आजच्या आपल्या शेवटच्या लेखात सर्वासाठीच अति महत्त्वाचा विषय असणाऱ्या पर्यावरण रक्षणासाठी ई-कचऱ्याचे व्यवस्थापन करणाऱ्या संस्था व कंपन्यांविषयी माहिती घेऊ या. ई-कचरा म्हणजे टाकाऊ  इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल उपकरणांमुळे निर्माण होणारा कचरा. या कचऱ्यात माणसांना, प्राण्यांना, पर्यावरणाला घातक ठरणारे धातू असतात. त्यांची योग्य तऱ्हेने विल्हेवाट लावली नाही तर खूप समस्या निर्माण होतात. म्हणूनच ई-कचरा व्यवस्थापन क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांकडे आपला ई-कचरा द्यायला हवा. त्या संस्था किंवा कंपन्या अशा कचऱ्याची योग्य शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावतात. शक्य असेल तर त्या वस्तू पुनर्वापर करण्यायोग्य करून त्यांचे वाटप ग्रामीण भागात किंवा संस्थांमध्ये केले जाते. या संस्था त्यासाठी आपल्याकडून कोणतेही शुल्क घेत नाहीत. मुंबई महापालिकेने ‘इकोरेको’ या कंपनीच्या सहाय्याने मुंबईताल ई-कचरा जमा करण्यासाठी पहिले केंद्र विलेपार्ले (पू.) येथील ‘मिठीबाई कॉलेज’मध्ये सुरू केले आहे. मुंबईत अशीच आणखी २३ केंद्रे सुरू होणार आहेत. विलेपार्ले येथीलच ‘लोकमान्य सेवा संघा’च्या ‘नागरिक दक्षता समिती’तर्फेसुद्धा ई-कचरा गोळा करण्यासाठी केंद्र सुरू करण्यात आले आहे. ‘इकोरेको’ याच कंपनीकडे हा कचरा सुपूर्द केला जातो. दर शनिवारी, रविवारी सकाळी संघाच्या कार्यालयात कचरा गोळा केला जातो. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक – ०२२ २६१४२१२३ ०२२ २६१४१२७६.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘ई वेस्ट रिसायकलिंग इंडिया’- मालाड (पू.) येथे असलेल्या या कंपनीकडे आपण आपला ई-कचरा नेऊन देऊ  शकतो किंवा ई-कचरा जास्त असेल तर त्यांची गाडी येऊन तो घेऊन जाते. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक – ९७६९०७७००८.

‘ई इन्कार्नेशन’ ही कंपनीसुद्धा भंगारवाले, शाळा, कंपन्या तसेच घरांमधून ई-कचरा गोळा करण्याचे काम करते. डेटामधील माहिती बाहेर जाऊ  न देण्याची खबरदारी त्यांच्याकडून घेतली जाते. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक – ०२२ ६६२५१३०० ८६५५६०६०६२ ८६५५६०६०६३.

पर्यावरणरक्षणाबाबत जागरूक होऊन आपण ई कचऱ्याचे व्यवस्थापन करणाऱ्या या उपक्रमांना हातभार लावू या असे विनंती वजा आवाहन करून आणि तुमचं आयुष्य निरोगी राहो ही शुभेच्छा देऊन  तुमचा निरोप घेते.

puntambekar.shubhangi@gmail.com

(सदर समाप्त)

मराठीतील सर्व हेल्पलाइन्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta chaturang helpline
First published on: 31-12-2016 at 01:08 IST