भटक्या समाजात बालविवाहाचे प्रमाण जास्त आहे, त्यातच जातपंचायतीचं वर्चस्व. यात अनेकींचे बळी गेले. त्यातल्याच एका तीन वर्षांच्या सुनीताचं लग्न पन्नाशीच्या एका शिक्षा भोगून आलेल्या बिजवराशी लावण्यात आलं. मात्र वयात आल्यावर सुनीताने ते स्वीकारायला नकार दिला. दरवर्षी एक लाख रुपयांचा दंड भरूनही त्यांचं कुटुंब पाच वर्षं बहिष्कृतच होतं… त्याचा सुनीतावरचा परिणाम भयंकर होता.

भटक्या समाजाची पंढरी समजल्या जाणाऱ्या मढी येथे रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशी जातपंचायत बसली. जातपंचायतीकडे न्याय मागण्यासाठी आलेला सोमा हा नरबळीच्या प्रकरणात शिक्षा भोगून बाहेर आलेला पन्नाशीकडे वाटचाल केलेला पुरुष. तो जेव्हा तुरुंगात गेला तेव्हा जातपंचायतीनं त्याची पत्नी शोभाचं लग्न एका चार मुलांचा बाप असलेल्या जातपंचाशी लावलं. शिक्षा भोगून तुरुंगातून परत आल्यावर सोमानं जातपंचायतीकडे आपल्या पत्नीची मागणी केली. जातपंचांनी सोमाच्या प्रश्नावर तोडगा काढला, शोभाच्या माहेरच्या कुटुंबातील एका मुलीचं सोमाशी लग्न लावून द्यायचं.

पंचांच्या आदेशानुसार शोभाच्या माहेरी निरोप गेला. शोभाच्या माहेरच्या कुटुंबातील कुणीही लग्नायोग्य मुलगी नव्हती. होती ती एक तीन वर्षांची शोभाची भाची-सुनीता. शोभाच्या वडिलांनी जातपंचांसमोर अडचण मांडली. ‘‘आमच्या कुटुंबात सोमाशी लग्न लावून देण्यायोग्य एकही मुलगी नाही.’’ पंचांनी तीन वर्षांच्या सुनीताचं लग्न सोमाशी लावण्याचा आदेश दिला. सुनीताचे आई-वडील, आजी-आजोबा हैराण झाले. तीन वर्षांच्या त्या कोवळ्या जिवाचं एका पन्नाशीच्या घरातल्या शिक्षा भोगून आलेल्याशी लग्न! सुनीताच्या घरच्या लोकांनी विरोध करूनही जातपंच त्यांच्या निर्णयावर ठाम होते. जातपंचांनी आईच्या मांडीवर झोपलेल्या त्या तीन वर्षांच्या चिमुरडीवर व सोमावर त्यांच्या प्रथेनुसार जोंधळ्याचे दाणे टाकून लग्न लावलं.

समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे १२ वर्षं वयापर्यंत मुलगी माहेरीच राहते, नंतर ती सासरी जाते. सुनीता १२ वर्षांची झाल्यावर सोमा सुनीताला नांदवण्यासाठी घ्यायला तिच्या घरी गेला. सोमासोबत सुनीताला नांदायला पाठवण्यास तिच्या कुटुंबानं विरोध केला. सोमानं पुन्हा जातपंचायतीचे दरवाजे ठोठावले. जातपंचायत बसली. पंचांनी, कुटुंबीयांना सुनीताला सोमाकडे नांदायला पाठवण्यास सांगितलं. सुनीताच्या आजोबांनी पंचांपुढे फेटा काढून साठीच्या सोमाकडे १२ वर्षांच्या सुनीताला पाठवू शकत नाही, त्यासाठी माफी मागून विनंती केली. पण पंच काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. शेवटी बरीच चर्चा, विचारविनिमय झाल्यावर पंचांनी सुनीताच्या कुटुंबाला एक वर्षासाठी वाळीत टाकलं आणि एक लाख रुपये दंड घेतला, सुनीताला नांदायला पाठवण्याचा निर्णय एक वर्ष पुढे ढकलला गेला. सुनीताला नांदायला पाठवण्याची तीच मागणी, तीच जातपंचायत व तोच निर्णय असं सलग पाच वर्षं सुरू होतं. प्रत्येक वर्षी मढीच्या जातपंचायतीत सुनीताच्या कुटुंबाला लाखभर रुपये दंड भरावा लागत होता. दंड भरूनही कुटुंब मात्र बहिष्कृतच होतं. सुनीताचे आई-वडील दंडाच्या रकमेसाठी वसईत आले. डोक्यावर टोपली घेऊन, सुया-दाभण, बिबवे, मुलांची खेळणी विकायला सुरुवात केली. कर्ज घेत गेले. आणि दरवर्षी पंचांनी फर्मावलेल्या दंडाची रक्कम भरत राहिले.

