आपल्याकडे कोणतीही कृती करण्याच्या आधी किंवा कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी ‘लोक काय म्हणतील?’ या घटकाचा विचार बहुतांशी केला जातोच. आता परीक्षांचे दिवस चालू आहेत, पुढे करिअरची निवड करताना मुलांचे गुण, क्षमता, आवड, याबरोबरीने एखादं विशिष्ट क्षेत्र निवडलं तर समाज काय म्हणेल, याचाही अंतर्भाव निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये असतो.
मुलांना विज्ञान आणि गणितात कमी गुण असले, तरी कला शाखेला गेल्यास लोक काय म्हणतील, म्हणून त्यांना बळजबरी विज्ञान शाखेत घातले जाते. बापरे! आपल्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या निर्णयांना प्रभावित करणारे हे ‘लोक’ असतात तरी कोण? काय आणि किती काळ ते आपल्या निर्णयांबद्दल बोलतात बरं? ते जे काही ‘म्हणतात’, ते किती विचार करून आणि योग्य बोलतात? ‘लॉजिक’ बाजूला ठेवा, त्याचा काहीही उपयोग इथे होत नाही. हे लोक प्रत्येक गोष्टीत चूक-बरोबर काही तरी बोलतात, आपल्या पोतडीतले हाताला लागतील ते शिक्के (लेबल्स) फारसा विचार न करता दुसऱ्यांना फेकून मारतात. ‘फेव्हिकॉल का जोड’सारखे हे शिक्के समोरच्याला आयुष्यभर चिकटून राहतात. ती व्यक्ती झपाटल्यासारखी तो शिक्का पुसून टाकायच्या प्रयत्नात समाजातून बाजूला एकटी फेकली जाते. समाजानं दिलेले ते शिक्के सोडता त्याच्याकडे काहीच उरत नाही.
२००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रॉकेट्री’ या चित्रपटात संशोधक नम्बी नारायण यांच्यावर झालेल्या हेरगिरीच्या आरोपांमुळे लागलेल्या काळिम्याचं चित्रीकरण केलं आहे. आरोप जरी फक्त त्यांच्यावर झाले, तरी त्याचे परिणाम संपूर्ण कुटुंबावर झाले. पत्नीला मानसिक धक्का बसला. एका मुलाखतीत नम्बी नारायण म्हणतात, की त्यांच्या मुलांना भविष्यात ‘हेरगिरी करणाऱ्याची मुलं’ असं संबोधलं जाऊ नये, म्हणून त्यांना त्यांचं निर्दोषत्व सिद्ध करायचं होतं. कुटुंबाचं राहणीमान इतकं साधं होतं, की मिळणाऱ्या आर्थिक भरपाईपेक्षा गेलेला आत्मसन्मान महत्त्वाचा वाटत होता. समाजानंही पडताळणी न करता हे लेबल स्वीकारलं आणि त्यानुसार भेदभावाचं वर्तनही केलं. कुटुंबाला एकटं टाकलं. आपल्या या वर्तनाचा कोणाच्या तरी आयुष्यावर खोलवर परिणाम होईल, याची जाणीवही त्यांच्याकडे नव्हती.
हेही वाचा…शेतमजूर ते शेतकरी!
हे फक्त विसाव्या-एकविसाव्या शतकात घडतं असं नाही. सोळाव्या शतकात ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांवर ‘संन्याशाची पोरं’ असा शिक्का मारणाऱ्यांची स्वत:ची पात्रता काय होती? पण शिक्क्यांची पोतडी त्यांच्याकडे होती. चार अनाथ, एकट्या पोरांना या शिक्क्यांमुळे आणखीनच एकटेपण आलं.
या झाल्या मोठ्यांच्या गोष्टी. एवढं सगळं झाल्यानंतरही त्यांनी आपल्या ज्ञानाचा समाजाला उपयोग करून दिला होता. सामान्य माणूस मात्र अशा परिस्थितीत पार कोसळून जातो. नमिता स्वभावानं साधी, छोटी स्वप्नं असणारी ३२ वर्षांची ‘नर्सरी टीचर’. त्या नर्सरी शाळेत आणखी ३-४ शिक्षिका होत्या. नमिताच्या लग्नाला ६-७ वर्षं उलटून गेली होती आणि तिला मूल नव्हतं. मात्र लहान मुलांची खूप आवड होती, म्हणूनच तिनं ही नोकरी निवडली होती. एकदा सीनियर केजीमधला एक मुलगा वर्गात यायलाच तयार नव्हता. प्रचंड रडत होता. नमिता बाहेर आली आणि त्याला त्याच्या आईच्या कडेवरून उतरून घेण्याचा प्रयत्न करू लागली. तितक्यात त्याची आई म्हणाली, ‘‘सॉरी टीचर, पण तुम्ही दुसऱ्या टीचरना बोलवा. तुम्हाला काही अनुभव नाही मुलांचा. कसं समजावणार तुम्ही त्याला?’’ नमिता पटकन दोन पावलं मागे झाली. झाल्या प्रकाराच्या साक्षीदार असलेल्या एका मावशींनी दुसऱ्या टीचरना जाऊन सांगितलं, ‘‘त्या मुलाची आई नमिता टीचरना ‘वांझ’ म्हणाली.’’ शिक्क्याला नीट नाव असायला हवं ना! कसं काय माहीत, पण ती गोष्ट हळूहळू सगळ्याच पालकांमध्ये पसरली. नमिताच्याही ते बऱ्याचदा कानावर यायचं. कोणीही पुढे येऊन ही चर्चा थांबवली नव्हती.
