लताच्या घरी ‘इन्व्हर्टर’च्या दुरुस्तीसाठी आलेल्या गणेशसोबत एकदा त्याचा मित्र सुभाष आला होता. गणेशचे काम सुरू असताना सुभाष लताशी गप्पा मारत बसला. अर्ध्या तासात दुरुस्तीचे काम आटोपल्यानंतर चहा-पाणी सुरू असताना सुभाष लताला उद्देशून म्हणाला की, ‘‘तुमचा स्वभाव खूप चांगला आहे, तुम्ही नात्यातल्या लोकांसाठी खूप काही करता. परंतु तुम्हाला यश येत नाही.’’ हे ऐकून लता अवाक झाली. तिच्या मनात नेहमी घोळणारे विचार सुभाष बोलला होता. तिच्या मनात प्रश्न निर्माण झाला यानं हे कसं ओळखलं?
लता साधारणत: पस्तिशीतली. स्वभाव बोलका. दोन दिवसांनंतर दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान दरवाजाची बेल वाजली म्हणून लताने दरवाजा उघडला तर समोर सुभाष उभा. ‘‘काही नाही, चाललो होतो इथूनच, म्हटलं बोलावं, तुमची झोप तर मोडली नाही ना? मी जातो,’’ असं म्हणत सुभाषने लताचा अंदाज घेतला. ‘‘नाही, नाही, या ना!’’ असं म्हणताच सुभाषने लताच्या घरात प्रवेश केला. लता घरात एकटीच आहे याचा सुभाषला अंदाज आला. सुभाषने त्या दिवशी लताचा हात पाहून भविष्य कथन केलं. तुम्हाला भविष्यात खूप ऐश्वर्य प्राप्त होणार असं काहीबाही सांगितलं. लता त्या ‘भविष्यवाणी’नं खूप प्रभावित झाली. अनेकांचा तो कुतूहलाचा विषय असतोच. गप्पांमध्ये एक तास कसा उलटला हे लताला कळलंच नाही.
जाताना सुभाषनं लताचा दूरध्वनी क्रमांक नेला. चार-आठ दिवसांतून सुभाषचं दुपारच्या वेळी लताच्या घरी हमखास येणं-जाणं सुरू झालं. ज्योतिष व अन्य विषयांवर दोघांच्या मनसोक्त गप्पांमध्ये तास-दोन तासांचा वेळ निघून जायचा. लताचा नवरा गोविंद बँकेत नोकरी करत होता. सकाळी दहा ते सायंकाळी साडेपाचपर्यंत ते बँकेत असायचे. मध्यम उंची, बारीक अंगकाठी असलेला गोविंद मितभाषी होता. उंच, धष्टपुष्ट शरीरयष्टीचा, वयाची तिशी उलटलेल्या देखण्या सुभाषकडे लताही आकृष्ट झाली. सुभाषचा ज्योतिष अभ्यास, बोलणं-चालणं या सर्व गोष्टींची लतावर भुरळ पडली होती. सुभाष प्रत्येक वेळी घरी आल्यावर लताचं कुटुंब, नातेवाईक याविषयी काही तरी भविष्य कथन करत होता. लताची दोन्ही मुलं (नेहा व कृष्णा), पती यांच्याशीही सुभाषनं ओळख वाढवली. आता तो घरचा सदस्य असल्याप्रमाणे घरात वावरू लागला. सुभाषचं चहा-पाणी-जेवण आता सर्व काही लताच्या घरीच होत होतं. कृष्णा व नेहा ही दोनही मुलं त्यांचा अभ्यास, शाळा, क्लास यात व्यग्र असायची. गोविंदला सुभाषचा घरातील सततचा वावर गैर वाटत नव्हता. सुभाषनं हळूहळू गोविंदच्या कमकुवत मानसिकतेचा गैरफायदा घेत त्याच्यावर काबू मिळवला. इतका की सुभाषनं लता-गोविंदच्या कुटुंबाचे सर्व निर्णय घेणं सुरू केलं. त्यांच्या आर्थिक बाबींवरही नियंत्रण मिळविलं. नंतर तर गोविंदचा पगार होताच सुभाष संपूर्ण पगार स्वत:च्या ताब्यात घेऊ लागला. लता व गोविंदच्या खर्चाचेही नियोजन तोच पाहत होता. सुभाष मन मानेल तेव्हा लताच्या घरी राहत होता. लताचं माहेर ती राहात असलेल्या तालुक्याच्या गावापासून १० किलोमीटर अंतरावर होतं. लताचे भाऊ, काका याचं अधूनमधून लताकडे येणं-जाणं होत होतं. त्याचा सुभाषला अडथळा वाटत होता. नियंत्रण गमावण्याची धास्ती वाटत होती. सुभाषनं मनाशी एक योजना आखली. त्यानं लताला विश्वासात घेतलं. ‘नातेवाईकांच्या घरी येण्यामुळे तुझ्या घरात अडचण येते, त्यांचं येणं बंद करण्यासाठी आपल्याला उपाय करावा लागेल.’ असं सांगत त्याने लताला स्वत:च्या भावाविरुद्ध पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करायला सांगितली. सुभाषच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या लताने पोलीस ठाण्यात तिच्या भावाविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली. लतानं तक्रार दिल्यानंतर चौकशी झाली व प्राथमिक चौकशीतच तक्रार खोटी असल्याचं समोर आलं. लतानं केलेल्या खोट्या तक्रारीमुळे लताच्या माहेरच्या लोकांचं लताच्या घरी जाणं-येणं बंद झालं. सुभाषला आता कुणाचाही धाक राहिला नाही.
