मनुष्य एवढा बेपर्वा का आहे?
-जेव्हा ज्ञानदान करणे व विद्यार्थ्यांची नोकरी मिळविण्यासाठी तयारी करणे, एवढय़ापुरतेच शिक्षण स्वत:ला मर्यादित करते, ते जेव्हा फक्त आदर्श समोर ठेवते व विद्यार्थ्यांला त्याच्या स्वत:च्या यशाचीच काळजी करायला शिकविते, तेव्हा मनुष्य बेपर्वा होणे स्वाभाविकच आहे. असे पाहा, आपल्यापैकी बहुतेकांची हृदये प्रेमशून्य आहेत. आपण कधी ताऱ्यांकडे पाहत नाही, कधी खळखळणाऱ्या पाण्याने आनंदित होत नाही. धावत्या पाण्याच्या प्रवाहावर चमचमणारे चांदणे कधी पाहत नाही किंवा पक्ष्याचे उड्डाण पाहत नाही. आपल्या हृदयात गाणेच नाही. आपण नेहमी कशात तरी मग्न असतो. मानव जातीला वाचविण्याच्या योजनांनी व आदर्शानी आपली मने भरून गेलेली असतात. आपण बंधुत्वाची भाषा करतो आणि आपली नुसती नजरही बंधुत्व नाकारणारी असते. म्हणूनच आपल्याला लहानपणीच योग्य प्रकारचे शिक्षण मिळणे फार महत्त्वाचे आहे, म्हणजे आपली मने व हृदये उघडी असतील, संवेदनक्षम, उत्सुक असतील. पण ती उत्सुकता, ती शक्ती, ती स्फोटक आकलनशक्ती, जेव्हा आपण भयग्रस्त होतो तेव्हा लगेच नष्ट होते; आणि आपण बहुतेकजण भित्रेच असतो. आपण आपल्या पालकांना भितो, आपल्या शिक्षकांना, पुरोहिताला, सरकारला, आपल्या साहेबाला भितो. आपल्याला आपली स्वत:चीच भीती वाटत असते. म्हणून जीवन भयावह होते, काळेकुट्ट होते आणि म्हणूनच मनुष्य बेपर्वा असतो.
* आपल्या आवडीचे काम करणे टाळूनही आपल्याला मुक्तीचा मार्ग सापडेल का?
– आपल्याला काय करावेसे नक्की वाटते ते ओळखणे ही एक अत्यंत अवघड गोष्ट असते पाहा. हे किशोरावस्थेत नव्हे, तर आयुष्यभर अवघडच असते आणि तुमच्या संपूर्ण अस्तित्वानिशी तुम्हाला काय करायला आवडते ते तुमचे तुम्ही शोधून काढले नाही तर तुम्ही, तुम्हाला मनापासून ज्या कामात मुळीच रस नाही ते करीत बसाल आणि मग तुमचे जीवन अतिशय दु:खी होईल. आणि जीवनात दु:खी असल्यामुळे तुम्ही चित्रपट, मद्यपान, असंख्य पुस्तके वाचणे, कसली तरी सामाजिक सुधारणा करणे इत्यादी अनेक प्रकारचे विरंगुळे शोधाल.
तेव्हा तुमचे पालक व समाज तुम्ही काय करावे याबाबत काहीही सांगत असले तरी ते बाजूस ठेवून तुम्हाला स्वत:ला आयुष्यभर काय करावेसे वाटते ते शोधून काढण्यास शिक्षक तुम्हाला मदत करू शकेल का, तोच खरा प्रश्न आहे, नाही का? कारण तुमच्या सर्व अस्तित्वानिशी कोणते काम करायला तुम्हाला आवडते हे एकदा का तुम्हाला कळले की तुम्ही स्वतंत्र माणूस झालात. मग तुम्हाला सामथ्र्य, आत्मविश्वास आणि उपक्रमशीलता- सारे काही असते. पण तुम्हाला काय करण्यात खरा आनंद आहे ते न जाणता तुम्ही वकील, राजकारणपटू किंवा आणखी कोणी तरी झालात तर सुख तुमच्या वाटय़ास येणार नाही, कारण तो पेशाच तुम्हाला व इतरांना नष्ट करण्याचे एक साधन बनेल.
