माधुरी ताम्हणे – madhuri.m.tamhane@gmail.com

टाळेबंदी झाल्यानंतर सगळ्यांनीच वेगवेगळ्या गैरसोईंचा सामना केला. या काळात एकेकटय़ा किंवा पती-पत्नी दोघंच राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना अनेक अडचणी आल्या. आधीच ‘करोना’च्या अति भीतीनं अवसान गळालेलं, त्यात यातल्या अनेकांपुढे घरातलं वाणसामान कसं भरायचं ही समस्या उभी राहिली, तर काहींना एकाकीपण खायला उठलं. पण अशा स्थितीतही विविध ‘हेल्पलाइन्स’नी ज्येष्ठ नागरिकांना आधार दिला.  आजच्या घडीला या हेल्पलाइन्स अनेक वृद्धांसाठी आधारकाठी ठरत आहेत. त्या हेल्पलाइन्सविषयी..

ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या ‘हेल्पेज इंडिया’ या संस्थेची हेल्पलाइन भारतभर पसरली आहे. संपूर्ण भारतभरासाठी त्यांचा एकच ‘टोल फ्री’  क्रमांक आहे. कुठूनही या हेल्पलाइनवर फोन आला तरी तो संबंधित राज्याकडे पाठवला जातो. अगदी ‘पांढरकवडा-घाटंजी’सारख्या दुर्गम भागातही या हेल्पलाइनचं जाळं पसरलं आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘हेल्पेज इंडिया’ची ही हेल्पलाइन आधारकाठीप्रमाणेच काम करत आहे. विशेषत: ग्रामीण भागात जागोजागी ज्येष्ठ नागरिकांचे बचत गट आहेत. त्यांच्यामार्फत ग्रामपातळीवरसुद्धा ही हेल्पलाइन प्रभावीपणे काम करते.

‘हेल्पेज इंडिया’ची स्थापना १९७८ मध्ये झाली. त्यानंतर काही काळानं ही हेल्पलाइन सुरू झाली. सध्या देशभरात जवळपास साडेअकरा कोटी ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यातले चाळीस टक्के ज्येष्ठ नागरिक पती-पत्नी किंवा एकेकटे राहतात. त्यांना कुणाची सोबत किं वा आधार नसतो. ‘ज्येष्ठांनी  उतारवयात सन्मानानं जगावं. आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलो तरच ते आपल्यापर्यंत पोहोचतील,’ या हेतूनं ही हेल्पलाइन सुरू करण्यात आली. आणि त्यावरून ज्येष्ठांच्या तक्रारींचं निवारण केलं जाऊ लागलं, समस्यांवर मार्गदर्शन मिळू लागलं, त्यांचीकैफियत सरकार दरबारी पोहोचविली जाऊ लागली.  इतकंच नव्हे, तर एकाकी वृद्धांना केवळ बोलण्यासाठी कुणी तरी मिळाल्यानं त्यांचा एकटेपणा अंशत: का होईना, पण दूर होऊ लागला.

‘हेल्पेज इंडिया’चे संचालक प्रकाश  बोरगावकर सांगतात, ‘‘ देशात ‘करोना’चा कहर सुरू झाला आणि सुरुवातीच्या काळात ‘ज्येष्ठांना करोनाची बाधा लवकर होते, त्यांना जपा,’ याचा अतिरेकी प्रचार सरकारपासून माध्यमांपर्यंत सर्वानी केला. त्यात तथ्य असेलही. पण ज्येष्ठ नागरिकांवर, विशेषत: एकटय़ा राहणाऱ्या ज्येष्ठांवर त्याचा खूप मोठा ताण आला. करोना म्हणजे मृत्यूचं सावट असा समज करून जगणाऱ्या ज्येष्ठांना किती मानसिक त्रास होत असेल याची कल्पना करा. जे मुलांसोबत राहतात त्यांच्यावर ज्येष्ठांनी गॅलरीतसुद्धा जायचं नाही, अशी जाचक बंधनं आली. समवयस्कांबरोबरच्या गप्पागोष्टी, हास्य क्लब, मोकळ्या हवेत फिरणं यावर र्निबध आले. त्यातच अनेक ज्येष्ठांना मधुमेह, उच्च रक्तदाबासारख्या व्याधी. शारीरिक हालचाली मंदावल्यानं काहींच्या व्याधी बळावल्या आणि त्याचाही त्यांच्यावर शारीरिक आणि मानसिक परिणाम होऊ लागला.’’

