‘‘पाळीव प्राणी माणसाच्या भावना ओळखतात आणि माणूस चिंतेत आहे किंवा निराश, त्रासलेला आहे, हे समजून घेऊन त्याच्या आजूबाजूला वावरतात, याचा अनुभव मी कित्येकदा घेतला आहे. माझ्या पाळीव प्राण्यांमुळे मला नेहमी आधारच मिळाला आहे. अगदी जवळच्या माणसासारखं आपलं मन ओळखणारे हे जिवलग आहेत!..’’ सांगताहेत अभिनेत्री, गीतकार आणि पॉप गायिका सुचित्रा कृष्णमूर्ती.

माझं प्राणिमात्रांवरचं प्रेम फार जुनं. शाळेतून येता-जाता कुत्रे, मांजरी, गाई, पक्षी, सगळय़ांकडे एका अनामिक ओढीनं पाहात मी घरी येत असे. त्या वेळेस आम्ही दक्षिण मुंबईत राहात असू. नेपीयन सी रोडवर असलेल्या आमच्या टोलेजंग इमारतीत जी कुटुंबं राहात होती, त्यांच्यापैकी काही कुटुंबांत ‘पेट्स’ होते. संध्याकाळी, सकाळी ते आपल्या पाळीव प्राण्यांना घेऊन खाली फेरफटका मारण्यासाठी येत मला तेव्हा त्यांचा मोठा हेवा वाटत असे.
एकदा शाळेच्या वार्षिक परीक्षा झाल्या, गृहपाठ आणि चाचणी परीक्षांमधून किमान दोन महिने सुटका मिळाली म्हटल्यावर मी वडिलांच्या मागे टुमणं लावलं, की मला आता कुत्रा आणून द्या! मी घरी कुत्रा पाळण्याचा हट्ट धरीन असं त्यांना वाटलं नव्हतं. घरी पेट्स पाळण्यातला आनंद शब्दातीत असतो. पण तरी कोणत्याही प्राण्याला पाळणं ही मोठी जबाबदारी आहे.

flowers, plant flowers,
निसर्गलिपी : हिरवा कोपरा
Keri Rings Pakoda Crispy raw mango pakoda kairi bhaji
गरमा गरम कुरकुरीत कैरीची भजी, एकादा खाल तर खातच राहाल! पाहा हटके रेसिपी Video
alu in garden
निसर्गलिपी : येता बागेला बहर…
diver artist uma mani began exploring new depths to life at age 49
४९ व्या वर्षी शिकल्या स्कुबा डायव्हिंग; आज समुद्र संरक्षणासाठी करतायत मोलाचे काम; कोण आहेत उमा मणी?

प्राण्यांना पाळणं म्हणजे त्यांना आपल्या कुटुंबाचा सदस्य होऊ देणं. त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी घेणं, त्यांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेणं, वेळच्या वेळी रोगप्रतिबंधक लशी देणं, फिरायला नेणं, त्यांच्याबरोबर खेळणं, स्वच्छता ठेवणं, अशा अनेक गोष्टींचा अंतर्भाव असतो. त्यासाठी वेळ द्यावा लागतो, मेहनतदेखील लागते. आपल्या घरातल्या पाळीव प्राण्यानं घरात प्रातर्विधी केलेले स्वच्छ करणं हेदेखील दैनंदिन काम. त्याला आंघोळ घालून स्वच्छ ठेवावं लागतं.. अशी कामं असतातच. माझ्या आई-वडिलांना (वडील व्ही. कृष्णमूर्ती आणि आई डॉ. सुलोचना) पेट्सच्या या अतिरिक्त जबाबदाऱ्यांबद्दल चांगलीच कल्पना होती. त्यांनी माझ्यावर अशी गुगली टाकली, ‘‘सुचित्रा, सध्या तुला सुट्टी लागली आहे म्हणून तू पेट्सना वेळ देऊ शकशील; पण लक्षात घे, घरात आणलेल्या प्राण्याशी फक्त खेळलं की तुझी जबाबदारी संपत नाही. तुलाच त्याला स्वच्छ ठेवावं लागेल, तुलाच त्यांच्या सगळय़ा स्वच्छतेचं पाहावं लागेल, त्याला फिरायला न्यावं लागेल.. पाहा, तुला हे काम दररोज जमणार असेल, तर आपण तुझ्यासाठी पेट- बेबी डॉग घरी आणू.’’