सुनीता १७ वर्षांची, जाणती झाली. तिनं निर्धार केला. साठीकडे वाटचाल केलेल्या, नरबळीच्या आरोपाखाली शिक्षा भोगून आलेल्या सोमाकडे नांदायला जायचंच नाही. जातपंचायतीच्या नियमानुसार, स्त्रियांना जातपंचायतीत आपलं म्हणणं मांडायची, जातपंचायतीच्या कामकाजात भाग घ्यायची, ते कामकाज चालू असताना हजर राहण्याचीही परवानगी नसते. सुनीता तिचं म्हणणं तिच्या आजोबा आणि वडिलांमार्फत जातपंचासमोर मांडत होती. सुनीताने सलग पाच वर्षं नांदायला जायला नकार देऊनही त्या प्रश्नावर तोडगा निघत नव्हता. शेवटी पंचांनी अजब निर्णय घेतला. ‘‘सुनीताने एक रात्रीसाठी सोमासोबत राहावं, ती सोमासोबत राहून आली की, दुसऱ्या दिवशी तिचा काडीमोड करू.’’ या निर्णयाने सुनीता, तिचे कुटुंबीय पूर्णपणे खचले, पण त्यांनी निर्णय स्वीकारला नाही.

ऑक्टोबर २०१३मध्ये एके दिवशी मला माझ्या चळवळीतील सहकारी कृष्णा चांदगुडे यांचा दूरध्वनी आला. त्यांनी थोडक्यात प्रकरण सांगितलं. मी ताबडतोब निघाले. संध्याकाळी साडेसात वाजता मी सुनीताच्या गावी पोहोचले. त्याच वेळी कृष्णा चांदगुडे व डॉ. ठकसेन गोराणे हेसुद्धा तिथे आले होते. प्रथम आम्ही पोलीस ठाण्यामध्ये जाऊन पोलीस निरीक्षकांना सुनीताबाबत थोडक्यात माहिती दिली. परंतु पोलीस यंत्रणा ढिम्म! त्यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही. रात्रीची वेळ होती. पोलीस ठाण्यामध्ये वेळ घालवण्यात अर्थ नव्हता. आम्ही तिथून थेट सुनीता राहात असलेल्या वस्तीत गेलो. जाताना वृत्तपत्र व दूरचित्र- वाहिनीच्या प्रतिनिधींनाही कळवलं होतं.

