scorecardresearch

आर्किटेक्ट स्वत:च्या आयुष्याची!

सतत भावनिक हिंसेला तोंड देणाऱ्या या गरीब मुलीविषयी सहानुभूती दाटून येते.

आर्किटेक्ट स्वत:च्या आयुष्याची!

नकोशी असलेल्या, आईची ‘पंचिंग बॅग’ असणाऱ्या, सतत भावनिक हिंसेला तोंड देणाऱ्या मुलीमध्ये होती धडाडी, त्यातूनच ती निर्णय घेत गेली. त्या निर्णयांचे परिणामही भोगले. त्यानंतर स्त्रीवादी संघटनांच्या सहवासात खुल्या विचारांचे पंख लाभलेलं, अभ्यासू, कष्टाळू, पण आनंदी असं स्वाभिमानी उत्तरायुष्य जगताना आपल्या लेकीवर, मुक्तावर या खुल्या जीवनाचा संस्कार करू शकलो याचा अभिमान आणि समाधानही तिला आहे, त्या वंदना खरेचं जगणं..

‘‘तू आमची नाहीस, आमच्या लाडक्या ताईला फसवणाऱ्या, पळपुटय़ा, बेजबाबदार माणसाची तू मुलगी आहेस. आमच्या फॅमिली फोटोत तू नकोस.’’ वंदनाला ऐकाव्या लागलेल्या या एका वाक्यातून तिच्या लहानपणाचं सारं चित्र आपल्या डोळ्यापुढे उभं राहतं आणि सतत नकोशी असलेल्या, आईची ‘पंचिंग बॅग’ असणाऱ्या, सतत भावनिक हिंसेला तोंड देणाऱ्या या गरीब मुलीविषयी सहानुभूती दाटून येते.
हीच गरीब बिच्चारी, हीन, दीन मुलगी शाळेत मात्र ‘राजकुमारी’च्या दिमाखात वावरत असते. वक्तृत्व, नाटक, कविता, भाषण, अभ्यास साऱ्यांत अव्वल क्रमांक मिळवणारी गोजिरी, गुणवान वंदना साऱ्या शिक्षकांची लाडकी असते. पुढे वंदनाला मुलगी झाल्यावर मात्र वंदना मनाशी निश्चय करते की, माझ्या मुलीला राजकुमारीसारखंच वाढवेन. भले साथीला राजा नसेल, राजवाडा नसेल, पण राणीच्या लाडाकोडात आणि मायेच्या सावलीत ती निश्चिंतपणे बागडेल.
वंदनाच्या कटू कहाणीला, त्यातल्या विपरीत अनुभवांना फार लहानपणीच सुरुवात झाली. तिचे वडील घरातून काही न सांगता निघून गेले. आईचं माहेरचं घर म्हणजे मोठं कुटुंब! वंदनाच्या आईनं टायपिस्टची नोकरी धरली. वंदना आजी-आजोबा, पाच मामा अशा गोतावळ्यात वाढली. धूमकेतूसारखे अचानक उगवणारे वडील तिला कधी आपले वाटलेच नाहीत. शिवाय ते पुन्हा निघून गेल्यावर सारं घर तिचा राग रागच करायचं, हे चांगलंच आठवतं. अशा घराविरुद्ध तिनं पहिलं बंड पुकारलं ते बारावीनंतर. तिनं स्वत:च आपला कल ओळखून आर्किटेक्चरला जाण्याचं ठरवलं. ‘बी.ए. होऊन मला आईसारखं टायपिस्ट व्हायचं नाही’, असं स्पष्ट सांगितलं आणि स्कॉलरशिप मिळवून तिनं आर्किटेक्चरला प्रवेश घेतला.
