टपालवाटप करता करता आपल्यातला माणूस हरवणार नाही याची खबरदारी भारतीय पोस्टमनप्रमाणे अमेरिकेतले मेल कॅरिअर्सही घेतात असे वाटते. मेल बॉक्समध्ये पत्र ठेवताना मेल कॅरिअर ग्रीटिंग कार्ड किंवा एखादं बरं दिसणारं टपाल वर ठेवून बिलं वगैरे तळाशी ठेवतात. तसा काही नियम नसतो, पण ज्याला मेल मिळणार आहे, त्याच्या भावनांची कदर करण्याचा हा एक लहानसा प्रयत्न असतो. भारतात कदाचित नसेल, पण अमेरिकेत घरात एकटय़ा राहणाऱ्या व्यक्तींच्या जिवाचं बरं-वाईट झालं, तर त्याची पहिली कुशंका मेल कॅरिअरला येते. मेल-बॉक्समधली मेल बॉक्समध्ये साठलेली दिसली, तर मेल-कॅरिअर तसं पोलिसांना कळवून त्या व्यक्तीच्या शेवटच्या प्रवासाला निघायला मदत करतात.
‘डा किया डाक लाया.. डाक लाया..’ हे  हिंदी चित्रपटातलं प्रसिद्ध गाणं ज्या पोस्टमन नामक व्यक्तीवर आधारित आहे त्याचं भारतातल्या लोकजीवनातलं स्थान, विशेषत: ग्रामीण भागातलं महत्त्व अबाधित आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे आता परिस्थिती बदलली असली तरी हे निरोपे आपल्या भूतकाळाचा अविभाज्य भाग आहेत हे नक्की.  
जॉन हा माझा अमेरिकेतला डाकिया आहे, पण आठवणीतला पहिला, अजूनही बऱ्यापैकी लक्षात राहिलेला पोस्टमन म्हणजे केशवकाका. पोस्टमनपेक्षा आजोबांच्या घरी नियमितपणे येणार पाहुणा म्हणून केशवकाकांची आम्हाला जास्त ओळख. आजोबांचं घर खेडय़ातलं, साधं पण खूप प्रशस्त होतं. मोठय़ा घरात राहणारी माणसंही मोठय़ा मनाची होती. घरात पै-पाहुण्यांचा राबता कायमचा. जवळचे-लांबचे नातेवाईक, गावातल्या कालभैरवाचं दर्शन करायला आलेले भक्त, कीर्तनकार, पुराणिकबुवा आणि आठवडय़ातल्या दोन संध्याकाळी आणि दोन रात्री वस्तीला असणारे पोस्टमन-केशवकाका कदम. केशवकाकांचा एकेरी उल्लेख आम्ही कधीच केला नाही. धोतर, खाकी कोट, डोक्यावर खाकी टोपी आणि पायात वहाणा. खांद्याला दोन पिशव्या-एक टपालाची आणि एक स्वत:चे कपडे, शिधा (खिचडी करता एकत्र केलेले तांदूळ आणि डाळ) असं सामान असलेली. आजोबांच्या घरात बाहेरच्या मांडवात एका कोपऱ्यात लहानशी चूल होती. झोपाळाही होता. वाटेचे वाटसरू जेव्हा निवाऱ्याला येत, तेव्हा चुलीवर रांधीत आणि झोपाळ्यावर झोपत. मागील दारी विहीर होती आणि नदीही फारशी लांब नव्हती. केशवकाका नेहमीच येणारे आणि सज्जन, निरुपद्रवी पाहुण्यांच्या कॅटेगरीतले. त्यांच्या जेवणाच्या वेळी आजी आमच्या हाती द्रोणात घालून त्यांना ताक, लोणच्याची फोड असे देत असे. सणासुदीच्या दिवसांमध्ये कधी तरी एखादी दशमी आणि थोडासा गुळांबा.    
