माधुरी ताम्हणे – madhuri.m.tamhane@gmail.com

‘करोना’चा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर आणि पुढे टाळेबंदीच्या काळात ‘करोना’चा संसर्ग झालेला नसलेल्यांनाही अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं, लागत आहे.  इतका काळ एका जागी रहाण्याने आणि जगण्यातल्या अनिश्चिततेमुळे अनेकांची मानसिक स्थिती ढासळली आहे, तर दुसरीकडे  ‘करोना’व्यतिरिक्त अनेक शारीरिक व्याधींनी अनेक जण त्रस्त आहेत. त्यांना मानसिक आधाराची असलेली गरज लक्षात घेऊन  तज्ज्ञ समुपदेशक विविध हेल्पलाइन्सच्या माध्यमांतून सज्ज झाले आहेत. मुंबईच्या ‘बीएमसी एम पॉवर वन ऑन वन’ – १८००१२०८२००५० आणि ‘नॉन कोविड हेल्पलाइन- केईएम रुग्णालय’- ०२२-६२३२८२३४  या हेल्पलाइन्सविषयी..

‘कोविड- १९’मुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीसाठी ‘बीएमसी एम पॉवर वन ऑन वन’ ही हेल्पलाइन नुकतीच सुरू करण्यात आली आहे. ही हेल्पलाइन नागरिकांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी ‘आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट’च्या प्रकल्पाअंतर्गत कार्यान्वित करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकार आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या सहकार्यानं सुरू झालेल्या या हेल्पलाइनचा मुख्यमंत्री

उद्धव ठाकरे यांनी जाहीर उल्लेख करताच एका आठवडय़ात त्यावर सुमारे पस्तीस हजार फोन आले. त्यामुळे या हेल्पलाइनची क्षमता तत्काळ दुप्पट केली गेली.

सध्या ‘करोना’मुळे लोकांना अनेक प्रकारच्या समस्यांशी सामना करावा लागत आहे. आर्थिक चणचण, पगारातली कपात, नोकरकपातीची टांगती तलवार, आप्तेष्टांचा दुरावा, संसर्गाचं भय, या सगळ्यामुळे लोकांचं मन:स्वास्थ पार ढवळून निघालं आहे. त्यांना आधार आणि मार्गदर्शन मिळावं हा या हेल्पलाइनचा मुख्य उद्देश आहे. ‘एम पॉवर – द फाऊंडेशन’ या संस्थेचे प्रमुख आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अंबरीश धर्माधिकारी हेल्पलाइनविषयी माहिती देताना सांगतात, ‘‘या हेल्पलाइनवर सुरुवातीला जे फोन आले त्यावरून असं लक्षात आलं, की लोकांच्या मनात ‘करोना’विषयी अनेक शंका आणि चिंता आहेत. ‘मी बाहेर पडलो तर लगेच मला ‘करोना’ची लागण होईल का, वस्तीत कोणाला विलगीकरणात ठेवलंय (‘क्वारंटाईन’), आता आमचं काय होईल, आम्हाला विलगीकरणात राहावं लागलंय, म्हणजे ‘करोना’ची लागण झालीय का, मी जगेन का..’ वगैरे.  माणसं वेगवेगळ्या कारणानं धास्तावलेली आहेत आणि सतत तणावाखाली आहेत. आजूबाजूचं वातावरण, जगभरातून येणाऱ्या ‘करोना’च्या बातम्या, यामुळे लोकांना नैराश्य आणि उदासीनतेनं ग्रासलं आहे. त्यांचा दिनक्रम बदललाय. घराबाहेर पडता येत नाहीये. सामाजिक जीवन ठप्प झालंय. त्यात भविष्याबद्दलची अनिश्चितताही आहे. पुढे नक्की काय वाढून ठेवलंय याचं ठोस उत्तर आज कुणाकडेच नाही. ‘व्हॉट्स अ‍ॅप’वरचे संदेश, बातम्या आणि अफवाही जोडीला आहेत. या सगळ्यानं मन:स्वास्थ्य पार उद्ध्वस्त झालंय. मनावरचा असह्य़ ताण हलका करण्यासाठी नेमकं बोलायचं तरी कुणाकडे.. आपल्या अडचणी सहानुभूतीनं ऐकून घेणारं, समजून घेणारं विश्वासाचं माणूस हवंय. नेमकी हीच भावनिक गरज ओळखून ही ‘कोविड १९’ संबंधीची विशेष हेल्पलाइन कमीत कमी वेळात आम्ही सुरू केली आणि त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. आज ३० मानसोपचारतज्ज्ञांचा चमू चोवीस तास या हेल्पलाइनवर काम करत आहे.’’

