– ऋता बावडेकर

साधारणपणे वडिलांचा किंवा वडिलोपार्जित उद्योगव्यवसाय घरातील मुलाने/ मुलग्यांनी सांभाळणे समाज म्हणून सगळ्यांनीच गृहीत धरलेले होते. त्यामागे काही सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक समजगैरसमज, संकेत, मानमान्यताही होत्या, मात्र गेल्या काही वर्षांत या चित्रात मोठा बदल होताना दिसतो आहे. वडिलांचा व्यवसाय सांभाळणाऱ्या किंवा होता त्यापेक्षा अधिक यशस्वी करणाऱ्या त्यांच्या मुली उद्योग क्षेत्रात नुसत्या दिसू लागल्या नसून त्या ‘कोट्यानुकोटी’ उड्डाणे घेत आहेत. महाराष्ट्रातील अशा काही प्रातिनिधिक स्त्रियांचा हा परिचय काल (८ मार्च) साजऱ्या झालेल्या ‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’च्या निमित्ताने…

Goa Police
आईने कडक उपवास करायला लावल्याने दोन भावांचा मृत्यू? दिवसाला केवळ एक खजूर खायचे; गोव्यातील खळबळजनक घटना
Girls sexually assaulted by bakery owner in Nalasopara
नालासोपार्‍यात बेकरीचालकाकडून लहान मुलींवर लैंगिक अत्याचार, आतापर्यंत ४ पीडितांच्या तक्रारी
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?

आपल्याकडे वडिलांचा किंवा वडिलोपार्जित व्यवसाय बहुतांशी त्यांचा मुलगा वा मुलगेच सांभाळताना दिसतात. ‘घराण्याचा वंश मुलगा चालवतो, मुलगी दुसऱ्यांच्या घरची,’ या पारंपरिक समजुतीला अनुसरूनच हे होत असल्याने ते गृहीत धरले गेले. पण आज कौटुंबिक-सामाजिक चित्र बदलायला लागले आहे. एकच मुलगी असणारे पालकही सर्वच स्तरांत दिसू लागले आहेत. मुलींना उच्च शिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायांवर उभे करणारेही खूप आहेत. त्यामुळे पुढे जाऊन, मुलगा नसेल, तरी व्यवसाय आपल्या मुलींच्या नावावर करणाऱ्यांची संख्याही वाढती आहे. पूर्वी त्यासाठी नात्यातला मुलगा शोधला जाई किंवा एखाद्याला दत्तकही घेतले जात असे. दरवर्षी ८ मार्चला आपण ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ साजरा करतो. या वर्षीची (२०२४) थीम ‘इन्स्पायर इन्क्लुजन – इन्व्हेस्ट इन विमेन, अ‍ॅक्सेलरेट प्रोग्रेस’ अर्थात ‘स्त्रियांचा सहभाग वाढवा आणि प्रगतीचा वेगही वाढवा,’ अशी आहे. गंमत म्हणजे, ही थीम येण्यापूर्वीच खरे तर आपल्या उद्योजिकांनी ती यशस्वी करून दाखवली आहे. देशभर अशा असंख्य ‘कन्या-उद्योजिका’ आहेत. महाराष्ट्रातील काही प्रातिनिधिक उद्योजिकांचा हा परिचय.

हेही वाचा – लैंगिकता वाढतं आकर्षण आणि गुन्हेगारीही!

मानसी किर्लोस्कर टाटा

भारतात ‘टोयोटा’ आणण्याचे श्रेय विक्रम किर्लोस्कर यांचे! ‘एसयूव्ही’ कार्स त्यांनी सर्वप्रथम भारतात आणल्या. फॉर्च्युनर, इनोव्हासारख्या मोटारी त्यांच्यामुळे आल्या. नोव्हेंबर २०२२ मध्ये विक्रम किर्लोस्कर यांचे आकस्मिक निधन झाले आणि बोर्डाने ‘किर्लोस्कर ग्रुप’ची धुरा त्यांची एकुलती एक मुलगी मानसी किर्लोस्कर टाटा यांच्याकडे सोपविली. मुख्य म्हणजे मानसी यांनी ती रास्त ठरवली.

