डॉक्टरांच्या जगात : व्रण- शरीरावर की मनावर?

डॉक्टरी पेशा हा नोबेल व्यवसाय मानला जातो. पण ते नोबेलपणही अनेकदा लोकांच्या मानसिकतेपुढे हतबल ठरतं. अगदी ऑपरेशन टेबलवरही येणारे स्त्रीच्या दुय्यमतेचे दु:खद अनुभव स्त्री-पुरुष विषमता अधिकाधिक गडद करत जातात. अनेक प्रश्न निर्माण करणारे डॉक्टरांना सातत्याने येत असलेले हे अनुभव तुमच्याही चिंतनासाठी. दर पंधरवडय़ाने..

डॉक्टरी पेशा हा नोबेल व्यवसाय मानला जातो. पण ते नोबेलपणही अनेकदा लोकांच्या मानसिकतेपुढे हतबल ठरतं. अगदी ऑपरेशन टेबलवरही येणारे स्त्रीच्या दुय्यमतेचे दु:खद अनुभव स्त्री-पुरुष विषमता अधिकाधिक गडद करत जातात. अनेक प्रश्न निर्माण करणारे डॉक्टरांना सातत्याने येत असलेले हे अनुभव तुमच्याही चिंतनासाठी. दर पंधरवडय़ाने..
एकदा एकोणीस वर्षांच्या आपल्या अविवाहित मुलीला घेऊन एक पिता हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. केस होती अंडाशयाच्या गाठीची.(ovarian cyst) जवळजवळ चाळीस सेंटिमीटर व्यासाची सोनोग्राफीत दिसलेली ती गाठ- त्यातही फक्त पाणी नाही; तर घन घटक  खूप असलेली. वरून पाहिल्यावर नऊ महिन्यांची गरोदर असलेल्या बाईसारखं तिचं पोट दिसत होतं. बापाचा आग्रह एकच होता, की, ‘ही गाठ दुर्बिणीच्या शस्त्रक्रियेनेच, लॅप्रोस्कोपीनेच काढा म्हणजे पोटावर मोठा व्रण नको दिसायला. मुलीची जात आहे ना ती! लग्न व्हायचंय तिचं,’ त्याचं म्हणणं. हे ऑपरेशन करून घेण्यासाठी तो बिहारमधून आला होता.
दुर्बिणीच्या शस्त्रक्रियेने आम्ही आत्तापर्यंत कितीतरी अंडाशयाच्या गाठी काढल्या असतील. पण एका बाळाच्या आकाराची ही गाठ – त्यात एवढी घनता असताना ते दुर्बिणीनं न काढता ओपन पद्धतीनं (पोटावर छेद देऊन पूर्वीच्याच पद्धतीने) काढणं हेच जास्त योग्य राहील; असं अनेक पद्धतीनं त्याला सांगून झालं, पण व्यर्थ! ‘मुलीच्या पोटावरची शस्त्रक्रियेची खूण बघून सासरचे लोक काय म्हणतील? काही झालं तरी ते दुर्बिणीनेच काढा’ असा त्याचा धोशा चालूच होता.
ती गाठ कर्करोगाची नाही ना, हे बघण्याच्या चाचण्या आम्ही करून घेतल्या आणि अखेर ती  केस करायला मी घेतली. ती शस्त्रक्रिया करताना अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या; पण त्या सगळ्यावर एका पाठोपाठ मात करत ती केस आम्ही दुर्बिणीनंच पूर्ण केली. करताना अनेकदा असं वाटलं, खरंच एवढा वेळ लावून ही अशी शस्त्रक्रिया करणं कितपत योग्य आहे? ओपन पद्धतीनं किती लवकर आणि सोपं झालं असतं वगरे वगरे! पण ‘मुलीच्या जातीला’ शरीरावर – विशेषत: पोटावर कोणतीही खूण असणं; हे संशयास कारण ठरू शकतं. लग्नाच्या वेळेस अनेक अडचणींना तोंड द्यावं लागेल, अशी शंका सतत मुलीच्या पालकांना भेडसावत राहते.