सद्य परिस्थितीत नैराश्यानं ग्रासलेल्या अनेक लोकांचे फोन या हेल्पलाइनवर सतत येतात. त्यांना तज्ज्ञांद्वारे हे समजावून सांगितलं जातंय, की ‘करोना’मुळे भविष्य अंधकारमय झालंय, सगळं संपलंय असं मानू नका. उलट भविष्य उज्ज्वल आहे, असा सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. सध्याची स्थिती ही फक्त तात्कालिक परिवर्तनाची परिस्थिती आहे. ती नक्की बदलेल.. अशा पद्धतीनं फोन करणारा आणि समुपदेशक यांच्यातला संवाद हा प्रभावी, पूर्वग्रहविरहित आणि सहानुभूतीपूर्ण श्रवणाचा असल्यानं लोकांच्या मनात आशेचा किरण निर्माण होतो आणि त्यांना धीर येतो. फोन करणाऱ्याचं पूर्ण समाधान झाल्याशिवाय समुपदेशक फोन ठेवत नाहीत. समुपदेशन तंत्रांचा प्रभावी वापर केला जातो. फोन करणारा पूर्ण नैराश्यात गेला असेल तर मात्र थेट उपचार घेण्यास सुचवलं जातं.

डॉ. अंबरीश धर्माधिकारी सांगतात, ‘‘एरवी कुणी आपल्याला अमुक गोष्टीची भीती वाटते म्हटलं, की आपली स्वाभाविक प्रतिक्रिया असते की, ‘काही झालेलं नाही. तुझं सगळं मानसिक आहे.’ आम्ही असं कधीही बोलत नाही. भीती कशाचीही असो- संसर्गाची, मृत्यूची, भविष्याची वा बेकारीची; मानसशास्त्रीय तंत्राचा सुयोग्य वापर करून या भीतीवर मात करायला आम्ही हेल्पलाइनवरच्या संवादातून शिकवतो. तेव्हा तो खरंच चिंतामुक्त होतो. सध्याच्या कठीण प्रसंगाशी कसा सामना करायचा, भयप्रद नकारात्मक भावनांवर काबू कसा मिळवायचा, जवळच्या माणसांकडे मन कसं मोकळं करायचं, कोणाशी वाद झाला तर तो कसा मिटवायचा, हे आम्ही फोन करणाऱ्याला समजावून सांगतो. शरीराप्रमाणे मानसिक आरोग्याची प्रतिकारशक्ती खूप महत्त्वाची असते. ती वाढावी यासाठी संतुलित विचार करण्याची गरज असते. सध्या सर्वात जास्त फोन तरुणांचे  येतात. ‘आम्ही कर्ज काढून घर घेतलंय, संसार थाटलाय.. आता नोकरी गेली तर काय करू?..’ तरुण अक्षरश: फोनवर रडायला लागतात. अशाच एका तरुणाला म्हटलं, ‘तुझी खरंच नोकरी जाणार आहे का?.. आणि तू जर कामात चोख असशील तर तुला नक्कीच दुसरी नोकरी मिळेल. तू दुसऱ्या नोकरीसाठी प्रयत्न कर.’ काही दिवसांनी त्यानं पुन्हा फोन करून आनंदानं सांगितलं, ‘तुम्ही मला खूप आत्मविश्वास दिलात. मी नैराश्यातून बाहेर आलो. दुसऱ्या कंपनीत मुलाखत दिली आणि तिथे माझी निवडही झाली.’ अशा प्रकारे हेल्पलाइनवरून सकारात्मक बोलून आम्ही फोन करणाऱ्यांना त्यांच्या विवंचनेतून मार्ग काढायला प्रवृत्त करतो. ते नंतर आम्हाला ‘थँक यू’ म्हणायलासुद्धा फोन करतात.’’

