हे सदर म्हणजे परिवर्तनाचं साधन आहे, हे ध्येयवाक्य समोर ठेवून पावलं टाकत गेले आणि जगावेगळी माणसं कुणी तरी पाठवल्यासारखी डोळ्यासमोर येत राहिली. जगण्याचा उत्सव झाला. ४० र्वष श्रमदान करून गावासाठी २७ कि.मी.चे रस्ते बांधणाऱ्या भापकर गुरुजींवर गेल्या वर्षी लिहिलं आणि यंदा नोव्हेंबरमध्ये त्या रस्त्यावरून गुंडेगाव-पुणे अशी एस. टी. सुरू झाली. एस.टी. महामंडळाने गुरुजींना पहिल्या फेरीत पुढच्या सीटवर बसवून पुण्याला नेऊन आणलं. त्या फ्रंटसीटवरून त्यांनी मला फोन केला. यापेक्षा दुसरा आनंद कोणता?

‘एका दिशेचा शोध’ या आपल्या पुस्तकात संदीप वासलेकर यांनी जगातील अनेक देशांत माणसं कसं जीवन जगतात हे सांगताना अनेक दाखले दिलेत. ते लिहितात, ‘‘ज्युली कॅटर्सन हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन क्षेत्रातील वजनदार नाव. तिने आपली कंपनी भरभराटीला असतानाच बंद केली व स्टॉकहोमबाहेरील एका छोटय़ा बेटावर स्थायिक होऊन आता ती आजूबाजूच्या खेडय़ातील शाळांमध्ये सेवा व बाकी वेळ स्वत:च्या बगिच्यात अंगमेहनत अशा जीवनशैलीत रमलीय. फळं, फुलं, फुलपाखरं, मध (स्वत: केलेला), पक्षी यांच्या सहवासात, आधीच्या झगमगीत आयुष्याचा तिला पार विसर पडलाय..’ हे जेव्हा मी वाचलं तेव्हा अशा गोष्टी फक्त परदेशातच घडतात असा शेरा मारून मी मोकळी झाले होते. परंतु जेव्हा मला समजलं की या सदरामधील ‘आधुनिक शेतीचं दान’ हा ज्ञानेश्वर व पूजा बोडके या शेतकरी दाम्पत्यावरील लेख वाचून आणि त्यानंतर ज्ञानेश्वरचं मार्गदर्शन घेऊन महाराष्ट्रातील २४ जणांनी (पुण्याचे १६, जळगावचे ३, सोलापूरचे ३ व अमरावतीचे २) आपल्या भरभक्कम पगाराच्या नोकऱ्या सोडून शेतीसाठी गावची वाट धरली तेव्हा काय वाटलं ते शब्दात सांगणं कठीण!

‘चतुरंग’मध्ये लेख प्रकाशित झाल्यावर त्या व्यक्तीला शेकडय़ांनी फोन येणं अपेक्षितच असतं. परंतु ज्ञानेश्वरला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एकूण ७६०० (त्यांनी मुद्दाम मोजले) फोन आले आणि त्यातील अडीच हजार वाचक प्रत्यक्ष येऊन त्याचा मळा बघून गेले. महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले गोंदियातील २० शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी घेऊन आले. चित्रपट-निर्माते गिरीश कुलकर्णी पुण्यात नोकरी करणाऱ्या आपल्या भावाला शिरीषला घेऊन आले. शेतीचं अबकडं माहीत नसलेला शिरीष आता सोलापूरला घरची ८/१० एकरची शेती करू लागलाय.

कौस्तुभ भाटकर व मृणाल या तरुण जोडप्याची कथा तर विशेषच. दोघेही एम.बी.ए. पुण्यात आय.टी. क्षेत्रात लाखांचं पॅकेज घेणारे. त्यांनी जून महिन्यात ज्ञानेश्वरची भेट घेतली. त्यानंतरचा घटनाक्रम असा.. १ जुलै ते ३ जुलै ज्ञानेश्वरकडे प्रशिक्षण. ४ जुलैला आपआपल्या नोकऱ्यांचा राजीनामा आणि ५ जुलैला गाशा गुंडाळून आपल्या गावी मुराम्बा (ता. मूर्तिजापूर, जि. अमरावती) येथे प्रयाण. या लेखाच्या निमित्ताने कौस्तुभशी बोलले. म्हणाला, ‘घरची ८० एकर शेती. पण पडीक. वडील, काका राबायचे पण उत्पन्न जेमतेम पोटापुरतं. आम्ही आलो आणि प्रथम १० गुंठय़ांवर पॉलिहाऊस उभारलं. ब्रोकोली, लेटय़ूस अशा परदेशी भाज्यांबरोबर देशी भाज्याही लावल्या. माझी भाजी नागपूर, अमरावती अशा शहरांतील मोठी हॉटेल्स व मॉल्समध्ये जाते. त्यांची मागणी पुरवण्यासाठी आता ११ शेतकऱ्यांचा ग्रुपही केलाय. मृणालने पॅकेजिंग व मार्केटिंगची जबाबदारी उचललीय. दोन गीर गाई घेतल्यात. रोज २६ लिटर दूध घरोघर पोहचवतो. आता तर आम्ही गावातलं घर सोडून शेतावर राहायला आलोयत..’ त्याच्या आवाजातला आनंद, उत्साह माझ्या कानातून मनापर्यंत पोहोचला आणि का कोणास ठाऊक एक कविता मनात जागी झाली.. ‘दिवस सुगीचे सुरू जाहले, ओला चारा बैल माजले, छन् खळखळ छन्, ढुमढुम पटढुम, लेझिम चाले जोरात..’