आम्ही सुनीताच्या वस्तीवर पोहोचेपर्यंत रात्रीचे नऊ वाजले. गावापासून अडीच ते तीन कि.मी. अंतरावर असलेली वस्ती, रात्रीची वेळ, वस्तीवर अंधाराचं साम्राज्य होतं. घराघरांत विजेचे दिवे असले तरीही बाहेर मात्र काळोख होता. आम्ही सुनीताच्या घरचा दरवाजा ठोठावला. सुनीताच्या आजोबांनी दरवाजा उघडला. आम्ही आमची ओळख सांगून घरात प्रवेश केला. तेवढ्यात वस्तीतील २५-३० तरुण सुनीताच्या घरी जमा झाले. सुनीता, तिचे आजी-आजोबा यांच्याशी आम्ही बोलत होतो, परंतु जमलेल्या जमावाने आमच्या चर्चेत व्यत्यय आणला. ‘‘आमच्या बहिणीचा निर्णय आम्ही घीऊ, तुम्ही निघून जा.’’ असे जमावातील तरुण आम्हाला धमकावणीच्या सुरात सांगत होते. त्यांची भाषा व देहबोली अतिशय आक्रमक होती. बघता-बघता सुनीताच्या घरासमोर १००-१५० लोकांचा जमाव जमा झाला. सर्वांचाच सूर आम्ही तिथून निघून जावं असा होता. आम्ही समजावणीच्या सुरात त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. परंतु जमाव आक्रमक होत चालला होता. त्याच वेळी १२-१३ माध्यमांचे प्रतिनिधी सुनीताच्या घरी पोहोचले. माध्यमाची ताकद मोठी असते याचा पुन्हा प्रत्यय आला. दूरचित्रवाणीच्या प्रतिनिधींनी कॅमेरे सरसावले. माध्यमांचे प्रतिनिधी तिथे पोहोचल्यावर आम्हालाही आधार मिळाला. सुनीता आणि तिच्या कुटुंबीयांनाही धीर आला.

आम्ही आमचा पवित्रा बदलला. समजावणीच्या सुरात सांगूनही न ऐकणाऱ्यांसाठी आम्ही कायद्याची भाषा बोलू लागलो. तेवढ्यात सुनीता आत गेली व हातात काही कागद घेऊन माझ्यापुढे येऊन बसली. तिने तिची व्यथा मांडली. ती म्हणाली, ‘‘ताई, आम्हाला पाच वर्षांपासून वाळीत टाकलं आहे, आमच्याकडे कुणी येत नाय, आमाला लग्न, मौत समाजातल्या कोणत्याच कार्यक्रमाला बोलवत न्हाई. गेलो तर हाकलून देत्यात. आज हे म्हणत्यात, आमच्या बहिणीचा निर्णय आम्ही घीऊ, तुम्ही निघून जा म्हणणारे हे एवढं दिवस कुठं गेलते?’’ माध्यमांची उपस्थिती व सुनीताचा हा सूर पाहून उपस्थित जमाव गप्प झाला व हळूहळू काढता पाय घेऊ लागला. सुनीतानं वर्तमानपत्रांची काही जुनी कात्रणं आमच्या समोर ठेवली. त्यात, ‘नरबळीच्या प्रकरणामधील आरोपीला सात वर्षांची शिक्षा,’ अशा मथळ्याखाली सोमाला दिलेल्या शिक्षेसंबंधी बातम्या होत्या. सुनीताच्या आजोबांनी पुन्हा सर्व हकीगत सांगितली. आम्ही सुन्न मनाने सुनीताच्या घरातून बाहेर पडलो. दुसऱ्या दिवशी सर्व वर्तमानपत्रात बातम्या झळकल्या. दूरचित्रवाणी माध्यमांनीही या घटनेला प्रसिद्धी दिली.

आम्ही दुसऱ्या दिवशी उपअधीक्षकांच्या कार्यालयात तक्रार केली. स्त्री उपअधीक्षक काहीही ऐकून न घेता ताड-ताड आम्हालाच सुनावत होत्या. हातात अधिकार, सत्ता असली की, काही लोक कसे बेदरकार होतात याचा अनुभव आम्ही घेत होतो. एका लहान मुलीचं होणारं शोषण व कुटुंबावर होणारा अन्याय थांबवण्याची मागणी आम्ही करत होतो. अर्थात आम्ही खचून जाणार नव्हतो. जातपंचांच्या दडपणामुळे सुनीता व तिचं कुटुंबीय प्रत्यक्ष तक्रार करण्यासाठी आमच्या सोबत येत नव्हतं. कारण जातपंचायतीची भीती आणि दडपण होतंच. कलेक्टर, पोलीस अधीक्षक व अन्य यंत्रणांकडे वेळोवेळी निवेदने दिली. पाठपुरावा केला. प्रसारमाध्यमांनीही चांगली साथ दिली. सुमारे सहा महिने आमचा लढा सुरू होता.

