सुष्मा देशपांडे
‘चित्रगोष्टी’ या डॉ. सुधीर पटवर्धन यांच्या चित्रांवर आधारित नाटकाबद्दल बोलायचे तर याची मुळे १९८२-८३ च्या दरम्यानच्या काळात मनात रुजली, असे म्हणायला हरकत नाही. डॉ. सुधीर पटवर्धन ठाण्यात आमच्या घरापासून जवळच राहायचे. ‘चित्र पाहाणे’ हा माझ्यावरचा पहिला संस्कार केला विश्वास कणेकरने. विश्वास डॉक्टरांच्या कामाबद्दल भरभरून बोलायचा. कित्येकदा त्यांचे काम चालू असताना ते पाहायला आम्ही गेलो आहोत. ती चित्रे बघत असताना विश्वास, ‘‘चित्रातील कामगाराचा दंड कसा काढला आहे ते पाहिलंस का?’’ इत्यादी तपशिलात बोलत राहायचा. त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन पाहाणे हा आमच्या जगण्याचा अविभाज्य भाग होता आणि आहे. डॉक्टरांच्या चित्रात शहर, शहरातली माणसे, कामगार वर्ग, त्यांचे जगणे, त्यांचे प्रश्न दिसतात.
मला आठवतेय, २०११ मध्ये त्यांचे ‘Family fiction’ हे कुटुंबाचे पैलू दाखवणाऱ्या चित्रांचे प्रदर्शन ‘साक्षी’ चित्र गॅलरीत प्रथमच लागले. कमाल आणि वेगळे काम त्यात होते. नंतर काही काळाने हेच प्रदर्शन दिल्लीत ‘रवींद्र भवन’मध्ये सुरू होते. त्याचवेळी ‘बया दार उघड’ नाटकाच्या ‘मेटा’स्पर्धेच्या प्रयोगासाठी मी आणि अरुण काकडेकाका दिल्लीत होतो. आम्ही प्रदर्शन पाहायला गेलो. चित्रावर खूप बोलत, चित्रासमोर वर्तुळाकार फिरत आम्ही चित्रमय झालो होतो. मुंबईत हेच प्रदर्शन पाहिले होते, परंतु यावेळी मी त्यात अधिक रमले. अनेक चित्रांत नाटक आहे, असे जाणवायचे. ‘‘काका, या चित्रांवर नाटक करायला हवे. तुम्हाला काय वाटतं?’’ मी काकांना विचारताच त्यांचा मोठ्ठा होकार आला. थोड्याच दिवसांत पुण्यात ‘भरतनाट्य’ मंदिरात मी शांता गोखलेने लिहिलेल्या नाटकाला गेले होते. डॉक्टर, त्यांची पत्नी शांता (पटवर्धन)सह त्याच नाटकाला आले होते. थिएटरमध्येच भेट झाल्याने न राहवून मी त्यांना विचारले, ‘‘तुमच्या चित्रांवर नाटक करायची इच्छा आहे. तुम्ही परवानगी द्याल का?’’ त्यांनी सहजपणे होकार दिला. शांता गोखलेची कलेच्या क्षेत्रातली जाण आणि वावर माहीत होता त्यामुळे शांताशी या नाटकाबाबत बोलायचे ठरवले.
शांताला कल्पना आवडली किंबहुना तिच्याही मनात ‘असे नाटक’ करायला हवे हे येऊन गेले होते. सगळ्यात महत्त्वाचे होते चित्र निवडीचे काम. शांतासह मी आणि काका ठाण्यात पोचलो, डॉक्टरांच्या घरी. खरे तर त्यांची अनेक चित्रे नाटकासाठी घेता येतील अशी आहेत. आम्ही १२ पेंटिंग आणि ४ स्केचेस नाटकासाठी निवडली. ‘आविष्कार’चे कलाकार घेऊन नाटक करायचे होते. सुरुवात केली ती स्वत: डॉ. सुधीर पटवर्धन आणि त्यांचे मित्र चित्रकार दिलीप रानडे यांची ‘पेंटिंग’ या विषयावर व्याख्याने ठेवून. पुढचा टप्पा होता, कलाकारांसह काम करणे. सुरुवात नेहमीप्रमाणे काही दिवस नाटकाचे खेळ करून झाली आणि तो प्रवास उत्स्फूर्त नाट्याविष्कार करण्यापर्यंत झाला. त्याच्या पुढचा टप्पा होता, कोणत्याही इतर चित्रांवर नाट्याविष्कार करणे. त्यानंतर निवडलेल्या चित्रांवर काम सुरू केले. डॉक्टर ज्या पद्धतीने माणसांची चित्रे काढतात, ते लक्षात घेऊन मी एकटी हे नाटक लिहिणार नाही, असे ठरवले होते. सर्व कलाकारांचा त्यात सहभाग आवश्यक वाटत होता. पण त्याआधी त्या कलाकारांशी त्या चित्रांविषयी कोणीतरी बोलायला हवे असे वाटले. मी माझ्या हक्काच्या मित्राला, संजय गणोरकरला अमरावतीहून बोलावून घेतले. (संजय हा ‘जेजे फाइन आर्ट’चा विद्यार्थी) कलाकारांनी नाट्याविष्कार केल्यावर, संजय त्यांना चित्र, त्यात वापरलेले रंग, चित्र कसे पाहायला हवे याबाबत सांगायचा.