या परिस्थितीत संस्थेतर्फे हेल्पलाइनवरून ज्येष्ठांचं चांगल्या प्रकारे समुपदेशन केलं जात होतं. देशातल्या सर्व भाषांतून हे समुपदेशन करण्यात येतं. ‘करोना’ काळात मुखपट्टी, हातमोजे, सॅनिटायझर कसं वापरावं, ओळखीच्या वा अनोळखी व्यक्तींच्या जास्त संपर्कात येऊ नये, अपरिचित वा घरकाम करणाऱ्यांच्या पासूनही अंतर राखावं, याची रास्त जाणीव करून देण्यात आली. रोज उन्हात बसावं, औषधं वेळेवर घ्यावीत, योग, प्राणायाम आणि आपल्याला झेपतील ते छोटे व्यायाम नियमित करत जावेत हेही हेल्पलाइनवर फोन करणाऱ्यांना आवर्जून सांगितलं जात असे.

एकदा एका आजींचा फोन आला,‘‘झोपून राहिले तर माझी कंबर दुखते आणि टी.व्ही. बघत बसले तर पाठ दुखते. मी काय करू?’’ त्यांना खुर्चीवर बसल्या-बसल्या सहजगत्या करण्याचे सोपे व्यायाम सुचवण्यात आले. बोरगावकर  सांगतात,‘‘एका वृद्धानं फोन करून रडवेल्या स्वरात विचारलं,‘बाहेर पाऊल ठेवता येत नाही आणि मला एकटय़ाला करमत नाही. काय करू?’ मी म्हटलं, ‘जुन्या फोटोंचे अल्बम बाहेर काढा. ते फोटो पाहता पाहता तुमचा वेळ चांगला जाईल.’ काही दिवसांनी त्यांचा पुन्हा फोन आला, की वेळ तर चांगला गेलाच, पण जुन्या आठवणींत रमल्यामुळे मनाला खूप बरं वाटलं. असाच आणखी एक फोन आला, ‘वेळ जात नाही’ अशी तक्रार करणारा. समुपदेशकानं त्यांना विचारलं,‘‘तुम्हाला काही छंद आहे का?’’ त्यांनी सांगितलं, की त्यांना पूर्वी रोजनिशी लिहिण्याचा छंद होता. समुपदेशकानं म्हटलं, ‘‘उत्तम! आताही तुम्ही रोजनिशी लिहायला लागा. जुन्या छंदाला उजाळा द्या. ज्या गोष्टी वेळेअभावी तुम्ही करू शकला नाहीत त्या गोष्टी आता करा.’ उदाहरणार्थ, दूरचित्रवाणीवरील कलाकार शशी कुलकर्णी हे जुन्या काळातल्या आठवणींच्या लेखनात रमून गेले आहेत. असं काही तरी आवडतं काम हाती घेऊन स्वत:ला सकारात्मक पद्धतीनं त्यात गुंतवणं आवश्यक आहे. काही लोकांशी किरकोळ वादातून आपण वर्षांनुर्वष अबोला धरतो. आज आपल्याला आयुष्याचं क्षणभंगुरत्व तीव्रतेनं कळलंय. मग अशा आपल्यापासून दूर गेलेल्यांना स्वत:हून फोन करा आणि तुमच्यातली दरी मिटवून टाका. बघा किती प्रसन्न वाटेल. एका वृद्ध आजींचा फोन आला, की ‘वर्क फ्रॉम होम’मुळे मुलाला आणि सुनेला बोलायला वेळ नाही आणि नातवंडं त्यांच्या विश्वात रमलेली. त्यांना म्हटलं, ‘तुमच्या शाळकरी नातवंडांशी आवर्जून बोला. त्यांना सांगा, की आम्हाला मोबाइल शिकवा. वेगवेगळी ‘अ‍ॅप’ डाऊनलोड करायला शिकवा. तुमच्या काळातले पत्ते, व्यापार डाव हे खेळ तुम्ही त्यांना शिकवा. त्यामुळे त्यांचा आणि तुमचा वेळ तर जाईलच, पण दोन पिढय़ांमधला दुरावाही कमी होईल.’ संकट काही काळ राहणार आहे खरं, पण आयुष्य वाहत्या प्रवाहासारखं वेगळं वळण घेत गेलं तर कदाचित पुढील वळणावर आनंदाचं निधान मिळू शकेल.’’

