गद्धेपंचविशी : रानझुडपासारखं एकाकी वाढताना… घडताना…

वयाची पंचविशी गाठली तेव्हा मी नागपूरच्या प्रतिष्ठित ‘धनवटे नॅशनल कॉलेज’मध्ये प्राध्यापक म्हणून नोकरीला लागलो.

|| रवींद्र शोभणे

‘‘कलासंस्कृतीचे आविष्कार पाहात माझं बालपण गेलं आणि चांगलं वाचताना माझ्याही आतून शब्द बाहेर पडू पाहायला लागले. पण लेखक म्हणून उभं राहायचं असेल, तर सकस लिहायला हवं, याचं भान ‘गद्धेपंचविशी’च्या काळातच येत गेलं. कविता हा माझा प्रांत नव्हे हा साक्षात्कारही झाला. शिवणकाम करून शिकता शिकता के लेलं लेखन, नाटकाच्या वेडानं घरातून २६ दिवसांसाठी परागंदा होणं, ‘साहित्याच्या वेडापायी वाया गेलेला दिवटा’ ही ओळख तयार होणं, हे माझ्या ‘गद्धेपंचविशी’चं फलित. पण याच काळातल्या अनुभवांमधून रानझुडपासारखं आपला मार्ग धरून वाढत जाणं शिकत गेलो. त्यातून अनेक साहित्यकृती घडत गेल्या… ’’

वयाची पंचविशी गाठली तेव्हा मी नागपूरच्या प्रतिष्ठित ‘धनवटे नॅशनल कॉलेज’मध्ये प्राध्यापक म्हणून नोकरीला लागलो. याआधी काही वर्षांपासून अधांतरी असलेला रोजीरोटीचा प्रश्न आता संपूर्णपणे मिटला होता. मागचं अस्थिर आणि धकाधकीचं जगणं आता थांबलं होतं. आईवडील, बहीणभाऊ, रक्ताची नाती असलेली, नसलेली सगळी माणसं या घटनेनं सुखावली होती. त्यांच्याही मनात काही सुखासीन स्वप्नं आकारू लागली होती. त्यांच्या दृष्टीनं ते गैरही नव्हतंच; पण वयाच्या या टप्प्यावर पंचविशीच्या या खुंट्याला स्वत:ला बांधून घेत मी आगेमागे पाहू लागतो, तेव्हा जडणघडणीच्या अनेक वाटांचा जणू एक कोलाज उभा राहतो. मागचंपुढचं सगळं स्पष्ट दिसू लागतं.

महाराष्ट्राच्या सीमेवर, आडवाटेवरील खरसोली गावात माझा जन्म झाला आणि शालेय शिक्षणही तिथेच झालं. गाव लहान होतं. २०० घरांचं; पण या गावात पारंपरिक अशा सगळ्याच गोष्टी रुजलेल्या होत्या. वारकरी संप्रदाय, गुरुदेव भजनी मंडळ, तमाशा-खडी गंमत, अशा प्रकारच्या कलांचा संस्कार या गावानं पचवला होता. आणि माझ्याही घरात हे तीनही संस्कार रुजले होते. आजोबा तमाशात काम करणारे, तर वडील, आजी, आई वारकरी संप्रदायाशी जुळलेली. त्यातच वडील पुन्हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गुरुदेव भजनी मंडळींमधले. शिवाय त्या काळात गावातल्या शाळेत नाटकंही नियमितपणे व्हायची. आणखी एक सांगायचं तर याच काळात सुरस रामकथा नाटकी ढंगानं सादर करणाऱ्या रामलीला कंपन्याही गावात यायच्या. मला वाटतं, मी या सगळ्या संस्कारात घोळवला गेलो आहे. कारण मला यातल्या कुठल्याही कला निषिद्ध नव्हत्या. अर्थात त्या टोकाच्या असूनही. बालसुलभ वृत्तीनं, औत्सुक्यापोटी या सगळ्यांतच माझा वावर असायचा. देवळात जाऊन गळ्यात टाळ अडकवून कीर्तनात उभा राहिलो. गुरुदेव भजनी मंडळीत जाऊन भजनं म्हटली. रात्र-रात्रभर जागून तमाशाचे खेळ पहिले. आणि एकही दिवस न चुकवता रामलीलेचेही खेळ पाहिले. रामलीला कंपनीतल्या मुलांशी मैत्री करून मी वाचलेल्या महाभारताच्या कथा त्यांना ऐकवल्या.

