माझ्यावर माझे वडील कैफी आझमी व आई शौकत आझमी यांचे खोल-सशक्त संस्कार आरंभीच्या काळात झालेत. ‘लडका घर का चिराग और बेटी पराया धन’ याला आमचं घर अपवाद होतं. बुजलेल्या महिलांना कसलीही आजादी नसते. प्रसंगी तुझा आवाज उंचव, तुझ्या अभिव्यक्तीला कधीही दडपू नकोस. हेच मी लहानपणापासून ऐकत आले आहे. म्हणून आज मी जी आहे ती या संस्कारांमुळेच.. सांगताहेत, ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी.
आ ज ज्या प्रकारे स्त्रिया सर्वच क्षेत्रात संचार करताहेत ते पाहून मला मी स्त्री असल्याचा अभिमानच वाटतो. ज्या सिनेसृष्टीत, नाटय़सृष्टीत एके काळी महिला औषधापुरत्याही नसायच्या, महिलांच्या भूमिकादेखील पुरुष कलावंत निभावून नेत, तिथे आता सर्वत्र महिला राज्य आलंय. फिल्म एडिटिंग ते सिनेमेट्रोग्राफी, कोरियोग्राफी महिलाच महिला आहेत, म्हणूनच मला अभिमान आहे मी स्त्री असल्याचा.
एका महिला कलाकाराच्या भूमिकेत जितकी विविधता असू शकते, तेवढे कंगोरे पुरुष कलावंताच्या व्यक्तिरेखेत अभावानेच आढळतात. मी पूर्वग्रहदूषित असेन कदाचित पण मला स्त्री कलाकाराचं रूप आवडतं. स्त्री म्हणून जगण्यातली आसक्ती आवडते. मी स्त्री असूनही मला प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळी माझे लाड पुरवले गेलेत. तू महिला आहेस, तुला हे काम जमणार नाही, असा अविश्वास कधी कोणी दाखवला नाही. त्यामुळे मी स्त्री असल्याचा आणि तरीही पूर्ण स्वतंत्र असल्याचा आनंद सदैव राहिला.
माझ्यावर माझे वडील कैफी आझमी व आई शौकत आझमी यांचे खोल-सशक्त संस्कार आरंभीच्या काळात झालेत. आम्ही मुस्लीम असलो तरी खूप आधुनिक वातावरण असायचं घरातलं. कारण दोघंही खूप सुधारक होते. ‘लडका घर का चिराग और बेटी पराया धन’ याला आमचं घर अपवाद होतं. त्यातही माझा जन्म आझमगडसारख्या भागात झाला, जे उत्तर प्रदेशात होतं, कर्मठ विचारांचं होतं. माझी अम्मा स्वत: रंगभूमीवरची सक्रिय अभिनेत्री असल्याने मी पुढे अभिनयाकडे गेले, मला विरोध तर झालाच नाही, उलट स्वागतच झालं. सुदैवानं आम्ही त्याबाबत पुरेसे पुरोगामी होतो. अब्बाजान व अम्मीने मला दिलेल्या शिकवणुकीनुसार वडीलधाऱ्यांचा अनादर न करता तू त्यांचं मत ऐकून स्वत: निर्णय घे. चार भिंतींत राहणाऱ्या, बुजलेल्या महिलांना कसलीही आजादी नसते. प्रसंगी तुझा आवाज उंचव, तुझ्या अभिव्यक्तीला कधीही दडपू नकोस. हेच मी लहानपणापासून ऐकत आले आहे.
 मी आज जी आहे, जी घडलेय त्यात माझ्या माता-पित्याचं. जावेदचा (पती -लेखक जावेद अख्तर) आणि दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचा प्रचंड प्रभाव आहे. जावेददेखील स्त्रीवादी आहे, त्याने माझ्या विचारांना अधिक मजबूत बनवलं. एक किस्सा सांगते, माझ्याकडे दिग्दर्शिका दीपा मेहता यांच्या ‘फायर’ चित्रपटाचं जेव्हा स्क्रिप्ट आलं, तेव्हा ते वाचून मी हादरून गेले होते. ज्या समाजात, ज्या अवतीभवतीच्या माणसांसोबत वावरले, त्यात कुठेही समलैंगिकता ही संस्कृतीत बसत नव्हती. मी त्याबद्दल फक्त ऐकून होते. बरेच दिवस ही पटकथा माझ्याकडे पडून होती, मी दीपा मेहतांना काहीही कळवू शकले नाही. दीपा मेहतांचा फोन येत राहिला. एकदा जावेदसमोर दीपा मेहतांचा फोन आला, तेव्हा जावेदला मी, दीपाच्या नव्या चित्रपटाबद्दल बोलले. जावेदने मला म्हटलं. त्यात इतका विचार करण्यासारखं काय आहे? देशात नव्हे जगात अशा खूप व्यक्ती अस्तित्वात आहेत, ज्या समलिंगी आहेत. जे सत्य आहे ते कसं नाकारून चालेल. नि:संकोचपणे ही भूमिका कर. तुला फक्त व्यक्तिरेखा साकार करायची आहे. अर्थात हे मोठे आव्हान आहे. वाद-विवादांना तोंड देण्याचं धाडस मात्र ठेव.
