‘मैत्री व्हायला खूप काही लागत नाही. जोवर कॉमन विषय असतात, आवडीनिवडी जुळतात, कंपनीचा कंटाळा येत नाही, तेव्हा ती मैत्री होतेच. माझी मुलींशी असलेली मैत्री मात्र विशिष्ट काळासाठी, विशिष्ट काळापुरती झालेली आहे. दुसरं म्हणजे त्या त्या काळातही बहुधा एखादीच मैत्रीण जवळची म्हणण्यासारखी आहे. याचं कारण आपले इन्टरेस्ट बदलतात, मुलींच्या घरचं वातावरण असं बरंच काही असू शकतं. पण एक मैत्रीण मात्र भेटली, तब्बल २५ वर्षांनंतर. शाळेच्या रियुनियनमध्ये. ती माझी उशिरा भेटलेली बालमैत्रीण असं म्हणता येईल…’

मी आर्किटेक्चरला असताना माझ्या जवळच्या मित्राला एक मुलगी आवडायला लागली. मुलगी आम्हाला दोनतीन वर्षे ज्युनिअर होती, आणि तिचा वर्ग वेगळ्या मजल्यावर होता. आता मला खरंतर यात आक्षेप असण्याचं काहीच कारण नव्हतं, फक्त आम्ही बरेचदा बरोबर असल्याने मलाही त्याच्याबरोबर उगाचच वरखाली करावं लागत असे. त्या मुलीलाही तो आवडत असे असा माझा समज आहे, पण त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी इतकी वेगळी होती, की तिला हे वर्क होणार नसल्याची खात्री होती.

बारामतीत कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून नाराजी नाट्य; खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Viral Girl Shravanis New Video
मित्रांची साथ सोडून देण्याचा चिमुकलीने दिला सल्ला; पण ‘ती’ असं का म्हणाली? Viral Video तून बघा
What is Benching in dating
Bitching ऐकलंय, पण Benching म्हणजे काय? पर्यायी नातं शोधणाऱ्या तरुणाईची डेटिंगमधील नवी संकल्पना! जाणून घ्या
Santosh Deshmukh murder case, Devendra Fadnavis ,
“आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला तरी…”, संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा
Loksatta lokrang Love Pictures Poet Relationship PWD Engineer
अन्यथा.. स्नेहचित्रे : अजंठ्याची पुसट रेषा…
dilemma Ramdas Athawale Parbhani case
परभणी अत्याचार प्रकरणी रामदास आठवलेंची कोंडी
Priyadarshini Indalkar
इंजिनियरिंग करून अभिनय क्षेत्रात यायचं ठरवल्यावर घरच्यांचा पाठिंबा होता का? प्रियदर्शिनी इंदलकर म्हणाली…

हेही वाचा…स्त्री‘वि’श्व: लढवय्या स्त्रियांपुढचे पेच

तिने त्याला हे सांगायचा प्रयत्न केला, पण जमेना. जेव्हा तिला हे कठीण व्हायला लागलं तेव्हा तिने आपल्या जवळच्या मैत्रिणीला सांगितलं, की तू प्रयत्न करून पाहा. ही मैत्रीण तशी खमकी होती आणि तिने त्याला लगेचच हे सांगून टाकलं. तरीही पुढे काही दिवस हे प्रकरण चालूच राहिलं आणि माझ्या मित्रामुळे मी आणि त्या मुलीमुळे तिची खमकी मैत्रीण हे सगळे एकमेकांच्या खूपच संपर्कात राहिलो, ज्याचा परिणाम हा माझीच त्या खमक्या मैत्रिणीशी चांगली मैत्री होण्यात झाला. ही मैत्री म्हटलं तर पुढे सहाएक वर्षे टिकली, किंवा खरं म्हणजे ती अजूनही टिकूनच आहे. बदल एवढाच झाला की सहा वर्षांनी आम्ही लग्नच केलं, आणि पल्लवीचं मैत्रीण हे स्टेटस अधिकृतपणे बदललं. बाकी मैत्रीत फरक पडला नाहीच. आता कोणी असं म्हणेल, की मैत्रिणीबद्दलच्या लेखात बायकोलाच मैत्रीण म्हणणं ही पळवाट झाली, आणि कदाचित त्यांचं बरोबरही असू शकेल. तो उल्लेख एवढ्यासाठीच केला की या प्रकरणात ती मैत्रीण आधी होती, आणि दीर्घ काळासाठी होती. ती एकच मैत्रीण होती असं मात्र नाही.

