आयुष्यातलं एकटेपण कधी स्वीकारलेलं तर कधी लादलेलं असतं; विशेषत: लग्नाच्या नात्यातलं! कधी त्याचं नाव घटस्फोट असतं तर कधी मृत्यू! नवरा नावाची व्यक्ती संसार सोडून वा टाकून निघून जाते आणि बायकोवर जबाबदारी येते, ‘अधुरी एक कहाणी’ पूर्ण करण्याची! या कहाणीत मग ती आपल्या परीने रंग भरते. स्वत:ला, मुलांना एकटेपणाची, झळ लागू नये म्हणून मनातले काही कप्पे घट्ट बंद करते. मुलांना कसलीही कमतरता भासू नये यासाठी तिच्यातली आई अनेकदा स्वत:ला मारत राहाते. काहीजणी मात्र खंबीरपणे परिस्थितीला तोंड देतात; ‘एकला चलो रे’ म्हणत ‘त्याच्या’शिवायही संसार करून दाखवतात. हे सदर अशाच ‘एकल’ मातांना समर्पित आहे, ज्यांनी एकटीनं दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडल्या. या सदराद्वारे त्या तमाम मातांना सलाम ज्यांनी ‘जीवन हे अगर जहर तो पिनाही पडेगा’ न म्हणता त्याचं अमृत केलं. एक जिवंत कहाणी दर पंधरा दिवसांनी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ती ललिता देव, तिचा संसार तिच्या वयाच्या तिशीपर्यंतही झाला नाही. मोठी मुलगी सहा वर्षांची आणि धाकटा मुलगा अवघा दीड वर्षांचा. मेजर शिरीष देव यांची बदली भटिंडय़ाहून पश्चिम बंगालमध्ये झाली होती. स्वत:च्या कुटुंबासमवेत पुण्यात आणि ललिताच्या माहेरी म्हणजे चाळीसगावला १५ दिवस सुट्टी घालवून बंगालमध्ये रुजू व्हायचं होतं. पण त्याच मधल्या काळात मेजर शिरीष देव यांचं अकस्मात निधन झालं. अत्यंत उत्तम, निरोगी प्रकृती, त्यात सैन्यदलातील भरपूर कष्टांची सवय..तरीही तरुण वयात हृदयविकाराचा अतितीव्र झटका का यावा, याला ‘नशीब’ हेच उत्तर होतं.
१९७१ च्या युद्धात उत्तर विभागाचं नेतृत्व करणाऱ्या मेजर जनरल नातूंची ललिता ही कन्या! पुण्यातल्या पहिल्या महिला पोलीस अधिकारी कुसुमताई देव आणि अण्णा देव यांचा कर्तबगार पुत्र मेजर शिरीष देव आणि ललिता यांच्या विवाहामुळे दोन प्रखर राष्ट्रभक्त कुटुंबे एकत्र जोडली गेली. ललिताचे वडील, भाऊ, मेहुणे सारे सैन्यदलाशी निगडित, आर्मीच्या गणवेशाचं तिला लहानपणापासूनच आकर्षण होतं. आणि खरोखरच तिला तिच्या स्वप्नातला राजकुमार मिळाला. उंच, देखणा, हसरा, मनमिळाऊ, नम्र..लहान वयात मोठे अधिकारपद मिळवणारा! पण ती सोबत अल्पकाळच टिकली.

शिरीष गेल्यानंतरचा पहिला अवघड निर्णय होता स्वतंत्र राहण्याचा! तिच्या सासू- सासऱ्यांना वाटत होतं, ललितानं दोन लहान मुलं घेऊन पुण्यात हक्काच्या घरी राहावं, हवं तर पुढे शिकावं..नोकरी करावी. आम्ही आहोतच मदतीला. पण ललिता सांगते, ‘‘माझ्या डोळ्यांसमोर माझी एक दूरची आत्या यायची. ती एकटी होती. कुणाकडे लग्न- सण समारंभ किंवा अडचण असेल तर ही मदतीला यायची. सुंदर स्वयंपाक करायची. अडचण संपली की निघून जायची. मला असं ‘बिचारं एकटेपण’ नको होतं. मला शिरीषनं पाहिलेलं स्वत:च्या घराचं, मुलांच्या शिक्षणाचं स्वप्नं पूर्ण करायचं होतं. त्यासाठी मला आमचं घर हवं होतं.’’ शिरीषनं औंधला सैनिक वसाहतीत घेऊन ठेवलेल्या प्लॉटवर ललितानं अगदी कमी खर्चात छोटं घर बांधलं आणि तिथे तिघं राहू लागले.