जावेद – माझा नवरा- माझा सखा.  त्याने उदारपणे मला होकार दिला. तरीही मी साशंक होते. माझी मुलगी झोया अख्तर (आजची आघाडीची दिग्दर्शिका) हिलाही मी ‘फायर’च्या कथानकाचे बाड दिले आणि तिच्या प्रतिक्रियेची वाट पाहत बसले.
तिने ते वाचले. म्हणाली, ‘सो..?’ तिला म्हटलं, ‘अगं. मी गोंधळात पडलेय. समलिंगी संबंध एका घरात. तेही नात्यातच..? कसं काय शक्य आहे ते..? अनकन्व्हिन्सिंग वाटतं.’ झोयाने म्हटलं, ‘असंही घडतं प्रत्यक्षात. तू ही भूमिका करायला हरकत नाही.’
झोया ही नव्या पिढीतल्या आधुनिक विचारांची प्रातिनिधिक मुलगी. तिला ‘फायर’चं कथानक खटकलं नाही, हे लक्षात येऊन ही भूमिका मी केली, त्यावर वादळ नाही वादळं झाली. इट वॉज अ कल्ट फिल्म. पण मुद्दा असा की नव्या पिढीतल्या महिला सर्वार्थाने बदलताहेत. त्यांचे विचार, त्यांची नैतिकता, त्यांच्या गरजा, त्यांची भूमिका खूप बदललंय. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे.
 म्हणूनच आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं महत्त्व माझ्या दृष्टीने अनन्यसाधारण आहे. महिलांना त्यांच्या वैयक्तिक वाढदिवसापेक्षादेखील महत्त्वाचा वाटावा, असं या दिनाचं महत्त्व आहे. कारण, अलीकडे आपल्या अतिप्रगत होत जाणाऱ्या समाजाला प्रत्येक गोष्टीचा इव्हेन्ट करायची सवय जडलेली आहे. या आधुनिक समाजासाठी जसा व्हॅलिन्टाइन डे तसा महिला दिन. ग्लॉसी मॅगजिन्स – काही दैनिकं यांच्या जाहिरातीत म्हटलं जातं- महिला दिनानिमित्त आपल्या पत्नीला हिऱ्यांची भेट द्या. व्वा. पत्नी-प्रेयसी यांना मानसिक समाधान- आनंद देण्याऐवजी, तिला एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून जगू देण्याऐवजी तिला हजारो-लाखो खर्च करून हिरे देण्यात काय हशील आहे हे मला न करणारं कोडं आहे. जावेदने मला एक गुलाबाचं फूल दिलं तरी ते मला भावणारं आहे. असो.. महिला दिनाचा इव्हेन्ट झाला असला तरी त्यामागचा हेतू अतिशय महत्त्वपूर्ण आहे. महिलांना प्रत्येक क्षेत्रात समसमान संधी, उच्च शिक्षणासाठी उत्तेजन, कुटुंबातून प्रोत्साहन मिळालं पाहिजे. कायद्याने स्त्री भ्रूणहत्या बंद असली तरी अनैतिक पद्धतीने अशा हत्या राजरोस चालताहेत. हे त्वरित थांबवायला हवं. ग्रामीण महिलांच्या आरोग्याची हेळसांड होतेय. त्याकडे तातडीने लक्ष द्यायला हवंय. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नदेखील अत्यंत गंभीर झाला आहे, या सगळ्याच कारणासाठी महिला दिन गांभीर्याने साजरा करणं गरजेचं आहे. जेणेकरून त्यांच्या प्रश्नांकडे संबंधितांचं लक्ष वेधलं जाईल.
 मी आजच्या स्त्रीबद्दल आशावादी आहे. आजची स्त्री तिचा मार्ग ती ठरवतेय. तो तिला कितपत योग्य वाटतो हे महत्त्वाचं आहे. तिला जे योग्य वाटतं ते मला योग्य वाटेलच असं नाही. काळानुसार बदलणं योग्य. पण हा निर्णयदेखील आजच्या स्त्रीनेच घ्यायचाय. किती बदलायचं. तडजोडी कितपत करायच्या आणि मनासारखं कितपत – कधी वागायचं. हे ठरवण्याचं स्वातंत्र्य किमान अबाधित राहायला हवं आणि ते राहीलच याची आज तरी खात्री वाटते.