आरती अंकलीकर ‘सरदारी बेगम’ चित्रपटातली शास्त्रीय संगीताच्या बाजाने जाणारी गाणी मला गायची होती. खरं तर २५ वर्ष मी गात, रियाझ करत होते; परंतु चित्रपटासाठी पार्श्वगायनाचा अनुभव माझ्यासाठी नवीन होता आणि तोही श्याम बेनेगल, जावेद अख्तर, वनराज भाटिया, अशोक पत्की यांसारख्या दिग्गजांबरोबर. गुरू वसंतराव कुलकर्णीकडे राग भैरव मी वर्षभर शिकत होते; पण इथे चित्रपटातला प्रसंग सांगणं, त्यावर तिथेच बसूनच गाणं लिहिणं, त्यावर स्वरसाज चढणं, ते गाणं आम्हाला शिकवणं, आम्ही ते आत्मसात करणं आणि शेवटी रेकॉर्डिग, एवढं सगळं केवळ ५ तासांत करायचं.. खूप आव्हानात्मक, श्रीमंत करणारा अनुभव होता तो! स्टुडिओ ‘रेडिओवाणी’त सकाळी १० वाजता भेटायचं ठरलं होतं. छानसा सलवार-कमीज घालून मी साडेनऊला घरून निघाले. १९९५ चा नोव्हेंबर महिना होता तो. आताएवढं ट्रॅफिक नसे त्या वेळी, त्यामुळे चालणार होतं! बरोबर १० ला १० मिनिटं असतानाच वरळीच्या पोतदार हॉस्पिटलवरून सीफेसकडे जाणाऱ्या रस्त्यावर गाडी वळवली.. वेळेत पोहोचले होते; पण तरीही थोडी बिचकतच स्टुडिओत शिरले. माहोल नवीन, थोडासा अनोळखी होता. रेकॉर्डिस्ट प्रमोद घैसासनं हसतमुखानं स्वागत केलं. अशोक पत्की हजर होते. बाकी मंडळी अजून यायची होती. पुढच्या १५-२० मिनिटांत हळूहळू सगळी मंडळी जमू लागली. तबलावादक केदार पंडित, ज्यानं माझं नाव सुचवलं होतं तो. सारंगी वादक खानसाहेब, सुप्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर, त्या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक वनराज भाटिया आणि दिग्दर्शक श्याम बेनेगल! इतकी सगळी दिग्ग्ज मंडळी आजूबाजूला बसलेली. मला पार्श्वगायनाचा अनुभव नव्हता. अर्थात, गायला लागून मात्र २५ वर्ष झालेली होती. १९७० मध्ये मी गाणं शिकायला सुरुवात केली आणि हे वर्ष होतं १९९५. त्यामुळे, १९७० ते १९९५ दरम्यान माझी संगीत साधना अखंड सुरू होती; पण हा चित्रपट संगीताचा माहोल थोडा वेगळा होता माझ्यासाठी. जरा साशंक होते मी सुरुवातीला. अशोक पत्कींनी मला एक ठुमरी गायला सांगितली. माझे गुरुजी वसंतराव कुलकर्णी यांनी शिकवलेला दादरा ‘सजनवा कैसे मैं आऊ तोरे पास’ मी गाऊन दाखवला. मी गाणं सुरू केल्यानंतर काहीच क्षणात वनराज भाटिया, श्यामबाबू, अशोक पत्की आणि जावेद अख्तर, चौघांच्याही डोळय़ांमध्ये एक चमक मला दिसली आणि त्यांची एकमेकांशी होणारी नजरानजरदेखील माझ्या नजरेनं टिपली. क्षणात, बावरलेल्या आरतीचं रूपांतर अतिशय आत्मविश्वासानं गाणाऱ्या आरतीत झालं! मी मनसोक्तपणे दादरा ऐकवला. सगळे खूश झाले. श्यामबाबू म्हणाले, ‘‘सरदारी का ये गाना हैं, वो आप गाईये। सरदारी किचनमें काम कर रही है, और सोचते-सोचते वो गुनगुनाने लगती है और एक गझल उसे याद आ जाती हैं। वही अब हम आज रेकॉर्ड करेंगे।’’ मला खूप आनंद झाला. तेवढय़ात स्टुडिओमध्ये सुप्रसिद्ध गायिका शोभा जोशी आल्या. त्यांनाही याच चित्रपटात गाण्यासाठी बोलावलं होतं. त्या माझ्यापेक्षा खूप मोठय़ा, अनुभवी गायिका. शोभा गुर्टू यांच्याकडे अनेक वर्ष त्यांनी तालीम घेतली होती. अत्यंत सुरेल, घुमारदार गळा त्यांचा! आल्याबरोबर त्यांनीदेखील एक दादरा ऐकवला, ‘नजरिया लागे नही कहीं और..।’ खूप सुरेख गायल्या त्या. छान ठेहराव होता त्यांच्या गाण्यात! त्यांच्या येण्यानं आधी दिलेला प्रसंग श्यामबाबूंनी बदलून टाकला. ते म्हणाले, ‘‘आता आधी आपण वेगळय़ा प्रसंगावरचं गाणं रेकॉर्ड करू.’’ सरदारी आणि तिच्या गुरूंचं गाणं रेकॉर्ड करू.’’ त्याप्रमाणे त्यांनी त्या प्रसंगाचं वर्णन केलं. जावेद अख्तर म्हणाले, ‘‘मला थोडा वेळ द्या. मी गाणं लिहून आणतो,’’ असं म्हणत ते सिंगर्स बूथमध्ये एकांतात जाऊन बसले. त्याआधी वनराज भाटिया यांनी जावेदजी आणि अशोक पत्की यांना गाण्याचं वृत्त, गाण्याची एक चाल पियानोवर वाजवून ऐकवली होती. केवळ त्या एका चाल लावलेल्या ओळीचा आधार घेऊन जावेद अख्तर त्या बूथमध्ये गेले, आणि इथे अशोक पत्कीदेखील त्या एका ओळीवर बांधल्या जाणाऱ्या डोलाऱ्याचा विचार करू लागले. वनराज भाटियाही ती एक ओळ सांगून कुठे तरी बाहेर निघून गेले. मी तशीच बावरलेली. जे काही घडत होतं ते माझ्यासाठी नवीन होतं. मला तर गाण्याचे शब्दही माहीत नव्हते, ना चाल माहीत होती, ना राग माहीत होता! सगळाच अनुभव नवीन. माझ्या गळय़ाची तयारी झाली होतीच; पण त्या अनुभवाला सामोरं जाण्यासाठी माझं मन, माझी बुद्धी तयारी करत होती. पहिला राग जो मला वसंतराव कुलकर्णीनी शिकवला होता, राग भैरव; वर्षभर त्याची तालीम सुरु होती. मला आठवतंय, एकच राग, तीच बंदिश वर्षभर चालू.. आज इथे मात्र जावेदजींनी लिहिलेल्या ताज्या गीताला अशोक पत्की लगेच चाल लावून मला शिकवणार होते आणि मला ते गाणं तिथेच आत्मसात करून रेकॉर्ड करायचं होतं. मोठं होतं आव्हान. तिथेच गाणं शिकायचं, गळय़ावर चढवायचं. माझ्या सर्जनशीलतेनुसार ते गाणं माझं करून मला गायचं होतं, माझ्या गळय़ाला साजेसं. जावेद अख्तरांनी लिहिलेले, पत्कींनी सुरात घोळवलेले ते शब्द, ‘माझे’ करायचे होते मला! आणि यासाठी माझ्याकडे वेळ होता अर्धा ते पाऊण तास! अर्ध्या तासात जावेदजी बूथमधून बाहेर आले तेच चार अंतऱ्यांचं एक सुंदर गीत लिहून. ‘राह में बिछी हैं पलकें आओ, फूल महके रंग छलके आओ।’ शोभाजी आणि माझं द्वंद्व गीत होतं ते. त्या गुरू आणि मी शिष्या आम्ही दोघी मिळून गायचं होतं ते. सरदारी बेगम आणि तिच्या गुरू रंगमंचावर बसून हे गाणं सादर करतायत असा प्रसंग चित्रपटामध्ये होता. वनराजजींनी आणि अशोकजींनी मिळून सुंदर चाल दिली त्या गीताला. शोभाताईंच्या ओळी त्यांना शिकवल्या गेल्या, माझ्या ओळी मी शिकले आणि आम्ही गाण्याची तालीम सुरू केली. इतकं सोपं नव्हतं ते गाणं! ताईंचा आवाज त्या गुरूंच्या वयाला साजेसा. धीर-गंभीर, शांत आणि माझंही वय सरदारी बेगमच्या वयाला साजेसंच. बेधडकपणे गाण्याची माझी वृत्ती, मनात आलेला विचार पटकन गळय़ातून हुकमतीने गाण्याचं परमेश्वरानं मला दिलेलं वरदान.. तालमींमध्येच गाण्याचा मजा येऊ लागला. केदारचा सुंदर ठेका, गाण्यात सुरात-सूर मिळवून वाजणारी सारंगी. मध्येच मंजूळ स्वरात वाजणारं स्वरमंडळ. बस इतकीच वाद्यं होती. त्यामुळेच बहुधा एक सुरेल माहोल तयार झाला तिथे! आम्ही दोघी गायकांच्या बूथमध्ये गेलो. तेवढय़ात वनराजजी आले आणि मला म्हणाले, ‘‘अरे, तू यंग सरदारी के लिये गा रही हैं, थोडी लचक लाओ गाने मे, हां?’’ आम्ही दोन-तीन वेळा गायलो आणि गाणं रेकॉर्ड झालं. सकाळी मी स्टुडिओत पोहोचल्यावर चित्रपटातील तो प्रसंग श्यामबाबूंनी सांगितला होता. त्या वेळेपासून गाणं रेकॉर्ड होईपर्यंतचा काळ केवळ ४ ते ५ तास. इतक्या कमी वेळात गाणं लिहून, त्याची चाल तयार करून, ते आम्ही शिकून, आत्मसात करून, ते गाणं आमचं करून, गाऊन, वादकांनी त्या गाण्याला साजेशी संगत करून नंतर ते रेकॉर्ड होऊन, ४-५ तासांत फायनल होणं म्हणजे खरंच आजच्या काळातील रेकॉर्डिग पाहता, मला चमत्कारच वाटतो. आज एक गाणं रेकॉर्ड करण्यासाठी १५ दिवस ते एक महिनादेखील लागू शकतो. कारण रेकॉर्ड करण्याची पद्धतच बदललेली आहे. एखाद्या दिवशी तबला रेकॉर्ड होतो, दुसऱ्या दिवशी बासरी रेकॉर्ड होते, कधी सतार, अशी वेगवेगळी वाद्यं वेगवेगळय़ा दिवशी रेकॉर्ड होतात. नंतर कधी गायक येऊन गातो आणि अशा तऱ्हेनं प्रत्येक वाद्याचं रेकॉर्डिग आणि गायकाचं रेकॉर्डिग एकत्र करून, नंतर मिक्स करून बॅलन्स केलं जातं आणि या एका गाण्याचं ध्वनिमुद्रण पूर्ण होऊन तयार व्हायला महिनादेखील लागू शकतो; पण आम्ही ‘सरदारी बेगम’चं गाणं रेकॉर्ड केलं ते केवळ ५ तासांमध्ये! रेकॉर्डिगच्या पहिल्या दिवशी जेव्हा मी श्याम बेनेगल यांना भेटले तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की, ‘सरदारी बेगम’ चित्रपटासाठी तुला २-३ गाणी गायची आहेत. मी खूश होते. तीन गाणी रेकॉर्ड झाली. त्यानंतर श्यामबाबू म्हणाले, ‘‘परवा परत रेकॉर्डिग आहे ‘रेडिओवाणी’मध्ये, १० वाजता ये! आणखी एक गाणं रेकॉर्ड करू.’’ अशा प्रकारे ३ गाणी गाण्यांसाठी गेलेली मी, ७ गाणी रेकॉर्ड करून आले. अत्यंत समृद्ध करणारा अनुभव होता तो. प्रत्येक वेळी स्टुडिओत भेटायचं, चित्रपटातला प्रसंग श्यामबाबू सांगत, तिथेच गाणं लिहिलं जायचं, चाल दिली जायची आणि मी ती शिकून गायची. या गाण्यांनी मला खूप काही शिकवलं! मला आठवतंय, एके दिवशी मी रेकॉर्डिग करून ‘रेडिओवाणी’ स्टुडिओमधून खाली उतरले. बिल्डिंगच्या बाहेर पडले तर समोर साक्षात आशाताई भोसले! मी त्यांना नमस्कार केला आणि त्यांना सांगितलं, ‘‘मी आरती अंकलीकर.’’ आशाताई म्हणाल्या, ‘‘मी तुम्हाला ओळखते. मी तुमचं शास्त्रीय संगीतही ऐकलं आहे आणि ‘सरदारी बेगम’ चित्रपटातली गाणीसुद्धा ऐकली आहेत. छान गाता तुम्ही.’’ मी थेट पोहोचले, सातवे आसमान पर! साक्षात सरस्वतीचं दर्शन झालं होतं मला. ज्यांची पूजा मी लहानपणापासून करत होते. त्यांची अनेक गाणी, ‘युवतिमना दारुण रण’, ‘जिवलगा’, ‘पिया तू अब तो आजा’, ‘आज कुणी तरी यावे’; ‘उमराव जान’मधील त्यांच्या गझला, एक-एक अविस्मरणीय गाणी! पुढे ‘सरदारी बेगम’साठीही आशाताईंची दोन गाणी रेकॉर्ड झाली. एक गाणं ‘मोरे कान्हा जो आये पलटके’ हे आमच्या दोघींच्या आवाजात रेकॉर्ड झालं. मी गायलेलं पारंपरिक पद्धतीत नटलेलं आणि आशाताईंनी गायलेलं थोडं निराळं, मॉडर्न! रेकॉर्ड केलं तेव्हा आमचं प्रत्येक गाणं साधारण ३ ते ४ मिनिटांचं होतं; पण जेव्हा प्रत्यक्ष चित्रपट पाहिला तेव्हा केवळ एक एकच मिनिटाचं गाणं वापरलं गेलं होतं. गाणं पूर्ण वापरलं असतं तर त्या गाण्याला न्याय मिळाला असता, असं वाटून गेलं त्या वेळी. मात्र तीन-चार वेळा चित्रपट पाहिल्यानंतर श्यामबाबूंना काय म्हणायचं होतं ते कळलं! सरदारी बेगमचं व्यक्तिमत्त्व, तिच्या सगळय़ा सोयऱ्यांच्या नजरेतून चित्रित केलं होतं श्यामबाबूंनी. ती केवळ एक गायिका म्हणून नाही, तर एक व्यक्ती म्हणून कशी आहे हे प्रत्येकाच्या नजरेतून दाखवल्यामुळे सरदाराची गाणी केवळ एक मिनिट दाखवणं हेच उचित होतं हे लक्षात आलं. हा सगळा अनुभव श्रीमंत करून गेला मला!