आईला वाटत होतं, की कुत्र्यांची शी-शू साफ करण्याचं काम माझ्या गळय़ात टाकल्यावर मी तयार होणार नाही आणि आपोआप नकार देईन. मग पाळीव प्राणी आणण्याचा प्रश्न निकालातच निघेल! पण नाही! मी या सगळय़ाला होकार दिला आणि पुढच्या रविवारी आम्ही कुत्रा विकत घेण्यासाठी क्रॉफर्ड मार्केटमध्ये गेलो. मी अतिशय उतावीळ झाले होते. कधी एकदा कुत्र्याला घेऊन घरी जातोय असं झालेलं! आणि त्या दिवसापासून आजपर्यंत माझ्या घरी पाळीव प्राणी आहेतच. आता माझी मुलगी कावेरी हिलादेखील आपसूकच प्राण्यांचा लळा लागला आहे.

त्या दिवसानंतर आई-बाबांनी खरोखरच माझ्यावर घरातल्या डॉगीची जबाबदारी पूर्णार्थानं सोपवली. मी साखरझोपेत असताना ते दोघं मला तमिळमध्ये हाका मारून उठवत आणि सांगत, ‘‘सूचि, चल ऊठ बरं, तुझ्या बोस्कीनं सूसू केलीय! सगळं स्वच्छ कर बरं!’’ त्यांनी लावलेल्या या शिस्तीचा मला फायदाच झाला. लहानपणापासून मी स्वावलंबी झाले. घरातल्या पेट्सची काळजी कशी घ्यावी हे समजलं, त्यात मी दक्ष झाले. आमची ही बोस्की ‘डशंड’ ब्रीडची होती. ती फार लवकर मरण पावली आणि त्यानंतर मी खूप उदास राहू लागले. मग वडिलांनी माझ्यासाठी पर्शियन मांजर आणली. मी तिच्याबरोबर रमले, पण एक दिवस ही मांजर अचानक कुठे निघून गेली काही समजलंच नाही.

मांजर निघून गेल्यावर मला पुन्हा एकटेपणा वाटू लागला. पुन्हा एकदा घरात कुत्रा आणावा असं अम्मा-आप्पांनी ठरवलं. त्याचदरम्यान दिल्लीच्या एका स्नेह्यांनी एका जखमी कुत्र्याविषयी फोनवर सांगितलं, की त्यांना दिल्लीच्या रहदारीत रस्त्यात एक जखमी, बेवारस कुत्र्याचं पिल्लू आढळलं. ते पिल्लू बिचारं रस्त्यात विव्हळत होतं. त्याला त्यांनी त्यांच्या घरी नेलं आणि फोनवर त्याच्याविषयी आम्हाला सांगितलं. मी आणि आप्पांनी फ्लाइटनं त्याला दिल्लीहून मुंबईला आणलं. तेव्हा तो पूर्ण बराही झाला नव्हता. दररोज त्याला स्वच्छ करून त्याच्या जखमांवर आम्ही औषध लावत असू, ड्रेसिंग करत असू; पण जखमांमुळे तो बेचैन होत असे. त्याला थंड वाटावं म्हणून त्याच्या खोलीत आम्ही रात्रभर एसी लावून ठेवत असू. त्याला कापसाच्या बोळय़ानं बरेच दिवस दूध पाजलं. काही दिवसांनी पिल्लू बरं झालं. त्याचं नाव मी बर्नार्ड ठेवलं. बर्नार्डबरोबर माझं बालपण सुखाचं झालं. मी बर्नार्डबरोबर अगदी निर्थक बडबड करत बसे. आमच्या दोघांचं एक भावविश्व होतं. पुढे आमच्याकडे दोन स्पॅनियल प्रजातीची पपीज् आली. त्यांच्याशी खेळण्यात माझा आणि कावेरीचा खूपसा वेळ अतिशय आनंदात जात असे. ही दोन कुत्री इतकी गोंडस होती, की मी त्यांना ‘कप केक’ आणि ‘मफिन’ अशीच नावं दिली होती.