आसाममधील चहाच्या मळ्यातील मजुरांच्या मुलांसाठी काम करणाऱ्या अलका व अशोक वर्णेकर यांचं म्हणणं असं की, ‘गेल्या २८ वर्षांत समाजाने प्रथमच आमच्या कार्यात एवढा रस दाखवला. प्रतिसाद देणाऱ्यांपैकी नागपूर व मुंबईकडचे ६० जण ऑक्टोबर १५ ते २१ दरम्यान आमच्यासोबत येऊन राहिले व त्यांनी इथल्या जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. आता ही मंडळी आमची दूत बनलीत. त्यांनी आमच्या मुलांना मुंबई पाहण्यासाठी आमंत्रण दिलंय..’ दानशूर वाचकांनी पाठवलेल्या तीन लाख रुपयांच्या निधीतून केंद्राच्या कुंपणाची भिंत व मुलामुलींसाठी स्वच्छतागृहं उभी राहिलीत. बोरिवली येथील ‘टच’या संस्थेने २०० मुलांसाठी रेनकोटस्, दफ्तरं, वह्य़ा व इतर स्टेशनरी पाठवली. या प्रेमामुळे वर्णेकर दाम्पत्य आता अधिकच जोमाने कामाला भिडलंय.

शहापूरच्या दुर्गम भागात शिक्षणाचं नंदनवन फुलवणाऱ्या धीरज डोंगरे याला मिळालेला प्रतिसादही अवाक करणारा. रोटरी क्लब मुलुंड साऊथ यांनी या डोंगरकपारीतील मुलांसाठी एक फिरती विज्ञान प्रयोगशाळा, ड्रायव्हर व मार्गदर्शकासह दिली. त्यांचा पगार, गाडीचं पेट्रोल, देखभालीचा खर्च ही सर्व जबाबदारी रोटरीची. या अभियानासाठी रोटेरियन नारायण राणे यांनी विशेष मेहनत घेतली. ही व्हॅन शहापूरमधील जिल्हापरिषदेच्या सर्व शाळांमधून प्रयोग दाखवत फिरते. दुसरी भेटही नवलाची. हा लेख प्रसिद्ध झाला तेव्हा डोंबिवलीतील दिलीप शेंडे आपलं खेळण्याचं दुकान बंद करून दुसरा व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत होते. परंतु धीरजची तळमळ वाचल्यावर सेल लावून माल संपवण्याचा विचार त्यांनी मनातून काढून टाकला आणि दुकानातली सर्वच्या सर्व दोन ते अडीच लाख रुपयांची खेळणी उचलून त्यांनी ती शहापूरच्या आदिवासी पाडय़ावरील मुलांना भेट दिली. आणखी एक.. ठाण्यातील सिद्धांचल सोसायटीतील नांदुर्डीकर, गाजरे व सानू या तिघांनी डांगरे गुरुजींच्या बेलवली येथील शाळेचा कायापालट (नव्या फरश्या, नवं छत, रंगरंगोटी इत्यादी) करून टाकला. या सर्वापेक्षा महत्त्वाचं म्हणजे कल्याण ठाणे परिसिरातील पन्नास एक तरुण-तरुणींची फळी धीरजच्या कामाशी जोडली गेली.

नर्मदा परिक्रमा, सेवा म्हणून करणाऱ्या प्रतिभाताई व सुधीर चितळे यांना मी प्रतिसाद विचारण्यासाठी फोन केला तेव्हा (१२ डिसेंबर) ते दोघं ओंकारेश्वरजवळ मोरटक्का येथे होती. प्रतिभाताई म्हणाल्या, ‘‘सध्या आमची पाचवी परिक्रमा सुरू आहे. ५ नोव्हेंबरला निघालो आणि आत्तापर्यंत महिना-सव्वा महिन्यातच ५० ते ६० भक्त ८/८ दिवस राहून सर्व प्रकारची सेवा देऊन परतलेत. मैयाची सेवा करण्याची इच्छा अनेकांना होती. आपल्या लेखाने त्यांना मार्ग दाखवला..’’

