जयश्री काळे – vish1945@gmail.com

आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘सिटी’ समूहाने जेन फ्रेझर यांच्या नावाची पुढील मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नुकतीच घोषणा केली.  भारतीय रिझव्‍‌र्ह बँके च्या गव्हर्नरपदी अद्याप स्त्रीची नियुक्ती झालेली नसली, तरी अनेक स्त्रिया देशात आणि परदेशातही बँकिं ग क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाची पदे भूषवत आहेत. त्यांच्याविषयी..

अमेरिकेतील तिसऱ्या क्रमांकावरील ‘सिटी बँके’च्या अध्यक्ष आणि ‘ग्लोबल कन्झ्युमर बॅंकिं ग बिझनेस’च्या प्रमुख  जेन फ्रेझर यांची बँकेच्या  मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  जेन फ्रेझर यांच्या या नियुक्तीमुळे आनंदही वाटला आणि अभिमानही. अगदी थोडक्यात त्यांच्याविषयी सांगायचं तर ‘केम्ब्रिज’मधून अर्थशास्त्र आणि ‘हार्वर्ड’मधून व्यवस्थापनाचे शिक्षण घेतल्यावर त्यांनी ‘मॅकेन्झी’ आणि ‘गोल्डमन सॅश’ कंपनीत काही काळ अनुभव घेतला. त्यांनी ‘सिटी ग्रुप’मध्ये प्रवेश केला तो २००४ मध्ये. २००७ ते २००९ या अर्थव्यवस्थेच्या कठीण काळात बँकेचे स्थैर्य राखले आणि सिटी बँकेला अंदाजे २५० मिलियन डॉलरच्या तोटय़ातून बाहेर काढले. आपल्या यशाबद्दल त्या  म्हणतात, ‘‘एकाच वेळी मुलांना वाढवणे आणि करिअर करणे मला कठीण वाटले. थकून जात असल्याने अपराधीपणाची जाणीव टोचत राहायची. मग ठरवले, की नाही म्हणायला शिकायचे आणि महत्त्वाची कामे ओळखून त्यावरच लक्ष केंद्रित करायचे.’’ याचंच फलस्वरूप आज त्या सीईओपदी पोहोचल्या आहेत.

एकू णच बँके च्या उच्च पदांचा विचार करताना लक्षात आले, की भारतीय स्त्रिया बँकांतून सर्वोच्च स्थानांवर अगोदरच  पोहोचलेल्या आहेत. काही नावे म्हणजे ‘स्टेट बँके’च्या अरुंधती भट्टाचार्य, ‘अलाहाबाद बँके’च्या शुभलक्ष्मी पानसे, ‘देना बँके’च्या नूपुर मिश्रा, ‘आयात निर्यात बँके’च्या तर्जानी वकील, ‘नाबार्ड’च्या रंजना कुमार, तर खासगी क्षेत्रात ‘अ‍ॅक्सिस’च्या शिखा शर्मा, ‘कोटक महिंद्र’च्या शांती एकम्बरम इत्यादी. अनेक भारतीय स्त्रियांनी कर्तृत्वाचा परीघ इतर देशांतूनही विस्तारला आहे. भारतात शिकलेल्या मुक्ता करंदीकर वयाच्या एकोणचाळीसाव्या वर्षी अमेरिकेतील ‘गोल्डमन सॅश’ या  कंपनीत  व्हाइस प्रेसिडेंट  आणि ‘डिव्हीजनल चीफ ऑफ स्टाफ’आहेत, तर सुजाता दिवेकर ‘जे. पी. मॉर्गन चेस’च्या व्हाइस प्रेसिडेंट आहेत. गीता गोपीनाथ आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये (इंटरनॅशनल मॉनिटरी फंड) मुख्य अर्थतज्ज्ञ या कळीच्या हुद्दय़ावर धडाडीने काम करत आहेत. हे असे ‘आहे मनोहर’ असले तरी भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरपदी अजून एकही स्त्री पोहोचलेली नाही. ‘डेप्युटी गव्हर्नर’ पदापर्यंत पोहोचल्या, पण पुढची पायरी चढायला लागणारी नियामकांची इच्छाशक्ती कमी पडली. उलटपक्षी अमेरिकेच्या ‘फेडरल रिझव्‍‌र्ह’ची प्रमुख म्हणून अमेरिके चे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी निश्चयाने जेनेट येलेन या अनुभवसंपन्न स्त्रीची निवड केली होती अर्थात या निर्णयावरही  बराच गदारोळ झाला. बँकिंग आणि आर्थिक क्षेत्रातील इतकी जबाबदारीची जागा एखादी बाई नाही निभावू शकणार असा सूर त्यात होता. परंतु ओबामा आणि त्यांच्या समविचारी पुरुष सहकाऱ्यांचा स्त्रियांप्रति असलेला न्याय्य समतावादी दृष्टिकोन येथे कामी आला. रशिया, मलेशिया, साऊथ आफ्रिका आणि इतर लहान १७ देशांतून मध्यवर्ती बँकेच्या प्रमुख पदापर्यंत स्त्रिया पोहोचलेल्या आहेत. अर्थात हा अपवादच म्हणावा लागेल.