यातूनच कधीतरी शब्दांशी नकळत नातं जुळलं. वाचनाचं वेड लागलं. नरखेडच्या आठवडी बाजारात जाऊन गोष्टींची पुस्तकं विकत घेऊ लागलो. त्यासाठी घरून पैसे चोरून किंवा जमवून ठेवलेले असायचे. यातही महाभारत कथा आणि रामायण कथासार, यांसारखी पुस्तकं विकत घेऊन वाचून काढली. अभ्यासाव्यतिरिक्त इतर पुस्तकं वाचण्याचं हे वेड अंगात विष भिनावं तसं अंगात भिनत गेलं. अशातच कुठेतरी आतून शब्द बाहेर पडू पाहत होतेच. कवितेच्या रूपात. पण कविता त्यासाठी अपुरी पडत असल्याची जाणीव झाली आणि सातव्या वर्गात असताना एक नाटुकलं लिहून ते गाई-म्हशी बांधण्याच्या गोठ्यात मित्रांच्या सहकार्यानं सादरही केलं. आपल्यात एक लेखक दडलेला आहे, ही जाणीव अस्पष्टशी, पण सार्थपणे झाली.

दहावीपर्यंत हे असंच सुरू होतं. मराठी शिकवणारे मास्तर भले मिळाले म्हणून हे वेड अधिक खोल खोल रुजत गेलं. त्या तुलनेत गणित बोकांडी बसलं होतं. आणि अशातच दहावीला असताना गणितानं घात केला. त्या विषयानं पुन्हा एक वर्ष दहावीतच मला धरून ठेवलं आणि पुढे कॉलेजात गेलो की या विषयाला कायमचा निरोप द्यायचा हेही मनोमन ठरवलं. दुसऱ्या वर्षी दहावीची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊनसुद्धा कला शाखेत प्रवेश घेतला. गंमत म्हणजे जीवनात सहप्रवासी (अरुणा) मिळाली ती गणिताची स्कॉलर!

घरची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच. घरी छोटंसं किराणा दुकान, शिलाई मशीन आणि सव्वादोन एकर शेती. मोठ्या बहिणीचं लग्न झालं आणि किराणा दुकान बसलं ते कायमचंच. मग वडिलांनी शिवणकाम सुरू केलं. तोपर्यंत मीही घरच्या घरी बऱ्यापैकी शिवणकाम करू लागलो होतो. या दिवसांत हाती येईल त्या पुस्तकाचं वाचन, मनात येईल ते लेखन आणि घरच्या परिस्थितीला हातभार लागावा म्हणून शिवणकाम, अशी ‘बी.ए.’पर्यंतची दिनचर्या ठरली होती. मधल्या काळात नाटकाच्या वेडापायी घरी न सांगता मुंबईला निघून गेलो होतो. २६ दिवस भटकून भटकून आलेले अनुभव घेऊन घरी परतलो आणि जन्माचं शहाणपण शिकलो. त्याच अनुभवावर ‘सव्वीस दिवस’ ही कादंबरी पुढे लिहून काढली.

यादरम्यान लेखन- म्हणजे नाटकांचं लेखन, मध्येच कधीतरी कविता हे सुरूच होतं. एक वल्ली, लेखनाच्या-साहित्याच्या वेडापायी वाया गेलेला दिवटा म्हणून गावात भरपूर प्रसिद्ध झालो होतो. अशातच ‘बी.ए.’ची परीक्षा झाली आणि नागपूरला पुढच्या शिक्षणासाठी आलो. घरून कुठलाही आधार नव्हता. उलट इथूनच घरी काही मदत करावी लागायची. पण शिवणकामाची कला आणि प्रचंड जिद्द सोबतीला होती. त्याच बळावर सकाळी कॉलेज करायचं आणि इथला आपला खर्च भागवायला दुपारी एखाद्या टेलरच्या दुकानात जाऊन कपडे शिवायचे, हे ठरवलं. पण अशातही पुस्तकाची गाठ मात्र सैल झाली नाही.

नागपुरात आलो तेव्हा कवी ग्रेस यांची ओळख झाली. त्यांना मी लिहिलेल्या कविता दाखवल्या. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली- ‘गुरुजी, माझ्या छायेत राहून कविता लिहिणार असाल, तर त्या न लिहिलेल्या बऱ्या.’ आणि त्याच क्षणी जाणवलं- कविता आपला प्रांत नाही. नंतर कवितेचं बोट सुटलं ते कायमचंच. आपण कविता लिहिल्या नाहीत याची कधी खंतही नंतर कधी मनाला शिवली नाही. याच दिवसात, म्हणजे ‘बी.ए.’च्या दुसऱ्या वर्षाला असताना लिहिलेल्या कादंबरीला ‘साहित्य आणि संस्कृती मंडळा’चं अनुदान मिळालं आणि ती कादंबरी ‘प्रवाह’ या नावानं प्रकाशित झाली. दरम्यान काही दिवस ‘लोकमत’मध्ये प्रूफरीडर म्हणून नोकरीला लागलो. आणि त्याच आधारावर नागपूरच्या साहित्य क्षेत्रात वावर वाढला. साहित्यिक

