scorecardresearch

शिक्षण सर्वासाठी : वस्ती शिक्षणाच्या बिकटवाटा

एखादा वर्ग अचानक बंद होणे ही आमच्यासाठी नवी गोष्ट नाही. अशा वेळेला बहुधा तिथली वस्तीच उठून गेलेली असते

(संग्रहित छायाचित्र)

रजनी परांजपे

‘‘ताई, आज मळ्याजवळचा वर्ग नाही भरला.’’ सुनीता दूरध्वनीवरून सांगत होती, ‘‘का, काय झालं?’’ मी विचारलं. ‘‘माहीत नाही ताई. मळेवाल्या आजीबाई आम्हाला आतच जाऊ देईनात. तुम्हाला पैसे मिळतात म्हणून तुम्ही येता, नाही येणार आज मुलं, जा तुम्ही परत मुकाटय़ानं, असं बरंच काहीबाही बोलल्या. आम्ही पुष्कळ समजावण्याचा प्रयत्न केला पण ऐकेनातच त्या. काय करायचं ताई आता?’’

‘‘आता ताई तरी काय करणार इथे बसून?’’ असं मनातल्या मनात म्हटलं आणि दूरध्वनीवर फक्त, ‘‘बरं असूं दे. तुम्ही या परत. मग बघू आपण काय करायचं ते.’’ असे म्हणून मी दूरध्वनी ठेवून दिला.

एखादा वर्ग अचानक बंद होणे ही आमच्यासाठी नवी गोष्ट नाही. अशा वेळेला बहुधा तिथली वस्तीच उठून गेलेली असते. इथे तशी परिस्थिती नव्हती. वस्ती होती, मुलेही होती पण वस्ती ज्या जागेवर वसली होती त्या जागेची मालकीण आम्हाला मुलांपर्यंत पोहोचू देत नव्हती. एक नवाच पेच समोर उभा राहिला. एका शेतमळ्यावरची दहा-वीस झोपडय़ांची लहान वस्ती. शेतातील मोकळी जागा भाडय़ाने दिलेली. आजुबाजूला थोडा भाजीपाला लावलेला, शेजारीच गुरांचा गोठा, त्यात पंधरा-वीस गुरे, जवळच एक वाहता कालवा, आजूबाजूला मोकळे रान. तसे वातावरण पुष्कळच चांगले. माणसे शहरात येतात ती पोटापाण्याची सोय व्हावी म्हणून. शहरात आल्यावर कमी-जास्त प्रमाणात ती तशी होतेही. हाताला काही ना काही काम मिळते, हातात पसा पडतो, रोजची चिंता बऱ्यापैकी मिटते. अन्न-वस्त्राची गरज भागते पण प्रश्न पडतो निवाऱ्याचा. तो मिळणे मात्र वाटते तितके सोपे नसते, स्वस्त तर नसतेच नसते.

मोकळ्या दिसणाऱ्या जागेचाही कोणी ना कोणी मालक असतो. अधिकृत किंवा अनधिकृत. तुम्ही त्या जागेवर पाय ठेवला रे ठेवला, की तो तुमच्यासमोर येऊन उभा ठाकतो. शहरातली राहती जागा गावाकडच्या जागेपेक्षा लहान, गैरसोयीची आणि किती तरी पटीने महाग. काही वस्त्यांतून भाडय़ाबरोबरच मालकांच्या दुसऱ्याही अटी असतात. आमच्या अशाच एका वस्तीत भाडे आहेच पण त्याशिवाय वीज, पाण्याचे पैसे वेगळे. पाणी मोजकेच वापरायचे, ठरलेल्या वेळीच दिवे बंद करायचे, किराणा सामान, भाजीपाला वस्तीतल्याच दुकानातून घ्यायचे अशा अटी. वस्तीतील माणसांवर सीसीटीव्हीची कडक नजर. शेतमळ्याचा वर्ग बंद पडण्याचे कारणही अशाच काही अटी. मालकाचा मळा आणि गोठा. पण भाडेकरूंच्या मुलांनी भाज्या तोडणे, मळ्याला पाणी लावणे, शेणगोठा करणे, गोवऱ्या थापणे, दूध घालणे वगैरे कामे करणे अपेक्षित. मुले म्हणजे चोवीस तास हाताशी असणारे हरकामेच. तेसुद्धा फुकटचे.

सुरुवातीला हे आम्हाला माहीत नव्हते. वर्ग सुरू करण्यापूर्वी पालकांशी बोललो होतो. ‘बसमध्येच वर्ग घेणार, लहान मुले बरोबर आणली तरी चालेल, शिवाय वर्ग दोन तासच असणार.’ असे सर्व पालकांना समजावून सांगितले होते. मुलांच्या सोयीची वेळ ठरवली होती. बस मळ्याबाहेरच रस्त्यावर लावत होतो. मुलेही हळूहळू रुळत होती. नियमित यायला लागली होती. आणि मध्येच ही अडचण आली. मग आम्ही माहिती काढली. मळ्याच्या मालकांशी बोललो. आडून-आडून, खुबीने शिक्षण हक्क कायदा, बालमजुरी अशा गोष्टीही बोललो. वाटाघाटी झाल्या. एकाच वेळेला सर्वच्या सर्व मुलांना वर्गावर घेऊन जाणार नाही. त्यातल्या त्यात एक-दोन मोठी मुले मागे ठेवू वगैरे सांगून वर्ग पुन्हा चालू केला.