आईच्या मनोविश्वाविषयी जाणून घेणं वंदनाला पुढच्या काळात जमलं, पण विद्यार्थिदशेत आईचा अनुभव ‘माता न तू वैरिणी’ असाच आला. स्कॉलरशिपच्या जिवावर पुढे पुढे जाणाऱ्या आणि कॉलेजात मोकळेपणाचं वारं लागलेल्या मुलीविषयी आईला तीव्र संताप यायचा. सूड म्हणून तिनं वंदनाला इन्स्ट्रमेंट्स, कागद, परीक्षेची प्रवेश फी यांचे पैसे कधी दिलेच नाहीत. आपलं सेकंड इयर वाया जाणार की काय म्हणून हताश झालेल्या वंदनाला एका मित्रानं पैसे, थोडा मानसिक आधार दिला. परीक्षा सुरळीत पार पडली. याचाच संताप येऊन सख्ख्या आईनं वंदनाला घराबाहेर काढलं. जो तुला मदत करतो त्याच्याच घरी राहा, म्हणून त्या मित्राला, त्याच्या कुटुंबालाही बोल लावले, संशय घेतला. अचानक आलेल्या या संकटानं मित्राचं कुटुंब बावरून गेलं आणि तरुण मुलगी घरात कशी ठेवणार..म्हणून मोठय़ा मनानं दोघांचं लग्न लावून दिलं.
अवेळी, अकाली आणि परिस्थितीनं लादलेलं हे लग्न यशस्वी होण्याची शक्यताच नव्हती. त्यातल्या कौटुंबिक हिंसाचारापासून सुटका करून घेण्यासाठी वंदनानं वृत्तपत्रात वाचलेल्या ‘मैत्रिणी’ व्यासपीठाचा आधार घेतला. तिथे भेटलेल्या मैत्रिणींनी वंदनाला खंबीर केलं. छाया दातार, मीना देवल, उषा मेहता, वासंती दामले यांची जीवनशैली, खुले विचार यामुळे वंदना तिथे वारंवार जाऊ लागली. छाया दातार यांनी तर हॉस्टेलवर सोय होईपर्यंत वंदनाला घरीच ठेवून घेतलं. जबाबदार पालकत्वाचा पहिलावहिला सुखद अनुभव वंदनाला छायाताईंच्या घरात मिळाला. तिची आर्किटेक्चरची अखेरची परीक्षा चालू होती. घरात फोन खणाणला. कुणी तरी पाहुणे घरी येऊ का विचारत होते. तर दातार यांनी उत्तर दिलं, ‘‘अहो, आमच्या तीन मुलांच्या परीक्षा चालू आहेत. घरात फक्त अभ्यासाला प्रवेश आहे.’’ स्वत:च्या दोघा मुलांबरोबर आपल्यालाही घरचं समजलं जातंय हा वंदनासाठी मोठाच विसावा होता. या काळात तिनं खूप कष्ट केले. सकाळी कॉलेज मग १ ते ८ नोकरी. याच काळात स्वत: कमावलेल्या पैशातून तिनं घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण केली.
आर्किटेक्चरची उत्तम पदवी, चांगली नोकरी, धडाडीचा स्वावलंबी स्वभाव.. वंदनाचे दिवस पालटले. आता तिला आधाराची गरज नव्हती, पण प्रेमाची होतीच. साथीदाराची होतीच. या कमावत्या शिडीचा उपयोग करू पाहणाऱ्या एकाशी वंदनाचं लग्न झालं, तो असंतुलित मनाचा निघाला. पण हे समजेपर्यंत मुक्ताचा जन्म झालेला होता. अवघ्या चार वर्षांच्या मुक्ताला घेऊन वंदनाची वणवण सुरू झाली. आर्किटेक्चरच्या नोकरीला खूप वेळ द्यावा लागायचा म्हणून वंदनानं ती नोकरी सोडून एका ‘एनजीओ’त नोकरी सुरू केली. आव्हान फक्त आर्थिक किंवा मुलीला सांभाळण्याचं नव्हतं तर असंतुलित मनाच्या वडिलांपासून तिला वाचवणं हे होतं.
