kagadराधिकाने माझा पदर हातात घेतला. म्हणाली, ‘‘हैलो पडर्र ऽऽऽ , हाऊ  आर यू? आय लव्ह यू.’ मग बराच वेळ ती त्याचे लाड करीत बसली. जाताना म्हणाली, ‘बाय बाय पडर्र.. सी यू सून’. आता तिचे पदराशी खेळणे, त्याच्याबरोबर गप्पा मारणे आणि माझे अनिमिष नेत्रांनी ते सुख मनात साठवणे सुरू झाले.

बाहेर जातांना मी रश्मीला विचारले, ‘रश्मी, कोणती साडी नेसू?’
‘आई, अगं आता इथे अमेरिकेला यायचे म्हणजे तू ड्रेस का नाही आणलेस?’’
‘‘मला सवय नाही गं. साडीच बरी वाटते. ही साडी नेसू का?’ एक साडी हातात घेऊन तिला दाखवत मी विचारले. तिने होकारार्थी मान हलवली.
‘‘मम्मा, नेस मिन्स वेअर?’’ राधिकाने विचारले. राधिका माझी नात, नुकतीच ज्युनियर के.जी.मधून सीनियर के. जी.मध्ये गेली होती. ती आमचा संवाद ऐकत होती.
‘‘हो बिट्टू.’’ तिची आई म्हणाली.
‘‘मग मी हा ड्रेस नेसू?’’ तिने लगेच विचारले. तशी ती मराठी चांगली बोलते. जावई सारंग आणि रश्मी घरी तिच्याशी नेहमी मराठीतच बोलतात. ती मराठी बोलताना उच्चार मात्र इंग्रजीप्रमाणे करायची. तसेच हेल काढून आणि खांदे उडवून बोलायची. तिची मम्मा तिला समजावून सांगू लागली, इंग्लिशमध्ये कपडे घालायचे असे म्हणायचे असेल तर वेअर हा एकच शब्द आहे पण मराठीत साडी नेसणे, ड्रेस घालणे असे म्हणतात.
दुसऱ्या दिवशी ती माझ्या रूममध्ये आली. ‘‘आजी, तू साडी नेसलीस?’’
‘‘हो. कशी आहे?’’ मी विचारले.
‘‘छाऽऽऽ न  आहे,’’ हेल काढून ती म्हणाली. नंतर तिने हळूच माझ्याभोवती एक गोल फेरी मारली आणि पुन्हा मागे जाऊन सगळी साडी नीट बघितली.
‘‘काय गं राधिका, काय बघतेस?’’ मी विचारले.
‘तुझी साडी’ हळूच माझा पदर हातात घेत ती म्हणाली, ‘‘आजी, तुझी ओढणी छान आहे.’’
‘‘ओढणी नाही काही, पदर आहे तो. ओढणी ड्रेसला असते आणि साडीला पदर.’’
‘‘व्हाट? पडर्रऽऽऽ ’’ आश्चर्याने माझ्याकडे बघत तिने विचारले. पदर या शब्दाचा उच्चार तिने पडर्र ऽऽऽ, पडर्र ऽऽऽ असा दोन-तीन वेळेस केला. मलाही गंमत वाटली. त्यानंतर बराच वेळ ती माझ्या पदराशी खेळत होती. शेवटी तिची आई तिला रागावली.
 ‘खेळू दे गं’ मी म्हणाले.
‘आई, तू साडी पिनअप केली आहेस ना, तिने ओढली तर फाटेल एकदम.’
‘नाही, बघते मी. नाही जास्त ओढू देत तिला.’ आईच्या रागावण्यामुळे एवढासा चेहरा करून बसलेली राधिका पुन्हा मला बिलगली.
    दुसरे दिवशी सकाळी उठल्याबरोबर ती माझ्या जवळ आली. म्हणाली, ‘आजी व्हेअर इज यॉर पडर्र ऽऽऽ?’
मी पदर तिच्या हातात दिला. तिने त्याच्याशी खेळायला सुरुवात केली. ‘तुला एक गंमत सांगू राधिका? तुझी मम्मा लहान होती ना तेव्हा सकाळी उठल्यावर तोंड धुतले की आधी येऊन माझ्या पदराला तोंड पुसायची.’ आश्चर्याने तिने डोळे विस्फारले.
‘रियली मम्मा?’आईकडे बघून तिने विचारले.
‘नुसते तोंडच नाही, हात पण पुसत होतो आम्ही.’ राधिकाकडे बघून ती म्हणाली.
‘आम्ही म्हणजे कोण?’ तिने पुन्हा विचारले.
‘आम्ही म्हणजे सगळे. तुझी निलूमावशी, नमामावशी.’
‘वॉव..!’’ दोन्ही खांदे उडवून ती म्हणाली. रश्मीच्याही जुन्या आठवणी जाग्या झाल्या. ‘आई, तू जर कधी सिंथेटिक साडी नेसलीस तर नीट पुसता येत नाही म्हणून मी चिडत होते, नाही का?’ रश्मी मला म्हणाली.