डॉ. विनोद शहा आणि मीना शहा यांना व त्यांच्या ‘जनसेवा फाऊंडेशन’ला या वर्षी दोन अत्यंत प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले. एक राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते मिळालेला, ज्येष्ठांसाठी काम करणारी अग्रगण्य संस्था हा पुरस्कार व दुसरा ‘कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार’ जो अलीकडेच म्हणजे ३ डिसेंबरला शहा पतीपत्नींना पद्मभूषण डॉ. के. एच. संचेती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. योगसाधनेतून आनंदाचा, आरोग्याचा ठेवा वाटणाऱ्या बसेर दाम्पत्याविषयी कळताच त्यांच्या मार्गदर्शनाने भारतीय योग संस्थेची नवी केंद्रे सुरू करण्याचा धडाकाच लागला. ८ ऑक्टोबरला लेख प्रसिद्ध झाला आणि नोव्हेंबरपासून पुण्यातील औंध व विश्रांतवाडी ही केंद्रे कार्यान्वित झाली. डिसेंबर-जानेवारीत मुंबई व पुणे येथे आणखी ५ वर्ग सुरू होत आहेत. तसंही या सदरातील प्रत्येक लेखाने काही का काही घडवलंच. प्रेरणादायी पर्यटन करणाऱ्या नवीन व स्नेहल काळेच्या ‘अमृतयात्रा’ कंपनीची पहिली शाखा पुण्यामध्ये सुरू झाली. कचऱ्यातून गच्चीवर बाग फुलवणाऱ्या प्रिया भिडे यांचा ‘लोकसत्ता’च्याच पुणे आवृत्तीत ‘हिरवा कोपरा’ नावाचं सदर सुरू झालं. औरंगाबादचे उद्योजक सुधांशू व सुजाते शेवडे यांच्यावरील लेख वाचून पुणे इंजिनीयिरग कॉलेजची काही मुलं थेट त्यांच्या कारखान्यात जाऊन थडकली आणि हे भावी उद्योजक आजही त्यांच्या संपर्कात आहेत.

मात्र छत्तीसगढमधील भानूप्रतापपूर येथे ‘प्रदान’ या एन.जी.ओ.साठी काम करणाऱ्या उच्चशिक्षित विशाल जामकरची जी खंत होती (४०० स्वयंसेवकात चारच मराठी डोकी) ती काही दूर झाली नाही. म्हणाला, ‘‘३०० च्या वर तरुणतरुणींनी संपर्क केला परंतु दुर्गम भागातील कार्यक्षेत्र हा प्रमुख अडसर ठरला.’’ शबरी सेवा समितीचे प्रमोद करंदीरकर यांचाही अनुभव काहीसा असाच. म्हणाले, ‘‘पैशांची मदत मिळते. कधीही हाक मार, आम्ही आहोत तुझ्याबरोबर अशी वचनेही मिळतात पण प्रत्यक्ष कामाच्या वेळी ती माणसं, वचनं हळूहळू पांगू लागतात.’’

या वाटचालीत शब्दाविना अर्थ सांगणारे काही हृदयस्पर्शी अनुभवही आले. पुरंदरच्या घाटावरील वंचित मुलांच्या ‘सार्थक सेवा संघ’ या संस्थेत गेले तेव्हा एक पाच वर्षांचा गोरापान, गोंडस मुलगा (जय त्याचं नाव) खूप आनंदात दिसला. डॉ. कुडिया म्हणाले, ‘‘आज त्याची आई येणार आहे ना भेटायला..’’ नंतर ती आली. व्यसनाधीन नवऱ्याने घराबाहेर काढल्याने चार घरची कामं करून रस्त्यावरच राहणारी ती आई मुलाच्या ओढीने एक दिवसाची रजा काढून एवढय़ा लांब आली होती. जय दिवसभर तिच्या कडेवरच होता. आईला काय काय दाखवत होता.. आम्ही इथे जेवतो. इथे झोपतो. मला वाटलं, आता आई निघेल तेव्हा तो जाण्यासाठी हट्ट करेल. पण नाही! दारात उभं राहून आईला टाटा करणाऱ्या त्या बालमूर्तीकडे पाहताना मलाच गलबलून आलं. इथल्या सुरक्षित जगण्याची किंमत त्या इवल्याशा जीवाला द्यावी लागत होती.