मुंबईपासून दूरच्या उपनगरात वंदनानं बिऱ्हाड केलं. चांगलं पाळणाघर निवडलं. मुलीला तिच्या वडिलांवरून बोल लावण्यात येईल अशा कोणत्याच नातेवाईक घराची मदत तिला नको होती. काही काळ ती मुलीला ट्रेनने घेऊन जायची. दादरला पाळणाघरात मुक्ताला ठेवून जवळच ऑफिसला जायची. या प्रवासानं मुक्ता खूपच धिटुकली, बोलकी झाली. तिला खूप मावशा मिळाल्या. साऱ्या जणी मिळून तिला खिडकीजवळ बसवून घ्यायच्या. मुक्ता कुणाच्या मांडीवर बसून ओरिगामी शिकायची तर कुणी तिला फळं भरवायचं. ती सहजपणे मराठी, हिंदी, कोकणी, गुजराती बोलायला शिकली ते ट्रेनमध्येच. वंदनाच्या आईनं अनेक वेळा बोलून दाखवलं होतं की ही धोंड, म्हणजे पोर पदरात आहे म्हणून, नाही तर ती कुठच्या कुठे गेली असती. वंदना मात्र अगदी उलट म्हणते. ‘‘ही पोर हे माझे ध्येय झालं. अडथळा कधीच नाही. ती माझी जगण्याची ऊर्जा झाली. माझं सारं विश्व मी तिच्या भोवती विणलं.’’ मुक्ता पूर्वी दोन्ही हातांनी सहज लिहायची. तिला उजव्या हातानं लिही म्हटलं की आईला उत्तर द्यायची, ‘‘पण मला दोन दोन उजवे हात आहेत, मग काय करू?’’
मुक्ताला आठवतं त्या काळात आईनं जे केलं ते मुक्ताच्या वेळा सांभाळूनच. मुक्तासाठी शनिवार- रविवार म्हणजे पर्वणी. आईसोबत हिंडायचं, वाचायचं, चित्रं काढायची. ‘आई आणि मी आम्ही खूप आनंदात असायचो’ अशाच मुक्ताच्या आठवणी आहेत. गाणी गोष्टींनी भरलेलं, आई- मुलीच्या लाडिक संवादांनी सजलेलं बालपण वंदनानं आपल्या मुलीला दिलं. मुक्ता दहावी झाल्यानंतर वंदनानं परगावी जाण्याची कामं स्वीकारली. ‘अवेही’, ‘पुकार’, ‘अक्षरा’, ‘वाचा’ ‘मीडिया मॅटर्स’..अनेक संस्थांबरोबर वंदनानं प्रोजेक्ट्स केले. तिच्या आयुष्याचे दोन उभे भाग आहेत. वयाच्या विसाव्या वर्षांपर्यंत खडतर अनुभवांचं, दबलेलं बिच्चारं आयुष्य आणि स्त्रीवादी संघटनांच्या सहवासात खुल्या विचारांचे पंख लाभलेलं, अभ्यासू, कष्टाळू पण आनंदमय असं स्वाभिमानी उत्तरायुष्य! मुक्तावर आपण या खुल्या जीवनाचा संस्कार करू शकलो, याचा वंदनाला अभिमान आणि समाधान आहे.
स्त्रीवादाची परिभाषा त्या गटात गेल्यावर वंदनाला समजली आणि लक्षात आलं, आपण जे भोगलंय त्याचंच हे तत्त्वज्ञान आहे. पुरुषप्रधानता, सत्तेची उतरंड, शोषण, लिंगभाव, समानतेची मूल्यं या साऱ्यांसाठी शिबिरं घेताना वंदनाची थिअरी तयारी झाली. ‘वैयक्तिक तेच वैश्विक’ वा ‘पर्सनल इज पॉलिटिकल’ – तिनं या विषयात अनेक संशोधनात्मक प्रकल्प केले आणि त्यातूनच अवतरलं, ‘योनीच्या मनीच्या गुजगोष्टी’ हे रूपांतरित नाटक. या नाटकानं या मायलेकींना निरनिराळ्या अडचणींना, प्रसिद्धी माध्यमातल्या