‘‘टाळेबंदीमुळे दिवसभर पती-पत्नी घरात असतात. परिस्थितीचा राग ते एकमेकांवर काढतात, चिडचिड करतात. त्यांना शांत करावं लागतं. आमच्या हेल्पलाइनवर अनेक पालकांचेही फोन येत असतात. ते साग्ांतात, ‘मुलांना बाहेर खेळायला जाता येत नाही. ती कंटाळतात. मग आमचाच राग-राग करतात, आक्रमक होतात. त्यांना नियंत्रणात ठेवणं खूप कठीण जातंय.’ अशा पालकांना हे सांगावं लागतं, की त्यांना रिकामपण स्वीकारणं कठीण जातंय. मुलांना दिवसभर टीव्हीसमोर बसवणं, कार्टून लावून देणं वा मोबाइलवर गेम्स खेळायला देणं, असं करू नका. त्यांना कल्पक खेळांमध्ये किंवा कार्यानुभवामध्ये गुंतवा. तुम्ही तुमच्या लहानपणी सागरगोटे, व्यापार डाव, पत्ते, कॅरम यांसारखे घरगुती खेळ खेळत होतात. ते जुने खेळ आता त्यांच्यासोबत खेळा. संधी मिळालीच आहे तर मुलांशी छान गप्पा मारा. त्यांचे विचार जाणून घ्या. त्यांना वाचनाची गोडी लावा. त्यांना तुमच्याबरोबर घरकामात गुंतवा. बघा किती खूश होतील ती. हे टाळेबंदीचे दिवस मुलांसाठी गोड आठवणींचे बनवणं तुमच्याच हातांत आहे.’’

या हेल्पलाइनवरून समुपदेशक वेगवेगळ्या लोकांना आधार देण्याचं काम करतात. त्यातलेच एक- विक्रांत सांगतात, ‘‘आम्हाला अनेक तरुणांचे फोन येतात. त्यांचे पालक  दुसरीकडे राहात असतात. मुलांना वृद्ध आई-वडिलांची चिंता लागलेली असते. ‘त्यांना धान्य, भाजीपाला कोण आणून देईल, त्यांना ‘करोना’ची लागण झाली तर, ते आजारी पडले तर त्यांना कोण बघेल, आम्हाला जाता येत नाही, त्यांचं कसं होईल..’ असे प्रश्न विचारतात. मग आम्ही त्यांना समजावतो, की तुम्ही घाबरू नका. शेजारी, गावकरी त्यांना नक्की मदत करतील. सरकार त्यांची काळजी घेत आहे. तुम्ही फोन करून त्यांच्या संपर्कात राहा. असं समजल्यावर ते शांत होतात. त्याउलट अनेक पालकांचे फोन येतात, ‘आमची मुलं जर्मनी, अमेरिकेत अडकलीत. तिथल्या बातम्या पाहून आमचा धीर खचतोय, जीव घाबरा होतोय..’ अशा वेळी आम्ही त्यांना शांत करण्यासाठी दीर्घ श्वसन, ध्यानधारणा, प्राणायाम करायला सांगतो. त्यांच्यावर ‘डिस्ट्रॅक्शन टेक्निक’द्वारे उपचार करतो. म्हणजे मुलांच्या विचारांनी अस्वस्थ झालात, तर स्वत:ला एखाद्या छंदात वा कामात गुंतवा. जुन्या मित्रमैत्रिणींना फोन करा. मनातले विचार रोजनिशीत मांडा, ज्यायोगे तुम्ही ते विचार पुढे ढकलू शकता. समुपदेशनाच्या अशा तंत्रामुळे अनेक पालकांच्या मनातली चिंता कमी झालीय, ते स्थिर झालेत. आणखी एक वर्ग असा आहे तो एकाकी ज्येष्ठ नागरिकांचा. त्यांना कुणाशी तरी बोलायचं असतं. त्यांना आम्ही सांगतो, की तुम्हाला हवं तेव्हा आम्हाला फोन करा. कितीही वेळ बोला, मन मोकळं करा. या काळात व्यसनी अथवा मनोरुग्णांच्या समस्येतही खूप वाढ झाली आहे. त्यांचाही या काळात सहानुभूतीनं विचार करणं अतिशय गरजचं आहे.’’