लहान असल्यापासून माझी अनेक मुलींशी कमीअधिक प्रमाणात मैत्री असे. मग त्या घराजवळ राहणाऱ्या असतील, कॉलेजला असताना वर्गातल्या मुली असतील, एकत्र काम करणाऱ्या असतील; आमच्या नाटकाच्या ग्रुपमध्ये, ऑफिसमध्ये, इतर कुठे. मैत्री व्हायला खूप काही लागत नाही. जोवर तुमच्याकडे कॉमन विषय असतात, आवडीनिवडी जुळतात, कंपनीचा कंटाळा येत नाही, तेव्हा ती मैत्री होते. मुलांशी होते, तशी मुलींशीही. अर्थात हे मी केवळ प्लॅटॉनिक स्वरूपाच्या मैत्रीविषयी बोलतोय. त्यापलीकडे जर अपेक्षा असल्या तर काही सांगता येत नाही.

एक मात्र मी पाहिलंय, की पल्लवीचा अपवाद वगळता, मुलींशी असलेली माझी मैत्री ही विशिष्ट काळासाठी, विशिष्ट काळापुरती झालेली आहे, काही मित्र जसे बालपणापासून आजवर टिकून आहेत, तसं मैत्रिणींचं झालेलं नाही. आणि दुसरं म्हणजे त्या त्या काळातही बहुधा एखादीच मैत्रीण जवळची म्हणण्यासारखी आहे. यातली पहिली गोष्ट तशी स्वाभाविक वाटते. आपली सर्कल्स बदलतात, इन्टरेस्ट बदलतात, मुलींच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या, घरचं वातावरण असं बरंच काही असू शकतं, जे तुमच्या वाटा बदलण्यासाठी कारणीभूत ठरेल. मित्रांबाबत सहसा असं होत नाही. दुसऱ्या गोष्टीचं, म्हणजे एकावेळी एकाच व्यक्तीशी मैत्री अधिक असण्याचं कारण मात्र स्पष्ट नाही. कदाचित माझी बँडविड्थ तेवढी असेल, कदाचित त्यांची.

हेही वाचा…‘भय’ भूती : भीती आहे, म्हणून तर…

गेल्या काही वर्षांत एकूण मैत्री होण्याच्या आणि टिकण्याच्याही शक्यतांमध्ये एक ड्रॅमॅटिक फरक पडलाय, तो सोशल मीडियामुळे. या माध्यमाने दोन प्रकारे बदल घडवला. एकतर केवळ ऑनलाइन असणारी मैत्री असा एक प्रकार सुरू केला. हा प्रकार प्राचीन काळी पत्रमैत्री स्वरूपात अस्तित्वात होता, अगदीच नाही असं नाही. पण इन्टरनेट आल्यावर आधी चॅटरूम्स, आणि पुढे फेसबुकसारख्या प्लॅटफॉर्ममधून याला जोर मिळाला. त्याबरोबरच आणखी एक गोष्ट सोशल मीडियाने केली. ती म्हणजे रियुनिअन्स. सोशल मीडियाच्या मदतीने फार वर्षांपूर्वी शाळा-कॉलेजमध्ये एकत्र असलेल्या मुलांना पुन्हा संपर्कात येणं शक्य झालं. याचा परिणाम काही अगदीच अपेक्षेप्रमाणे झाला असं म्हणता येणार नाही. बऱ्याच बाबतीत या सगळ्यांच्या आवडीनिवडी, सामाजिक/ सांपत्तिक स्थिती, विचारधारा यात एवढा फरक पडलेला होता, की जुन्या मित्रमैत्रिणींनाही एकमेकांची ओळख पटणं कठीण होऊन बसलं. याला अर्थात दुसरी बाजूही होती. पूर्वी जुजबी ओळख असूनही आता समविचारी बनलेल्यांची मैत्री नव्याने व्हायला लागली आणि मोठ्या गटांचे छोटे सबसेट पडायला लागले, त्याच गटांमधून मैत्रीच्या नव्या शक्यता तयार व्हायला लागल्या. माझी अपर्णा मोडकशी गाठ पडली, ती अशाच एका सबसेटचा भाग म्हणून.