केशवकाका जरा गंभीर प्रकृतीचे होते. त्यांच्याबद्दलची एक आठवण मात्र मनात कायमची कोरली गेलीय. जवळ जवळच्या ५-६ खेडय़ांमधे पत्रवाटप करून केशव काका दमून-भागून आमच्या घरी येत असत. खिचडी रांधून आणि खाऊन झाल्यावर भाऊंशी म्हणजे माझ्या आजोबांशी विडीचे झुरके घेत थोडय़ा गप्पा मारीत. एकदा त्यांनी भाऊंकडे २ रुपये मागितले. शेजारच्या खेडय़ात रखमाआजी एकटीच राहत असे. तिचा नातू शहरात गिरणी कामगार होता. आजीला न चुकता मनीऑर्डर करीत असे. यावेळी मनीऑर्डरला बराच उशीर झाला होता. म्हातारीला दिवसातून दोन वेळा चहा प्यायचं व्यसन(?) होतं. मनीऑर्डरला उशीर झाल्याने म्हातारीची चहाची तलफ भागेना. म्हातारी अशी मानी की कोणी चहा देऊ  केला, तरी तो घेणं तिच्या स्वभावात नव्हतं. केशवकाकांनी भाऊंकडे म्हातारीसाठी दोन रुपये मागितले आणि भाऊंनी ते त्याला दिले. मात्र दोन दिवसांनी केशवकाकांनी ते परतही दिले. नातू मनीऑर्डर न करता आजीला भेटायलाच आला होता. खाकी कोटाच्या आत जपलेली केशवकाकांची माणुसकी आम्हाला जाणवली पण आता प्रश्न पडतो तो असा की पोटासाठी वणवण फिरणाऱ्या केशवकाकांना त्यांच्या मुलाबाळांची, कुटुंबाची विचारपूस करण्याची माणुसकी कोणी दाखविली असेल का?
   सुट्टी संपून शहरात घरी परतलं की शाळा-कॉलेजच्या, परीक्षांच्या गडबडीत पोस्टमनचं अस्तित्व दिवाळीशिवाय एरवी फारसं जाणवत नसे. दिवाळीला आई पोस्टमनकरिता लहानशा पाकिटात घालून पैसे ठेवीत असे. दिवाळीचे हे बक्षीस म्हणजे तेव्हा आणि आताही ‘फूल ना फुलाची पाकळी’ असंच वाटतं.
  आणखी एक आठवण. पत्र घेऊन येणारा पोस्टमन बदलला होता. आता माने आले. माझं लग्न कांदेपोह्य़ाचा कार्यक्रम होऊन झालं. मुलगी पसंत असल्याचं मध्यस्थांकडून कळलं होतं, पण आम्ही रीतसर येणाऱ्या पत्राची वाट बघत होतो. घरोघरी फोन येण्यापूर्वीचा हा काळ. माझ्याबाबतीत सांगायचं तर होणारा नवरा नोकरीनिमित्त लांबच्या मोठय़ा शहरात, त्याचे आई-वडील दूरवर एका लहान शहरात आणि मी मुंबईला अशी त्रिस्थळी विखुरलेली मंडळी. अंतिम होकार आमच्यापर्यंत यायला भरपूर वेळ लागला. दिवसातून दोन वेळा टपाल घेऊन येणाऱ्या मानेंची मी गॅलरीत उभी राहून वाट बघत असे. शेवटी सासऱ्यांच्या सुवाच्य अक्षरात आईचं नाव आणि पत्ता लिहिलेलं इनलॅण्ड लेटर मानेसाहेबांनी हातात दिलं आणि माझा आनंदी चेहरा बघून प्यायला पाणी मागितलं. दाराजवळच्या खुर्चीत त्यांना बसायला सांगून, आईनं दिलेल्या दोन करंज्या आणि पाणी देऊन मी न बोलता माझे आभार त्यांना कळविले. माझ्या आयुष्यात जरी माने पोस्टमन आनंदाची बातमी घेऊन आले, तरी खेदाच्या, निराशेच्या, अपमानाच्या अशा सगळ्या भाव-भावनांनी भरलेली पत्रं वाटायचं कामही माने नाइलाजाने वर्षांनुर्वष म्हणजे सेवानिवृत्त होईपर्यंत करत राहिले. युनिफॉर्मचे साधे-सुधे धुवट कपडे, मजबूत वहाणा, खांद्याला अडकवलेली पत्रांनी भरलेली बॅग, रापलेला चेहरा याच्या मागचा माणूस कसा असेल असं मला नेहेमी वाटत असे. मान्यांच्या घरी कोण कोण असेल, दिवसभराची पायपीट करून घरी गेल्यावर घराचं भाडं, वाण्याचं बिल, मुलांच्या शिक्षणाचे खर्च हे सारं त्यांना सतावत असेल का?  मुळात इतक्या तुटपुंज्या पगारात त्यांच्या नशिबी बायको, मुलांनी भरलेलं घर असेल का?  नाही म्हणायला मी जेव्हा दिल्लीला गेले, तेव्हा जानेवारीचा महिना होता. सहा फूट उंच, गरम कोट घातलेल्या, मजबूत, देखण्या तरुणाने जेव्हा माझ्या हातात पत्र देऊन ‘नमस्ते बीवीजी’ म्हटले, तेव्हा मला त्या देखण्या पोस्टमनने सुखद धक्का दिला होता. भारतात असे धक्के पोस्टमनच्या बाबतीत तसे दुर्मीळच. कष्टी, दमलेल्या चेहऱ्याचे, बारीक चणीचे अशी भारतीय पोस्टमनची प्रतिमा माझ्या मनात तयार झाली आहे.