‘करोना’च्या विपरीत परिस्थितीत अशा हेल्पलाइन्स नागरिकांसाठी संजीवक ठरत आहेत.‘बीएमसी एम पॉवर वन ऑन वन’ या हेल्पलाइनचा टोल फ्री क्रमांक आहे – १८००१२०८२००५०.

शरीरस्वास्थ्यासाठीचा आधार

‘कोविड १९’च्या तीव्र प्रादुर्भावाच्या सध्याच्या काळात मुख्य आरोग्य यंत्रणा ‘करोना’च्या रुग्णांसाठी कार्यरत असल्यामुळे इतर व्याधिग्रस्तांची आबाळ होऊ शकते, ही शक्यता लक्षात घेऊन मुंबईतील केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी आपल्या रुग्णालयातील सर्व विभाग प्रमुख डॉक्टरांसह आणि आय.आय.टी. मुंबईच्या अधिष्ठाता डॉ. कामेश्वरी छेब्रोल यांनी आपल्या संगणकशास्त्र तसेच अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापकांसह  एकत्रितपणे एक हेल्पलाइन सुरू के ली आहे. वैद्यकशास्त्र आणि तंत्रज्ञान यांच्या संयुक्त सहकार्यातून ही रुग्णालय स्तरावरची हेल्पलाइन सध्याच्या आपत्कालीन काळात नागरिकांसाठी उपयुक्त ठरत आहे.

औषधशास्त्र विभागाच्या साहाय्यक प्राध्यापक डॉ. सोनाली कारेकर केईएम रुग्णालयाद्वारे चालवण्यात येणाऱ्या या आपत्कालीन हेल्पलाइनविषयी विस्तृत माहिती देतात. ‘‘ फारशी गरज नसेल तर लोकांना रुग्णालयात जावं लागू नये, जेणेकरून त्यांना जंतुसंसर्ग होणार नाही. यासाठी त्यांना शक्यतो घरच्या घरी उपचार मिळवून देण्याच्या हेतूनं ‘नॉन कोविड हेल्पलाइन- केईएम रुग्णालय’- ०२२-६२३२८२३४  ही हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे.’’

‘‘भारतीय वैद्यक परिषदेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ती चालवली जाते. या हेल्पलाइनवर आम्हाला फोन येताच सर्वप्रथम भाषेचा पर्याय विचारला जातो. तद्नंतर रुग्णाचं वय आणि व्याधीनुसार त्याची वर्गवारी केली जाते.  रुग्णानं योग्य पर्याय निवडला, की आम्ही तो फोन तातडीनं घेतो. प्रथम पातळीवरचे डॉक्टर हे रुग्णाच्या आजाराचा इतिहास विचारतात. व्याधीचं स्वरूप, वय, औषधं कोणती चालू आहेत, ते विचारतात आणि नंतर तो फोन व्याधीच्या स्वरूपानुसार त्या विषयातील तज्ज्ञ डॉक्टरकडे वर्ग केला जातो. रुग्णाची परिस्थिती गंभीर असेल तर तज्ज्ञ डॉक्टर त्याला केईएम रुग्णालयात बोलावतात. ते शक्य नसेल, तर त्याला त्याच्या निवासाजवळच्या रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्थाही आमच्या डॉक्टरांचा चमू करतो. सध्या ‘डायलिसिस’ची गरज असणाऱ्या रुग्णांची व्यवस्था अग्रक्रमानं करावी लागते. काही वेळा अपघात झाल्याचे फोनही या हेल्पलाइनवर येतात. अशा वेळी त्यांच्या जवळच्या केंद्राशी संपर्क साधून ‘एक्स-रे’ची सोय करणं, शस्त्रक्रिया अपरिहार्य असेल तर तशी व्यवस्था करणं, अशा सोयी या  हेल्पलाइनद्वारे  केल्या जातात. सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम लोकांच्या मनावर होऊन काही शारीरिक व्याधी उद्भवू शकतात. छातीत धडधड, आम्लपित्त यांच्या तक्रारीही अधिक येतात. चलनवलनाअभावी सांधेदुखी, गुडघेदुखीच्या तक्रारी येतात. रक्तातली साखर, रक्तदाब वाढत असल्याच्या तक्रारी सातत्यानं येतात. अशा वेळी हेल्पलाइनवरून आम्ही त्यांना योगासनं, सूर्यनमस्कार, शरीराचे इतरही  व्यायाम सुचवतो. काही व्याधी केवळ औषधोपचारांनीही बऱ्या होतात.’’