भारतीय स्त्रिया अजून सर्वोच्च बुरुजावर स्वार झाल्या नसल्या तरी जवळपासची अनेक शिखरे त्यांनी सर केली आहेत. महत्त्वाचे म्हणजे बुरुजाचा पाया आणि उभारणी त्यांनी मोठय़ा प्रमाणात आर्थिक क्षेत्रात सहभागी होऊन मजबूत केली. एका पाहणीनुसार २००५ मध्ये बँकांतील स्त्री-अधिकाऱ्यांची संख्या २७  हजार होती, ती २०१४ मध्ये १,२९,३४५ झाली. आज  स्त्रियांच्या बँका, पतपेढय़ा, सहकारी उद्योग यांची संख्या सुमारे चार हजार आहे. कित्येक लाख बचत गट आहेत. त्यात शेतकरी स्त्रियाही आहेत. त्याचा स्त्रियांच्या सक्षमीकरणाबरोबरच एकूण अर्थव्यवस्थेच्या सबलीकरणालाही हातभार लागत आहे.  आज भारतात नोकरी करणाऱ्या स्त्रियांपैकी ६७ टक्के  स्त्रिया या बँकिंग आणि संलग्न क्षेत्रात आहेत. पुरुषप्रधान समाजव्यवस्था ही सार्वत्रिक आहे. त्यात स्त्री-पुरुषांची जडणघडण काही प्रमाणात भोवतालचा परिसर, त्यातील भयगंड, न्यूनगंड यातून होत असते. स्त्रियांमध्ये जी विशिष्ट मानसिकता तयार होते त्याची संभावना पुष्कळदा ‘बायकी गुण’ म्हणून केली जाते आणि ते संस्थेच्या प्रगतीसाठी मारक आहेत असा आभासही होतो. परंतु बँकिंगसारख्या क्षेत्रात ‘बायकी गुण’ तारक आहेत हे बँकेत काम करताना मला प्रकर्षांने जाणवले. स्त्रियांमध्ये जोखीम उचलण्याची क्षमता कमी असते, त्या घाबरट असतात, असे म्हटले जाते. पण खरं तर त्या अधिक सावधानतेने, मोजून-मापून जोखीम स्वीकारतात आणि पुरुषी बिनधास्तपणा टाळून कर्जव्यवहार करतात. घर, मुलांचे संगोपन अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळत असताना अष्टावधानी होतात. बँक व्यवहारांच्या वेगवेगळ्या अंगांकडे एकाच वेळी लक्ष ठेवून समतोल साधायचे कसब आत्मसात करतात. समाजशास्त्रीयदृष्टय़ा स्त्री परिस्थितीचा अधिक सम्यक विचार करणारी असते. म्हणूनच ती कर्जदाराच्या बारीकसारीक तपशिलाचा अंदाज घेऊन कर्ज परतफेडीची क्षमता नीट जोखू शकते. कर्जवसुलीचे जिकिरीचे कामही स्त्रिया चिवटपणे, संयमाने, मनगटशाही न वापरता करतात असा अनुभव आहे.

स्त्रियांची गुणग्राहकता असणाऱ्या महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर, महर्षी कर्वे, यांच्यासारख्या द्रष्टय़ा समाजसुधारकांनी स्त्रीशिक्षणाची, स्त्रीसमतेची बीजे रोवली. त्यांच्या विचारधारेत एक मोठा सुशिक्षित, उदारमतवादी पुरुषवर्ग आणि कुटुंबव्यवस्था तयार झाली. येथे स्त्रीशिक्षण महत्त्वाचे मानले गेले आणि तिला शिकण्यास, स्वत:ला घडवण्यास वाव दिला गेला. ‘बँक ऑफ बरोडा’मध्ये अधिकारी म्हणून काम करताना पदोन्नतीसाठी ग्रामीण शाखेतील अनुभव घेणे आवश्यक असायचे. स्त्रियांना अलिखित धोरणानुसार शक्यतो जवळच्याच ग्रामीण शाखेत पाठवले जायचे. उद्देश असा, की मुले लहान असताना संगोपनासाठी तिने नोकरीचा राजीनामा देऊ नये. काही महाभाग ओरड करायचे, पण बालसंगोपन केवळ तिच्या कुटुंबाच्याच दृष्टीने महत्त्वाचे नसून एकूण समाजहितासाठी पोषक आहे, हे पुरुष सहकारीसुद्धा हिरिरीने मांडायचे.