अमेरिकेला ‘घर’ म्हटल्याला बराच काळ लोटल्यामुळे प्रत्येक बाबतीत भारत आणि अमेरिकेची तुलना करून बरं-वाईट, बरोबर-चूक, योग्य-अयोग्य असं पडताळून बघायची सवय लागली आहे. अमेरिकेतल्या पोस्टल सिस्टीमला भारदस्त इतिहास आहे. बेंजामिन फ्रँकलिन, अब्राहम लिंकन, हॅरी ट्रमन अशा दिग्गजांनी टपाल खात्यात नोकरी केलेली आहे. १८४५ सालापासून महिलासुद्धा पत्रवाटप करीत असून आजमितीला एकूण कर्मचाऱ्यांच्या ४५ टक्के महिला मेल कॅरिअर्स आहेत. पत्रवाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कष्ट इथेही खूप आहेत. साधारणपणे १० मैल रोजचं चालणं असतं. वाहन असलं, तरी कधी कधी ते एका ठिकाणी पार्क करून चालत चालत काम करावं लागतं. नोकरीच्या आधी मुलाखतीच्या वेळी ७० पौंडाचं ओझं उचलून दाखवायला लागतं. (प्रत्यक्षात रोजच्या कामात काही इतकं जड पार्सल उचलायची वेळ येत नाही.) बायका, पुरुष सगळ्यांचा फिक्या निळ्या रंगाचा शर्ट आणि जरा गडद निळ्या रंगाची पँट (बायकांना स्कर्टचा ऑप्शन असतो) असा गणवेश असतो. कुठलाही युनिफॉर्म म्हटला, की त्याची शिस्त असते. अमेरिकेत शाळेतली मुलेही ही शिस्त पाळतात. ही शिस्त म्हणजे टॉप-शर्ट किंवा ब्लाऊज हा नेहमी पँटच्या (अथवा स्कर्टच्या) आत खोचलेलाच असायला हवा.  
टपालवाटप करता करता आपल्यातला माणूस हरवणार नाही याची खबरदारी भारतीय पोस्टमनप्रमाणे अमेरिकेतले मेल कॅरिअर्सही घेतात असे वाटते. माझ्या शेजारच्या घरात मार्था एकटीच राहते. घराची रस्त्याच्या बाजूची जी खिडकी आहे, तिथे आपल्या मांजरीला मांडीवर घेऊन मोठय़ा खुर्चीत बसून येणाऱ्या-जाणाऱ्या गाडय़ा बघत जीव रमवत असते. मेल कॅरिअरची व्हॅन दिसली की आनंदून जाते. आमचा मेलमन जॉन व्हॅनमधून खाली उतरतो. मार्थाला कधी पत्रं आलेली असतात, कधी नसतात. पण जॉन आपल्या कामाच्या वेळातला दोन मिनिटांचा वेळ मार्थाच्या खिडकीजवळ जाऊन तिची विचारपूस करण्यात जरूर खर्च करतो. कधी रजिस्टर पत्र घेऊन कोणाच्या घरात गेला, तर खुशाली विचारून, हवा-पाण्याच्या गप्पा केल्याशिवाय आपल्या व्हॅनकडे परत जात नाही.
मेल-बॉक्समध्ये पत्र ठेवताना मेल कॅरिअर ग्रीटिंग कार्ड किंवा एखादं बरं दिसणारं टपाल वर ठेवून बिलं वगैरे तळाशी ठेवतात. तसा काही नियम नसतो, पण ज्याला मेल मिळणार आहे, त्याच्या भावनांची कदर करण्याचा हा एक लहानसा प्रयत्न असतो. भारतात कदाचित नसेल, पण अमेरिकेत घरात एकटय़ा राहणाऱ्या व्यक्तींच्या जिवाचं बरं-वाईट झालं, तर त्याची पहिली कुशंका मेल कॅरिअरला येते. मेल-बॉक्समधली मेल बॉक्समध्ये साठलेली दिसली, तर मेल-कॅरिअर तसं पोलिसांना कळवून त्या व्यक्तीच्या शेवटच्या प्रवासाला निघायला मदत करतात.