स्वतंत्र घर केलं खरं, परंतु आर्थिक प्रश्न सुटायचे होतेच. सासर आणि माहेर दोन्ही घरं संपन्न असली तरी ललितानं कधीही पैशांची मदत स्वीकारली नाही. घरच्यांनीही कधी ललिताच्या आत्मसन्मानाला धक्का नाही लावला. ललिता कृतज्ञतेनं सांगते ‘‘सैन्यदल कधी तुम्हाला वाऱ्यावर सोडत नाही.’’ पेन्शन कमी होतं. पण कॅण्टिनची सुविधा, शैक्षणिक सवलती होत्याच. माझ्या मुलांनीही कधी महागडे हट्ट केले नाहीत. मुलं अकाली समजूतदार झाली याचंच वाईट वाटायचं.’’
सकाळी १० ते ३ मुलं शाळेत गेल्यावर ललितानं स्क्रीन प्रिंटिंगचा व्यवसाय सुरू केला. कारण स्वत:ला व्यग्र ठेवायचं होतं. साडी विक्रीचाही व्यवसाय केला. कोटा किंवा बंगालहून साडय़ा आणून पुण्यात विकल्या. अतिशय उच्च कलाभिरुचीसंपन्न असणाऱ्या ललिताकडे अशा साडय़ांना खूप मागणी असे. ती अतिशय चविष्ट केक्सही बनवत असे. असे छोटे छोटे पूरक उद्योग चालू होते. पण मुख्य म्हणजे अतिशय काटेकोर आखणी करून तिनं संसार केला. कधीही हाता बाहेर जाणारा खर्च नाही केला.
सर्वात कठीण काम होतं मुलांना भावनिक आधार देणं. रोज शाळेत काहीतरी वेगवेगळी प्रश्नोत्तरं व्हायची. मुलं दुखावून घरी यायची. आदितीला वाटायचं फॅमिली क्वार्टर मिळालं की बाबा आपल्याला घ्यायला येईल. त्यामुळे शाळेत ती तसंच सांगायची. कधी छोटा अगस्ती गणपती बाप्पाबरोबर गप्पा मारून ‘एका तरी बर्थ डेला बाबांना परत पाठव’ म्हणायचा, तेव्हा ललिताला ब्रह्मांड आठवायचं. अगस्ती दोन्ही घरच्या आजोबांना सांगायचा, ‘‘मला गुरुवारी शाळेत न्यायला या आणि स्कूटर घेऊन या.’’ पुण्यात गुरुवारी इंडस्ट्रियल हॉलिडे असे. बहुतेक मुलांचे वडील गुरु वारी घ्यायला येत. तेव्हा अगस्तीला वाटे, गुरुवारी तरी आईनं येऊ नये. आजोबा आले तरी चालतील. अगस्तीचे दोन्ही आजोबा अधूनमधून राहायला येत. मुलांवर छत्र धरत.
ललिता सांगते, माझे भाऊ, मेहुणे, यांच्या जिथे जिथे बदल्या झाल्या तो तो प्रदेश तर आम्ही पाहिलाच. पण मी दरवर्षी मुलांना सुट्टीत एकेक राज्य ठरवून दाखवलं. ‘बाबा नाही तर हॉलिडे नाही’ असं मुलांना कधीच वाटू दिलं नाही. पुण्यात काही कार्यक्रम असले की त्या वातावरणामुळे तिथं जाणं ललिताच्या फार जीवावर येई. पण नाही गेलं तर आपली मुलं एकटी पडतील असं वाटे. रात्री सारी चौकोनी कुटुंबे परत जात. ललिताही औंधला बसने परत येई. पण येताना मुलांच्या डोळ्यातून झोप ओसंडत असे आणि ललिताच्या डोळ्यांतून अश्रू! बसस्टॉप ते घर हे दहा मिनिटांचं अंतरही तिला नको वाटे.

