scorecardresearch

डोळस भक्ती

या अनुभवांची पुन: पुन्हा आठवण होत राहिली..

डोळस भक्ती

श्रद्धाला घरी आणलं आणि तिच्या पावलांनी आनंदाबरोबरच ऋचा यांना मातृत्वही मिळालं, पण त्याच वेळी पतीचं निधन झालं,  परंतु ऋचा यांनी घरच्यांच्या मदतीनं स्वत:ला सावरत दोन्ही मुलांना मोठं केलं. आज मुलांची आईवर डोळस भक्ती आहे. आणि म्हणूनच भूमिकांची अदलाबदल झाली आहे. मुलं आईचे पालक बनू पाहात आहेत, तिला सांभाळत आहेत.. त्या ऋचा कुलकर्णी यांच्याविषयी.. 

शाळा-महाविद्यालयामध्ये असताना दर शनिवारी आजीबरोबर बसून ‘दूरदर्शन’वरचा मराठी चित्रपट पाहायचो. चित्रपटातलं एखादं गाणं किंवा एखादा कौटुंबिक प्रसंग आनंदाच्या परमोच्च सांगीतिक कल्लोळावर पोहोचला की आजी पटकन उठायची. म्हणायची, ‘आता काही तरी वाईट घडणार. नशिबाचा घाला पडणार बिचाऱ्यांवर, चला मी देवाजवळ दिवा लावते. तू डाळ-तांदूळ धुऊन ठेव गं तोवर.’ पुढच्या दु:खाच्या प्रसंगामधून सुटका करून घेण्याची आजीची ही रीतच होती. आनंदाच्या वळणावर झुलत पुढे जात असताना, या वळणापलीकडे दबा धरून दु:ख बसलेलंच असतं याची प्रचीती आयुष्यात पुढे अनेक वेळा आली. पुढे पुढे तर त्या दु:खाचं अस्तित्व गृहीत धरून सावध राहायची सवय करावी लागली. पण तेही बेरकं, दरवेळी नवं रूप धारण करतं.. तुमच्या अनुमानाच्या कैचीत असं सहज सापडत नाही. मुंबईत, दहिसरच्या ऋचा कुलकर्णीशी बोलताना माझ्या या अनुभवांची पुन: पुन्हा आठवण होत राहिली..

ऋचा, सुशिक्षित, सुसंस्कृत शिक्षक कुटुंबातली मुलगी, पदवीधर झाल्याबरोबर परिचयाच्या राजेश कुलकर्णीशी विवाहबद्ध झाली. सासरे अनंतराव कुलकर्णी, विश्व हिंदू परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते, घरात खूप पुरोगामी वातावरण. नणंदा खूप शिकत होत्या, सासूबाईंनी सुनेलाही ‘हवं ते कर’ म्हणून स्वातंत्र्य दिलं. ऋचा लग्नाआधीपासूनच ‘बेस्ट’मध्ये नोकरी करत होती. सासूबाईंच्या उत्तेजनामुळे नंतरही चालू ठेवली. राजेशचा स्वत:चा व्यवसायही हळूहळू स्थिरावत गेला. लग्नाला ८ वर्षे झाली, दरम्यान ऋचाचे तीन गर्भपात झाले. नोकरी आणि घर यात दिवस भराभर पळत होते. बाळाची ओढ होतीच, पण ती मनाच्या कोपऱ्यात लपवून ठेवली होती.

राजेशच्या एका मित्राला मूल दत्तक घ्यायचं होतं. ऋचाचे सासरे अनंतराव अनेक अनाथाश्रमांचं काम करायचे. मित्राला बाळ दत्तक घेण्यासाठी सारे जण ‘वात्सल्य’ संस्थेत गेले. तिथे बरीच बाळं होती. एका पाळण्यात सावळीशी टपोऱ्या डोळ्यांची, गोड हसणारी एक मुलगी ऋचाला फार आवडली. सर्व जण घरी परतले, पण ऋचाचं मन त्या हसऱ्या मुलीच्या पाळण्याभोवती रेंगाळत राहिलं. मूल दत्तक घेण्याचा  विषय तोपर्यंत घरात झाला नव्हता. पण ऋचाचा हट्ट साऱ्यांनीच सहज मान्य केला आणि ‘मला ती हवीच’ या ओढीनं दुसऱ्या दिवशी ऋचा आश्रमाकडे धावली. यथावकाश कागदपत्रांची पूर्तता करून बाळी घरी आली. खूप थाटात बारसं झालं आणि श्रद्धाच्या आगमनानं कुलकर्णी कुटुंबात चैतन्य आलं.