स्त्रियांच्या क्षमता बँकिंगसाठी किती उपयुक्त आहेत याची जाण असलेले विवेक दाढे यांनी पत्नी मीनाक्षी यांच्याबरोबर ‘भगिनी निवेदिता बँक’ स्थापन केली आणि सर्व कारभार स्त्रियांवर सोपवून दिला. आज बँकेची सर्वागीण, गुणवत्तापूर्ण वाटचाल सुरू आहे.

एकीकडे उच्चशिक्षित स्त्रिया असल्या तरी त्याचबरोबर काबाडकष्ट करणाऱ्या अशिक्षित स्त्रियाही भारतात आहेत. कुटुंबनियोजनाचा, शिक्षणाचा बऱ्यापैकी प्रसार आणि साधनांची उपलब्धता झाल्याने या स्त्रियाही अधिक मोकळ्या आणि मुलांमुलींच्या शिक्षणाबाबत जागरूक झाल्या आहेत.

जगातील महासत्ता असणाऱ्या अमेरिकेतील अभिव्यक्तिस्वातंत्र्य, स्वयंशिस्त, विज्ञान-तंत्रज्ञानाची प्रगती यांचा योग्य आदर राखून असे नमूद करावेसे वाटते, की भौतिक सुखांची रेलचेल, कुटुंबनियोजनाला काही प्रमाणांत असणारा धार्मिक विरोध, घटस्फोट आणि त्यातून एकल स्त्रियांवर येणाऱ्या जबाबदाऱ्या या सगळ्यांचा तिथल्या स्त्रियांच्या उच्चशिक्षणावर काहीसा विपरीत परिणाम होतो आहे. अनेक स्त्रिया शालेय शिक्षण पूर्ण करून, कमी वेतन देणाऱ्या नोकऱ्यांत अडकून पडतात. ‘डेटिंग’च्या आधारे जोडीदार मिळवायचा आणि नंतर टिकवायचा असल्याने सुंदर, आकर्षक दिसण्यासाठी धडपडत राहातात. स्त्रिया बँकिंग क्षेत्रात क्लार्क, रिसेप्शनिस्ट, सेक्रे टरी या पदांवर काम करताना दिसत असल्या, तरी व्यवस्थापनाच्या वरच्या श्रेणीत मात्र फारच कमी प्रमाणात- म्हणजे फक्त जवळपास १६ टक्के च  दिसतात. पुरुषी अहंकार, स्त्रियांबाबत काहीसा प्रतिगामी दृष्टिकोन, यातून निर्माण झालेले अदृश्य अडथळे, ‘ग्लास सीलिंग’ पार करताना आलेले ‘पेप्सिको’च्या इंद्रा नुयी, ‘याहू’च्या मारिसा मायर यांचे अनुभव वाचण्यासारखे आहेत. परंतु उच्चशिक्षित स्त्रीला आपल्याकडे पुष्कळदा कुटुंबाचा, व्यवसायातील स्त्री-पुरुष सहकाऱ्यांचा आधार लाभतो. पुरुषही त्यांच्या आक्रमकतेच्या, लैंगिक वर्चस्वाच्या  कवचाबाहेर पडून अधिक संवेदनशीलतेने स्त्रियांना नोकरी-व्यवसायात मदत करतात, ही आपली मोठी जमेची बाजू. म्हणूनच आज ‘करोना’काळात बँका अत्यावश्यक सेवेत अंतर्भूत केल्या आहेत अशा वेळी अनेक अडचणींवर मात करून, निष्ठेने सेवा देणाऱ्या सेवकवर्गाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण ठेवायला हवे.

आंतराष्ट्रीय स्तरावर वावर असणाऱ्या ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ सुलभा ब्रrो यांचं बोलणं आठवतंय. त्या म्हणायच्या, ‘‘भारतीय, विशेषत: उच्चशिक्षित महाराष्ट्रीय स्त्रियांना ज्या संधी मिळाल्या, त्या जगात इतरत्र कु ठेही मिळालेल्या नाहीत.’’ या संधीचे सोने बँकिंग आणि अर्थविश्वातील स्त्रियांनी केले. त्याचा सार्थ अभिमान बाळगताना गेल्या काही वर्षांत एकूणच नोकरी सोडणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण वाढत आहे, याचाही आपण गांभीर्याने विचार करायला हवा.

(लेखिका ‘भगिनी निवेदिता बँके’च्या संचालिका आणि माजी अध्यक्षा आहेत.)