टाळेबंदीच्या काळात वृद्धाश्रमातल्या ज्येष्ठांना भेटायला कुणीच जात नाही. अशा वेळी ‘सिल्व्हर इनिंग्ज’सारखी संस्था त्यांच्यासाठी पुढाकार घेते. संस्थेचे अध्यक्ष शैलेश मिश्रा सांगतात,‘‘टाळेबंदी सुरू झाल्यावर ज्येष्ठांना मदत करण्यासाठी आमच्या संपर्कातले, वकील, प्राध्यापक, पत्रकार एकत्र आले. प्रथम गरीब आणि गरजू ज्येष्ठांना धान्याची पाकीटं वाटण्यास आम्ही सुरुवात केली. पोलिसांना पाणी, फळांचा रस, हातमोजे, सॅनिटायझर या वस्तू दिल्या. एकदा आमच्या हेल्पलाइनवर एका वृद्ध जोडप्याचा फोन आला. त्यांची मुलगी ग्वाल्हेरला असते. त्यांच्या घरात अन्नाचा कण नव्हता. आम्ही तातडीनं ‘फु ड डिलिव्हरी अ‍ॅप’द्वारे थाळी पाठवली. इतकंच नव्हे, तर आमचे विश्वस्त रजनीश मलिक यांनी त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय स्वत:तर्फे केली. एका ८० वर्षांच्या वृद्धाला या काळात किराणा सामान जाऊन आणणं शक्य नव्हतं. त्यांचा हेल्पलाइनवर फोन येताच ‘सिल्व्हर इनिंग्ज’च्या स्वयंसेवकांनी सर्व सामान त्यांच्या घरी पोहोचतं केलं. एकदा एका नागरिकानं कळवलं, की मीरारोड स्टेशनवर एक वृद्ध जोडपं बसलं आहे. आम्ही तातडीनं त्यांची भेट घेतली. तेव्हा कळलं, की त्यांचं मुंबईतलं घर मोडकळीस आल्यानं ते गावाला निघाले होते, पण टाळेबंदीमुळे मीरा रोड इथे अडकले होते. आम्ही त्यांना घर बघून दिलं, महिन्याचं रेशन भरलं. त्यांच्या घरात पंखा आणि दिवेही बसवून दिले.’’ मुंबईतल्या एका उच्चभ्रू सोसायटीतून एक फोन आला. मुलगा अमेरिकेत, पैसा मुबलक. पण घरातलं वाणसामान, फळं, भाजी सर्व संपलेलं. सोसायटीतले लोक एकमेकांशी बोलतही नाहीत. मग शैलेश मिश्रांनी त्यांना ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर यादी पाठवायला सांगितली आणि सर्व सामान घरी पोहोचवलं. आजी-आजोबांनी मनापासून धन्यवाद दिले.

शैलेश मिश्रा सांगतात,‘‘साथसोवळ्याच्या नावावर माणसं भावनिकदृष्टय़ा एकमेकांपासून दुरावत आहेत. अशा वेळी हेल्पलाइन उपयोगी पडते आहे. या अनुभवातून आम्ही बऱ्याच सोसायटय़ांशी संपर्क साधला, माहिती घेतली आणि प्रत्येक सोसायटीत वीस जणांचा गट स्थापन केला. ज्या घरांमध्ये एकेकटे वृद्ध राहतात अशांना धान्य, फळं आणि औषधं देण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आणि त्यांची आळीपाळीनं काळजी घ्यायला सांगितलं. माणसं दुरावण्याच्या या काळात असे स्वमदत गट स्थापन केले. त्यामुळे एखाद्या रुग्णाला डायलिसिसला नेण्यापासून, गरज भासल्यास वैद्यकीय सुविधा, अ‍ॅम्ब्युलन्स मिळवून देण्यापर्यंत सर्व प्रकारची मदत करता येते.’’