राजेशच्या व्यवसायाची भरभराट होऊ लागली म्हणून त्यांनी नवीन फ्लॅट घेतला. फ्लॅटचं कर्ज फेडायचं म्हणून ऋचानं नोकरी चालूच ठेवली. आजी-आजोबांची मदत होतीच आणि ध्यानीमनी नसताना ऋचाला स्वत:च्या बाळाची चाहूल लागली. औषधं नाहीत, विश्रांती नाही. अगदी सुरक्षित गर्भारपण. आठवा महिना संपत आला. बस्स. आता फक्त बाळाच्या आगमनाची तयारी आणि वाट पाहणं. याच वळणावर दबा धरून बसलेल्या संकटानं झडप घातली ती मृत्यूच्याच रूपात. राजेशचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं. ऋचाची दुनियाच उलटीपालटी झाली. सासूबाई नुकत्याच गेल्या होत्या आणि नंतर राजेश.

हा प्रसंग ऋचाकडून ऐकताना अंगावर काटा उभा राहिला. श्रद्धा तर मला भेटली तीच मनावर काही तरी ओझं असल्यासारखी दिसत होती. श्रेयस मात्र शांत होता. मी त्याला हसून सांगितलं, ‘‘माझ्या या लेखासाठी आईला हे गुपित तुला सांगावं लागलं ना, की श्रद्धा दत्तक मुलगी आहे’. काय प्रतिक्रिया झाली तुझी?’’ तो गालातल्या गालात हसला आणि म्हणाला, ‘मला ते केव्हाच माहीत होतं. फक्त या दोघींना माहीत नव्हतं की मला माहीत आहे.’ श्रद्धानं एक मोठा श्वास सोडला. खरोखर तिच्या उरावरचा भार उतरला बहुतेक. पोरीनं याचंच टेन्शन घेतलं होतं. भावा-बहिणीचं नातं खूपच घट्ट दिसलं. श्रेयस म्हणाला, ‘आईचा आणि ताईचा काहीही वाद झाला की बऱ्याच वेळा ताई वादाचा शेवट करण्यासाठी हेच अस्त्र वापरायची. ‘मी दत्तक मुलगी ना..’ तेव्हा मला दत्तक शब्दाचा अर्थ शाळेतून कळला होता. मी कुणाला काही विचारलं नाही. कारण मला त्याचं महत्त्व नाही वाटलं.’

श्रद्धाला तर स्वत:ची ओळख कळली ती ‘कभी खुशी कभी गम’ हा चित्रपट टीव्हीवर पाहिल्यामुळे. त्या चित्रपटावरून पोरांमध्ये बरीच चर्चा झाली. मग ऋचानं हळुवारपणे श्रद्धाला सांगितलं, की त्या शाहरूखप्रमाणेच आम्हीही तुला दत्तक घेतलं होतं. ऋचाचं सासर-माहेर दोन्ही कुटुंबांनी श्रद्धाला खूप प्रेम दिलं. राजेश गेल्यावर आधार दिला. त्यामुळे तिलाही ‘दत्तक’ या शब्दामुळे काहीच फरक पडत नाही.

‘‘घरकाम आणि शिस्त हे कुठल्याही आई-मुलीमधले वादाचे मुद्दे आमच्यातही आहेत. बस्स तेवढंच!’’ ऋचा सांगते. श्रद्धा दहावीला गेली तेव्हा ताणामुळे सुरुवातीला खूप कमी मार्क्‍स मिळाले. तेव्हा ऋचानं तिच्याबरोबर अहोरात्र स्वत: अभ्यास केला. श्रद्धा म्हणते, ‘आईनं त्या वेळी माझा आत्मविश्वासच मला परत मिळवून दिला. नाही तर मी भरकटले असते.’ श्रद्धानं एसएनडीटीमधून ह्य़ूमन डेव्हलपमेंटमध्ये मास्टर्स केलं आहे. तरी तिचं पहिलं प्रेम ‘नृत्य’ हेच आहे. सध्या ती बांद्रय़ाच्या एका डान्स स्कूलमध्ये शिकवते. अनेक मोठमोठय़ा इव्हेन्ट्समध्ये भाग घेते.