माझ्या जीवनाच्या पुढच्या टप्प्यावर मला १० वर्ष लंडनला राहावं लागलं. लंडनला जाण्यापूर्वी माझ्यापुढे मोठा प्रश्न होता, तो म्हणजे पेट्सना कुठे सुरक्षित ठेवावं? कुलाब्याला माझी मैत्रीण समिथा राहात असे. तिनं आनंदानं आमच्या कुत्र्यांची जबाबदारी घेतली आणि मी चिंतामुक्त झाले. लंडनहून मी वरचेवर फोन करून त्यांची ख्यालीखुशाली विचारत असे. मी लंडनहून भारतात परत आल्यावर मात्र मैत्रिणीकडून आमचे कुत्रे परत आणणं योग्य वाटत नव्हतं, कारण आता ते दोघं मैत्रिणीच्या घरात छान रुळले होते. त्यामुळे मी मुंबईत येताच पुन्हा नवीन पेटस् आणले, मुंबईतलं रुटीन सुरू झालं. कावेरीला तर सतत तिच्यासोबत पाळीव प्राणी हवे असत.

जिवाला जीव देणारे मुके जीव आपल्या आयुष्यात प्रत्येक क्षणी धीरोदात्त साथ देतात. विशेषत: आम्हा कलाकारांच्या जीवनात. कधी आमच्याकडे काम असतं, तर कधी नसतं! काम नसलं, की अगदी स्वाभाविकपणे मनात नैराश्याचे ढग दाटून येतात. मनातली बैचेनी, अस्थिरता, भीती वाढत जाते. मला प्रकर्षांनं वाटतं, की त्या त्या हळव्या क्षणी हे मुके जीव कसलीही अपेक्षा न करता आपल्या मनाला उभारी देतात. त्यांची मौन साथ मला खूप मोलाची वाटते. नुकतंच माझ्या वडिलांचं वृद्धापकाळानं निधन झालं. वडील गेल्याचं मला अतोनात दु:ख झालं होतं, पण आईला या धक्क्यातून कसं सावरावं, हा मोठा प्रश्न होता. त्यांचं वैवाहिक जीवन ४६ वर्षांचं. अम्माला आप्पांच्या पश्चात कसं राहाता येईल अशी काळजी वाटत होती.. पण घरात पाळीव प्राणी असल्यामुळे त्यांच्या लीला पाहाण्यात तिची निराशा, एकाकीपण हळहळू कमी होतंय, तिच्याही चेहऱ्यावर किंचित हसू येतंय.

किमान ४० वर्ष आमच्याकडे असलेल्या वेगवेगळय़ा कुत्र्यांनी, मांजरींनी माझ्या कुटुंबाचं जीवन व्यापलं आहे. जितका आनंद त्यांच्या सान्निध्यात मिळाला तितका अन्य कशानंही लाभला नाही. घरात पाळलेल्या कुत्र्यांना आठवडय़ातून किमान दोनदा स्वच्छ आंघोळ घालणं गरजेचं असतं. दोनदा न जमल्यास किमान एकदा. त्यांची त्वचा संवेदनशील असते, त्यामुळे ती कोरडी ठेवावी लागते. प्राण्यांच्या शरीराला एक प्रकारचा गंध असतो. तो नकोसा वाटत असल्यास औषधांच्या दुकानात वाइप्स मिळतात त्यावर लॅव्हेंडरचे २ ते ३ ड्रॉप्स घालून त्यानं कुत्र्यांना स्वच्छ पुसून घ्यावं लागतं. दोन दिवसांतून एकदा तरी ड्राय शाम्पूनं त्यांना पुसून काढल्यास चांगलं. घरच्या पेट्ससाठी सुगंधित स्पा किटसुद्धा मिळतं. मी माझ्या घरातल्या पेट्सना स्वत: आंघोळ घालते, ड्राय शाम्पूचा वापर करून त्यांना ‘स्पा ट्रीटमेंट’ देते. त्यामुळे माझ्या घरातील माझ्या पेट्सच्या अंगाला कधी दरुगध येत नाही. त्यांची वैद्यकीय तपासणी दर महिन्याला होते. पाळीव प्राणी हे माझ्यासाठी कधीच ओझं नव्हते. त्यामुळे मी त्यांना मनापासून सांभाळते.

