शिल्पा परांडेकर
अमरावती जिल्ह्य़ातील भौगोलिकदृष्टय़ा विविधतेमुळे या प्रत्येक जिल्ह्यातील खाद्यसंस्कृतीमध्ये विविधता आली आहे. तिथली उकडपेंडी, पानगे, आंबट बेसन, त्रिकोणी पोळय़ा, पापडा, ज्वारीच्या चकोल्या, वरणफळं, खांडोळीची भाजी अशा अनेक पदार्थाबद्दल मी ऐकत होते. त्यातली उकडपेंडी करताना पाहताही आली नि खाताही आली.
साधारण इ. स. पू. २००० मध्ये विदर्भातील थोर गणिती, विज्ञानवेत्ते, कवी आणि कृषी अभ्यासक गृत्समद ऋषींनी कापसाचे सूत काढून त्याचे कापड विणण्याचा मूळ शोध लावला, असे सांगण्यात येते. विदर्भात कापसाची लागवड करण्याचाही मूळ शोध यांचाच. याच सूतकताईने गांधीजींच्या स्वदेशी चळवळीमध्ये मोठी भूमिका पार पाडली आहे. त्याच वध्र्यात मी माझ्या पुढील प्रवासाला सुरुवात करून पोहोचले होते. वध्र्यातील गांधीजींच्या सेवाग्राम इथे थांबून पुढील काही दिवस आजूबाजूचा प्रवास पूर्ण करणार होते.
‘दुसऱ्याच्या श्रमावर मी जगता कामा नये,’ ही शिकवण गृत्समद ऋषींची अशीच स्वावलंबनाची शिकवण बापूजींचीही. गृत्समद ऋषी आणि गांधीजी हे दोन्ही दुवे माझ्या या प्रवासात मला निव्वळ योगायोग म्हणून नाही तर नेहमीच आदर्श म्हणून सोबत राहिले आहेत.कृषी आणि याद्वारे प्राकृतिक आहाराचे महत्त्व या दोघांनी आपल्यासमोर मांडून ठेवले आहे. गांधीजींनी त्यांच्या आयुष्यात अन्नावर अनेक प्रयोग केले आणि त्याची परीक्षणे त्यांनी ‘माझे सत्याचे प्रयोग’ या त्यांच्या आत्मकथेतून आपल्यासमोर मांडली आहेत. संपूर्ण शाकाहार, फलाहार, धान्याहार, उपवास याविषयी त्यांनी त्यात सविस्तर चर्चा केली आहे. तसेच सेवाग्राममध्ये देखील बापूजींची रसोई, भोजनासंबंधीच्या अनेक महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना, त्यांनी वापरलेली जाती वगैरे मला तिथे पाहायला मिळाली. सेवाग्रामच्या परिसरात तसेच वध्र्यात बापूजींच्या प्राकृतिक आहाराच्या विचारधारेतून प्रेरित होऊन अनेकांनी ‘प्राकृतिक आहार केंद्रे’ सुरू केली आहेत. वध्र्यातील वास्तव्याच्या काळात मी अधिकतर अशाच ठिकाणी खाणे पसंत केले.
पळसगावात गेले तेव्हा एक जुनाट वाडा, लागूनच छोटेसे देऊळ होते. बायकांची काही तरी लगबग चाललेली दिसली. मी बाजूलाच थांबून सर्व प्रकार पाहत होते. गव्हाच्या लोंब्या (हुरडा) देवासमोर ठेवला जात होता. भाजलेले हिरवेगार, कोवळे गहू, साखर, तीळ घालून केलेल्या लोंब्या हातावर प्रसाद म्हणून मिळाला म्हणून मी खुशीत असतानाच समोरून लगबगीने एक आजी माझ्याकडे येताना दिसल्या. मला वाटले प्रसाद घेण्यासाठी त्या येत असाव्यात. पण त्या जणू मलाच ‘प्रसाद’ (जाब विचारण्यासाठी) देण्यासाठी आल्या होत्या. ‘माझी पेन्शन मला वेळेत मिळत नाही. काय करता तुम्ही सरकारी अधिकारी’, त्या माझ्यावर ओरडल्याच. त्यांना मी सरकारी अधिकारी वाटले होते. बऱ्याच गावांत असे विनोदी प्रसंगदेखील घडतात. सामान्य शहरी माणसं अशा ठिकाणी फार कमी वेळा तिथे जात असावीत म्हणूनच कोणाला मी सरकारी अधिकारी, सरकारी डॉक्टर किंवा अजून बरेच काही वाटत असते आणि मग ते थेट त्यांची गाऱ्हाणी किंवा तक्रारीदेखील सांगायला सुरुवात करतात!