अमेरिकेतील ‘ऱ्होड आयलंड स्कूल ऑफ डिझायनिंग’च्या मानसी पदवीधर असून ‘केअरिंग विथ कलर’ ही स्वयंसेवी संस्था त्या चालवतात. कलेचा पिंड असणाऱ्या मानसी यांचा २०१९ मध्ये प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांचे पुत्र नेव्हिल यांच्याबरोबर विवाह झाला. माहेरी आणि सासरीही उद्योगाच्याच वातावरणात राहिल्यामुळेही असेल, वडिलांनंतर त्यांनी उद्योगविश्वही सहज आत्मसात केले. आज त्यांनी वैयक्तिक जीवनात विविध खेळ, कलांची आवड आणि व्यावसायिक जीवनात विविध कंपन्यांचे नेतृत्व अशी विभागणी व्यवस्थित केली आहे.

विक्रम किर्लोस्कर यांच्या निधनानंतर ‘किर्लोस्कर जॉइंट व्हेंचर्स’च्या अध्यक्षपदी मानसी यांची निवड झाली. आज त्या ‘टोयोटा मटेरियल हँडलिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’, ‘किर्लोस्कर टोयोटा टेक्स्टाइल प्रायव्हेट लिमिटेड’, ‘टोयोटा इंजिन इंडिया लिमिटेड’ आणि इतर कंपन्यांचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्या आई गीतांजली किर्लोस्कर ‘किर्लोस्कर सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड’च्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. मानसी या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक, कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ‘टोयोटा किर्लोस्कर मोटर’साठी २०२२ हे वर्ष महत्त्वपूर्ण ठरले. मानसी यांनी आपली कल्पकता या व्यवसायात आणली. त्यांनी गाड्यांचे शानदार प्रदर्शन केले. त्यामुळे कंपनी चर्चेत राहिली. त्या वर्षी कंपनीचे मागील दहा वर्षांचे रेकॉर्ड मोडत सगळ्यात जास्त गाड्या विकल्या गेल्या. २०२१ च्या तुलनेत कंपनीची ही विक्री २३ टक्के अधिक होती. २०२१ मध्ये त्यांनी एक लाख तीस हजार ७६८ युनिट्स विकली, तर २०२२ मध्ये त्यांनी एक लाख साठ हजार ३५७ युनिट्स विकली. एका मुलाखतीत मानसी म्हणतात, ‘मी चांदीचा चमचा तोंडात धरून जन्माला आले असले, तरी त्यामुळे काही फरक पडत नाही. माझे कर्तृत्व मला कामातूनच सिद्ध करावे लागणार आहे.’ त्या ते या व्यवसायातून सिद्धच करत आहेत.

आदिती कारे पाणंदीकर

‘इंडोको रेमेडीज’च्या व्यवस्थापकीय संचालक आदिती कारे पाणंदीकर यांनी ‘ओहायो स्टेट युनिव्हर्सिटी’मधून (अमेरिका) औषधनिर्माण शास्त्रातील पदव्युत्तर पदवी मिळवली आणि पेटंटसंबंधित कायद्याचा अभ्यास करून त्या २०१२ मध्ये भारतात परतल्या. तरुण पिढीला संधी मिळायला हवी, असा विचार करून त्यांचे वडील सुरेश कारे यांनी ‘इंडोको रेमडीज’चा कारभार आदिती यांच्या हाती सोपवला. जबाबदारी स्वीकारल्यानंतर काही वर्षांतच त्यांनी नफ्यात दुपटीपेक्षा जास्त वाढ करून दाखवली. सुरेश कारे यांचे वडील गोविंद कारे यांनी १९४७ मध्ये नोंदणी केलेली आपली ही औषधांची कंपनी १९६३ मध्ये आपल्या मुलाकडे सोपवली. कंपनीची उलाढाल त्या वेळी अडीच लाख होती. सुरेश कारे यांनी ती शंभर कोटी रुपयांपर्यंत नेली. आदिती यांचा ओढा व्यवसायाकडे होताच. मात्र व्यवसायात यायचे असेल तर व्यवस्थित तयारी करून यायचे, असा त्यांच्या आईवडिलांचा कटाक्ष होता. दोन बहिणींमध्ये आदिती मोठ्या. आदिती आणि मधुरा दोघीही कंपनीत काम करीत, परंतु सीए पूर्ण झाल्यानंतर मधुरा यांनी आपल्याच व्यवसायात पुढे जायचे ठरवले आणि ‘इंडोको’चे काम आदिती पाहू लागल्या. कंपनीत त्यांनी सर्व विभागांत काम केले. सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. २०१२ मध्ये त्या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक झाल्या. आदिती यांनी जागतिक बाजारपेठेवर अधिक लक्ष केंद्रित केले. सर्वसमावेशक संशोधनाला प्राधान्य देणाऱ्या ‘इंडोको रेमिडीज’ या कंपनीचे आज जवळजवळ ५५ देशांत अस्तित्व असून तिची उलाढाल २०२३ मध्ये १६३८ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली होती. त्यांची ही घोडदौड अजूनही सुरूच आहे.