साधे लिहायला, वाचायला शिकायचे तर किती अडचणी, किती प्रश्न. ज्या वयात इतर मुले खेळण्या-बागडण्यात वेळ घालवतात त्या वयात अशा वस्त्यांवरची मुले कामे करण्यात गुंतलेली असतात. सर्वच मुले बाहेर मोलमजुरी करतात असे नाही. पण आई-वडील दोघेही दिवसभर घराबाहेर राहणार असले की, अगदी लहानपणापासून मुलांच्या अंगावर धाकटय़ा भावंडांकडे बघणे, भांडी घासणे, केरवारा करणे अशा जबाबदाऱ्या पडतात. त्यातून मुलींना जास्त. ज्या वयात इतर मुली भातुकलीच्या खेळातल्या लहानशा बोळक्यात चुरमुरे घालून लुटीपुटीचा भात करण्यात दंग असतात त्या वयात या मुली खरीखरी चूल पेटवून खराखुरा भात करत भावंडांना जेवू घालतात. या मुलांना शाळेत नियमित जाता येत नाही त्याचे कारण घरची परिस्थिती आणि घराची परिस्थिती दोन्हीही. घर, घराचे शाळेपासूनचे अंतर, तिथे पोहोचण्यासाठी असलेला रस्ता अशा किती तरी गोष्टी शाळेच्या आड येतात. उदाहरणार्थ, किती तरी बांधकामं शहराबाहेर असतात. लेबर कॅम्प्स रस्त्यापासून बरेच आत असतात. मोठय़ा रस्त्याला लागेपर्यंत लागणारी वाटही कच्ची, त्यात बांधकामाचे सामान, विटा, वाळू, खडी जागोजागी पडलेली. सहाव्या वर्षी शाळेची सुरुवात करायची म्हटले तर पाठीवर दप्तर घेऊन एवढे चालणे खूप होते. शाळा सुरू होतात जून महिन्यात. पावसाळी दिवसात तर अशा रस्त्यांवर चालणे जास्त त्रासाचे. शाळेपर्यंतचा रस्ता कधी हायवे तर कधी आडवाट. कधी वाटेत एखादा नाला. पावसाळ्यात हे नाले भरतात. एक ना दोन, दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या अडचणीच अडचणी. दगडखाणीतील मुलांची घरे तर आणखीनच अवघड जागी बसलेली. रस्त्यापासून बरीच खाली. खाण जशी जशी खोलखोल जाते तशी तशी राहण्याची जागाही खाली खाली जाते. आपण तर ही घरे पाहून चक्रावूनच जातो. मूळ रस्त्यावर यायचे म्हटले तर असेच अर्धा एक किलोमीटर तरी चढून यावे लागते. तेही कच्च्या रस्त्यावर. रस्तेबांधणी मजुरांच्या झोपडय़ा तर रस्त्याबरोबरच पुढे पुढे सरकणाऱ्या, झोपडय़ांना ना दरवाजा ना खिडकी, मुलेच घराची रखवालदार. शिवाय घर जसजसे पुढे सरकेल तसे शाळेपासूनचे अंतर वाढतच जाणार, कधी कधी वाटही बदलणार. कसे करायचे? रस्त्यावर पुलाखाली राहणारी मुले. यांच्या डोक्यावर तर नावापुरतेदेखील घराचे छप्पर नसते. शाळेची पाटी-पेन्सिल, पुस्तक, दप्तर कुठे ठेवायचे इथपासून प्रश्न. रोजचा गणवेश रोज धुऊन घालायचा म्हटले तरी ते कुठे आणि कसे करायचे हासुद्धा प्रश्नच. अशी निरनिराळी उदाहरणे, प्रश्न पुष्कळ. प्रत्येकाचे वेगवेगळे.

काही प्रश्न मात्र सगळ्यांना सारखेच. पाणी, संडास, बाथरूम वगैरे गोष्टींचा अभाव सर्वानाच. रोजच्या गरजेच्या आणि आपण गृहीतच धरलेल्या सुविधा मिळविण्यासाठी ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ अशी स्थिती. स्वच्छता करावी म्हटले तरी ती कशी? मग शाळेत गेले की, ‘ही मुले स्वच्छ नसतात. त्यांच्या अंगाला वास येतो.’ असे शेरे ऐकावे लागतात. म्हणणाऱ्यांचेही खरेच असते. जिथे जागोजागी विजेचा लखलखाट दिसतो तिथे आपल्या घरात मात्र अंधार, जिथे बागांमधून कारंजी उडत असतात तिथे आपल्याला मात्र पाण्याच्या थेंबासाठी वणवण. हे सर्व रोज बघून न बघितल्यासारखे करायचे, लहानपणापासूनच ‘हे आपल्यासाठी नाही.’ हे मनाला शिकवणे सोपे नाही. बघून बघून त्यांची नजर मरते आणि आपलीही. आजूबाजूला परिस्थितीने गांजलेली अशी किती तरी माणसे दिसत असताना आपल्या संपत्तीचे प्रदर्शन करण्यात आपण गुंग असतो.

आपण तर या गोष्टींचा विचार करत नाहीच पण आपल्या मुलांनाही आपल्यासारखेच घडवतो. त्यांची संवेदनशीलता, दुसऱ्यासाठी विचार करण्याची क्षमता, वाढवण्याचा प्रयत्न आपण करत नाही, उलटच वागतो. ही मुले अशी निर्ढावतात तर ती तशी. अंतर वाढत जाते. त्याची चर्चा होते. ‘समान संधी’, ‘समान अधिकार’, असे वापरून-वापरून झिजलेले शब्द उधळले जातात बस एवढेच. पुढे घडत काहीच नाही! हीच शोकांतिका आहे.

rajani@doorstepschool.org

chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Habitation school shikshan sarvansathi abn

ताज्या बातम्या