डॉ. सोनाली कारेकर  सांगतात, ‘‘सध्या फक्त आपत्कालीन शस्त्रक्रियांनाच प्राधान्य दिलं जात आहे; पण हेल्पलाइनवर येणाऱ्या रुग्णांच्या तक्रारींचा विचार करताना आम्हाला अत्यंत त्रस्त करणारा विषय वाटतो, तो म्हणजे ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर व्हायरल होणारे विविध उपचार. एकदा एका स्त्रीचा फोन आला. तिच्या छातीत खूप दुखत होतं. मी तिचा फोन हृदयरोगतज्ज्ञाकडे पाठवण्यापूर्वी खोदून-खोदून चौकशी केली तेव्हा कळलं, की ‘करोना’चे जंतू मारण्यासाठी ती गेले काही दिवस रोज हिरव्या मिरच्या खात होती. ‘मिरची खाने से ‘करोना’ के जंतू मरते हैं ना’, या तिच्या निरागस प्रश्नावर मी हतबुद्ध झाले. एक जण सांगत होती, ‘मेरे मुँह में छाले पड गये है..’ चौकशी केल्यावर कळलं, की ‘करोना’चे जंतू मारण्यासाठी ती रोज उकळतं पाणी पीत होती. त्यामुळे तिला तोंडात जखम (‘अल्सर’) झाली होती. माझी सर्वाना कळकळीची विनंती आहे, की जोपर्यंत शास्त्रीयदृष्टय़ा सिद्ध होत नाही, तोवर केवळ ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर वाचून वा ऐकीव माहितीवर असे अघोरी उपाय करू नका. त्यापेक्षा स्वत:ची प्रतिकारशक्ती वाढवणारा पौष्टिक आहार घ्या. नियमितपणे घरच्या घरी व्यायाम करा. मध्यंतरी एका रुग्णाचा फोन आला, ‘माझे पाय खूप सुजलेत, मला चालता येत नाही..’ केवळ या लक्षणावरून व्याधी कशी कळेल? रुग्णाचा इतिहास जाणून घेतल्यावर कळलं, की त्याचा व्यवसाय फिरतीचा आहे. आता दिवसभर न फिरल्यानं पाय जड होत असल्याची, शरीर सुस्तावल्याची भावना होत आहे. वास्तविक अशा रुग्णांना औषधांची नव्हे तर व्यायाम आणि समुपदेशनाची अधिक गरज असते. शारीरिक आणि मानसिक संतुलन राखाल तर ‘करोना’च नव्हे तर तुमचं शरीर सर्वच रोगांशी सामना करेल. तरीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास हेल्पलाइनवर संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेला तत्पर आहोत.’’

‘नॉन कोविड हेल्पलाइन- केईएम रुग्णालय’- ०२२-६२३२८२३४ – हेल्पलाइनची वेळ- सकाळी ८ ते रात्री १० ६