या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या सदराची समाप्ती करताना ईश्वराजवळ मागणं आहे, तुझा विसर पडू देऊ  नकोस. गेले वर्षभर संतांच्या चांगल्या विचारात मनावरचे ताणतणाव दूर झाले. तुकाराम महाराज म्हणतात तसं ‘न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा’ हे प्रत्येकाला अनुभवता आलं तर येणारा रोजचा दिवस प्रसन्नता घेऊन येईल. मी ईश्वराची प्रार्थना केली, ‘आपुलिया बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची’, या अनुभवाने ईश्वरावरची श्रद्धा दृढ झाली. वाचकांना सदर आवडले. या सदराचे छोटे पुस्तक असावे, अशा सूचना मनाला उमेद देऊन गेल्या. विलेपाल्र्याच्या ‘ओरायन’ या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना मराठी विषय शिकविणाऱ्या वैशाली सरगुले यांनी हे सदर वाचून मुलांना संतवाणी सोप्या शब्दांत समजावून सांगण्यासाठी आमंत्रित केले. शाळेच्या प्रिन्सिपल सुषमा पाठक आणि देशमुखबाई यांच्या सहकार्याने तुकाराम, एकनाथ, नामदेव यांचे अभंग मुलांना समजावून सांगताना फार आनंद वाटला. सगळी मुलं खूप शांत बसून ऐकत होती. ऑगस्टमध्ये झालेल्या या कार्यक्रमानंतर  सर्व मुले अगदी नियमित ‘चित्ती असो द्यावे समाधान’ हे सदर वाचू लागल्याचे त्यांच्या बाई वैशाली यांनी सांगितले. दासबोधात समर्थानी संतांचं वर्णन करताना फार सुंदर ओव्या लिहिल्या. ‘संत आनंदाचे स्थळ संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत.’ ज्ञानेश्वरांनी पसायदानात ईश्वराकडे मागणं मागितलं, ‘वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी’ सर्व प्रकारच्या मंगलांचा वर्षांव करणारे ईश्वर निष्ठ संत सर्व जीवांना भेटावे त्यामुळे दुष्ट माणसांचं दुष्टपण जाईल त्यांची बुद्धी सत्कर्म करण्याकडे प्रवृत्त होईल. पापी लोकांचा अज्ञानरूपी अंध:कार जाईल. समाजात आपापसात प्रेम वाढेल विश्वात स्वधर्मरूपी सूर्याचा उदय होईल, हा त्यांना विश्वास होता.

त्यांचे गुरू निवृत्तींनाथांनी त्यांना ईश्वराचा हा प्रसाद तुला मिळेल असे सांगितल्यावर ज्ञानेश्वर आनंदित झाले. ज्ञानेश्वरांचे हे पसायदान आपल्या सर्वाच्या चित्ताला समाधान देणारे आहे. तुमचंही आयुष्य असंच आनंदमय राहो, हीच शुभेच्छा.

madhavi.kavishwar1@gmail.com

(सदर समाप्त) 

मराठीतील सर्व चित्ती असो द्यावे समाधान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sant tukaram maharaj thoughts
First published on: 31-12-2016 at 00:34 IST