डॉ.द. भि.कुलकर्णी, ग्रेस, यशवंत मनोहर, मनोहर तल्हार, प्रा. या. वा. वडस्कर, श्रीपाद जोशी, भाऊ समर्थ इत्यादी मंडळींच्या संपर्कात आलो. एक होतकरू लेखक म्हणून वावरू लागलो. पण हा वावर तसा काही खरा नाही, आपल्याला साहित्यात आपली ओळख निर्माण करायची असेल, तर काहीसं वेगळं, सकस असं हातून लिहून व्हायला हवं, ही जाणीव आतून ढुशा देत होतीच. याच दिवसात ‘विदर्भ साहित्य संघा’चं तेव्हाचं ‘शिवाजी संदर्भ ग्रंथालय’ जवळचं झालं. मराठीत ‘एम.ए.’, ‘बी.एड.’, शिवणकाम किंवा छोट्या छोट्या वर्तमानपत्रात नोकऱ्या आणि त्याबरोबरच लेखनाचे उद्योग सुरू होते. अशातच प्रा. या. वा. वडस्कर यांच्याशी ओळख झाली. तेव्हा ते ‘धनवटे नॅशनल कॉलेज’चे प्राचार्य होते. त्यांनी त्या काळात अमृता प्रीतम यांच्या अध्यक्षतेखाली याच कॉलेजच्या परिसरात जनसाहित्य संमेलन आयोजित केलं होतं. त्या संमेलनात मी एक स्वयंसेवक म्हणून वावरत होतो. त्यांनी जनसाहित्याची संकल्पना मांडली होती. या संमेलनात आनंद यादव, रा.रं. बोराडे, भास्कर चंदनशिव, नागनाथ कोत्तापल्ले इत्यादी मंडळी सहभागी झाली होती. हे संमेलन माझ्यासाठी निमित्त ठरलं, ते दोन अर्थांनी. पहिलं  म्हणजे मी त्याच कॉलेजात नोकरीला लागलो आणि दुसरं म्हणजे मला माझ्यातल्या लेखकाची अगदी जवळून ओळख झाली. मला माझ्या लेखनाचा सूर गवसला होता. वर्तमानपत्रांच्या रविवार पुरवण्या, मासिकं, दिवाळी अंक, विशेषांक, इत्यादींमधून कथा, कविता, ललितलेख, समीक्षा अशा चौफेर स्वरूपाचं लेखन मी करू लागलो. बरा लिहिणारा एक होतकरू लेखक म्हणून हळूहळू माझी ओळख होऊ लागली. याच दरम्यान ‘पीएच.डी.’साठी ‘साहित्यिक श्री. ना. पेंडसे’ हा विषय निवडून डॉ. अ. ना. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू लागलो होतो.

‘रक्तध्रुव’ या कादंबरीचं लेखन या काळात करत होतो. अशातच ‘इतिहास बदलतो आहे’ हे नाटक लिहून ते राज्य नाट्य स्पर्धेत सादरही झालं होतं. इथल्या नाटकातल्या मंडळींबरोबर ऊठबस होतीच. नाटकाचा प्रयोग चांगला झाला होता; पण स्पर्धेत ते नाटक टिकलं नव्हतं. त्यातल्या त्यात माझ्या लेखनाचं थोडंफार कौतुक झालं होतं. पण त्यापुढे या क्षेत्रात आपल्याला फार जाता येणार नाही, ही जाणीव मात्र झाली होती. ‘रक्तध्रुव’चं हस्तलिखित अनेकांना वाचायला देऊन पुनर्लेखन करत होतो. या निमित्तानं आनंद यादव यांच्याशी मैत्री वाढली. त्यांनी ते लेखन ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’कडे पाठवायला सुचवलं. शिवाय त्यांनीच एका दिवाळी अंकाकरिता ही कादंबरी सुचवली. त्या दिवाळी अंकाच्या १,५०० रुपयांच्या मानधनावर घरी गॅस आला आणि अरुणा वातीच्या स्टोव्हला बाजूला सारून गॅसवर स्वयंपाक करू लागली.