आपलीच चूक असल्यासारखा आता हा शिक्का नमिताच्या डोक्यात बसला. तिला खूप एकटं वाटायला लागलं. या सगळ्याचा शेवट तिच्या नोकरी सोडण्यानं झाला.
आजही आपल्या समाजात मुलामुलींना स्वत:चा जोडीदार निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य नाही. शहरात जास्त नसेल कदाचित, पण गावात जातव्यवस्था अजून खूप पक्की आहे. जातीबाहेर लग्न करणं म्हणजे मोठं साहसच. अशात एखाद्या मुलीनं जातीबाहेरचा जोडीदार निवडला, पळून जाऊन लग्न केलं, तर तिचे आईवडील ‘लोक काय म्हणतील?’चा जास्त धसका घेतात. खोटंही नसतं म्हणा ते! नातेवाईक, आजूबाजूचे त्यांच्याकडे येणंजाणं कमी करतात, भावंडांची लग्नं जुळायला त्रास होतो. या सगळ्या परिस्थितीचा पालकांच्या मनावर विपरीत परिणाम होतो. खरं तर मुलीनं निवडलेला जोडीदार चांगला असेल का? मुलगी सुरक्षित आणि आनंदात असेल का? या काळजीने त्यांचा जीव अर्धा झालेला असतो, पण त्यांची ही काळजी समाजाला दिसत नसते. समाज फक्त त्यांना दोष देण्यात व्यग्र असतो. अशा परिस्थितीत त्यांना आधार द्यायचा की एकटं पाडायचं हे समाजाला ठरवावं लागेल.
हेही वाचा…शंभरीतलं शहाणपण!
वास्तविक, आपल्या रोजच्या जीवनात आपल्यावर मारलेले शिक्के आपल्याला लगेच दिसतात, पण नकळत का होईना कधी तरी आपणही दुसऱ्यांवर शिक्के मारतोच. कठीण आहे ना पचवायला! पण हे सत्य आहे. ते ‘लोक’ म्हणजे आपणच असतो! हे शिक्के काही नेहमीच उघडपणे मारले जातात असं नाही, तर अत्यंत सूक्ष्म पातळीवर, कधी नजरेतून, कधी देहबोलीतूनसुद्धा जाणवून दिले जातात. आपल्याला वाटत राहतं, की ‘मी तर काहीच नाही बोलले/बोललो’. पण समोरच्याला जे काही लागायचं ते लागतं.
साताऱ्याची सुनीता सुवर्णपदकासह पदवी मिळवलेली. तिला मुंबईत एका मोठ्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये नोकरी मिळाली. पण खरी परीक्षा पुढे होती. तिनं आजवर कधी सजण्या- धजण्यात, पार्लरमध्ये जाण्यात रस घेतला नव्हता. तिचे कंपनीतले सहकारी नेहमी इंग्लिश बोलायचे, पाश्चात्त्य संस्कृती जगायचे, ‘टिपटॉप’ राहायचे. एकदा तिच्यावर ‘प्रेझेंटेशन’ द्यायची वेळ आली. तिनं उत्तम प्रेझेंटेशन तयार केलं, पण ते सादर करायला ती उभी राहिली आणि आपण या समोर बसलेल्यांसारखे दिसत नाही, याची प्रकर्षानं जाणीव होऊन तिला एकदम न्यूनगंड आला. तो बाजूला ठेवून तिनं बॉसची परवानगी घेतली आणि अधूनमधून मराठीचा आधार घेत उत्तम प्रेझेंटेशन केलं. पण तिचं बोलणं सुरू असताना दोन-तीन मुली एकमेकींना इशारे करत होत्या, हे तिच्या नजरेतून सुटलं नाही. नंतर एकीनं तिला मुद्दाम इंग्लिशमध्ये प्रश्न विचारून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तिच्या पेहेरावामुळे, साधेपणामुळे तिला एकटं पाडलं जात होतं हे तिच्या बॉसनं आधीच टिपलं होतं. ते तिच्या मदतीला धावून आले आणि त्यांनी तिच्या कामाचे मोकळेपणानं कौतुक केलं. ‘भाषेपेक्षा कामातली गुणवत्ता मला महत्त्वाची वाटते. सुनीताकडून अनेकांना बरंच शिकण्यासारखं आहे,’ असं ते म्हणाले. बॉसनं घेतलेल्या या पवित्र्यामुळे सुनीता नंतर एकटी पडण्यापासून वाचली. हळूहळू तिच्यातही बदल झाले. ते कधी ना कधी होणारच होते, पण तोपर्यंत येणाऱ्या एकटेपणाचं काय?… भाषा, प्रांत, जात, शिक्षण, लिंग, असे किती तरी घटक शिक्के बनतात. कामाच्या ठिकाणी एक समुदाय बनतो आणि एखाद्याला तो वेगळं काढतो.