अपर्णा आमच्या शाळेत होती. आणि माझी तेव्हा तरी तिच्याशी अजिबात ओळख नव्हती. एकमेकांना पाहून माहिती असू, पण तेवढंच. त्यात गोंधळ असा होता, की आमची मराठी शाळा चौथीपर्यंतच कोएड होती. पुढे मुलं राजा शिवाजी विद्यालयात, तर मुली ‘गर्ल स्कूल नं. २ ’अशा चमत्कारिक नावाच्या शाळेत. आमच्या शाळेची मुलं आमच्याच कॅम्पसमध्ये असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या संपूर्ण कोएड शाळांचा हेवा करत, आणि खात्रीने मुलीही करत असतील, पण हेवा करून काही उपयोग नव्हता. त्यामुळेच शाळेच्या दिवसात शाळेतली मैत्रीण म्हणावीशी नव्हती. नाही म्हणायला मुलं कलेसाठी कला म्हणून समोरच असलेल्या गर्ल्स स्कूलची खबर ठेवत, काही जणांनी ट्यूशन क्लासेसचा फायदा घेत अशी मैत्री टिकवूनही दाखवली, अगदी आमच्याच दोन बॅचमेट्सचं लग्न झाल्याचं उदाहरणही आहे, पण मी काही तेवढे कष्ट घेणाऱ्यातला नव्हतो. त्यामुळे जेव्हा आमच्या बॅचच्या रियुनिअनची वेळ आली, तेव्हा बहुतेक सगळ्या मुलींचे चेहरे माझ्यासाठी अनोळखीच होते. पण या दरम्यान ओळखी झाल्या. कालांतराने काही ग्रुप्सची, काहींची व्यक्तिगत मैत्री अधिक वाढली. ते भेटत राहिले, बोलत राहिले. माझी अपर्णाशी मैत्री झाली ती अशी. आम्ही प्रथम भेटलो, ती शाळा सोडल्यावर सुमारे पंचवीस वर्षांनी. त्यामुळे ती माझी उशिरा भेटलेली बालमैत्रीण आहे असं म्हणता येईल.

हेही वाचा…ॲलर्जीचं ‘वावडं’!

आता या गोष्टीलाही दहा वर्षांहून अधिक काळ झाला. त्यामुळे अगदी नीट आठवत नाही, पण मला वाटतं, आमचा संवाद अधिक व्हायला लागला तो माझ्या लेखनाच्या निमित्ताने. याआधी आमची चांगली ओळख झाली होती, फोनवर, सोशल मीडियावर गप्पा मारणं सुरू झालं होतं, काही भेटी झाल्या होत्या. पण मी जेव्हा फिक्शन लिहायला सुरुवात केली तेव्हा त्या लेखनाचा आधी अनुभव नव्हता. दर महिन्याला एक कथा छापून येणार होती आणि मला स्वत:लाच माझी दिशा कळण्यासाठी काही त्रयस्थ मतांची गरज होती. यातलं एक पहिल्या मैत्रिणीकडून, म्हणजे पल्लवीकडून येणारच होतं, पण त्याबरोबर इतर मतांचीही गरज वाटत होती, मग मी दर कथा पूर्ण झाली की मोजक्या दोनतीन जणांना वाचायला द्यायला लागलो, आणि ते जे मत देतील त्याला विरोध न करता त्याचा प्रामाणिकपणे विचार करायला लागलो. अपर्णाच्या सूचनांचा, मतांचा, ‘खिडक्या अर्ध्या उघड्या’ लिहिताना मला खूप फायदा झाला. पुढे हे एक रूटीनच ठरून गेलं. आता त्यानंतर आणखी चार कथासंग्रह आले, तरी अजूनही नवी कथा वाचणाऱ्या पहिल्या तिघांमध्ये ती असते.