विनती सराफ मुत्रेजा

विनती यांचे वडील विनोद सराफ यांनी १९९० मध्ये मुंबईत ‘विनती ऑरगॅनिक्स’ ही कंपनी सुरू केली. त्यावेळी त्या फक्त सहा वर्षांच्या होत्या. मात्र वयाच्या १७, १८ व्या वर्षीच त्यांना या व्यवसायात रस वाटू लागला आणि त्याच्या सर्वंकष अभ्यासासाठी त्यांनी परदेशात जाऊन बिझनेस आणि इंजिनीअरिंग यामध्ये उच्च पदव्या मिळवल्या. विनती भारतात परत आल्या आणि २००६ मध्ये त्यांनी या व्यवसायात अधिकृतपणे प्रवेश केला. वडिलांबरोबर अनेक ठिकाणी जाऊन प्रत्यक्षअप्रत्यक्ष व्यावहारिक शिक्षण घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात ‘विनती ऑरगॅनिक्स’ने भारतातील व्यवसायावर लक्ष केंद्रित केले. नंतर विनती आणि त्यांच्या वडिलांनी आपले केमिकल (रासायनिक) उत्पादन सीमेपलीकडे नेण्याचे ठरवले. ‘‘भारतातील भौगोलिक तथा राजकीय परिस्थितीमुळे परदेशी ग्राहकांचा भारतीय पुरवठादारांवर विश्वास नव्हता. भारतात कोणीही हे उत्पादन तयार करत नव्हते, तरीही नियंत्रणाबाहेरची परिस्थिती आणि अविश्वास यामुळे आम्हाला परदेशात प्रचंड संघर्ष करावा लागला. अशा उत्पादनासाठी परदेशी ग्राहक इतरत्र ५० टक्के जास्त किंमत द्यायला तयार होते, पण आमचे उत्पादन घ्यायला तयार नव्हते,’’ असे विनती सांगतात. अखेर विनती यांची कंपनी, उत्पादन वितरित करण्याची त्यांची क्षमता, पुरवली जाणारी सेवा, यावर हळूहळू ग्राहकांचा विश्वास बसत गेला. त्यानंतर त्यांना परदेशातील ऑर्डर्स मिळू लागल्या. कंपनीचा निर्यातीचा टक्का वाढत जाऊन एकूण विक्रीच्या ६५ टक्क्यांपर्यंत गेला. नंतर ‘आयब्युप्रोफेन’मधील सर्वांत महत्त्वाचा घटक ‘आयबीबी’ यापलीकडे जाऊन त्यांनी ‘एटीबीएस’ हा रासायनिक घटक तयार केला. शेती, टेक्स्टाइल उद्योगांत त्याचा वापर केला जातो. त्या सुमारास विनती सुपरमार्केट्स आणि फळांच्या उद्योगातही रस घेत होत्या. ते त्यांच्या उत्पादनाचा कच्चा मालही तयार करू लागले. जास्त उत्पादने खरेदी करणाऱ्या इतर उत्पादकांनाही ते उत्पादन विकू लागले.