नेहा ११वीत गेली. नुकतीच वयात आलेली नेहा धारदार नाक, बोलके डोळे यामुळे लक्ष वेधून घेत होती. सुभाषच्या मनात आता नेहाविषयी विचार सुरू झाला. सुभाषने लताच्या कुटुंबावर नियंत्रण मिळविलं होतंच; परंतु आता तो दहशत निर्माण करू पाहत होता. कधी कधी दोघा मुलांसमोर गोविंद व लताला मारहाणही करू लागला. आता त्याने नेहाशी सूत जमवलं. लताला त्याने बाजूला सारलं होतं. आई आणि मुलगी या दोघींचंही शारीरिक शोषण करणाऱ्या सुभाषने त्यांचं राहतं घर विकून भाड्याच्या घरात सामान हलवलं. दरम्यान, गोविंदची बदली जवळच्याच तालुक्याच्या गावी झाली. तिथं सुभाषने त्यांना मोजकं सामान देऊन भाड्याची खोली घेऊन दिली. सुभाष न चुकता गोविंदचा पगार ताब्यात घ्यायचा. खर्चापुरते पैसे त्यांना देऊन संपूर्ण रक्कम स्वत:कडे ठेवायचा. आता त्याची मारहाण प्रचंड वाढली होती. सुभाषची मारहाण, आरडाओरडा यामुळे लता-गोविंद यांना वारंवार भाड्याचं घर बदलावं लागत होतं. गोविंदचं मानसिक संतुलन बिघडलं. तो कार्यालयातही नुसताच बसून राहायचा. त्याच्याविषयी कार्यालयात तक्रारी वाढल्या. अखेर त्याला सक्तीच्या रजेवर पाठवलं गेलं. कृष्णासमोर त्याच्या आई-वडिलांना मारहाण होत होती. बहिणीचं शारीरिक शोषण सुरू होतं. कृष्णाही मोठा होत होता. तो महाविद्यालयात जाऊ लागला.
एकदा एका कार्यक्रमानिमित्त आम्ही त्याच्या महाविद्यालयात गेलो होतो. तिथं माझं व्याख्यान संपल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी माझा दूरध्वनी क्रमांक घेतला होता. त्यानंतर चारच दिवसांनी घाबराघुबरा झालेला महाविद्यालयीन गणवेशातला कृष्णा आमच्या कार्यालयात आला. सोबत एक व्यक्ती होती. ‘‘माझ्या आई-वडिलांना खूप मारझोड झालीय,’’ एवढेच तो वारंवार सांगत होता. सोबत आलेली व्यक्ती म्हणाली, ‘‘मी रमेश. कृष्णाचा मामा आहे. कृष्णाच्या आई-वडिलांना मारहाण होत असताना महाविद्यालयाचं निमित्त करून कृष्णा घराबाहेर पडला. मधल्या काळात आमचे संबंध दुरावल्यामुळे आमचा लताशी संपर्क राहिला नाही. आज कृष्णा माझ्याकडे आला व त्याने घडलेली सर्व हकीगत सांगितली. आम्हाला तुमची मदत पाहिजे.’’ त्यांना धीर देऊन जुजबी चर्चा करून सांगितलं की, ‘‘लता, गोविंद आणि नेहाला सुभाषच्या कचाट्यातून आधी सोडवलं पाहिजे. प्रथम तुम्ही घरी जा, काय परिस्थिती आहे. ते मला ताबडतोब कळवा.’’ परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन रमेश कृष्णासोबत लताच्या घरी गेला. लता व गोविंद घरातल्या दोन कोपऱ्यात खाली मान घालून बसलेले होते. घरातील सामान व नेहाला घेऊन सुभाषनं घर सोडलं होतं. गोविंद व लताला घेऊन लताचा भाऊ आमच्या कार्यालयात आला. लता व गोविंदशी आम्ही चर्चा केली. त्या चौघांना सोबत घेऊन पोलीस ठाणं गाठलं. तक्रार नोंदवली गेली. तिथं सुभाषनं केलेल्या फसवणूक व अत्याचाराबाबत सांगितलं असता, सुभाष हा शेजारच्याच खेड्यातील असून तो विवाहित आहे आणि त्याला दोन अपत्यं आहेत. तसेच भविष्य सांगता-सांगता यापूर्वीही त्याने दोन स्त्रियांना फसवलं असल्याची माहिती पोलिसांकडूनच समजली. म्हणजे सुभाष गुन्हेगार वृत्तीचाच होता.
