तृप्ती जोशी-कुलश्रेष्ठ

सकाळी ६ वाजता मोबाइलचा गजर वाजला आणि आळोखेपिळोखे द्यायलासुद्धा वेळ न घालवता पल्लवीनं कामाला सुरुवात केली. एकीकडे डब्याची तयारी, दुसरीकडे पाणी भरायचं होतं, तिसरीकडे कॉलेजकन्येला उठवायचं होतं. तिच्या कॉलेजमध्ये कसलातरी ‘इव्हेंट’ होता, त्यामुळे ती निघेपर्यंत आज नुसता गोंधळ होता. अर्थात पल्लवीच्या नवऱ्याला या सगळयामुळे ढिम्म फरक पडणार नव्हता. कसा पडणार? त्याच्या ऑफिसची महत्त्वाची मीटिंग होती. कन्येनं सागरवेणी घालून मागितली होती, ती नीट जमेपर्यंत तिचं तोंड चालूच होतं. इकडे नवरोबांना हे सगळं फालतू वाटत होतं आणि त्याच्या हातात सगळं आयतं मिळावं अशी त्याचीही मागणी होती. कसंबसं करून एकदा कन्या आणि एकदा नवरा, असा तोल सांभाळत (त्यासाठी डोक्यावर बर्फ ठेवत) पल्लवीनं एकदाचा किल्ला सर केला. म्हणजे त्या दोघांना वाटेला लावलं!

Loksatta editorial Finance Minister Nirmala Sitharaman in the budget on the states of Andhra Pradesh and Bihar
अग्रलेख: विश्वासामागील वास्तव!
Swelling in Ankles
घोट्याला सूज येण्याची ६ मुख्य कारणे लक्षात ठेवा; किडनी, हृदय व यकृतालाही ठरू शकतो धोका, ‘हे’ सोपे उपाय उतरवतील सूज
Uddhav Thackeray Kundali Predictions For Vidhan Sabha Elections
उद्धव ठाकरेंना पक्षातील बरोबरी करू पाहणाऱ्या ‘या’ मंडळींपासून राहावे लागेल सावध! ज्योतिषतज्ज्ञांचा इशारा, म्हणाले, “वायफळ…”
Loksatta kutuhal Is artificial intelligence always accurate Can she never go wrong The answer is
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्ता चुकते तेव्हा..
trade and technology farmers marathi news
शेतकऱ्यांना कुबड्या नको, स्वातंत्र्य द्या!
cataracts causes and symptoms from experts
तरुणांनादेखील होऊ शकतो मोतीबिंदू? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कारणे आणि लक्षणे
rishi sunak, Narendra Modi, Rishi Sunak's Humble Resignation, Narendra Modi's Aggressive Approach, Narendra Modi s 400 seat announcement, Narendra modi loksabha performance, vicharmanch article,
या बाबतीत मोदींपेक्षा सुनक निश्चितच वरचढ ठरले!
how to take steam correctly
चेहऱ्यावर वाफ घेताना आवर्जून करा ‘ही’ गोष्ट; नाहीतर डोळ्यांना होऊ शकते इजा! लक्षात घ्या डॉक्टरांचा सल्ला….

त्यानंतर घरातल्या इतर कामांना फार तर एक तास लागला असता. आता घरात वादळानंतर असते तशी शांतता होती. आताशा रोजचाच दिवस तिच्या अंगावर यायचा. जवळजवळ बारा तास ती घरी एकटी असायची. अर्थात त्यानंतरही फार काही वेगळं घडत नसेच. वेळ घालवायला उगीच फोनवर रटाळ बोलत बसायला तिला आवडायचं नाही. तिनं परत घडयाळ बघितलं- सकाळचे फक्त अकरा वाजले होते. टीव्ही, वर्तमानपत्र असं सगळं करूनही दुपार तिच्यासाठी लांबलचक असायची. तो अंगावर येणारा एकटेपणा आठवूनच तिला रडू कोसळलं. जसजसे ६-६.३० वाजले, तसं ती मन लावून स्वयंपाक करायला लागली. लेकीच्या सागरवेणीचं कौतुक केलेलं ऐकायला, फेस्टिव्हलची मजा ऐकायला म्हणून ती लवकर स्वयंपाक करून मोकळी झाली. लेक आली आणि ‘‘आई.. कॉफी,’’ अशी ऑर्डर देऊन फोनला चिटकली, ती वडील आल्यावर त्यांच्या धाकानं हॉलमध्ये आली. नवराही वैतागूनच आला आणि टीव्ही लावून जेवण करत बसला. सागरवेणी घालणारी, कॉफी करणारी, जेवायला वाढणारी ती कोणी रोबोट होती का? की तिच्याकडून नुसती कामं करून घेतली, उद्याच्या सूचना फीड केल्या की झालं?.. ती दुपारीही एकटी होती आणि आता रात्रीही एकटीच होती.