आपण मुलांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो. पण मुलांच्या मनातली बाबाची जागा घेऊ शकत नाही, किंवा मुलांचं मन पुरतं जाणू शकत नाही हेही तिला एका प्रसंगी तीव्रपणे समजलं. ललिताचे बंधू एका दीर्घकाळच्या पोस्टिंगहून परत आले. त्यांच्या मुली जाऊन आपल्या वडिलांना बिलगल्या. घरात गोडधोडाचं जेवण होतं आणि आदिती खोलीतून बाहेरच येईना. ललिता तिच्यावर थोडी रागवली. नंतर एकदम उमगलं. आपले वडील असे कधीच परत येणार नाहीत म्हणून आदिती हळवी झाली असणार. त्याक्षणी आपल्या मुलीला समजून घेण्यात कमी पडलो ही खंत अजूनही तिच्या मनाला डाचते आहे. अर्थात असे प्रसंग अपवादात्मकच. ‘‘एरवी आईनं आम्हाला कधी एकटं वाटू दिलं नाही, आईचं प्रेम आणि वडिलांचा धाक, आदरयुक्त दरारा दोन्हीचा तोल तिनं सांभाळला. औंधच्या रक्षक कॉलनीत आम्ही दोन खोल्यांत राहायला गेलो तेव्हा आजूबाजूला एक दोनच बंगले होते. संध्याकाळी वाहन मिळायचंच नाही तेव्हा आईनं स्कूटर घेतली. जवळच्या वस्तीतली सारी माणसं आईकडे कौतुकानंच बघायची. रात्री त्या परिसरात कुत्री खूप असत. वारा सुटला तर दारं खडाखडा वाजत. एका पत्र्याच्या दारावर आमची सुरक्षा होती. पण ना आई कधी घाबरली, ना आम्हाला घाबरू दिलं. आपण लांब राहातो म्हणून एखाद्या क्लासला किंवा छंदवर्गाला जाऊ नका असंही आई कधी म्हणाली नाही.’’ आदिती सांगते.

दोन्ही मुलांचे छंद, क्लासेस, व्यायाम यांच्याकडे ललितानं काटेकोर लक्ष पुरवलं. शिक्षणक्रम निवडतानाही तिनं मुलांना सर्व पर्याय समजावून सांगितले. फायदे-तोटे..कष्ट..साऱ्यांचा विचार करा. असं सांगितलं आणि निवडीचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं. दहावीनंतर छोटय़ा मोठय़ा टय़ुशन्स करून आदिती स्वयंपूर्ण झालीच होती. तिनं लँडस्केप डिझायनिंगमध्ये पदवी मिळवली. पुढे काही काळ अध्यापनही केलं. अगस्तीनंही त्याच्या आवडीनं मरिन इंजिनीअिरग केलं. आता तो एका उत्तम कंपनीत काम करतो.

लहानपणी अगस्तीला सारे म्हणत, ‘‘तुला बाबांसारखं व्हायचं आहे.’’ तेव्हा तो गोंधळून जायचा. कारण त्याच्या आठवणीत बाबांचा सहवास, बाबांचा चेहरा, बाबांची मूर्ती असं काही नव्हतंच. त्याच्यासाठी जे बाबा अस्तित्वात होते ते इतरांच्या आठवणींमधून ऐकलेले. पण ललितानं मुलांना थोडं समजू लागल्यावर सतत मुलांशी बाबांविषयी गप्पा मारल्या. त्यांची मतं, त्यांचं सामाजिक भान, त्यांचं सैन्यदलातलं स्थान..याचा दृश्य परिणाम असा झाला की अनेक वेळा मुलांनीही आत्ता कसं वागलो तर बाबांना आवडलं असतं असाच विचार केला. तसंच वागत गेली मुलं. अगस्ती सांगतो, ‘‘आईनं आमच्या मनात बाबांना सतत जिवंत ठेवलं. आता मोठं झाल्यावर कळतंय की ते करणं किती अवघड होतं. आईनं बाबांची उणीव तर भासू दिली नाहीच, पण माणूस म्हणून सतत घडत आणि वाढत जाणं, आपल्या रोजच्या कामकाजात रोज सर्वोत्तम होत जाणं. सतत चांगल्या आणि उत्कृष्ट वागण्याचीच कास धरणं ही माझ्या आईनं मला दिलेली अनमोल देणगी आहे.’’
अगस्ती हे नुसतंच बोलत नाही तर त्याला तेवढंच जबाबदारीचं भान आलंय. आदिती पहिल्या बाळंतपणाला माहेरी आली त्या दिवशीच अगस्तीनं आईसाठी एक कार दारात आणून उभी केली. नव्या नोकरीतही रजेचं जमवून तो पुण्यात राहिला आणि वडिलकीच्या नात्यानं आधार दिला.