सुभाष नेहाला घेऊन फरार झाला होता. त्याचा दूरध्वनी लागत नव्हता. नेहाही संपर्क करत नव्हती. आमचा पाठपुरावा सुरूच होता. सुमारे सहा महिन्यांनंतर सुभाष-नेहाचा शोध घेण्यात यश आलं. दोघांना पोलीस ठाण्यात आणलं गेलं. नेहा सज्ञान झाली होती. तिने ‘मी स्वेच्छेने सुभाषसोबत राहते, मला आई-वडिलांकडे जाण्याची इच्छा नाही,’ असं सांगितलं. त्यामुळे ‘नेहाचा नाद आम्ही सोडून देऊ. आम्हाला आमचं घर पुन्हा उभं करायचं आहे’, असं लता म्हणाली. गोविंदची मानसिक अवस्था खूपच वाईट झाली होती. लता व गोविंदला मानसोपचारतज्ज्ञांकडे पाठवलं. लताच्या भावाच्या मदतीने पुन्हा काही जुजबी सामानासह लताच्या माहेरच्या गावातच एक खोली घेऊन पुन्हा नव्याने लताचा संसार उभा केला. सुमारे एक वर्षभर मानसोपचारतज्ज्ञांचे उपचार घेतल्यानंतर गोविंद बरा झाला. त्याचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य सुधारलं. त्याच्या नोकरीसाठी आम्ही पुन्हा प्रयत्न केले. तो आता नोकरी करतो. लता-गोविंदचा संसार सुरळीत सुरू झाला आहे.
कृष्णा आता अभियंता बनला असून पुण्यात नोकरी करतो आहे, पण नेहा मात्र त्यांच्यापासून दुरावली आहे. लता-गोविंदच्या संसाराची ४-५ वर्षांत झालेली राखरांगोळी, संपूर्ण कुटुंबाचं आर्थिक, मानसिक, शारीरिक शोषण आणि त्यात गेलेला नेहाचा बळी. लताच्या अविवेकी मोहापायी तिच्या कुटुंबाला खूप मोठी किंमत मोजावी लागली. खरं तर तिला एकटीला यात दोषी मानता येणार नाही. सुभाषसारख्या विकृत मनोवृत्ती समाजात आहेतच, परंतु यांच्यापासून सावध राहायला हवं. नाही तर कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त होण्याचा धोका टाळता येत नाही. केवळ शिक्षण, नोकरी, पैसा यामुळे माणूस निर्भय, निर्णयक्षम बनत नाही. गोविंदसारखी व्यक्ती सुभाषच्या दबावाला बळी पडते. मात्र कृष्णाची हिंमत व प्रसंगावधानामुळे कुटुंबं काही अंशी सावरण्यात यश आलं.
मला ज्योतिष कळतं, असा आव आणून भल्याभल्यांना प्रभावित करणाऱ्या, ज्योतिषाच्या नावाखाली फसवणाऱ्या सुभाषसारख्यांपासून लांबच राहायला हवं. ‘नको नको ज्योतिषा माझ्या दारी येऊ। माझं दैव मला कळे माझा हात नको पाहू।,’ असं ठणकावून सांगणाऱ्या निरक्षर बहिणाबाई या पार्श्वभूमीवर खूप आदर्शवत वाटतात. चिकित्सक वृत्ती आणि स्वकर्तृत्वावरील विश्वासच माणसाला असल्या फसव्या मायाजाळापासून लांब ठेवू शकतो.
(लेखातील व्यक्तींची नावे बदललेली आहेत.)