आणखी वाचा-‘एका’ मनात होती..! ‘एकटाच असतो गं मी!’

घराची गरज म्हणून लग्नानंतर पल्लवीनं नोकरी सोडली. वेळ नाही म्हणून कोणते छंद जोपासले नाहीत, की नवीन मैत्रिणी जोडल्या नाहीत. आता या वळणावर घरातला जो तो आपल्या उद्दिष्टासाठी पळतोय.. आणि तिला कळतच नाहीये, की तिनं कशापाठी आणि कशासाठी धावावं? याचं उत्तर सापडत नाही आणि ती एकटेपणाच्या खोल गर्तेत जात राहते. अशा कितीतरी ‘पल्लवी’ गृहिणी होऊन घराचा गोवर्धन एका करंगळीवर पेलतात खरा, पण त्या गोवर्धनाखाली त्या एकटयाच असतात. दिवसातून शंभर वेळा तरी ‘आपल्या जगण्याचं नेमकं उद्दिष्ट काय आहे?’ हा विचार त्यांच्या मनात येत राहतो. म्हणजे मुलांना त्यांच्या स्वप्नापर्यंत जाण्यासाठी मोठं करणं आणि नवऱ्याच्या यशातच आपलं यश मानणं, हे तिच्या आयुष्याचं उद्दिष्ट आहे, की परंपरेनुसार रीतिभाती, सणवार सांभाळणं, पाहुणेरावळे सांभाळणं हे असेल तिच्या आयुष्याचं उद्दिष्ट?.. या सगळयात ती कुठे आहे? ती एक व्यक्ती म्हणून काय जगली? ‘गृहिणीपद’ स्वीकारण्याआधी जेव्हा त्या मुली असतात, तेव्हा तेवढयाच हिरिरीनं रात्रंदिवस जागून अभ्यास करतात. गुण नाही मिळाले, तर घरी बोलणी खातात. कोणत्याही मुलापेक्षा मुलींची वेगळी विद्यार्थीदशा नसते. पण लग्न ठरलं, की या गुणांचा आणि पदवीचा वापर फक्त चांगला नवरा मिळवण्यासाठी होता की काय, असा प्रश्न अनेक मुलींना पडतो.