तुम्हाला काय करायची खरोखर तळमळ आहे ते तुम्ही स्वत:च ओळखून काढले पाहिजे. समाजात चपखल जम बसण्याच्या हेतूने व्यवसाय निवडण्याचा विचार करू नका, कारण तुम्हाला कोणते काम करण्यात आनंद वाटतो हे कळणारे नाही. तुम्हाला जेव्हा एखादे काम करण्याचे प्रेम असते तेव्हा तेथे निवड करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. तुम्ही जेव्हा प्रेम करता तेव्हा त्या प्रेमभावनेतूनच जी कृती घडेल ती घडू द्या; म्हणजे योग्य तीच कृती घडेल. कारण प्रेम कधी यशाच्या मागे लागत नाही, ते कधी अनुकरणात अडकत नाही. पण ज्या कामावर तुमचे प्रेम नसते ते काम करण्यास तुम्ही जीवन वाहिलेत तर तुम्ही कधीही स्वतंत्र होणार नाही.
पण केवळ स्वत:च्या मर्जीला येईल ते करणे म्हणजे जे आपल्या खरोखरी जिव्हाळ्याचे आहे ते काम करणे नसते. तुम्हाला खरोखर काय करण्यात रस आहे हे शोधण्यासाठी फार मोठी भेदक बुद्धी असावी लागते, अंतर्दृष्टी असावी लागते. चरितार्थ चालवायचा आहे वगैरे भाषेत विचार करण्यापासून प्रारंभ करू नका, पण जर का तुम्हाला काय काम करण्यात खरोखर रस आहे. कशात आनंद आहे  ते सापडले तर तुम्हाला चरितार्थाचेही साधन मिळेल.
* जे शुद्ध असतात तेच केवळ निर्भय असू शकतात हे खरे आहे काय?
– शुद्धता, ब्रह्मचर्य, बंधुत्व, अहिंसा वगैरे ध्येये व आदर्श बाळगू नका, कारण ते अर्थशून्य असतात. धाडसी होण्याचा प्रयत्न करू नका, कारण ती केवळ भयाची प्रतिक्रिया असते. निर्भय असण्यासाठी अत्यंत श्रेष्ठ अंतज्र्ञान असावे लागते, भयाची सर्व प्रक्रिया व त्याचे कारण यांचा संपूर्ण बोध व्हावा लागतो.
असे पाहा, जोपर्यंत तुम्हाला तुमच्या विवाहात, तुमच्या नोकरीत, तुमच्या अधिकारपदात, तुमच्या जबाबदारीत, तुमच्या कल्पनांत, तुमच्या श्रद्धांत, जगाबरोबरच्या तुमच्या संबंधात किंवा ईश्वराबरोबरच्या तुमच्या संबंधात सुरक्षितता हवी असते, तोपर्यंत भय अस्तित्वात असते. मन ज्या क्षणी कोणत्याही स्वरूपात कोणत्याही पातळीवर सुरक्षितता किंवा समाधान मागते त्या वेळी भय अस्तित्वात येणारच; आणि या प्रक्रियेचे भाग असणे व ती समजून घेणे हेच महत्त्वाचे असते. तथाकथित शुद्धतेचा हा प्रश्न नाही. जे मन दक्ष, निरीक्षणशील असते, भयमुक्त असते, ते मन निष्पाप असते आणि असे निष्पाप असणारे मनच सद्वस्तू, सत्य किंवा ईश्वर यांचा बोध प्राप्त करू शकते.
