. आता आपल्याला सतत स्वत:ला सिद्ध करावे लागणार, हा एक सामाजिक दबाव तयार झाला. शिक्षणाचे माध्यम बदलले म्हणून सुरूवात थोडी कठीण वाटली, पण पुढे थोडी सुधारणा झाली. नुसते पदवीधर होणे अपेक्षित नव्हते, मग कॉलेज करत असताना सनदी लेखापालाची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झालो. पण योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने ते अर्धवट सोडून दिले.  केवळ मुंबईतील कॉलेजमध्ये असल्याने ‘कॉस्ट अकाउंटंट’ या व्यावसायिक पदवीची माहिती मिळाली. काही मित्रांनी त्याच्या शिक्षण वर्गाला प्रवेश घेतला म्हणून मीही घेतला. कॉलेजमधील मित्रमैत्रिणींच्या संगतीचा असा परिणाम होतो. पुढे ‘बी.कॉम.’, ‘कॉस्ट अकाऊंटंट’ची इंटर एकत्र पास झालो. सकाळी कॉलेज व संध्याकाळी इंटरचे वर्ग अशी धावपळ होत होती. पण इथेच खात्री पटली की मेहनतीशिवाय यश मिळत नाही.

पुढे काय? हा प्रश्न होताच, पण सुटत गेला. एका वित्तीय आस्थापनामध्ये तात्पुरती नोकरी मिळाली, पण योगायोगाने तिथल्या गुंतवणूक खात्यात रुजू झालो. तिथे येणाऱ्या विविध कंपन्यांच्या ताळेबंदातील पत्त्यावरून मग मी स्वत: अकाउंट्स खात्यात नोकरीसाठी माझे परिचय पत्रक पाठवू लागलो आणि एका ठिकाणी मला नोकरी लागली. त्यांचा कारखाना मुंबईलाच होता. हळूहळू तेथील कामावर जम बसला. चांगले सहकारी होते. त्यामुळे कॉम्प्युटरची चांगली ओळख झाली. इथेही ऑफिसनंतर क्लासेस चालूच होते. कोणतेही काम कमी दर्जाचे नसते. त्यातून काही ना काही तरी शिकायला मिळते. असेच एक साधे काम करीत असताना त्याचे कॉम्प्युटर सिस्टिमला अकाउंटिंग कसे होते हे सहज म्हणून पाहताना त्या प्रोसेसची मोठी चूक मी निदर्शनास आणून दिली. पुढे ‘कॉस्ट अकाउंटंट’ची व्यावसायिक पदवी मिळाली व एका नामांकित कंपनीत नोकरी मिळाली. कोणत्याही कंपनीत जाण्यापूर्वी आपण आपल्या अगोदरच्या कंपनीत आपले विशेष योगदान काय दिले याला फार मोठे महत्त्व असते. असाच एक प्रयत्न एक संहिता तयार करून मीही  केला होता व त्यामुळे कंपनीला आर्थिक फायदा होणार होता. हे मुलाखतीत विशद केले त्यामुळे बऱ्याच जणांतून माझी निवड झाली. काही महिन्यातच आधी नोकरी करत असलेल्या कंपनीत वरचा हुद्दा मिळाल्यामुळे पुन्हा तिथे रुजू झालो. हा निर्णय घेताना बरेच कठीण गेले. आता वरिष्ठ बदलले होते. त्यांच्या अति महत्त्वाकांक्षेपायी कामाचा ताण जाणवू लागला. त्याचवेळी याच कंपनीच्या पूर्व मुख्य वित्तीय अधिकाऱ्यांच्या  एका नवीन कंपनीत संधी चालून आली.

इथे कामाचे स्वरूप थोडे वेगळे होते. परदेशी रिपोर्टिगही होते. पण इतर सहकारी अनुभवी असल्यामुळे इतर कामासाठी वेळ मिळे. त्यासाठीची नेमणूक वरिष्ठ करीत असत. आपल्याला चांगल्या सहकाऱ्यासोबत चांगले वरिष्ठ मिळणे हे व्यावसायिक प्रगतीसाठी जरुरी असते. कंपनीचा व्यवसाय वाढत होता व आता ती एका आंतरराष्ट्रीय कंपनीला संलग्न झाली होती. अकाउंटिंगच्या नवीन कॉम्प्युटर सिस्टिम सुरू करण्यात माझा मोठा सहभाग होता. त्यातून काही परदेशवाऱ्याही झाल्या. यातील यशाने एक आत्मिक समाधान लाभत होते तसेच पदोन्नती व पगारवाढही होत होती. इथले वरिष्ठ चांगले लाभले. इथेही एका अचानक आलेल्या प्रस्तावामुळे कंपनीचे वीजबिल कमी होऊन कंपनीला कायमचा मोठा आर्थिक फायदा झाला. त्याकामी माझेही योगदान होते. पण अचानक आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या घसरलेल्या किंमतीने कंपनीची आर्थिक घडी विस्कटली व कामगार कपात सुरू झाली. ध्यानीमनी नसताना नोकरी सोडावी लागली. पुढे काही कोर्स करून व छोटय़ा फर्ममध्ये कामही केले. ते काही जमेना. पण नोकरीला असताना आर्थिक शिस्त पाळली होती व यथायोग्य गुंतवणूकही केली होती त्यामुळे पुढचे जीवन व्यवस्थित मार्गक्रमण करीत आहे. इथे एक गोष्ट जाणवली, की आपण आपली कौशल्ये नेहमीच विकसित केली पाहिजेत. (या वेळी कंपनी सचिव या पदवीचा अभ्यास मध्येच सोडला होता याची खंत वाटली).

वैयक्तिक आयुष्यातही जोडीदार चांगला मिळाल्यामुळे अगदी साधेपणाने लग्न करण्यापासून ते एक सामान्य मध्यमवर्गीय जीवन जगत आहे. मित्रपरिवार, नातेवाईक व कुटुंबीयांची सोबत आहेच. जमेल तशी समाजसेवा करीत आहे . मध्यंतरी आरोग्याच्या तक्रारीही सुरू झाल्या. त्यांनाही सकारात्मकदृष्टय़ा स्वीकारले. म्हणून शेवटी खालच्या गीताच्या बोलातूनच आयुष्याचा अर्थ संबोधित होतो –

‘हाती नाही येणे, हाती नाही जाणे हसत जगावे, हसत मरावे, हे तर माझे गाणे’

draut12@gmail.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ayushyacha arth author dilip anant raut man surprise darwin evolutionism rules physiology scripture ysh

First published on: 04-06-2022 at 00:06 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×