‘नव रंगांची नव पानगी. असं तश्याच ते काम नाही’. पिपरीतल्या सुरेखाबाई मला म्हणाल्या, जेव्हा मी त्यांच्याकडे मला पानगे करून दाखवण्याचा आग्रह धरला. कोकणात तसेच अनेक आदिवासी भागात हळदीच्या, केळीच्या पानात पीठ, गूळ किंवा मोह घालून बनवलेले गोड पानगे आपल्याला माहीत आहेत. हा प्रकार म्हणजे रोडगे, बाटी, लीट्टी, बाफले, बिट्टय़ा यांचाच भाऊ. सुरेखाबाई यांच्या म्हणण्याचा अर्थ असा होता, की हे पानगे बनविणे खूप नजाकतीचे आणि संयमाचे काम आहे. कोण्या येरागबाळय़ाचे नाही! पिठाची हातावरच बनवलेली एक-एक छोटी पारी एकात एक भरून या पानग्या बनविल्या जातात आणि विस्तवात बाटय़ांप्रमाणेच शेकल्या जातात. अनेक गावांत भंडारा, यात्रेदरम्यान केवळ पानग्या शेकण्याचे काम पुरुष करतात. आलू-वांगेसोबत हे पानगे छान लागतात. माझ्या आग्रहामुळे सुरेखाबाईंनी मला झटपट का होईना पण त्याची कृती करून दाखवली. आपल्याकडे अशा अनेक पाककृती आहेत ज्यात नजाकत, विशेष आकार, विशेष कृती आहेत की ज्या केवळ ऐकून लिहून घेतल्याने त्यांचे तितकेसे आकलन होत नाही, असा माझा अनुभव असायचा. तेव्हा मी त्यांना मिळेल त्या पिठापासून अगदी चिखलाच्या गोळय़ापासूनदेखील मला तो आकार जमवून दाखवा, यासाठी आग्रह धरायचे.
विदर्भाचा दुसरा विभाग- अमरावती. उत्तरेस मध्य प्रदेश, दक्षिणेस मराठवाडा, पश्चिमेस खानदेश, पूर्वेस नागपूर विभाग. अशा वैविध्यपूर्ण चतु:सीमा लाभलेला हा प्रदेश असाच वैविध्यपूर्ण आणि अनेक खाद्यसंस्कृतींचा मिलाफ असणारादेखील आहे. एकटय़ा विदर्भातीलच नागपूर आणि अमरावतीमधील खाद्यसंस्कृतीत बरीच विविधता आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, आणि वाशीम हे अमरावती विभागातील जिल्हे. एकाच विभागात हे जिल्हे येत असले तरी इथल्या भौगोलिकदृष्टय़ा विविधतेमुळे या प्रत्येक जिल्ह्यातील खाद्यसंस्कृतीमध्येदेखील विविधता आली आहे.
अमरावतीमध्ये उकडपेंडी, पानगे, आंबट बेसन, त्रिकोणी पोळय़ा, पापडा, ज्वारीच्या चकोल्या, वरणफळं, खांडोळीची भाजी, असे अनेक पदार्थ अनेक गावांत मी ऐकत होते. मात्र काही पदार्थ प्रत्यक्ष पाहणे मला आवश्यक वाटत होते. दुपारनंतरची वेळ. थोडं ऊन सरलं, वामकुक्षी झाली की अंगणात स्त्रिया एकत्र येऊन गप्पागोष्टी करताना दिसतात. हे चित्र गावांमध्ये सर्रास पाहायला मिळते. अशाच एका दुपारी राहितमध्ये मला हिराबाई भेटल्या. ‘मला कई बाई असं पदार्थ-बिदार्थ सांगता-बिंगता नाही यायचे. पण मला तू जरा दमलेली दिसत्येस. त्यापेक्षा माझ्या घरी चल. उकडपेंडी वगैरे झटपट काही तरी बनवते. खाऊन घे.’ देव भेटल्यानंतर जसा एखाद्याला आनंद होईल तसाच आनंद मला या वेळी झाला. त्यांच्यासाठी झटपट होणारा, किरकोळ पदार्थ माझ्यासाठी मात्र मोठा ऐवज मिळाल्यासारखाच होता. काही पदार्थ झटपट आणि किरकोळ असे वाटू शकतात, पण त्यातही एक छोटे, पण महत्त्वाचे तंत्र लपलेले असते. तेच या उकडपेंडीतदेखील आहे आणि हिराबाईंनी अगदी नकळतपणे ते उलगडले.