मोटू, काळ्या, फावड्या, लंगड्या, थोट्या,ढापणी असे शरीरावरून मारलेले शिक्के तर अपरिहार्यपणे ऐकायला लागतात! ते व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाशी इतके एकरूप होऊन जातात, की लोक त्यांना बोलवताना याच शिक्क्यांवरून संबोधतात. हळूहळू वाद घालायचा सोडून त्या व्यक्तीही प्रतिसाद द्यायला लागतात. पण आपल्याला काय वाटतं, की या शिक्क्यांचं व्यक्तींना काहीच वाटत नसेल? प्रत्येक वेळेस त्यांच्या मनावर एक चरा उमटतोच. पण समुदायापासून एकटं पडण्याच्या भीतीनं ते मुकाटपणे हे शिक्के झेलतात.
हेही वाचा…सांदीत सापडलेले.. ! शिक्षण!
विवेकवादी विचारपद्धतीत सांगितल्याप्रमाणे कोणतंही लेबल कायमस्वरूपी असू शकत नाही. आज ‘वांझ’ शिक्का मारलेल्या बाईच्या मदतीला वैद्याकीय शास्त्र धावून आलं, तर कदाचित तिच्या कुशीत उद्या जुळेसुद्धा येतील. आज उपहासानं मारला गेलेला शिक्का उद्या बदलू शकतो. इतर काहीच नाही, तर केवळ बदल शाश्वत आहे! एखादीला ‘ती स्त्री आहे,’ असं म्हणून कमी लेखलं, तर ती उद्या आपल्या क्षमतांसह लख्ख उजळूनही निघेल. एवढं जरी आपण लक्षात ठेवलं, तरी शिक्क्यांमुळे येणारं एकाकीपण आपण कमी करू शकतो.
नुकतीच अहमदनगरमध्ये एका अल्पवयीन मुलीनं आत्महत्या केल्याचं वाचलं. तिच्यावर झालेल्या बलात्कारामुळे तिनं असं केल्याचं समोर आलं. आपल्याला समाज परत स्वीकारेल का? आपल्या आई वडिलांना समाजात स्थान उरणार नाही, या विचारांच्या प्रभावामुळेच अशा अनेक मुली आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतात. आज मानसशास्त्रात आघातावर ( Trauma) मात करण्याबाबत खूप चांगलं संशोधन झालंय. त्यामुळे बलात्काराच्या आघातामधून स्त्रीला समुपदेशनाच्या मदतीनं नक्कीच बाहेर काढता येऊ शकतं. पण त्याआधी समाजाच्या न्यायालयात पीडितेचं नाही, तर गुन्हेगाराचं मूल्यमापन होईल, अशी उदाहरणं समोर आली पाहिजेत. तर मुली समाजासमोर खात्रीनं अन्यायाला वाचा फोडू शकतील.
विवेकवादी विचारसरणीचे (‘रॅशनल इमोटिव्ह बिहेव्हिअर थेरपी’) आणखी एक महत्त्वाचं तत्त्व आहे. आपण इतरांकडून कोणतीही अपेक्षा करू नये. लोकांनी कसं वागावं हे आपण ठरवू शकत नाही. ते शिक्के आपण स्वीकारायचे की नाही, हे मात्र आपण ठरवू शकतो. किंबहुना तेवढंच आपल्या हातात असतं. ‘रेल्वेत भीक मागणारी’ अशी ओळख मिळालेली असताना, त्या बिरुदात न अडकता, ‘अनाथांची माय’ हा शिक्का कमावणाऱ्या सिंधुताई सपकाळ आपल्याला ज्ञात आहेतच. सावित्रीबाई फुले शेणाचे गोळे, दगड भिरकावले जात असताना ऐकू येणाऱ्या ‘धर्मबुडवे’, ‘जगबुडी आणणारे’, अशा शिक्क्यांना घाबरल्या असत्या, तर मी आज हा लेख लिहायलाही कदाचित समर्थ नसते.
हेही वाचा…माझी मैत्रीण : टूवे स्ट्रीट
आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल, की शिक्का मारणारे फारसे विचार करून किंवा दर वेळेस अगदी योग्य शिक्का मारतात असं नाही. मग अशा विचार न करता मारलेल्या शिक्क्यांनी एकटेपण, दु:ख, अवहेलना ओढवून घ्यायची, की त्यांकडे दुर्लक्ष करून आपल्या वाटेवर चालत राहायचं हे आपल्याला ठरवावं लागेल. हे सोपं नाही, पण अशक्यही नक्कीच नाही!
trupti.kulshreshtha@gmail.com