अलीकडे तर साध्या मुलीच्या अपेंडिक्सच्या ऑपरेशननंतरही -‘आता काही प्रॉब्लेम नाही ना डॉक्टर? पुढे हिला मुलं होण्याला त्रास नाही ना होणार?’ अशा शंका जवळजवळ ९५ टक्के वेळा विचारल्या जातात. अपेंडिक्स आणि जननसंस्था यांचा एकमेकांशी काही संबंध नाही, हे माहीत नसल्याचं अज्ञान मी समजू शकते, ते सांगितल्यावर लोकांना समजतंदेखील; पण मग हाच प्रश्न मुलावर अपेंडिक्सची शस्त्रक्रिया झाल्यानंतर का विचारला जात नाही? मुलीलाच कुठल्याही शस्त्रक्रियेच्या खुणेची एवढी चोरी किंवा न्यूनगंड का? अज्ञान हेच जर या प्रश्नामागचं कारण असेल; तर रुग्ण मुलगा असो वा मुलगी असो- हा प्रश्न समान प्रमाणात शंका म्हणून विचारला जायला हवा होता! ते राहो, मुलाच्या हíनया, हायड्रोसिल व इतर काही जननसंस्थेशी संबंधित शस्त्रक्रियांनंतरही हे प्रश्न मुलाच्या पालकांकडून फार क्वचित विचारले जातात. मुलीच्या पोटावर शस्त्रक्रियेची खूण दिसणं म्हणजे आपत्ती, मग तीच खूण जर मुलाच्या पोटावर दिसली; तर या शंका-कुशंकांचं मोहोळ आपोआप कसं विरून जातं?
या निमित्ताने अजून एक अनुभव सांगावासा वाटतो, मुलींमध्ये विशेषत: १७ ते २५ वयोगटातील मुलींमध्ये सहज दिसणारी गोष्ट म्हणजे स्तनांमध्ये दिसणारी साधी व घट्ट पण कर्करोगाची नसणारी गाठ. ज्याला fibroadenoma breast म्हटलं जातं, – जी औषधाने जात नाही; शस्त्रक्रियेनेच काढावी लागते. शस्त्रक्रियेनंतर व्रण जास्त दिसू नये म्हणून मी विशिष्ट प्रकारे चामडीच्या आतून टाके घेते, ज्यायोगे नंतर खूण अत्यल्प राहील. पण या शस्त्रक्रियेनंतरही – अनेक जण अनेक प्रश्न विचारतातच, ‘हे नंतर खराब दिसणार नाही ना? मुलाकडचे लोक काय म्हणतील? सासरच्यांना काय वाटेल?’ न संपणाऱ्या प्रश्नांची मालिका सुरूच राहते.. मला नेहमी विषाद या गोष्टीचा वाटत आला की या प्रश्नांऐवजी ‘हिला बाळाला दूध देताना काही अडचण नाही ना येणार ?’ असे जास्त सुसंगत प्रश्न का नाही विचारले जात? जे खरं तर त्या अवयवाच्या महत्त्वाच्या कामाविषयी असतात. हे सारं अनुभवताना सातत्याने प्रश्न पडतो, स्त्रियांनीही हे स्वीकारलंय का, की स्त्रीचं शरीर फक्त चांगलं दिसण्यासाठी असतं? त्याच्या कितीतरी महत्त्वाच्या कामांना तितकंसं महत्त्व नसतं?
याच्या विरोधातला अनुभव म्हणजे, मुलांच्या वा तरुणांच्या हíनया, हायड्रोसिल, खालच्या जागेपर्यंत न उतरलेल्या टेस्टीजवरील शस्त्रक्रिया – अशा कुठल्याही शस्त्रक्रियेनंतर मला कुणीही कसलेही प्रश्न विचारले नाहीत. या शस्त्रक्रियेच्या खुणांबद्दल मुलीकडचे लोक काय म्हणतील? प्रत्यक्ष मुलीला काय वाटेल? त्या लोकांना हे सांगितलं पाहिजे का? किंवा याचा जननसंस्थेशी वा मुले होण्याशी काय संबंध आहे? त्याचा किती परिणाम होईल?’ खरं तर हíनया, हायड्रोसिल सोडून द्या; ज्यांचा पुनरुत्पादनाशी काही संबंध नाही; पण काही टेस्टीज्च्या (वीर्य तयार करणाऱ्या ग्रंथी) ऑपरेशननंतर – (उदा. खाली न उतरलेल्या टेस्टीज्ची शस्त्रक्रिया किंवा टेस्टीज्ला पिळा पडल्याने करावयास लागणाऱ्या शस्त्रक्रिया).   प्रत्यक्ष त्या अवयवांचं ऑपरेशन झालेलं असताना – एक टेस्टीज् कमी काम करते हे सांगून किंवा धातू तपासणी (semen analysis) करून लग्नं ठरवली जातात का? जर अज्ञान हेच या भेदांमागचं कारण मानलं; तर ते मुलगा-मुलगी या िलगभेदावरून बदलतं कसं? शंका तर दोघांच्या बाबतीत यायला हव्यात. काळजी तर दोघांच्याही बाबतीत तेवढीच वाटायला हवी.