शिक्षिका होण्याचं रूपालीचं स्वप्न. त्यासाठी दहावीला मेरिटमध्ये येऊनसुद्धा तिनं बारावीनंतर ‘बीएस्सी’ला प्रवेश घेतला. ‘एमएस्सी’ला सुवर्णपदक मिळवल्यानंतर गलेलठ्ठ पगाराच्या, अभियंता विशालचं स्थळ आलं आणि आई-वडील हुरळून गेले. त्यांनी लगेच लग्नाचा निर्णय घेतला. काहीच महिन्यांत विशालला कंपनीनं अमेरिकेला पाठवलं. सगळं काही विशालभोवती फिरत होतं. विशालचं करिअर, त्याची प्रगती, त्याचा पगार, या सगळयात रूपालीचंही अभिनंदन केलं जात होतं, पण अमेरिकेच्या थंड वातावरणात तिचं करिअर गोठून गेल्याचं कोणाच्याही लक्षात आलं नव्हतं. अगदी तिच्या आई-बाबांच्याही नाही! फोनवर आईवडील, बहिणी, सासरचे, या सगळयांच्या डोळयांत ‘पोरीनं नशीब काढलं हो!’ असे भाव असायचे. रूपालीच्या मनात मात्र एकटेपणाचा मिट्ट काळोख होता. काही काळानं का होईना, सगळयांना तिचा एकटेपणा, उदासीनता जाणवली. तेव्हा, ‘‘आता चान्स घ्या! म्हणजे आपोआप मन रमेल,’’ अशा सूचना मिळायला लागल्या. म्हणजे आता तर करिअरच्या उरलेल्या आशाही संपल्या, असं वाटून रुपाली आणखीनच मिटून गेली. परदेशात जाण्याची ‘क्रेझ’ प्रत्येकाला असतेच असं काही. काही जणांना गलेलठ्ठ पगाराच्या अमेरिकेतल्या नोकरीपेक्षा आपल्या देशात, आपल्या माणसांत राहायला मिळणं जास्त भावतं. भारतात रूपालीनं कदाचित तिनं तिच्या करिअरसाठी प्रयत्न केले असते, पण अमेरिकेत व्हिसाच्या तांत्रिक अडचणीमुळे तेही शक्य होत नव्हतं. परक्या देशातल्या, वेगळया संस्कृतीतल्या एकटेपणापेक्षा आपण पाहिलेल्या स्वप्नांपासून दूर जाण्याचा एकटेपणा खूप ठळक असतो. पैसा, ‘लग्झरी’, हे सगळं ही उणीव भरून काढू शकत नाही.

आणखी वाचा-सांदीत सापडलेले.. ! दोन ध्रुवांवर दोन पिढ्या..

मधुरा आणि रोहित यांनी लग्नानंतर ठरवलंच होतं, की मधुरानं घर सांभाळायचं आणि रोहितनं अर्थार्जन करायचं. घर सांभाळून गाण्याची आवड जोपासायला वेळ देता येईल, असं तिला वाटलं. त्यामुळे तिच्यावर हा निर्णय काही लादलेला नव्हता. अवनी आणि आरव ही त्यांची जुळी मुलं आता दहा वर्षांची झाली होती. मधुरा घर, गाणं आणि मुलांचा अभ्यास, यांत भरपूर व्यग्र होती. एकदा शाळेतून खगोलशास्त्रावर आधारित प्रकल्प बनवायला मुलांना सांगितलं होतं. मधुरानं दोघांकडे त्याबद्दल विचारणा केली, तर आरव पटकन म्हणाला, ‘‘तुला नाही अगं जमणार! बाबांना विचारतो.’’ अवनी म्हणाली, ‘‘अगं, ते सायन्स जेवण बनवण्याएवढं सोप्पं नसतं! बाबाला जमेल. तो हुशार आहे तुझ्यापेक्षा.’’ इथे मधुराला पहिला फटका बसला. मधुरा फक्त स्वयंपाकपाणी करण्यातली आहे आणि ती काही जास्त शिकलेली नाही, हा मुलांचा गैरसमज वरचेवर दृढ होत गेला. रोहितही त्यांचा गैरसमज दूर करण्याच्या भानगडीत न पडल्यामुळे पुढे मुलं जशी मोठी होत गेली, तशी करिअर, पैसा, तांत्रिक मुद्दे याबद्दल ती फक्त बाबांबरोबर चर्चा करायला लागली. कोणत्याही सामाजिक किंवा राजकीय प्रश्नावर वाद झाला, तर मुलं चेष्टेनं ‘चाय पे चर्चा’मधला ‘‘ ‘चाय’ तू कर, ‘चर्चा’ आम्ही करतो,’’ असं म्हणून खदखदून हसायची. ताज्या घडामोडींविषयी मधुराचं वाचन चांगलं होतं. नेहमी गरज न भासल्यामुळे तांत्रिक बाबतीत ती तेवढी तज्ज्ञ नसेल, पण मुलांना ती कशात चांगली आहे किंवा नाही, हे जाणून घेण्यात आता अजिबात रस नव्हता. त्यांनी तिला कधीच त्यांच्या ‘विद्वान, ज्ञानी’ लोकांच्या ग्रुपमधून बाहेर काढलं होतं. त्यामुळे घरात सुट्टीच्या दिवशी सगळे जण असले, की मधुराचा एकटेपणा आणखीनच वाढायचा.

