कुठल्याही सजीवानं एकदा का या पृथ्वीतलावर जन्म घेतला, की त्याच्या वाटचं आयुष्य तो जगतोच. या सजीवांतील मनुष्य हा बुद्धिमान प्राणी. आपली बुद्धी वापरून, निरनिराळे शोध लावून त्यानं आपलं आयुष्यमान वाढवलं आहे; पण हे वाढलेलं/ वाढवलेलं आयुष्य तो खऱ्या अर्थानं जगतो का? हा कळीचा प्रश्न आहे. मिळालेलं आयुष्य सकारात्मकतेनं जगल्यास मानवाच्या जीवनाचं सार्थक होतं, असं म्हणता येईल. त्यासाठी जगण्याचा मंत्र त्याला कळायला हवा. मला कळलेला मंत्र एखाद्या दीपस्तंभासारखा मार्ग दाखवत आला आहे. तो म्हणजे श्रीकृष्णानं गीतेत सांगितलेलं सार- ‘जे होतं ते चांगल्यासाठीच.’
शिक्षण पूर्ण होईपर्यंत इतरांसारखाच घराच्या जबाबदारीबाबत थोडासा अनभिज्ञच होतो; पण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मात्र घरातील मोठा मुलगा असल्यामुळे कमावता होणं ही जबाबदारीची पहिली पायरी समोर उभी राहिली. साहजिकच नोकरीची शोधाशोध सुरू झाली. १९९३ च्या मे महिन्यात पदवीधर झाल्यानंतर पुढचे पाच-सहा महिने ही शोधाशोध सुरू होती. या कालावधीत नोकरीच्या बाबतीत तितकंसं यश आलं नाही; पण १९९४ चा जानेवारी महिना उजाडला आणि दोन-तीन ठिकाणी मुलाखतीसाठी बोलावलं गेलं. दोन ठिकाणी अनुभवी माणसांची आवश्यकता होती, तर एके ठिकाणी प्रशिक्षणार्थी म्हणून एक हजार रुपये महिना या अटीवर सुरुवात करता येणार होती. मी माझा निर्णय राखून ठेवला होता. त्याच दिवशी एका ओळखीच्या व्यक्तीनं एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीची संधी असल्याचं कळवलं. तिथे गेल्यानंतर लेखी परीक्षा आणि मुलाखत झाल्यानंतर प्रशिक्षणार्थी म्हणून अडीच हजार रुपये महिना मिळतील, असं सांगण्यात आलं. अगोदरच्या आणि या नोकरीच्या वेतनात बरीच तफावत होती. मी माझा होकार या कंपनीला कळवला. तिथेच ‘जे होतं ते चांगल्यासाठी’ हे पटलं. या कंपनीतल्या नोकरीनं आर्थिक स्थैर्य दिलं. घरची परिस्थिती सुधारली. लग्न झालं. नंतर वरळीत स्वत:चं घर घेता आलं.
‘जे होतं ते चांगल्यासाठी’ हे नंतर वेळोवेळी पटत गेलं. मुलींच्या शिक्षणाचं माध्यम निवडताना नैसर्गिकपणे मातृभाषेला पसंती दिली. अर्थात इंग्रजी शिक्षणाचा पगडा असलेल्यांकडून नाकं मुरडली गेली. आम्ही उभयता आमच्या निर्णयावर ठाम राहिलो. त्यानंतर दोन्ही मुलींची शैक्षणिक प्रगती आमच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करणारी ठरली आणि ‘जे होतं ते चांगल्यासाठी’ हे सिद्ध करणारी ठरली.
नोकरीची २० वर्ष झाल्यानंतर काही कारणांमुळे स्वेच्छानिवृत्ती घ्यावी लागली. त्यानंतर घरीच राहावं लागलं; पण त्यानिमित्तानं कुटुंबाला वेळ देता आला. मुलींची वेगवेगळय़ा स्पर्धाची तयारी करता आली. त्यांना स्पर्धेसाठी नेणं-आणणं आणि स्पर्धेवेळी सतत सोबत असणं यामुळे त्यांना पाठिंबा मिळून यशात भर पडत गेली. नोकरी सुटली तरी घरी राहणं ‘जे होतं ते चांगल्यासाठी’ याची साक्ष देणारा ठरलं.
असे इतरही प्रसंग, घटना उदाहरणादाखल देता येतील. आयुष्याचा अर्थ पटवून देणारं हे बोधवाक्य सतत सोबत करत असतं. त्यामुळे देवाकडे रोज सकाळी प्रार्थना करताना म्हणतो, की ‘माझा कालचा दिवस जसा चांगला गेला, तसा आजचा दिवस चांगला जाऊ दे आणि उद्याचाही दिवस चांगला जाऊ दे!’ या सकारात्मक सुरुवातीनंतर ‘जे होतं ते चांगल्यासाठी’ हा मंत्र दिवसभरात नकारात्मक विचारांना मनात थाराच देत नाही!
deepak_gundaye@rediffmail.com