scorecardresearch

ज्येष्ठांचे लिव्ह इन : हिंमतवाली!

लग्न होऊन दक्षा जीवनच्या घरी आल्यावर तिच्या लक्षात आलं, की त्या घरात खेळीमेळीचं वातावरण नव्हतं.

ज्येष्ठांचे लिव्ह इन : हिंमतवाली!

|| सरिता आवाड
गुजरातमधील ‘अनुबंध फाउंडेशन’ ही ज्येष्ठांच्या पुनर्विवाह किंवा ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’साठी काम करणारी नटुभाई पटेल यांची संस्था. आजवर कित्येक वयोवृद्धांनी लग्न वा सहजीवनाचा आधार घेत आपलं वार्धक्य सुकर के लं आहे. त्यातलंच एक जोडपं दक्षा आणि रमणिक यांचं. अत्यंत कष्टाचं जीवन जगल्यानंतर उत्तर आयुष्यात दक्षाबेन यांना त्यांचा आधार गवसला. पण, ते जगणं वास्तवात आणण्यासाठी त्यांना प्रचंड हिंमत दाखवावी लागली… खमके पण दाखवावं लागलं…

नुकतीच मी अहमदाबादला जाऊन आले. तिथे ‘अनुबंध फाउंडेशन’ ही संस्था ज्येष्ठांच्या पुनर्विवाह किंवा ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’साठी प्रयत्नशील आहे असं मला समजलं. म्हणून मी तिथे जाऊन धडकले आणि या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नटुभाई पटेल यांची भेट घेतली. त्यांनी हे काम कसं सुरू केलं, कधी सुरू  केलं, आजपर्यंतची कामातली प्रगती, याबद्दल मी विस्तारानं सांगणार आहेच. पण आज त्यांनी गाठ घालून दिलेल्या एका जोडप्याबद्दल लिहायचा मला मोह होतोय.  या जोडप्यामधल्या दक्षाबेन तर मला विलक्षणच वाटल्या.

संध्याकाळी त्यांना भेटायला जाण्याआधी नटुभाईंनी मला त्यांच्याबद्दल फारशी माहिती दिली नव्हती. पण ‘आज आपण एका हिंमतवालीला भेटणार आहोत,’ हे मात्र आवर्जून सांगितलं. आम्ही दक्षाबेन आणि रमणिकभाई यांच्या घरी पोहोचलो. छोटी, एकमजली घरं एका मोठ्या मैदानाच्या कडेनं बांधली होती. या गोलाकार रचनेमुळे सगळी घरं आमने-सामने होती. पोहोचल्यावर उंच, मजबूत बांध्याच्या, गुजराथी पद्धतीची साडी नेसलेल्या दक्षाबेननी आपुलकीनं स्वागत केलं. त्यांच्या कपाळावरचं ठसठशीत मोठ्ठं कुं कू लक्ष वेधून घेत होतं. घरात गेल्यावर रमणिकभाई भेटले. काळेसावळे, मध्यम उंचीचे आणि हसऱ्या चेहऱ्याचे. त्यांचं वय सत्तरपेक्षा अधिक असावं, हा माझा अंदाज बरोबर ठरला. नंतर झालेल्या गप्पांमधून समजलं की रमणिकभाई ७२ वर्षांचे, तर दक्षाबेन ७० वर्षांच्या होत्या. रमणिकभाई मितभाषी आणि दक्षाबेन भरभरून बोलणाऱ्या दिसल्या.

मराठीत प्रसिद्ध होणाऱ्या ‘लोकसत्ता’ या लोकप्रिय दैनिकाच्या ‘चतुरंग’ पुरवणीसाठी ज्येष्ठांच्या ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’संबंधी मी लेखन करत असल्याची माहिती नटुभाईंनी त्यांना सांगितली. दक्षाबेन आणि रमणिकभाई उत्साहानं आपली गोष्ट सांगायला तयार झाले. दक्षाबेन बोलायला लागल्या.

दक्षाबेन सुस्थितीतल्या कुटुंबात जन्मल्या. त्या लहान असतानाच त्यांचे आई-वडील अपघातात गेले. त्यांचा सांभाळ त्यांच्या आजी-आजोबांनी केला. आजोबांचा तयार कपड्यांच्या विक्रीचा व्यवसाय होता. व्यवसायाच्या निमित्तानं त्यांची जीवन मेहता या मुलाशी ओळख झाली. मुलगा २०-२२ वर्षांचा, धडपड्या होता. आजोबांना आपल्या नातीसाठी हा योग्य वर वाटला आणि दक्षाचं लग्न त्यांनी जीवनशी लावून दिलं. आपल्या धंद्यात भागीदारी दिली. व्यवहार सुकर व्हावा म्हणून मुखत्यार पत्रही दिलं. आजोबांना हा नातजावई सगळ्यात जवळचा वाटत होता. त्याची अधिक सखोल माहिती काढावी, असं त्यांना त्यावेळी वाटलं नाही.