वादळांना तोंड द्यावं लागलं. आज हे नाटक प्रौढ प्रेक्षकांनी नावाजलं आहे, पण त्याहीपेक्षा मोठा फायदा म्हणजे मुक्ता या नाटकात आपल्या आवडीचं काम करते आहे. मुक्ताला पहिल्यापासूनच गोष्टी लिहिणं, सांगणं, सादर करणं याची आवड होती. सोप्या भाषेत समजावून सांगणं हे वंदना मुक्तामुळेच शिकली. ज्याचा तिला ‘युनिसेफ’च्या प्रकल्पांमध्ये खूप उपयोग झाला. समाजशास्त्रीय अभ्यास आणि संवाद दोन्हीकडे. मुक्ता जेव्हा म्हणाली रुपारेल महाविद्यालयात प्रवेश घ्यायचाय, कारण तिथे नाटकांसाठीचं छान वातावरण आहे. तिला वंदनानं आनंदानं परवानगी दिली. मुक्तानं पदवी न घेता रुपारेल सोडलं. फिल्म मेकिंगचा कोर्स केला. शॉर्ट फिल्म्स केल्या. मालिकांमध्ये छोटी छोटी कामं केली. वंदना म्हणते, ‘‘तिच्या निर्णयांचा मी आदरच केला.’’ मुक्ताला वाटतं, ‘‘आईनं मला नुसते विचार दिले नाहीत तर विचार करायला शिकवलं. ती स्वत: प्रचंड हुशार, पण माझ्यावर काहीच लादत नाही.’’ आईची कोणती गोष्ट आवडत नाही विचारलं तर म्हणते, ‘‘आई कुणावरही लगेच विश्वास ठेवते. फारच साधी आहे ती आणि स्वत:साठी खर्चच करत नाही.’’
आज ‘योनीच्या मनीच्या गुजगोष्टी’चे २०० प्रयोग झालेत. प्रत्येक प्रयोगानं मायलेकींना खूप अनुभव दिलाय. रंगमंचीय आणि व्यावहारिकसुद्धा. एकमेकींच्या आवडींनी, छंदांनी, कलांनी त्या एकमेकींना संपन्न करत आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आई- वडिलांच्या दुभंगलेल्या नात्याचं सावट मुलांवर पडतं. इतिहासाची पुनरावृत्ती होते म्हणतात. वंदनाला त्याचा अनुभव आला. दोन्ही लग्नं न टिकल्याचा ‘बट्टा’ लागला तिला. पण हे चक्र तिला इथेच थांबवायचंय. प्रगल्भ विचारांच्या मुक्ताला समजूतदार जोडीदार मिळावा, असं वंदनाला वाटलं तर स्वाभाविकच आहे. पण पन्नाशीच्या उंबरठय़ावरच्या आईला अजूनही चांगला जोडीदार मिळावा, तिचं एकटेपण संपावं तरच मी सुखानं संसार करू शकीन, असं मुक्ताला वाटतंय.
स्त्रीवादी विचार परंपरेची शिबिरं, नाटुकल्या
आणि नाटके करताना खऱ्या समाधानाची,
सुखाची वाट शोधणं..ती सापडणं.. आणि
वैयक्तिक सुख हे वैश्विक करण्याची उमेद राहणं हेच या दोघींच्या जीवनशैलीचं वैशिष्टय़ आहे. आपल्यावरच्या आपत्तींमधून इतर स्त्रियांचं भलं करण्याची संधी घेणाऱ्या या ‘आर्किटेक्ट’चं म्हणूनच कौतुक वाटतं.

– वासंती वर्तक
vasantivartak@gmail.com

मराठीतील सर्व एकला चालो रे ( Ekla-chlo-re ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Stories of children who facing emotional violence

ताज्या बातम्या