टाळेबंदीच्या काळात माणसांमधल्या माणुसकीचं दर्शनही अनेक वेळा घडलं आहे. ठाण्यातल्या ‘आदित्य प्रतिष्ठान’चे अध्यक्ष किरण नाकती आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तर अनेक ज्येष्ठ नागरिकांना एक प्रकारे दत्तकच घेतलं आहे. मालाडच्या डॉ. ज्योती चौधरी त्यांचे मनापासून आभार मानतात, कारण त्यांच्या आईवडिलांना अत्यावश्यक औषधं त्यांच्यातर्फे  तातडीनं पोहोचवण्यात आली. तर राजन मयेकर यांनीही त्यांच्या पत्नीला आणि मुलीला केलेल्या मदतीसाठी आभार मानले. साधना काळे यांना वेळेवर घरपोच सामान मिळाल्याचा एवढा आनंद झाला, की ‘आमची मुलं दूर असली तरी आमची काळजी करणारा एक मुलगाच या निमित्तानं आम्हाला मिळाला,’ अशी भावना त्यांनी व्यक्त के ली.

‘प्रोजेक्ट मुंबई’ या संस्थेचे संचालक शिशिर जोशी मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्यानं अनेक सामाजिक प्रकल्प राबवत असतात. टाळेबंदीच्या काळात या संस्थेनं एकाकी आणि अपंग ज्येष्ठांकडे लक्ष दिलं. हेल्पलाइनवर फोन येताच ज्येष्ठांना घरबसल्या धान्य देण्याची व्यवस्था केली. आर्थिकदृष्टय़ा दुर्बल गटातील ज्येष्ठांना मोफत घरपोच धान्य देण्यात येतं. आजवर हजारोंना अशा प्रकारे धान्य आणि औषधांचं वितरण करण्यात आलं. आपत्कालीन परिस्थितीत ज्येष्ठांना वैद्यकीय मदतही मिळवून देण्यात आली. ‘प्रोजेक्ट मुंबई’ या संस्थेच्या प्रकल्प प्रमुख रुपाली वैद्य सांगतात,‘‘आमचा स्वयंसेवकांचा मोठा गट आहे. त्यात विद्यार्थ्यांपासून सर्व पेशांमधले लोकआहेत. ते धारावी, गोवंडी, चेंबूर, दादर इथल्या वस्त्यांमधून हेल्पलाइनवर फोन येताच ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकारची मदत पोहोचविली जाते. एकदा हेल्पलाइनवर अंध वृद्ध जोडप्याचा फोन आला. आठ दिवस शेजाऱ्यांनी दिलं तेवढंच त्यांनी खाल्लं होतं. त्यानंतर ते जवळपास उपाशीच होते. आम्ही त्यांना तातडीनं अन्नधान्य पुरवलं. अनेक परदेशस्थ मुलांनी हेल्पलाइनवर आपल्या आईवडिलांचे पत्ते कळवले. असे पत्ते कळताच आम्ही धान्य, फळफळावळ, औषधं अथवा वैद्यकीय मदत गरजू ज्येष्ठांना पुरवतो. त्यांची परदेशांत राहणारी मुलं आम्हाला धन्यवाद देतात. तेव्हा आम्ही त्यांना आश्वासन देतो, की आम्ही तुमच्या आईवडिलांना सांभाळू. काळजी करू नका.’’

‘‘जिंदगी में इतने तुफान आके चले गए, ये ‘करोना’का तुफान भी चला जाएगा.’’ या आशावादाला या हेल्पलाइनच्या माध्यमातून जणू उत्तर मिळालेलं आहे,

बंद दरवाजों में जिंदगी गुजर रही है।

पर दिल के दरवाजे तो खोलीए जनाब॥

ज्येष्ठांसाठी हेल्पलाइन्स-

प्रोजेक्ट मुंबई – ९८७९५०८४०४

हेल्पेज इंडिया -१८००१८०१२५३

सिल्व्हर इनिंग्ज – ९०२९००००९१

आदित्य प्रतिष्ठान – ९००४७८२९१९, ८२९१०८७१९२