दुसऱ्या बाजूला माझे डॉक्टरांवर आलेले लेख, मुलाखती वाचणे, चित्रांवरून त्यांच्याशी बोलणे सुरूच होते. चित्र कधी काढले? तेव्हा मनात काय होते? हे समजून घेत होते. डॉक्टर कम्युनिस्ट विचारसरणीचे, त्यामुळे त्यांच्या चित्रात दिसणारा मुंबईतला कामगार माणूस खोलवर जाणवायचा, मूर्तिमंत दिसायचा. ‘आविष्कार’चे कलाकार मध्यमवर्गीय स्तरातले, नाटक करणारे. असे चित्रातले जगणे त्यांच्यापासून दूर होते असे लक्षात येत गेले. मात्र त्यांच्या नाट्याविष्काराचा मला उपयोग व्हायचा. काही सुचत जायचे. कधी काय हवे आहे आणि कधी अगदी हे नकोच आहे, ते जाणवायचे. हे लक्षात घेऊन मी एका टप्प्यावर ठरवले की मला जे वाटते ते मी लिहीन. आमच्या कलाकारांसमोर त्याचे वाचन करेन आणि कलाकारांचे त्यावरचे मत घेईन आणि चर्चेतून लेखनाबाबत निर्णय घेतले जातील.
लिखाणाची अशी प्रक्रिया सुरू झाली. कधी ‘हे वेगळे लिहायला हवे.’ तर कधी ‘विषय योग्य वाटतोय पण जास्त धारदार व्हायला हवा.’ असे वाटत राही. मी पुन्हा पुन्हा लिहीत असे. पुन्हा पुन्हा वाचत असे. एकेका चित्रातले नाटक आकार घेऊ लागले. कोणकोणती पात्रे करणार हे ठरवून त्याच्या तालमी सुरू झाल्या. काका सातत्याने विचारायचे ‘‘अगं, पण ही चित्रं एकत्र कशी येणार नाटकात? नाटकाला सूत्र लागतं.’’ माझे तेव्हा उत्तर असायचे, ‘‘नाही सुचलंय काका. पण सुचेल.’’
नाटकाचे नेपथ्य करायला मी विश्वास कणेकरला सांगितले. विविध स्तर वापरून विश्वासने स्टेजवर अशा जागा निर्माण केल्या की त्याचा नाटक बसवायला उपयोग झाला. एका ठिकाणी पायऱ्या टाकल्या. ‘‘चित्रं फोटो काढून फक्त प्रोजेक्ट केली जाणार नाहीत. चित्र हे पात्र आहे. तशीच चित्रं निर्माण करायला हवीत.’’ मी काकांना आणि विश्वासला सांगितले. ‘‘ जे चित्र सादर होईल ते सुरुवातीला किंवा शेवटी स्टेजवर येणं मला अपेक्षित आहे.’’ आहेत तशी चित्रे निर्माण करणे मोठे आव्हान होते. चर्चेत फ्लेक्स छापले जातात ते कापड वापरता येईल मात्र त्याला ग्लेझ दिसतो तो चालणार नाही, असा मुद्दा आला. फ्लेक्सचे कापड उलटे वापरता येईल असे विश्वासच्या लक्षात आले. त्याने त्याचा फ्लेक्स छापणारा मित्र नीलेश मोघेला विचारले. खरे तर मशीनमध्ये हे कापड उलटे टाकले तर मशीन खराब होण्याची शक्यता होती. मात्र ही रिस्क घ्यायला नीलेशने होकार दिला. चित्रातला महत्त्वाचा भाग रंगसंगती. ‘कलर करेक्शन’- साठी स्वत: डॉक्टर पुण्यात दाखल झाले. हे खूप महत्त्वाचे काम पुण्यात चालू झाले.
दरम्यान, मुंबईत तालमीत ‘difficulty in telling the truth’ या डॉक्टरांच्या सेल्फ पोर्टेटमधून नाटक गुंफण्याचे सूत्र मिळाले. डॉक्टरच डॉक्टरांशी बोलत आहेत, ही संकल्पना मनात आली आणि नाटकभर डॉक्टरांचा स्वत:शी संवाद चालेल ते त्यांच्याच चित्रांविषयी बोलतील, ही कल्पना खूपच उपयोगी ठरली. पात्र न वापरता दोन भिन्न आवाज वापरायचे ठरवले. नाटक सुरू होते तेव्हा एक जण पाठमोरा चित्र काढत आहे आणि इतर कलाकार स्टेजवर फिरत आहेत, ज्यांचे म्हणणे असते, ‘‘आम्ही डॉक्टर सुधीर पटवर्धन यांची पात्रे आहोत.’’ मग ऐकू येत राहातात डॉक्टरांचे दोन भिन्न आवाज. एक डॉक्टरांचा आणि एक स्वत:शी बोलतानाचा. संवादाचा. त्यासाठी दीपक राजाध्यक्ष आणि रसिक राणे यांचे आवाज वापरले होते.