 नुकताच आणखी एक असाच अनुभव आला. एक अपेंडिक्सला सूज असलेली एक मुलगी माझ्याकडे आली. जिचा साखरपुडा एक आठवडय़ावर आला होता. तपासल्यावर मी निदान केलं आणि तातडीने तिचं ऑपरेशन करणं गरजेचं असल्याचं सांगितलं. त्यावर तिच्या आईपुढे मोऽठ्ठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं.मग मी दोन पर्याय समोर मांडले. पहिला म्हणजे – उद्याच्या उद्या दुर्बिणीने शस्त्रक्रिया करू. आठवडय़ात ती नॉर्मल होईल किंवा फार फार तर एक आठवडा मुलाकडच्या मंडळींना सांगून साखरपुडा पुढे ढकलता येईल. दुसरा म्हणजे –   औषधं देऊन सूज तात्पुरती कमी करण्यासाठी प्रयत्न करू, ते शक्य झाल्यास साखरपुडा ते लग्न या कालावधीत ऑपरेशन करून टाकू म्हणजे ऐन लग्नात पुन्हा सूज येण्याचा त्रास नको. माझं सगळं ऐकल्यावर तिच्या आईने मला न सुचलेला तिसराच पर्याय शोधून काढला. तो म्हणजे – आत्ता सूज कमी करण्याची औषधे घ्यायची. याच शनिवारी ठरल्याप्रमाणे साखरपुडाही करायचा आणि यातलं सासरच्या मंडळींना काहीच न सांगता उलट  लवकरात लवकर लग्नच करून मोकळं व्हायचं. मग पुढे सुजेचा अ‍ॅटॅक आल्यास आपोआपच ‘त्यांचं ते काय ते बघतील. म्हणजे लग्नाआधी ऑपरेशनची खूण नको, त्याप्रमाणे ते मनातले किल्मिष नको, लग्न मोडण्याची भीती नको.’
मी तिला विचारलं, ‘हाच सुजेचा अ‍ॅटॅक नवऱ्यामुलाला आला असता तर तू हे लग्न मोडलं असतंस का गं?’ याचं उत्तर अर्थातच ‘नाही’ असं होतं. ‘तू त्यांना बोलावून मोकळेपणाने हा प्रॉब्लेम सांगत का नाहीस? किंवा त्यांना माझ्यापुढे आणत का नाहीस?’ या माझ्या सरळसोट प्रश्नावर तिनं काहीच उत्तर दिलं नाही. आत्ताचा अ‍ॅटॅक अ‍ॅण्टीबायोटिक्स औषधांमुळे कमी झालाही असता, लग्न लवकर घेतलंही असतं, तरी दुसरा अ‍ॅटॅक नेमका त्यावेळीदेखील येण्याची शक्यता आहे, हे सारे सांगूनही ती ‘आई’ केवढा मोठा धोका पत्करत होती – ऑपरेशन वेळेवर न करण्याचा!
   पण त्यांच्या निर्णयापुढे मी काहीच करू शकत नव्हते. आत्ताची सूज कमी करण्यासाठीची औषधे माझ्याकडून लिहून घेऊन ती जी गेली ती परत कधी आलीच नाही आणि माझ्याकडेही तिचा काही संपर्क क्रमांक नसल्याने मीही शोध घेऊ शकले नाही. वाईट इतकंच वाटत राहिलं की या सर्व प्रकारांत मुलीच्या होणाऱ्या शारीरिक त्रासाचा व मानसिक कोंडमाऱ्याचा विचारच केला गेला नाही.
 यानिमित्ताने काही प्रश्न समोर उभे ठाकले. दोन कुटुंबांना, मनांना जोडणारे विवाह विश्वासाच्या दृढ नात्यांच्या कुंडल्यांवर कधी मांडले जातील? कधी मोकळेपणाने बोलून परस्पर विचारांनी काही गोष्टी ठरविण्याचे धारिष्टय़ वधू किंवा वधूकडची माणसं दाखवतील व कधी यातील शास्त्रीय सत्य समजावून घेऊन वराकडची मंडळी अशा अनाहूत अडचणींतून मार्ग काढण्यासाठी वधू मंडळींसमोर हात पुढे करतील? ती आई फक्त मुलीच्या पोटावर व्रण उठू नयेत याचा विचार करत होती; आणि आजही मुलींच्या वाटय़ाला येणाऱ्या या विषमतेच्या दर्शनाने माझ्या स्त्री-मनावर मात्र उभे- आडवे व्रणच व्रण उठतच होते!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Girls appendix operation patches on body or mind

ताज्या बातम्या