आपल्याकडे गृहिणीला कायमच खूप गृहीत धरलेलं आहे. मुलांनी, नवऱ्यांनी थकूनभागून घरी यावं आणि ‘ती काय, दिवसभर घरीच होती,’ म्हणावं! म्हणजे दिवसभर हे खूप उत्पादक काम करत होते आणि ती सटरफटर काम करत, दुपारी झोप काढत घरातच असते, असा सगळयांचा सूर! स्वत:ला सिद्ध करून काही उपयोग नाही, हे समजून चुकलेली अशी गृहिणी आतून स्वत:ला मिटून घेते. तिचा घरच्यांशी संवाद तुटल्यावर ती स्वत:ला एकटं समजायला लागते. कारण तिच्या दृष्टीनं तिचं समाजातही स्थान नसतं आणि पात्रता असून घरातही स्थान नसतं. अर्थात हा प्रश्न तितकासा नवीन राहिलेला नाही तरी त्यावर उत्तरही सापडलेलं नाही.

आणखी वाचा-माझी मैत्रीण : काय झाले गं बोटाला?

केरळमधल्या सोळा वर्षांच्या अनुजथ विनयलालनं एक स्त्री दिवसभरात काय काय काम करते, याचं काढलेलं एक खूप सुंदर चित्र इंटरनेटवर ‘व्हायरल’ झालं होतं, ते पाहण्यासारखं आहे. गृहिणी जेवढी कामं एका वेळी लीलया करते आणि घर ‘मॅनेज’ करते, ते करण्यासाठी एखादी व्यवस्थापनशास्त्राची पदवीही अपुरी पडेल. मानुषी छिल्लर २०१७ मध्ये ‘मिस वल्र्ड’ झाली, त्या वेळी अंतिम फेरीत तिला प्रश्न विचारला होता, की ‘जगात कोणत्या व्यवसायाला सर्वाधिक पगार दिला गेला पाहिजे?’ त्यावर तिनं ‘आईला सर्वात जास्त पगार दिला गेला पाहिजे आणि तुम्ही तो फक्त पैशांच्या स्वरूपात नाही, तर सर्वाधिक आदर देऊन दिला पाहिजे,’ असं उत्तर देऊन मुकुट जिंकला होता. तुमच्या घरातल्या गृहिणीचा एकटेपणा कमी करायला तुम्हाला आधी हे उत्तर लक्षात ठेवावं लागेल.

आपण रोजची कामं करण्यात तर निष्णात असतो, पण मेंदू ताजातवाना आणि तरुण राहण्यासाठी सतत नवीन काही तरी शिकत राहणं खूप गरजेचं आहे. ‘नवीन काही तरी’ म्हटलं की युटय़ुबवरच्या रेसिपीज् आठवतील तुम्हाला; पण ते तुमच्यासाठी आव्हानात्मक नाही! एखादं नवं वाद्य, चित्रकला, व्यायामाचे नवीन प्रकार, कॉम्प्युटर, काहीही शिकताना ‘याचा उपयोग काय?’ असा विचार करायचा नाही. आपला आनंद आपल्या हातात असला पाहिजे. तुम्ही जरी आतापर्यंत छंद जोपासला नसेल, तर किमान एखाद्या सामाजिक कामाशी जोडलं जाण्याचा प्रयत्न करा. तुमचं असं एक वेळापत्रक असू द्या. बाहेर पडा. तुमचा एकटेपणा फक्त कुटुंबातल्या सदस्यांमुळे नाही, तर समाजाशी जोडलं गेल्यानं कमी होईल. काहीच नाही, तर बागेत चालायला गेलात, तरी लोक तुमच्याशी जोडले जातील.

‘झिम्मा’ चित्रपटातली स्त्री पात्रं जशी स्वत:ला आजमावायला बाहेर पडली होती. तुम्हीही तुमचा ‘कम्फर्ट झोन’ सोडून बाहेर पडा. बघा.. बाहेर खूप सुंदर जग तुमची वाट पाहतंय!

trupti.kulshreshtha@gmail.com