अमेरिकेतल्या लोकांना दिलदारपणाने दुसऱ्यासाठी पदरचे पैसे खर्च करायला मनापासून आवडतं. त्यातून मेल कॅरिअर, शाळेतले शिक्षक ही तर खास आवडीची मंडळी. काही वर्षांपूर्वी आमच्या आणि अलीकडच्या, पलीकडच्या ४-५ रस्त्यांवरच्या घरांकरिता टपालवाटपाचं काम रोझी नावाची कृष्णवर्णीय हसरी महिला करत असे. रोझी आई होणार असल्याचं जेव्हा आमच्या लक्षात आलं, तेव्हा पटापट फोन फिरविले गेले. आठवडय़ाच्या सुरुवातीला प्रत्येक मेल-बॉक्समध्ये रोझीच्या नावाने छोटी गिफ्ट बॅग होती. रोझीने पुढच्या आठवडय़ात प्रत्येकाच्या मेल-बॉक्समध्ये ‘थँक्यू कार्ड’ ठेवलं आणि हा ‘बेबी शॉवर’ तिच्या कसा कायम स्मरणात राहील तेही कळवलं. मेल कॅरिअर हा वेगवेगळ्या भावना पत्राद्वारे तुमच्यापर्यंत पोचवणाऱ्या दूताचं काम करत असला, तरी तो कायम निर्लेप, अलिप्त राहू नाही शकत. भारतात काय किंवा अमेरिकेत काय आपलं काम करताना स्थितप्रज्ञ असणं सोईचं असूनही माणुसकी न सोडणारा (सोडणारी)अशी ही आपली मित्रमंडळी. एकाच तऱ्हेचं काम भारतात आणि अमेरिकेत दोन्ही देशांत करत असूनही भारतात मात्र त्यांचं काम अगदीच दुर्लक्षित झाल्यासारखं राहून राहून वाटतंय.
येथील राहणीमानाचा मुद्दा लक्षात घेतला तरी अमेरिकेतला मेल कॅरिअर आपल्या पोस्टमन काकांपेक्षा खाऊन -पिऊन सुखात असतो. समाजाच्या मध्यमवर्गात त्याची गणना होते. वर्षांकाठी ४०,००० डॉलर्स पासून सुरू होणारा पगार बऱ्यापैकी वाढू शकतो. नोकरी मिळणं फार काही अवघड नसतं. खात्याची प्रवेश परीक्षा द्यायची, वाहनपरवाना तयार ठेवायचा आणि मुलाखतीच्या कॉलची वाट बघायची. (नाही म्हणायला सध्या अमेरिका बेकारीच्या भोवऱ्यात सापडलेली आहे आणि पोस्टामधल्या नोकऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे. परिस्थिती सुधारावी अशी सगळ्यांचीच इछा आहे.) भारतातला मेल कॅरिअर परिस्थितीने गरीब असावा असा माझा अंदाज आहे. माझा अंदाज चुकीचा असून त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली असली, तर ती आनंदाचीच गोष्ट आहे.
मात्र, इंटरनेट, मोबाइल फोन, पार्सल सव्‍‌र्हिसेस या साऱ्यांच्या १९९०-९१ पासूनच्या अतिक्रमणांनंतरही पत्रवाटपाचे काम माणुसकीचं भान ठेवत करणाऱ्या, रोज मैलोन्मैल पायपीट करणाऱ्या टपाल कर्मचाऱ्यांच्या भविष्यात काय वाढून ठेवलंय कुणास ठाऊक!     

a father helps mother from last 35 years a true lovely life partner a daughter shared post viral
Video : जोडीदार असावा तर असा! “गेल्या ३५ वर्षांपासून बाबा स्वयंपाकघरात आईला मदत करतात” तरुणीची पोस्ट व्हायरल
Jeep Meridian X Edition
भारतात लाँच झाली Jeep Meridian X, जाणून घ्या किंमत अन् जबरदस्त फिचर्स
Hasan Ali suffers generator celebration
T20 Blast 2024 : पाकिस्तानच्या हसन अलीला विकेटनंतर ‘जनरेटर’ सेलिब्रेशन करणे पडले महागात, VIDEO होतोय व्हायरल
Ukraine allows US weapons to be used on Russian territory
रशियाच्या हद्दीत अमेरिकेची शस्त्रास्त्रे वापरास युक्रेनला परवानगी… युरोपातील युद्धाचे चित्र पाटलणार?
T20 World Cup 2024 USA Cricketer Saurabh Netravalkar Profile
T20 WC 2024: मुंबईचा मराठमोळा इंजिनियर कसा झाला अमेरिकेचा फास्ट बॉलर; आता भारताविरुद्धच परजणार अस्त्रं
Why is it challenging to give up smoking
World No Tobacco Day: “धूम्रपान सोडणे इतके अवघड का आहे? तुम्हाला धुम्रपान करण्याची इच्छा का होते? जाणून घ्या…
Adani Ports to enter Sensex (1)
अदाणी पोर्ट्स सेन्सेक्समध्ये प्रवेश करणार; भारतातील प्रमुख शेअर बाजार निर्देशांक कसे कार्य करतात?
Serum, Maleria vaccine,
सीरमची हिवतापाची लस भारतासाठी नाही! भारतीयांना कधी मिळणार याचं पूनावालांनी दिलं उत्तर…