२०१८ पासून विनती कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्या जेव्हा कंपनीत आल्या, तेव्हा कंपनीचा ‘मार्केटकॅप’ २० कोटी रुपये होता. आता तो १८,७०० कोटी रुपये आहे. २०२३ या आर्थिक वर्षात कंपनीचा रेव्हेन्यू २,१५७ कोटी रुपयांपेक्षा अधिक होता. ‘जमापुंजी आणि कर्जमुक्तता यामुळे कंपनीची भरभराट होत असते,’ यावर विनती यांचा विश्वास आहे. म्हणूनच असेल, त्यांचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढतोच आहे.

प्रीती राठी गुप्ता

‘आनंद राठी शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स लि.’च्या व्यवस्थापकीय संचालक आणि ‘LXME’ (लक्ष्मीसाठी वापरलेले संक्षिप्त रूप) च्या संस्थापक अशी प्रीती राठी गुप्ता यांची ओळख आहे. २००४ पासून त्या ‘राठी ग्रुप’शी संबंधित आहेत. त्याबरोबरच त्यांनी LXME हे खास स्त्रियांसाठी खास अ‍ॅप तयार करून वडिलांच्या व्यवसायाला अधिक व्यापक केले.

प्रीती यांच्या कामात अर्थातच पैसे, गुंतवणूक या विषयांना महत्त्व आहे. पण काम सुरू केल्यानंतर काही दिवसांतच त्यांच्या लक्षात आले, की स्त्रिया आर्थिक विषयांत रस घेत नाहीत. बोलायला गेले तरी टाळतात. एवढेच नाही, तर यासंबंधित प्रतिनिधीही पुरुषांशीच बोलतात. स्त्रियांना विषय समजावून सांगायला जातच नाहीत. याची कारणे शोधताना त्यांच्या लक्षात आले, की पैसे हा विषय अनेक स्त्रियांनी जोखमीचा मानला आहे. म्हणून त्या नवरा, वडील, भाऊ, मुलगा अशा कोणाची तरी मदत घेत सगळे निर्णय त्यांच्यावर सोपवतात. हे चित्र प्रीती यांना निराशाजनक वाटले. सगळ्याच नसल्या, तरी अशा स्त्रियांचे प्रमाण लक्षणीय असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि ते गैरसमजातून आहे हेही लक्षात आले. त्यातूनच त्यांना ‘LXME’ या व्यासपीठाची कल्पना सुचली. रिद्धी कनोरिया डुंगरसी यांच्या सहकार्याने त्यांनी हे अ‍ॅप केवळ स्त्रियांसाठी सुरू केले. स्त्रियांनी आर्थिक विषयावर मोकळेपणाने बोलावे, प्रश्न विचारावेत ही त्यामागची मूळ कल्पना. ‘‘आपल्या देशातील किमान वीस दशलक्ष स्त्रियांना ‘आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र करणे हे आमचे ध्येय आहे. पैसे मिळवणे म्हणजेच स्वातंत्र्य मिळवणे ही कल्पना चुकीची आहे. ते महत्त्वाचे आहेच, पण गुंतवणूक करणे, त्या गुंतवणुकीचा वापर नीट करणे, त्यात वाढ कशी होईल ते बघणे, आर्थिक निर्णय घेण्याची क्षमता मिळवणे, याला आर्थिक स्वातंत्र्य म्हणतात. याची जाणीव स्त्रियांमध्ये निर्माण करण्यासाठी आम्ही हे व्यासपीठ सुरू केले आहे,’’ असे प्रीती राठी गुप्ता सांगतात. त्याचा उपयोग स्त्रियांमधील आर्थिक साक्षरता वाढण्यासाठी होतो आहे.

हेही वाचा – इतिश्री: चुकलं तर चुकलं!