पाळीव प्राण्यांबरोबर खेळणं फार महत्त्वाचं असतं. ते खेळणं म्हणजे त्यांच्यासाठी मानसिक आनंद आणि शारीरिक व्यायाम असतो, जो फार आवश्यक असतो. पाळीव कुत्र्यांना मानसिक आनंद आणि रोजचा व्यायाम मिळाला नाही, तर ती चिडचिडी होतात, जास्त प्रमाणात भुंकू लागतात, क्वचित पिसाळतातही.मध्यंतरी मी पेंटिंगच्या वर्गाला जात होते. अम्मा वामकुक्षी घेत असे आणि कावेरी तिच्या क्लासला जात असे. तेव्हा झालं असं, की आमच्या कुत्र्यांसाठी नेमलेला केअरटेकर त्यांना पुरेसं खायला देत नसे आणि मग दुपारभर ही कुत्री भुंकून घर डोक्यावर घेत. ते बिचारे बोलू शकत नसल्यामुळे आपली भूक, आपल्या भावना भुंकण्यातून व्यक्त करत. असा प्रकार महिनाभर चालू होता. माझ्या घरातली कुत्री इतकी भुंकताहेत हे शेजारच्यांसाठीही नवं होतं. त्यामुळे त्यांनी मला फोन करून ते सांगितलं. मी घरी आल्यानंतर दोन्ही डॉगी (मून आणि मच्छा) का भुंकत असतात, म्हणून केअरटेकरला विचारलं, पण समाधानकारक उत्तर मिळालं नाही. काही दिवसांनी पुन्हा मी पेंटिंग वर्गाला गेले असतानाच इमारतीच्या सेक्रेटरींचा फोन आला, ‘‘तुमची कुत्री आमच्या मजल्यावर फिरताहेत. बहुदा केअरटेकरनं त्यांना फिरवून आणल्यावर तुमच्या घरी नेलं नसावं, जरा पाहा.’’ मी लगेच घर गाठलं. इमारतीच्या वरच्या मजल्यांवर माझी कुत्री भरकटल्यासारखी फिरत होती! मी पुन्हा केअरटेकरला जाब विचारला, पुन्हा समाधानकारक उत्तर नाही. मग मी केअरटेकरला कामावरून काढून टाकलं. या प्रकारानंतर मून आणि मच्छामध्ये ‘एन्झायटी’ वाढलेली दिसत होती. डॉक्टरच्या उपचारानंतर फारसा फरक पडला नाही. मग मी त्यांना होमिओपॅथी औषध सुरू केलं आणि त्यांच्यात फरक पडला. ते नीट अन्न खाऊ लागले, न भुंकता त्यांना शांत झोप लागणं सुरू झालं; पण त्या व्यक्तीमुळे माझ्या कुत्र्यांना सोसावं लागलंच, शिवाय मला आणि कुटुंबाला मनस्ताप झाला तो वेगळाच. असेही प्रसंग पाळीव प्राण्यांच्या बाबतीत घडतात. त्यामुळे प्रत्येक वेळी त्यांना केअरटेकरच्या हातात सोपवून आपलं काम संपलं, असं होत नाही.

दिवाळीसारख्या सणांना फटाक्यांच्या आवाजामुळे प्राण्यांना त्रास होतो, अशी तक्रार प्राणिप्रेमी करतात. मला वाटतं, की अशा प्रसंगी आपल्या पाळीव कुत्र्यांच्या कानात कापसाचे बोळे घालावेत आणि त्यांना कमीत कमी त्रास व्हावा म्हणून प्रयत्न करावा. शक्यतो फटाके उडवूच नयेत. निदान कमी आवाजाचे आणि जास्त धूर होणार नाही असे फटाके उडवावेत. पाळीव प्राण्यांची काळजी कशी घ्यायची, तर जशी आपण घरातल्या लहान मुलांची काळजी घेऊ तशीच! आपल्या पेट्सचा कुणाला त्रासही होता कामा नये.

मला माझ्या पाळीव प्राण्यांनी नुसतं प्रेमच नाही, तर हळव्या क्षणांमध्ये आधाराचा हात दिला. असा आधार, जो घरातली अगदी जवळची मंडळी, प्रियजन, जवळचे मित्रच देऊ शकतात. तसं पाहिलं, तर या प्राण्यांना प्राणी तरी का समजावं? जीव लावून, मूक संवाद साधून आधाराची ऊब देणारे हे जिवलगच!
( मुलगी कावेरीसह सुचित्रा कृष्णमूर्ती )
शब्दांकन- पूजा सामंत
samant.pooja@gmail.com