एके काळी माणसांनी गजबजलेला वाडा आज थोडा शांत असतो, याची खंत वाटत असली तरी मुलांची प्रगती आणि यश यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर समाधानदेखील होते. घरी गेल्यापासून त्यांच्या खूप गप्पा आणि माहिती सांगणे सुरूच होते. ‘मी तरी बाई, मला मनात येईल तेव्हा उकडपेंडी करून खाते. ह्यांना (त्यांचे पती) नाही आवडत. भरपूर तेल, कांदा, शेंगदाणे घालून केलेली उकडपेंडी मला आवडते.’’ त्यांची परवानगी घेऊन मी ही पाककृती व्हिडीओबद्ध केली. ‘‘उकडपेंडीला जरा तेल जास्तच लागते. त्याशिवाय ती अशी छान मोकळी होत नाही,’’ असे म्हणत त्यांनी माझ्यासमोर लगेच गरमागरम उकडपेंडीची ताटली ठेवली. साधाच परंतु खमंग, पौष्टिक आणि मुख्य म्हणजे पोट भरणारा असा हा पदार्थ.
अमरावती शहरात मला अनेक ठिकाणी ‘आलू-पोंगा’ अशा पाटय़ा दिसायच्या. गंमत अशी की, झेरॉक्सच्या दुकानातदेखील अशी पाटी लावलेली असायची. मला वाटले, खूपच काही तरी विशेष पदार्थ असेल हा. हा काही घरी केला जाणारा पदार्थ नाही. त्यामुळे गावांमध्ये मला याची माहिती नाही मिळाली, पण क्वचित कोणी तरी सांगायचे, खूप भारी लागते चवीला, वगैरे. आता इतकं ऐकल्यावर, वाचल्यावर माझी उत्सुकता शिगेला पोहोचली होती. पण मला अमरावती शहरात रोज रात्री परतण्यास उशीर व्हायचा तोपर्यंत हे सर्व गाडे बंद झालेले असायचे. पण एका रात्री माझी आणि आलू-पोंग्याची अखेरीस गाठभेट झालीच. तर आलू-पोंगा म्हणजे बॉबी, फुकणी किंवा नळी या नावांनी सर्वाना परिचित असणारी एक पिवळी, तळलेली नळीचा आधुनिक पदार्थ. जी सर्व प्रकारची किराणा दुकाने, पानपट्टी, रस्त्यावरचे सिग्नल्स वगैरे ठिकाणी विकायला ठेवलेली सर्रास पाहायला मिळते. महाराष्ट्रात असे कोणतेही गाव, शहर, नगर नसेल की ज्याने ही खाल्ली नाही किंवा नळीचा पोकळ भाग बोटांमध्ये अडकवून, हात उंचावून मिरवले नसेल. तर उकडलेला बटाटा, काही साधेच मसाले, कांदा, मीठ वगैरेचे केलेले हे मिश्रण त्या नळीमध्ये हलकेच भरायचे. ताटलीमध्ये आलू भरलेल्या या नळय़ा घेऊन चाटप्रमाणे पुदिना चटणी, चिंच चटणी, कांदा, बारीक शेव, चाट मसाला वगैरे घालून विदर्भ स्ट्रीट फूड स्पेशल ‘आलू-पोंगा’ तयार होतो.
माहितीसाठी संदर्भ :
गृत्समद ऋषी माहिती – ‘विदर्भाचा इतिहास’. लेखक – डॉ. श. गो. कोलारकर, गो. मा. पुरंदरे. – विदर्भ संशोधन मंडळ
उकडपेंडी
साहित्य : ज्वारीचे पीठ, कांदा, तेल, शेंगदाणे, तिखट, मीठ, कोथिंबीर, जिरे-मोहरी.
कृती : तेल तापवून घेणे. तेल तापल्यावर मोहरी, जिरे घालणे. मोहरी तडतडल्यावर कांदा घालणे. हळद आणि ज्वारीचे पीठ घालून ते परतणे. पीठ तेलात चांगले परतून घेणे. त्यात मीठ, लाल तिखट घालून पुन्हा एकदा परतणे. थोडे-थोडे तेल घालत पीठ व इतर जिन्नस चांगले एकजीव होईपर्यंत परतत राहणे. वरून कोिथबीर घालती की उकडपेंडी खाण्यास तयार. (उकडपेंडी मोकळी होणे आवश्यक आहे. गरज वाटत असल्यास पाण्याचा हबका देऊन वाफवून घ्यावे. ज्वारीच्या पिठाप्रमाणेच कणकेचीदेखील उकडपेंडी करता येते.)
(क्रमश: )
parandekar.shilpa@gmail.com