‘हो ना, म्हणून तर मी घरी कॉटनच्या साडय़ा नेसत होते.’ आमचे बोलणे चालू होते आणि राधिकाचे पदराशी खेळणे. त्यानंतर तिला तो एक चाळाच लागला. एकदा अशीच कुठून तरी हळूच माझ्यामागे आली. पदराचा बोळा करून हातात घेतला आणि म्हणाली, ‘हैलो पडर्र ऽऽऽ, हाऊ  आर यू ?’ मग तो बोळा जवळ घेऊन पुन्हा म्हणाली, ‘उं ऽऽऽच्च्यू.. आय लव्ह यू.’ मग बराच वेळ त्याचे लाड करीत बसली. मी लक्ष नाही असे दाखवले. नंतर जाताना म्हणाली, ‘बाय बाय पडर्र.. सी यू सून’ तिच्या या खेळण्याची मला मजाच वाटली.
आता तिचे पदराशी खेळणे, त्याच्याबरोबर गप्पा मारणे आणि माझे अनिमिष नेत्रांनी ते सुख मनात साठवणे सुरू झाले. बाहेर गेलो तरी मधून मधून तिला पदराची आठवण यायचीच. साडय़ा बरोबर घेऊन जायची मला बुद्धी झाली याबद्दल मी देवाचे आभार मानले. माझ्या पदरात स्वत:ला गोल गोल गुंडाळून घेणे आणि गोल फिरणे, कधी पदर हातात घेऊन तो गोल गोल फिरवणे किंवा पदर तोंडावर धरून सगळीकडे बघणे असे तिचे प्रकार चालत. मॉलमध्ये किंवा पार्कमध्ये किंवा कुठेही गेलो तरी भरपूर मोकळी जागा दिसली की ती माझा पदर ओढून या टोकापासून त्या टोकापर्यंत तो जिथपर्यंत ओढला जाई तिथपर्यंत ओढत नेई आणि पुढे पळत जाई. नंतर मग पुन्हा दुसऱ्या बाजूला पण तसेच. खरेदीला किंवा कामाला कितीही वेळ लागला तरी तिला कंटाळवाणे होत नसे. आजूबाजूला असलेले सगळे परदेशी लोक तिच्या या खेळाकडे कौतुकाने बघत. माझ्याकडे बघून हसत आणि विचारीत, ‘ यू आर ग्रॅण्डमा?’ मी नुसतीच होकारार्थी मान हलवे. लपाछपी खेळताना तर माझ्या पदराच्या खाली लपणे ही तिची हक्काची जागा होती. बाहेर गेलो की थंडी वाजते म्हणून माझ्या पदरात ती स्वत:ला गुंडाळून घ्यायची. राधिकाच्या या खेळाने मी जेवढी सुखावत होते तेवढीच अंतर्मुखही झाले होते..
अगदी जन्मल्यापासून आईच्या पदराखाली तोंड लपवून दूध पिणारे बाळ, कळायला लागल्यानंतर हळूच पदर बाजूला करून तिच्याकडे बघून हसते, स्वर्गसुख यापेक्षा वेगळे काय असणार? पहिल्यांदा बॉऽऽऽ करून भॉऽऽऽक करण्याचा खेळ तिच्या पदरापासूनच सुरू होतो. नंतर ते तिच्याच पदराखाली मोठे होतात, पदर हातात धरून सारखे तिच्याभोवती घुटमळत असतात आणि आई? मुलांच्या सगळ्या चुका आपल्या पदरात घेते. प्रसंगी लोकांपुढे आपला पदर पसरते. एका आईच्या पदरात सगळे जग सामावले आहे. त्याच सुखाचा पुन:प्रत्यय मला राधिकामुळे मिळत होता..  
एकदा तर राधिकाने कमालच केली. तिचे उन्हाळी सुट्टय़ांचे वर्ग सुरू होते. आणि वर्ग संपत आले की शेवटच्या दिवशी सगळ्या मुलांचे गेटटूगेदर असते. ‘आजी, आज तू पण आईबरोबर माझा कार्यक्रम बघायला ये हं.’ तिने मला तीनतीनदा सांगितले. आम्ही गेलो. राधिका कुठे दिसते का ते आम्ही बघत होतो. तेवढय़ात तिने मला हात केला. कार्यक्रम संपल्यानंतर तिच्या आईने तिला विचारले,‘राधिका, एवढय़ा गर्दीत आम्ही आलेलो तुला दिसलो का?’
‘मम्मा आय सॉ आज्जी’ज् पडर्र..’ आणि  ‘पडर्र ऽऽऽ’ म्हणत तिने त्याचा एक छान पापा घेतला. कधी कधी किती साध्या साध्या आणि लहान लहान गोष्टी माणसाला आयुष्यात आनंदाचे, सुखाचे भांडार खुले करून देतात. राधिकाला अमेरिकेत, तिच्या आजूबाजूच्या जगात कुठे पदर दिसतच नव्हते, त्यामुळे तिला पदराबद्दल कुतूहल वाटत होते. त्याच्याशी खेळण्यात तिला मजा वाटत होती. आणि मीही या गोष्टीचा विचार करीत होते. माझ्या मनात विचार आला, कोण जाणे काही दिवसांनी पदर म्हणजे काय हे लोकांना कळणार नाही आणि त्याचा अर्थ शब्दकोशात बघायची वेळ येईल.     
नंदिनी देशमुख- nandini.deshmukh @ gmail.com