झहाबिया खोराकीवाला

असंच आणखी एक महत्त्वाचं नाव म्हणजे झहाबिया खोराकीवाला. ‘वोकहार्ट लि. फार्मास्युटिकल आणि बायोटेक्नॉलॉजी’ कंपनीच्या त्या व्यवस्थापकीय संचालक आहेत. ही जागतिक कंपनी असून निम्म्यापेक्षा अधिक नफा त्यांना युरोपमधून मिळतो. त्यांचे वडील हबिल हे कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. कार्यकारी संचालक म्हणून झहाबिया २०१० मध्ये कंपनीत रुजू झाल्या. वर्षभरातच व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांना बढती मिळाली. पण मुलगी म्हणून त्यांना हे सहज मिळाले नाही. त्यासाठी त्यांनी श्रम घेतले. मुख्यत: वैद्याकीय खर्चाचा भाग त्या बघतात. त्यानुसार अँजिओप्लास्टीचा खर्च किती येऊ शकतो, डॉक्टर्सची भरती, कायदेशीर बाबी, पगाराच्या रचना अशी सगळ्या गोष्टींची त्यांनी माहिती घेतली. हळूहळू अनेक महत्त्वपूर्ण बदल केले. २०११ मध्ये ‘वोकहार्ट इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅस्थेटिक्स’ची गोव्यामध्ये स्थापना करण्यात त्यांचा सहभाग होता. तसेच रेडिओलॉजी, सीटी स्कॅन, पॅथॉलॉजी, याबद्दलची माहिती एकाच ठिकाणी मिळू शकेल, हे तंत्र त्यांनी सुरू केले. एका मुलाखतीत त्या म्हणतात, ‘आमचा भर नर्सिंगवर असतो. कारण रुग्णाचा अधिक संबंध परिचारिकांबरोबर येत असतो. नर्सिंग ही सेवा आमच्यासाठी महत्त्वाची आहे.’ आज त्या आपल्या या व्यवसायात पुढे जात आहेत, एक विशिष्ट ध्येय समोर ठेवून.

नादिया चौहान

‘फ्रुटी’ हा ब्रँड भारतात लोकप्रिय आहे. ‘पारले अ‍ॅग्रो’ने तयार केलेल्या या पेयाचा खप सुरुवातीपासूनच लक्षणीय होता. अल्पावधीत ते घराघरांत पोहोचले. त्यामुळे प्रकाश चौहान यांच्या या कंपनीचे मूल्य २००३ मध्ये ३०० कोटी रुपये झाले होते. त्याच वर्षी त्यांची मुलगी नादिया चौहान यांनी कंपनीत प्रवेश केला. आज नादिया चौहान या ‘पारले अ‍ॅग्रो कंपनी’च्या मुख्य विपणन अधिकारी (चीफ मार्केटिंग ऑफिसर) आणि व्यवस्थापकीय सहसंचालक (जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर) आहेत. शौना आणि अलिशा या त्यांच्या बहिणींचीही साथ त्यांना या व्यवसायात मिळत आहे.

