मे १९७७ ला माझं लग्न झालं. १५ दिवसांची सुट्टी भावी आयुष्याची स्वप्नं रंगवतच संपली आणि खूप आनंदाने ऑफिसला गेलो आणि बातमी ऐकली की एक डिपार्टमेंट बंद झालं आहे व हळूहळू पुढची सुद्धा बंद होणार आहेत. या बातमीने मी स्वप्नांच्या दुनियेतून खाली आदळलो. दरदरून घाम फुटला. नोकरीशिवाय दुसरं काही करायचं हे तोपर्यंत मनातसुद्धा आलं नव्हतं.
मात्र दुसरा मार्ग शोधण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. जुजबी शिक्षण, अनुभव नाही, ओळख-वशिला नाही, मग पुढे काय? नवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता आणि वेळेची गरज म्हणून कारकुनी सोडून मेकॅनिक ‘लाइन’ सुरू केली. हा माझ्या आयुष्यातला आव्हानात्मक टर्निग पॉइंट ठरला. रेडिओ, ट्रान्झिस्टर, ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट टीव्ही रिपेअिरग शिकून सराव करीपर्यंत बाजारात रंगीत टीव्ही-व्हिडीओ आले. थोडा भ्रमनिरास झाला, पण पुन्हा त्याचं शिक्षण घेणं आणि त्याचा सराव करणं भाग पडलं.   हळूहळू लोकांशी विश्वासाचं नातं तयार व्हायला लागलं. नोकरी आणि मेकॅनिकची कामं ही कसरत जमायला लागली व थोडी स्थिरता वाटायला लागली, तोच पुन्हा एकदा कारकुनी जगात कॉम्प्युटर युगाने मोठी पावलं टाकली. ऑफिसमध्ये वेगळी कॉम्प्युटर रूम होती. तेथे कोणाला आत जायलासुद्धा परवानगी नव्हती.
एका कामासाठी मी त्या रूममध्ये गेलो आणि माझ्या नेहमीच्या मित्रांनी माझा जिव्हारी लागेल असा अपमान केला. त्या सणकीतून मी बाहेर आलो आणि ठरवलं, आपण नुसताच ऑपरेटर नाही तर प्रोग्रामर व्हायचं. आणि आणखी एक टर्निग पॉइंट आला.. एक आशादायी वळण. क्लास लावणं, पुस्तक विकत घेणं, चालू नोकरी- मेकॅनिकचा बिझनेस सांभाळून सराव सुरू झाला. क्लासमध्ये पहिला आलो आणि कंपनीने प्रोगॅ्रिमगची संधी दिली. या काळात स्थिरता दिसायला लागली तर परत कंपनी बंद पडणार अशी बातमी आली.
माझी कामाची पद्धत, आकलन पाहून माझ्या एका नवीन ओळखीच्या मित्राने प्रोगॅ्रिमगमधल्या महत्त्वाच्या टिप्स मला दिल्या, ज्यामुळे या क्षेत्रात मी प्रगत झालो आणि नवीन नोकरीचं आव्हान स्वीकारायला तयार झालो. तो ४ हजार कामगार असलेला कारखाना होता. तिथल्या मागण्या पूर्णपणे वेगळ्या. निवड झाल्यावर सांगितलं की, तुम्ही एकटेच प्रोग्रामर आहात, कोणी सहायक नाही. हाताखालचे ऑपरेटरसुद्धा नवशिके. त्यामुळे या मिलची िखड एकटय़ा बाजीप्रभूने (मी) लढवली नाही तर नोकरी जाणार होती.
शिकणारी माझी २ मुलं, संसाराची पूर्ण जबाबदारी या तणावमुळे ७-८ महिने जवळजवळ झोपलोच नाही. पुढे काम हळूहळू आवाक्यात आलं. ७-८ र्वष होत नाही तर इथंही कारखाना बंद पडायची भीती निर्माण झाली. माझ्या हुशारीची दखल माझ्या मित्रांनी घेतली व मला दुसऱ्या मोठय़ा कंपनीत नोकरी दिली. या नवीन कंपनीत मेन फ्रेमवर प्रोग्रािमग होतं. ते मला शिकावं लागलं. असं करीत करीत बरीच र्वष कार्यरत राहून आता मी इथंच निवृत्त होत आहे. म्हणूनच म्हणावंसं वाटतं, ज्यांनी मला मदत केली त्यांचे धन्यवाद, पण त्यांनाही धन्यवाद अधिक ज्यांनी मला ही मदत नाकारली. त्यामुळे मी मला घडवू शकलो.     

   ‘टर्निग पॉइंट’ साठी  मजकूर पाठवताना
या सदरासाठी मजकूर पाठवताना तुमचं आयुष्य आमूलाग्र बदललेला एकच अनुभव पाठवावा. जो अनुभव तुम्हाला शिकवून गेला, नव्याने जगायला भाग पाडून गेला असाच अनुभव असावा, त्याची पाश्र्वभूमी थोडक्यात सांगावी. मजकूर ३०० ते ३५० शब्दांचाच असावा. त्यापेक्षा जास्त मजकूर असलेल्या पत्रांचा विचार केला जाणार नाही.
आपले पत्र या पत्त्यावर पाठवावे
  ‘लोकसत्ता चतुरंग’, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे,
नवी मुंबई, ४००७१० किंवा ईमेल करा.  chaturang@expressindia.com