आमच्यात एकदा संवाद सुरू झाला तसं आमच्या लक्षात आलं, की आमचे बोलण्याचे अनेक विषय सारखे आहेत. लिहिण्या- वाचण्याची आवड, विशिष्ट व्यंगचित्रकारांची चित्र पाहणं, नाटक, चित्रपट, सोशल मीडियात लिहिणं, पण त्याच बरोबरीनं त्याचा येणारा कंटाळा वगैरे. मी जशी फिक्शन लिहायला सुरुवात केली, तशा अपर्णानेही काही कथा लिहिल्या आणि मलाही वाचायला दिल्या. मी जरा आळशी असल्याने काही वेळा वाचायला थोडा उशीर केला हेदेखील खरं, पण वाचल्या, आणि त्याबद्दल मतं दिली. यातली एक कथा तर आम्ही भेटलो तशा रियुनिअन याच विषयावर आधारित होती, आणि ‘शाळा’ कादंबरीचं सीक्वल या स्वरूपात लिहिली होती. ‘अक्षर’च्या दिवाळी अंकात ती प्रसिद्ध झाली होती. सर्वांत गमतीची गोष्ट म्हणजे ‘संवादसेतू’ मासिक घेत असलेल्या कथास्पर्धेत एके वर्षी आम्ही बाबांच्या (रत्नाकर मतकरी) स्मरणार्थ पुरस्कार ठेवला होता ज्यासाठी परीक्षकांनी निवडलेली कथा ही अपर्णाने लिहिली होती. या स्पर्धेचा पुरस्कार वितरण समारंभ पुण्यात असतो. त्यामुळे त्या दिवशी ती ठाण्यातून आणि मी मुंबईहून असे पुण्याला गेलो आणि पुरस्कार समारंभानंतर डिनरलाही गेलो.

अपर्णाची पल्लवीसह माझ्या घरच्या सर्वांशीच ओळख आहे, आणि बहुतेकांना आमचं शाळेचं कनेक्शन माहीत आहे. आमचं एकमेकांच्या घरी फार येणंजाणं होत नाही, पण एरवी आम्ही बाहेर भेटतो, समारंभांना भेटतो, आमच्या शाळेच्या गँगच्या गेटटुगेदरनाही भेटतोच. फोनपेक्षा मेसेजवर अधिक गप्पा होतात, आणि त्या बऱ्याच रँडम असतात. कोणी फेसबुकवर काय लिहिलंय, घरी काय म्हणतायत, तिचं ऑफिस कसं चाललंय, आम्हा दोघांपैकी कोणी काही नवं करतंय का, असे काहीही फाटे फुटत असतात. कोणी घरचे किंवा मैत्रीतले परदेशी गेले की मी त्यांना येताना पुस्तकं आणायला सांगतो तशी अपर्णा गेली तर तिलाही हक्काने सांगतो. आणि मुख्य म्हणजे नवी कथा लिहिली की तिला पाठवतोच. तिची प्रतिक्रियाही लगेच येते.

हेही वाचा…‘एका’ मनात होती : पुरुषी एकटेपण

मैत्रीत जेंडर हा भाग तसा दुय्यम असायला हवा, असं मी मानतो. शेवटी विचार जुळणं हे अधिक महत्त्वाचं आहे. पण केवळ ते पुरेसं नाही. मैत्री हा ‘टू-वे स्ट्रीट’ आहे. तो जोवर तसा राहील तोवर त्यावरचा प्रवास सुरळीत होत राहील. यासाठी संवाद, देवाणघेवाण टिकणं महत्त्वाचं. निदान माझा अनुभव तरी हेच सांगतो.

ganesh.matkari@gmail.com

Story img Loader