‘‘माझ्या स्वभावातील औत्सुक्य, कुतूहल यापायी मी इतकी झपाटून जाते की मला अमुक गोष्ट का जमणार नाही? मी ते करून पाहाणारच या विचारापर्यंत माझी मजल जाते आणि जिद्दीने मी ती गोष्ट करतेच. नाटकाचंही तसंच झालं. पहिल्या ऑडिशनच्या वेळी स्वत:ला बजावत राहिले, ‘‘मला हे जमलंच पाहिजे.’’ माझी पहिलीच एन्ट्री. वाक्य होतं, ‘‘हाय!’’ तेव्हा ‘हाय’ एवढं प्रचलित नव्हतं. मी त्यांनाच प्रश्न केला, ‘‘ही हाय नक्की कोणती? हाय खातो ती की हाय म्हणतो ती?’’ सगळे हसले, मी वाचन केलं. माझ्या पहिल्याच वाक्यावर माझी निवड पक्की झाली. तेव्हा प्रथमच कळलं की विनोदी नाटक अधिक गंभीरपणे करावं लागतं. पण ते करताना मला अजिबात जड गेलं नाही. आणि  ‘मला हे जमणार नाही’ हे वाक्यच मी आयुष्यातून पुसून टाकलं.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘मी सहावीत होते तेव्हा! पुण्याच्या हुजूरपागा शाळेच्या आवारात मोठी विहीर होती. चार पायऱ्या उतरून आत गेलं की त्याजागी एक दरवाजा होता. त्याला कुलूप होतं. असं म्हणायचे की आत एक भुयार आहे. ते शनिवारवाडय़ापर्यंत जातं. आम्हाला सक्त ताकीद होती की तिथे जायचं नाही. एखादी गोष्ट करू नको म्हटलं की मला प्रश्न पडतो की मी ते का करायचं नाही? मग माझी उत्कंठा, कुतूहल शिगेला पोहोचत असे आणि मी ती गोष्ट करून पाहायचीच असं ठरवते. त्याही वयात मी त्या भुयारात उतरायचं नक्की केलं. संधी साधून एक दिवस बॅटरी, सुरी, वॉटर बॉटल तिथे नेऊन ठेवली. मला मैदानी खेळांची खूप आवड! डॉजबॉल खेळून सगळे पांगले. मैदानावर सामसूम झाली तशी उतरत्या संध्याकाळी मी त्या विहिरीत उतरले. दगडाने चार घाव घालताच ते गंजलेलं कुलूप तुटलं. बॅटरीच्या उजेडात मी आत चालायला सुरुवात केली. मला त्या काळोखात भुयारातून चालताना अजिबात भीती वाटली नाही. जेमतेम पंधरा-वीस पावलं चालले आणि मला सळसळ ऐकू आली. मी बॅटरीचा उजेड समोर टाकला तर माझ्यापासून पाच पावलांवर एक पिवळाधम्मक नाग फणा काढून उभा! माझी बोबडीच वळली. बॅटरी, चाकू, सगळं सामान खाली टाकलं आणि धूम पळत सुटले. मधेच अडखळले. पडले. उठले. पुन्हा धावले. असं करत मातीने माखून घरी आले ती पुढे दोन दिवस शाळेकडे फिरकलेच नाही. नंतर मलाच गंमत वाटली की उद्या कोणीतरी त्या भुयारात शोध घेतला तर प्लॅस्टिकची वॉटर बॉटल, बॅटरी, चाकू या वस्तू पाहून इतिहासच बदलेल की!

मराठीतील सर्व दृष्टी आडची सृष्टी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress vandana gupte article for chaturang
First published on: 26-11-2016 at 01:32 IST