आणि अशातच गावात एक घटना घडली. एका भुरट्या चोराचा गावातल्या तीन-चार टग्यांनी भरचौकात खून केल्याची. तोवर मी नागपुरात स्थायिक झालो होतो. पण गावाची नाळ मात्र कायम होती. तो भुरटा चोर, ती टगी मुलं माझ्या परिचयाची होती. आणि त्यातूनच ‘कोंडी’चा जन्म झाला.‘कोंडी’मुळे सर्वत्र नाव झालं. चार पुरस्कार पदरी पडले. मध्यंतरी ‘वर्तमान’ हा कथासंग्रहदेखील ‘मॅजेस्टिक’कडून प्रसिद्ध झाला. आयुष्यात केलेल्या कुठल्याच गोष्टी वाया जात नाहीत हा माझा अनुभव पुन्हा मला नव्यानं आला तो ‘उत्तरायण’च्या निमित्तानं. पुराणकथांचं आडवंतिडवं वाचन करण्याचा परिणाम म्हणून आता महाभारत मनात वेगळ्या अर्थानं ठाण मांडून बसलं होतं. महाकाव्याला चिकटलेली सगळी निरर्थक पुटं बाजूला सारून माणसाची कथा म्हणून महाभारताचा विचार करू लागलो. दहा वर्षं त्यात घालवली. त्यातून ‘उत्तरायण’ साकारली गेली. गंमत म्हणजे देशीवाद्यांनी ती पारंपरिक म्हणून नाकारली आणि भोळ्या- भाबड्या वाचकांनी ती सामान्य माणसांची (अद्भुतता नाही) म्हणून नाकारली. पण तटस्थ वाचकांनी, जाणकारांनी मात्र तिचं मोल जाणलं. तिनं मला प्रतिष्ठा दिली. एक वेगळं,महत्त्वाचं लेखन म्हणून माझ्या लेखनप्रवासात ती कादंबरी उभी आहे.

लेखक म्हणून स्थिरावलो होतो. नवं, वेगळं शोधण्याच्या ध्यासातच आणीबाणीनंतरचा मोठा पट समोर ठाकला आणि त्यातून कादंबरी त्रयी उभी राहिली. अवतीभवतीचं अष्टवक्री वास्तव सतत धडका देत असतंच. अशातच दुष्काळाचा भीषण अनुभव देणारी ‘पांढर’ लिहून झाली. शिक्षण व्यवस्थेत इतकी वर्षं घालवल्यानंतर मी तरी कसा त्यापासून दूर राहणार? त्यातून ‘पांढरे हत्ती’सारखी कादंबरी लिहून झाली. याच वास्तवाचे छोटे छोटे तुकडे अंगावर येतात आणि त्यातून काही कथा लिहून होतात. महाभारताविषयीची आस्था म्हणा किंवा झपाटलेपण म्हणा, पण ते कायमच माझ्या व्यक्तिमत्त्वात आहे. या महान ग्रंथाचं इतिहासाच्या परिप्रेक्ष्यातून पुनर्मूल्यांकन होणं, मग ते ललित किंवा तात्त्विक पातळीवर असो, पण व्हायला हवं हा माझा कटाक्ष आहे. म्हणूनच मी ‘महाभारताचा मूल्यवेध’ हे पुस्तक लिहिलं. हा माझा शोध अनेकदा माझ्याच मुळावर घाव घालणारा ठरला. काही तथाकथित मंडळीं ‘रवींद्र शोभणे हा उजव्या विचारांच्या जवळचा आहे’ वगैरे वगैरे ठरवून मोकळे झाले. याच काळात मी ‘विदर्भ साहित्य संघा’च्या वर्तुळात प्रवेश केला आणि या हाकाटीला अधिक धार आली. अ. भा. मराठी साहित्य संमेलनाची निवडणूक लढवताना या गोष्टींचा मला अधिक कटु अनुभव आला. बहुजनीकरणाच्या नावाखाली साहित्य क्षेत्रातली काही मंडळी जातीय पीळ जपत गटातटाचे कंपू अधिक घट्ट, अभेद्य करत असल्याचा मला आलेला अनुभव अधिक उद्वेगजनक आहे.

या सगळ्या पटाचा विचार करता करताना पंचविशीच्या खुंट्यांपासून सुरू झालेला हा प्रवास पाहता मला एक जाणीव अधिक तीव्रतेनं होते आहे. माझ्या बाबतीत सांगायचं तर मी माझं सत्त्व माझ्या मातीतूनच शोधत राहिलो. अवतीभवतीच्या वंचनेचा विचार कधीही मनाला शिवू न देता. म्हणूनच मला नेहमी वाटतं, मी वाढत राहिलो ते रानझुडपासारखा.

ऊन-वारा-पावसाची तमा न बाळगता, आपण आपली वाट अधिक प्रामाणिकपणे, अधिक निष्ठेनं चालत राहिलो, की आपलं श्रेयस आपल्याला कुठेतरी सापडतंच. ‘जिस का जितना आंचल था, उस को उतनी  सौगात मिली…’ हेही नाकारता येत नाहीच ना!  

shobhaner@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Gaddhepanchvishi author ravindra shobhane article invention of art culture went the way of learning akp

Next Story
करिअरिस्ट मी : जिम् पोरी जिम्
ताज्या बातम्या