आदिती कॉलेजमध्ये असताना एकदा ललिताला मोठा अपघात झाला. स्कूटरवरून पडून डोक्याला मार लागला. जवळजवळ ५ महिने स्मृतिभ्रंश झाला. तिचं रुग्णालयात असणं आणि स्मृती परत आणण्याच्या धडपडीच्या काळात आदिती फार धैर्यानं आणि जबाबदारीनं खंबीरपणे उभी राहिली. नातेवाईकांनी तर तिला सांगितलं की, ‘शिरीषनं जशी तुझी काळजी घेतली असती तशी मुलांनी घेतली’ त्यावर आदितीचं म्हणणं, ‘‘हे सारं आम्ही आईच्याच वागण्यातून उचललं आहे. धीरानं उभं राहणं आणि परिस्थितीशी सामना करणं.’’

मुलांच्या मनात ललितानं शिरीषला जिवंत ठेवलं तरी समाजात तिचं स्थान ‘एकटी’ असंच होतं, त्याचा काही त्रास झाला असणारच. सुदैवानं ललिताचं माहेर आणि सासर काळाच्या पुढे पाच पावलं होतं. पण आजूबाजूचे सण-समारंभ..हळदीकुंकू यात मन दुखावण्याची वेळ यायचीच. ललिता म्हणते, ‘‘मी प्रेमानं माझ्या मुलीची ओटीसुद्धा भरते. पण इतरांनी कसं वागावं ते आपल्या हातात नाही म्हणून दुर्लक्ष करायचं.’’

शिरीषच्या दोन्ही बहिणी आणि मेहुणे यांनी ललिताला भक्कम मानसिक आधार दिला. शिरीष नसला तरी मी आहे ना, या भावनेनं ललितानंही दरवर्षी दोघींची भाऊबीज प्रेमानं साजरी केली. कुसुमताई देवांचा या सुनेवर भारी जीव! ललितानंही आपल्या सासऱ्यांना वचन दिलं होतं. ‘‘तुम्ही आईंची काळजी करू नका. मी शिरीषसारखाच त्यांचा मान राखीन. साथ देईन.’’ आणि अण्णासाहेब देवांनाही आपल्या या सुनेची खात्री वाटत होती. ललितानं हे वचन मनापासून निभावलं.

ललिताचा जावई- आशुतोष भारतीय हवाई दलात पायलट आहे. त्याचं एक निरीक्षण म्हणजे मूल्यसंस्कारावरचं उत्तम भाष्य आहे. ‘‘मुलगी पसंत करताना पुरुष तिचं माहेरचं कुटुंब निरखत असतो. त्या कुटुंबाला पाहिल्यावर मला एक सुखी, समाधानी, परोपकारी, सन्माननीय प्रतिष्ठा असलेलं घर दिसलं. उद्या माझं कुटुंब असंच असेल याची खात्री वाटली. म्हणजे मी माझ्या सासू-माँकडे पाहूनच आदितीला होकार दिला म्हणा ना!’’ एखाद्या स्त्रीला याहून मोठं प्रशस्तिपत्र दुसरं काय असणार! पण तरीही ललिता म्हणते ‘‘बाबांची उणीव भासू दिली नाही..असा माझा प्रयत्न होता. मुलांनी समजून घेतलं. मी आजही शिरीषवर तितकंच प्रेम करते. त्याच्याशिवायचं आयुष्य, त्यानं दिलेल्या आठवणींवर निभावते. आता मुलं मला जपतात. अजिबात एकटं वाटू देत नाहीत.

लौकिकार्थानं आमचं कुटुंब त्रिकोणी होतं. आम्हीही ते सत्य स्वीकारलं होतं. पण आमचं नातं फार मजबूत होतं. अजूनही आहे. माझ्या दृष्टीनं तेच महत्त्वाचं आहे.’’

मराठीतील सर्व एकला चालो रे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Life story of lalita dev
First published on: 09-01-2016 at 01:51 IST