श्रेयसनं यंदा इंजिनीअिरगला प्रवेश घेतला आहे. तो राजेशसारखा शांत, विचारी आहे. ऋचा तापट तर श्रद्धा मूडी, अशी ही मायलेकींची जोडी. मी ऋचाकडे थोडं रोखून पाहत विचारलं, ‘‘अगदी मनात आतल्या कप्प्यात.. दोन मुलांमधला काही फरक जाणवला. तुझ्या आईपणानं कधी डावं-उजवं नाही केलं?’’ ऋचाऐवजी मुलांनीच जोरात सांगितलं, ‘‘नाही, मुळीच नाही.’’

ऋचा म्हणाली, ‘‘एक अपराधभाव आहे माझ्या मनात. एकदा श्रद्धा ऐकत नव्हती म्हणून मी रागानं तिला माझ्याकडे ओढलं आणि तिचा खांदा निखळला.’’ सांगताना आजही ऋचाच्या डोळ्यात पाणी होतं. मीच तिला समजावलं. म्हटलं, ‘‘अगं तो काळच वाईट होता. दिवस भरलेले, जीव जडावलेला. तुझं मन थाऱ्यावर नव्हतं. सदैव माणसांची जा-ये, सांत्वनाचा महापूर, सगळ्या बाजूंनी शब्द शब्द कानावर आदळत होते. त्यात श्रद्धाचा हट्ट. तू नुसतं रागानं जवळ घेतलंस अन् तिचा खांदा निखळला. हे दु:खाच्या भरात घडलं. रागाच्या नव्हे.’’

ऋचाला त्या साऱ्या दु:खातून सावरायला पुढे कित्येक वर्षे गोळ्यांची मदत घ्यावी लागली. राजेशच्या व्यवसायाचा व्याप आवरून तिनं प्रथम घराचं कर्ज फेडलं. फक्त ‘बेस्ट’च्या पगारावर तिनं दोन्ही मुलांना उत्तम शिकवलं. सासऱ्यांचा आधार पुढे ३-४ वर्षेच लाभला. पण आजही पूर्ण कुटुंब ऋचाच्या पाठीशी आहे. मतभेदांसह आधार भक्कम आहे. यातूनच मुलंही सुजाणपणे नाती जपत आहेत. मुलं म्हणतात, ‘‘आईनं आमच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी जरूर त्या सर्व गोष्टींची फी भरली. स्वातंत्र्य दिलं. काहीच कमी नाही केलं.’’ ‘‘हां, बाबा असते तर लाइफस्टाईल वेगळी झाली असती.’’ श्रेयस कबूल करतो.

ऋचाची दोन्ही मुलं आईची डोळस भक्ती करतात. आईला आता खूप जपतात. त्यांचं नातं पाहताना वाटलं, ‘‘आईपण नेमकं कशात असतं? नऊ महिने भार वाहण्यात? नाळ जोडलेली असण्यात? हृदयाची स्पंदनं एकच असण्यात? की मुलांच्या सर्वागीण विकासासाठी धडपडण्यात? मनाची स्पंदनं जोडून ठेवण्यात.. सुख-दु:खाचा भार कोणत्याही वयात शेअर करण्यात..’’ उत्तर सोपं नाही. कदाचित ते ज्याचं त्याचं वेगळंही असू शकते.

मला मात्र समोर दिसतंय, ऋचाच्या वाढत्या वयामुळं सहजपणे दोघंही तिला जपत आहेत. तिचे पालक होऊ पाहत आहेत. भूमिकांची अशी सहज अदलाबदल हे ऋचाच्या ‘आईपणाचंच यश’ आहे, नाही का?’

वासंती वर्तक

vasantivartak@gmail.com

मराठीतील सर्व एकला चालो रे ( Ekla-chlo-re ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या