प्रत्येक दोन चित्रांमधला संवाद, अनेक चित्रांतल्या गोष्टींसाठी आवाज आणि संगीतही गरजेचे होते. सामान्यत: माझ्या नाटकात मी तंत्राचा वापर कमी करते, मात्र या नाटकात ते शक्य नव्हते. नाटकासाठी लागणारे संगीत, संवाद ध्वनिमुद्रित करण्याचे मोठे काम होते. मोठा ऑडियो ट्रॅक वापरणे गरजेचे होते. नितीन कायरकर या मित्राने ही जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडली. प्रतीक यादव संगीत संयोजनाचे काम करायचा. बऱ्यापैकी अवघड काम तो ताकदीने पेलायचा. चित्रातल्या संगीताबाबत बोलायचे तर डॉक्टरांचे एक चित्र आहे, ‘सायलेन्स’. वृद्ध झालेले एक जोडपे आहे, त्यांच्यात आता संवाद नाही, पण मनात विचार असणारच. ते बोलणे ध्वनिमुद्रित करून वापरायचे मी ठरवले. त्यासाठी वसंत आबाजी डहाके यांची ‘संवाद’ ही अप्रतिम कविता घेतली. स्टेजवरची पात्रे बोलणार नाहीत पण मनातले विचार ऐकू येणार… हे योग्य की अयोग्य यावर चर्चा झाल्या. पण ते तसेच वापरायचे, हा माझा हट्ट होता. ते चित्र उत्तम वठत असे.
पटवर्धनांचे ‘लोअर परेल’ हे खूप प्रसिद्ध चित्र आहे. लोअर परळ पुलाच्या आसऱ्याने जगणारे अनेक जण त्यात आहेत. कित्येक दिवस हे चित्र कसे करायचे हे सुचत नव्हते. एका संध्याकाळी अचानक मला हा जुना पूल बोलतो आहे, पूल पोवाडा गात आहे असे वाटले. काकांना पूल म्हणून गायला लावूयात असे मनात आले. काका लगेच तयार झाले. देवदत्त साबळेने पोवाडा लिहिला आणि गायलाही. इतरांचे जे दृश्य आहे तसे आवाज, संवाद ध्वनिमुद्रित केले. कलाकार त्या त्या भूमिका करत. आता हा पूल पाडला गेलाय, चित्रात मात्र तो कायमचा बंदिस्त झाला आहे.
एकीकडे नाटक बसत होते त्याचवेळी ती चित्रे शेवटच्या टप्प्यावर आली होती. काही चित्रे सहज पकडता येतील अशी होती तर काही मोठी चित्रे दुमडत होती. कलाकारांना ती रंगमंचावर घेऊन यायची होती. कलाकारांना याची जेमतेम तालीम करायला मिळाली. मात्र त्यांनी ती जबाबदारी पेलली. आजही मला ‘NCPA’ च्या प्रयोगाला आलेले ख्यातनाम चित्रकार गिव्ह पटेल आणि अतुल दोडिया यांच्या प्रतिक्रिया आठवतात.
नाटक बसल्यावर शांता गोखले तालमीला आली आणि तिने मौलिक सूचना केल्या. पुढे हेच नाटक हिंदीत केले. प्रफुल्ल शिलेदार या कवी मित्राने हिंदी भाषांतर केले. शांताच्या सूचनांचा तेव्हा विचार करणे शक्य झाले. हिंदीत नाटकाचे नाव ठेवले, ‘ये कौन चित्रकार है!’ मी बसवले होते तसेच नाटक बसवायची जबाबदारी विक्रांत कोळपेने पार पाडली.
चित्र, संगीत, त्यातील अनेक कलाकार लक्षात घेता या नाटकाचे खूप प्रयोग करणे शक्य झाले नाही. पण प्रयोग करू देणारे आपल्या मागे ठाम आहेत हे माहीत असल्याने नवे नवे प्रयोग करण्याची ऊर्मी येते. संस्कार आणि आधार असेल तर प्रयोग करण्याची क्षमता वाढते हे नक्कीच. त्यासाठी अरुण काकडेकाकांना नमस्कार. आजही हे नाटक खुणावते. नाटकातील डॉक्टरांच्या चित्रासह नवी-जुनी चित्रे मनात बोलत राहतात.
नाटकात म्हटले आहे तसे ‘सुधीर पटवर्धन हे माणसांचे चित्रकार.’ खरेच इथला तळातला वर्गातला माणूस, ‘मुंबई’ या चित्रातून जगभर पोचवणाऱ्या सुधीर पटवर्धन यांना सलाम!