एक अविस्मरणीय क्षण माझ्याही वाटय़ाला आला. ती हकिगत अशी.. गेल्या वर्षी ‘सत्पात्री दान’ सदरासाठी दानशूर उद्योजक आबाजी पठारे यांची मुलाखत घेण्यासाठी अहमदनगरला गेले असताना त्यांनी ‘माऊली सेवा प्रतिष्ठान’ ही संस्था दाखवली. (जिला त्यांनी तीन एकर बागायती जमीन दान केली होती.) अनाथ, बेघर, मनोरुग्ण स्त्रियांसाठी डॉ. राजेंद्र व डॉ. सुचेता धामणे या पतीपत्नीने हाती घेतलेलं ते सेवाकार्य बघून मी दिङ्मूढ झाले आणि त्या क्षणी (शेखचिल्लीप्रमाणे) मनात विचार आला.. माझ्या या सदराचं जर पुस्तक निघालं आणि जर त्याला प्रायोजक मिळाला तर पुस्तक विक्रीतून येणारी सर्व रक्कम मी ‘माऊली’ला देईन. आणि अहो भाग्य! अगदी तस्सच घडलं. ४ मे २०१६ ला पुस्तक प्रकाशित झालं आणि २५ मे २०१६ ला सर्व प्रती (हजार) संपून आमच्या अत्रे कट्टय़ावरच आयोजिलेल्या कार्यक्रमात मला ‘माऊली’साठी एक लाख रुपयांचा चेक देता आला.

प्रकरण एवढय़ावरच थांबलं नाही. या वर्षी ‘हातात हात घेता’ सदरात मी डॉ. राजेंद्र व डॉ. सुचेता विषयी लिहिलं आणि ते वाचून रोटरी क्लब ऐरोलीच्या गोविंद पाटील यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर व्हिडीओ चित्रण.. वगैरे सर्व सोपस्कार होऊन रोटरी इंटरनॅशनलच्या या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय ‘ह्य़ुमॅनिटी पुरस्कारा’साठी भारतातर्फे त्यांची एंट्री पाठवण्यात आली आणि ११ देशांतून त्यांची मानवता सर्वश्रेष्ठ ठरली. या बहुमानासाठी अंशत: का होईना माझा हातभार लागला यासाठी मी ‘लोकसत्ता’चे व त्या जगनियंत्याची सदैव ऋ णी राहीन.

खरं तर ‘चतुरंग’मध्ये सदर लेखनाला सुरुवात केल्यापासून गेली तीन वर्षे कशी गेली ते समजलंच नाही. ही सदरे म्हणजे हे परिवर्तनाचं साधन आहे हे ध्येयवाक्य समोर ठेवून पावलं टाकत गेले आणि जगावेगळी माणसं कुणी तरी पाठवल्यासारखी डोळ्यासमोर येत राहिली. नमस्कारासाठी ज्यांच्या पायांपर्यंत हात पोहचणंदेखील मुश्कील अशा व्यक्तींचा सहवास लाभला आणि संपर्कही राहिला. त्यामुळे जगण्याचा उत्सव झाला. ४० र्वष श्रमदान करून आपल्या गावासाठी २७ कि.मी.चे रस्ते बांधणाऱ्या भापकर गुरुजींवर गेल्या वर्षी लिहिलं. या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्या रस्त्यावरून गुंडेगाव-पुणे अशी एस. टी. सुरू झाली. एस.टी.महामंडळाने गुरुजींना पहिल्या फेरीत पुढच्या सीटवर बसवून पुण्याला नेऊन आणलं. त्या फ्रंटसीटवरून त्यांनी मला फोन केला. यापेक्षा दुसरा आनंद कोणता?

‘मला भेटलेली देव माणसं’ या विषयावर बोलायला अनेकांनी बोलावलं. जिथे गेले तिथे मैफल सजली. जगलेले क्षण पुन्हा पुन्हा आठवत राहिले. मनाला पालवी फुटत राहिली. गेल्या तान वर्षांचं ते झपाटलेपण आता शांत होणार म्हणून हुरहुर दाटलीय. परंतु या काळात अनुभवलेल्या अनेक सकारात्मक बाबींनी आयुष्य बदलून गेलंय. घेणाऱ्यांचे हात कमी झालेले नसले तरी देणाऱ्यांचे हात वाढताना दिसताहेत. वंचितांच्या, पीडितांच्या मदतीसाठी समाजातील तरुण वर्ग मोठय़ा संख्येने पुढे येतो आहे. मी ही माऊली प्रतिष्ठानाशी जोडले गेले आहे. या प्रवासात अनुभवलेल्या माणुसकीच्या दीपस्तंभांकडे पाहताना आठवलेल्या शांता शेळकेंच्या चार ओळी लिहिते आणि थांबते.

हे एक झाड आहे, याचे माझे नाते

वाऱ्याची एकच झुळुक दोघांवरून जाते

कधी तरी एक दिवस मीच झाड होईन

पानांमधून ओळखीचे जुने गाणे गाईन.

waglesampada@gmail.com

(सदर समाप्त)