‘पारले ग्रुप’ची स्थापना मोहनलाल चौहान यांनी १९२९ मध्ये केली. ते नादिया यांचे पणजोबा. सुरुवातीला येथे फक्त बेकरी उत्पादने तयार होत. दहा वर्षांनी कंपनी बिस्किटे तयार करू लागली. चौहान यांना मिळालेल्या लायसन्सनुसार ते केवळ ब्रिटिश आर्मीला ही बिस्किटे विकू शकत होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांची ‘पारलेजी’ ही बिस्किटे सर्वत्र मिळू लागली. १९७७ मध्ये कंपनीतर्फे गोल्डस्पॉट, थम्सअप, लिम्का ही थंड पेये मिळू लागली. मोहनलाल यांचा लहान मुलगा जयंतीलाल यांनी ‘पारले अ‍ॅग्रो कंपनी’ सुरू केली. पुढे त्यांचा मुलगा प्रकाश यांनी कंपनीची सूत्रे हाती घेतली. १९८४ मध्ये त्यांनी ‘फ्रुटी’ हे सॉफ्ट ड्रिंक बाजारात आणले. ते प्रचंड लोकप्रिय झाले. प्रकाश यांना तीन मुली. त्यापैकी नादिया यांनी उद्योगव्यवसायात येण्याचे खूप आधीच ठरवले होते. त्यानुसार वयाच्या सतराव्या वर्षीच, २००३ मध्ये त्यांनी ‘पारले अ‍ॅग्रो’मध्ये प्रवेश केला. कंपनीचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला. एका मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे, ‘छोट्यामोठ्या गावांमध्ये मी फिरले. लोकांच्या खाण्याच्या सवयी काय आहेत, कुठली चव त्यांना आवडते, कोणते पॅकबंद खाद्या ते पसंत करतात, त्याची कारणे काय आहेत, असे सर्वांगीण निरीक्षण मी करत होते. लोकांशी बोलत होते. माझ्या व्यवसायाला त्याचा उपयोग होणार होता.’ दरम्यान ‘फ्रुटी’ या पेयावर कंपनी खूपच अवलंबून असल्याचेही त्यांच्या लक्षात आले. ९५ टक्के रेव्हेन्यू फक्त ‘फ्रुटी’मधून मिळत होता. त्यातील धोका ओळखून त्यांनी ‘बेली’ हे बाटलीबंद पाणी बाजारात आणले. पाण्याचा दर्जा, पॅकेजिंग याबाबत त्यांनी विशेष काळजी घेतली. त्यांनी विचार केल्यानुसार यात त्यांना यश आले आणि ‘फ्रुटी’वरचा ‘ताण’ थोडा कमी झाला. ‘बेली’नंतर २००५ मध्ये त्यांनी ‘अ‍ॅप्पी फिज’ हे पेय आणलं. अ‍ॅपल ज्यूसमधले भारतातले हे पहिले पेय ठरले. लोकांना ते आवडले. ‘फ्रुटी’च्या खांद्यावरचा भार आणखी थोडा कमी झाला. उमेदवारीच्या काळात केलेली भटकंती, तेव्हा केलेली निरीक्षणे आणि जाणवलेले वास्तव, यानंतर नादिया यांनी आपल्या भात्यातला महत्त्वाचा बाण काढला. रुपडे बदलून ‘फ्रुटी’ पुन्हा लाँच करण्याचे त्यांनी ठरवले. ‘लहान मुलांचे पेय’ ही त्याची ओळख अधिक व्यापक करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्या वेळी अनेक पेये बाजारात येत होती. स्पर्धा तगडी होती. नादिया यांनी ‘फ्रुटी’चे पॅकेजिंग अधिक आकर्षक केले. तरुणांचेही लक्ष जाईल अशी रंगसंगती केली. हिरव्या रंगातून ‘फ्रुटी’ पिवळ्या रंगात आली. त्या वेळी त्यांनी ‘फ्रुटी’चे त्रिकोणी आकाराचे छोटे पॅकेटही काढले. त्याची किंमत फक्त अडीच रुपये होती. ग्रामीण भागात याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. हे सगळे बदल ठसवण्यासाठी हिंदी चित्रपट कलाकारांना घेऊन जाहिरातीही केल्या. अशा प्रकारे २००३ मध्ये ३०० कोटी रुपये मूल्य असलेल्या वडिलांच्या ‘पारले अ‍ॅग्रो कंपनी’चे मूल्य लेकींच्या प्रयत्नांमुळे आज ८,००० कोटी रुपये झाले आहे. अर्थातच त्यांचा इरादा यापेक्षाही मोठा आहे, २०३० पर्यंत कंपनीला वीस हजार कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे लक्ष्य त्यांनी स्वत:समोर ठेवले आहे.

हा खरं तर फक्त काहीच यशस्वी उद्योजिकांचा परिचय. आज अशा अनेक जणी स्वतंत्रपणे, तर काही जणी वडिलांच्या किंवा नवऱ्याच्या बरोबरीने उद्योग क्षेत्राला गवसणी घालत आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रांत आपल्या नवनवीन कल्पनांनी, मेहनतीने ‘कोट्यानुकोटी’ उड्डाणे घेत आहेत. शहरातच नाही तर गावपातळीवरही अनेक स्त्रिया छोट्या छोट्या उद्योगातून घराला आर्थिक स्थैर्य देत आहेत. हे सारे यश पाहिले की स्त्रीच्या आत्मिक ताकदीची कल्पना येते. बाईला व्यवहारातले, पैशांतले काय कळते, असे म्हणणाऱ्यांना ही सणसणीत चपराकच म्हणावी लागेल.

ruta.bawdekar@gmail.com