निवेदन, तक्रार अर्ज, आंदोलन, वर्तमानपत्रातून लेख व प्रबोधन सुरू होतं. पोलीस व प्रशासन मात्र काहीही हालचाल करत नव्हते. काहीही दखल घेत नव्हते. परंतु आमची ती कृती व प्रसारमाध्यमातून येणाऱ्या बातम्यांमुळे जातपंचावरचा दबाव वाढत होता. २०१४चा मार्च महिना आला. येणाऱ्या रंगपंचमीला मढी येथे जातपंचायत बसणार याची चर्चा सुरू झाली. जातपंचायत बसू देऊ नये म्हणून आमचे प्रयत्न सुरू झाले. जातपंचांची मनमानी, शोषक वृत्ती, हुकूमशाही पद्धतीने घेतले जाणारे निर्णय, याला आमचा विरोध होता. सुनीताचा प्रश्न पुन्हा जातपंचांसमोर मांडला जाणार याची चाहूल आम्हाला लागली होती. आमचा जातपंचायती बसण्याला असलेल्या विरोधाच्या बातम्या वर्तमानपत्रातून छापून आल्यामुळे रंगपंचमीच्या दिवशी जातपंचायत बसलीच नाही. त्यानंतर दोन दिवसांनी वेगळ्याच ठिकाणी गुप्तपणे जातपंचायत बसली. जातपंचांनी सुनीताला सोमाकडे नांदायला पाठवण्याची सक्ती मागे घेतली. इथून पुढे मुलींना शिक्षण देऊ, बालविवाह करणार नाही, अशीही घोषणा केली. सुनीताबरोबरच सुनीताचे कुटुंबही जाचातून मुक्त झाले. त्यांचे बहिष्कृततेचे आयुष्य संपले.

पूर्वी बालिकांच्या पोटाला कुंकू लावून किंवा पाळण्याला बाशिंग बांधून लग्न ठरवायचे. त्याच्या दुष्परिणामांमुळे समाज होरपळून निघत होता. अनेक चिमुरड्यांना विधवेचं जिणं जगत आयुष्य घालवावं लागतं होतं. लहान वयात संसाराचा डोलारा सांभाळता सांभाळता आलेलं गर्भारपण, बाळंतपण यात ती अडाणी, अशिक्षित, कुपोषित माता कुपोषित बालकांना जन्म द्यायची. या बालविवाहासारख्या प्रथेतून होरपळ व्हायची ती मुलींचीच. पुढे बालविवाह प्रतिबंधक कायदा आला. त्यात वेळोवेळी सुधारणा होत गेल्या. परंतु समाजाची मानसिकता बदलण्यास कायदा पुरेसा नसतो. कायद्याबरोबरच प्रबोधनाच्या चळवळी उभ्या राहणं आवश्यक होतं. ते काम अद्याप पुरेसं झालेलं नाही असंच आजचं चित्र आहे.

जातपंचाच्या वर्चस्वामुळे त्यांच्या आधिपत्याखाली सर्व निर्णय घेतले जात. ‘पंच’ म्हणजे ‘देव’ अशी धारणा या भटक्या समाजात होती. जातपंचांना विरोध करण्याचे धाडस लोकांमध्ये नव्हतं आणि याच निर्णयाचा बळी होते सुनीता व तिचे कुटुंबीय.

आम्हा कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांना सुनीता, तिचे कुटुंबीय आणि प्रसारमाध्यमांमुळे यश आलं. त्यानंतर सुनीताच्या घरी जाऊन तिने पुढील शिक्षण घ्यावं यासाठी खर्चाची जबाबदारी आम्ही घेतो, असं खूप समजावून सांगितलं. परंतु खूप मोठा काळ मानसिक तणावाखाली असलेली सुनीता शिक्षण घेण्यास तयार झाली नाही. जातपंचांच्या मनमानीचा सुनीतावर झालेला आघात खूप मोठा व भयावह होता.

(या लेखातील व्यक्तींची नावे बदललेली आहेत.)