दुर्दैवाने या देशात व इतरत्र, आदर्शाना विलक्षण महत्त्व प्राप्त झालेले आहे. आदर्श म्हणजे ‘जे व्हावे’ असे वाटते ते. ‘मी अहिंसक व्हावे’, ‘मी चांगला व्हावे’ वगैरे कल्पना त्यात येतात. ‘जे व्हावे’ असे वाटते तो आदर्श नेहमी कुठेतरी दूर असतो. त्यामुळे तो कधीही प्रत्यक्ष अस्तित्वात नसतो. आदर्श हे शापच आहेत; कारण जेव्हा तुम्ही वस्तुस्थितीला तोंड देता, तेव्हा थेट साधेपणाने, खरेपणाने विचार करण्यास ते प्रतिबंध करतात. आदर्श- ‘जे व्हावेसे वाटते’ ते म्हणजे ‘जे आहे’ त्यापासून पलायन असते. ‘जे आहे’ ते म्हणजे तुम्ही भीत असता ही वस्तुस्थिती- तुम्ही, पालक काय म्हणतील याला भिता, लोकांना काय वाटेल याला भिता, समाजाला भिता, रोगाला, मृत्यूला भिता आणि जर तुम्ही ‘जे आहे’ त्याला तोंड दिलेत, त्याकडेच सरळ पाहिलेत, त्याने जरी तुम्हाला क्लेश झाले तरी त्यात शिरलात व तेच समजून घेतलेत तर तुम्हाला तुमचे मन असाधारण रीतीने साधे, स्पष्ट, निर्मल झाले आहे असे दिसून येईल. आणि या निर्मळपणातच भयाचा अंत असतो. दुर्दैवाने आपल्याला नाना प्रकारच्या तात्त्विक आदर्शाच्या विक्षिप्त गोष्टींचे ज्ञान मिळत असते, पण ती नुसती चालढकल असते, त्यांना सत्यता मुळीच नसते.
* मनुष्य हा त्याच्या स्वत:च्याच वासनांचा बळी असतो. त्या वासना अनेक समस्या निर्माण करतात. मग निर्वासन अशी अवस्था तो कशी काय अस्तित्वात आणू शकेल?
– निर्वासन अशी अवस्था आणण्याची इच्छा करणे ही मनाची निव्वळ एक चलाखी आहे. वासनेमुळे दु:ख निर्माण होते हे पाहून व त्या दु:खापासून सुटका करून घेण्यासाठी मन हे निर्वासन स्थितीचा काल्पनिक प्रक्षेप करते आणि मग विचारते- ‘‘मी माझा आदर्श कसा गाठीन बरे?’’ आणि मग काय घडते? निर्वासन होण्यासाठी तुम्ही तुमची वासना दडपून टाकता, होय की नाही? तुम्ही तुमच्या वासनेचा गळा घोटता, तुम्ही तिला ठार मारण्याचा प्रयत्न करता आणि मग तुम्हाला वाटते की आपल्याला निर्वासन स्थिती प्राप्त करता आलेली आहे, पण ते सगळे खोटे असते.
वासना हे काय असते? ती शक्तीच असते, होय ना? आणि ज्या क्षणी तुम्ही तुमच्या शक्तीची गळचेपी करता त्या क्षणी तुम्ही स्वत:ला मंद, निर्जीव करता. भारतात हेच झालेले आहे. तथाकथित सर्व धार्मिक व्यक्तींनी त्यांच्या वासनांचे दमन केलेले आहे; विचारशील आणि मुक्त असे फारच थोडे आहेत. तेव्हा वासनेची गळचेपी, दमन करणे हे महत्त्वाचे नसून शक्तीचे स्वरूप समजून घेणे व योग्य दिशेने शक्तीचा उपयोग करणेच महत्त्वाचे आहे.
शिक्षणाच्या मार्गाने, प्रत्येक प्रकारच्या मान्यतेच्या व नियंत्रणाच्या मार्गाने ती शक्ती हळूहळू चिरडून टाकली जाते, पण तुम्हाला जास्त शक्तीची आवश्यकता आहे, कमी शक्तीची नव्हे; कारण विराट शक्तीविना तुम्ही सत्य काय आहे ते कधीही शोधून काढू शकणार नाही. तेव्हा शक्तीला आळा कसा घालावा ही समस्या नसून ती टिकवून कशी वाढवावी, ती स्वतंत्र व अखंडित कशी ठेवावी, ही समस्या आहे- श्रद्धा किंवा समाजाची इच्छा म्हणून नव्हे, ती शक्ती सत्याकडे, ईश्वराकडे जाणारी चेतना होईल. मग शक्तीला अगदी वेगळेच महत्त्व असेल. शक्ती अमर्याद, अप्रमेय असते आणि ती शक्तीच ईश्वर होय.
( कृष्णमूर्ती फाऊंडेशन इंडिया, यांनी प्रकाशित केलेल्या ‘संस्कृतीचा प्रश्न’ या पुस्तकातील हा संपादित भाग, साभार)