लग्न होऊन दक्षा जीवनच्या घरी आल्यावर तिच्या लक्षात आलं, की त्या घरात खेळीमेळीचं वातावरण नव्हतं. जीवन आणि त्याचा धाकटा भाऊ नरेश यांच्यात विस्तव जात नव्हता. मोठी बहीण चंदा नवऱ्याबरोबर अमेरिकेला होती आणि तिथे तिचा नवरा मोटेल चालवत होता. नरेश कमावत नव्हता. जीवनला धंद्यात खोट आली आणि त्यानं बहिणीच्या मागे अमेरिकेला जायचं ठरवलं. एव्हाना त्यांना मनीष आणि आशीष ही दोन मुलं झाली होती. अमेरिकेला जाताना बायको आणि मुलांना इथेच ठेवून जायचं, असं जीवननं  ठरवलं. जीवनच्या मागे आपल्याला त्याच्या कुटुंबाची जबाबदारी घ्यावी लागेल, शिवाय इथल्या घरात जीवनला हिस्सा द्यावा लागेल, असं वाटून नरेशचं डोकं भडकलं. जीवन आणि नरेशची सतत भांडणं व्हायला लागली. अशाच एका भांडणात नरेशनं जीवनचा गळा दाबून खून केला. नरेशला अटक झाली आणि तो तुरुंगात गेला. दक्षा, तिच्या म्हाताऱ्या सासूबाई आणि मुलं मागे राहिली. चंदाला हे समजलं, तेव्हा ती तातडीनं भारतात आली आणि मनीष व आशीष या दोन्ही छोट्या मुलांना आपल्याबरोबर अमेरिकेत घेऊन गेली. मुलांच्या प्रगतीसाठी काळजावर धोंडा ठेवून दक्षानं मुलांना अमेरिकेत जाऊ दिलं. दक्षा आणि सासूबाई इथे राहिल्या. रसोड्याची ( स्वयंपाकाची) कामं करून दक्षा चरितार्थ चालवत होती.

याच सुमाराला समोरच्या घरात राहाणाऱ्या भावनाची आणि दक्षाची ओळख झाली. भावनाची मुलं मयांक आणि जितू दक्षाच्या मुलांच्याच वयाची होती. या मुलांना दक्षानं लळा लावला. भावनाशी तिची चांगली दोस्ती झाली होती. दक्षाचा कामसूपणा, शिवण आणि स्वयंपाकातलं कसब, याचं भावनाला भारी कौतुक. तिचे यजमान रमणिकभाई यांचा लोखंडाचा व्यवसाय होता. ते कामानिमित्त बाहेर असायचे. पण भावनाच्या सांगण्यावरून कधी विजेचं बिल भरायला, तर कधी घरपट्टी भरायला ते दक्षाला मदत करायचे. दक्षाच्या सासूबाईंच्या आजारपणात तिला भावना आणि रमणिकभाईंची खूप मदत झाली. सासूबाईंच्या मागे दक्षा रसोड्याबरोबर शिवणाचाही व्यवसाय करायला लागली. अमेरिकेत गेलेला दक्षाचा मुलगा मनीष मोठा होऊन आत्याला मोटेलच्या धंद्यात मदत करू लागला आणि इकडे आईला घरखर्चाला पैसेही पाठवू लागला. भावनाचीही मुलं कामधंद्याला लागली. रमणिकभाईंनी शेजारचं घर मोठ्या मुलासाठी विकत घेतलं. दोन्ही मुलांची लग्नही करून दिली.

आणि अचानक भावनाला कर्क रोग झाला. तिचं तातडीनं ऑपरेशन करावं लागलं, पण तिला वाचवता आलं नाही. रमणिकभाई एकटे पडले. दोन सुना, दोन मुलं असूनसुद्धा त्यांना एकाकी वाटायला लागलं. मुलांच्या आयुष्यात आपल्याला स्थान नाही असं वाटायला लागलं. रमणिकभाईंना मधुमेहाचा विकार होता. त्यांना खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळायला लागायच्या. सुनांना काही ते जमेना. कुरबुरी वाढायला लागल्या. एका रात्री रमणिकभाईंची साखर खूप कमी झाली. त्यांनी मुलाला फोन करून साखर-पाणी मागितलं, पण त्यानं दुर्लक्ष केलं. सकाळी बघू, असं म्हणून झोपला. मग रमणिकभाईंनीच धडपडत घरातून साखर शोधून काढली आणि वेळ निभावली.

त्यांची घालमेल दक्षाला समजत होती. अधूनमधून चौकशी करणं, घरात काही चांगलंचुंगलं केलं तर एखादी कटोरी देणं, असं सुरू होतं. त्याच सुमाराला एका वर्तमानपत्रातला नटुभाईंचा लेख रमणिकभाईंच्या वाचनात आला. साठीच्या आसपास असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी साथीदार गमावला असेल, तर अशांनी एकमेकांना साथ द्यावी. उर्वरित आयुष्य रडतखडत, एकाकी घालवण्यापेक्षा एकमेकांच्या सहवासात, आनंदानं घालवावं, असा विचार त्यांनी मांडला होता. रमणिकभाईंनी चौकशी केली तेव्हा त्यांना समजलं, की नटुभाई अशा जोड्या जमवतही होते. या सेवेला त्यांनी ‘विनामूल्य अमूल्य सेवा’ असं नाव दिलं होतं. नटुभाईंनी आयोजित केलेल्या मेळाव्याला ते जाऊन आले. या वयात कसा असा विचार करायचा, असा संकोच करणाऱ्या ज्येष्ठांना नटुभाई ठामपणे नव्यानं सहजीवनाचा स्वीकार करायला प्रोत्साहित करत होते. रमणिकभाई या विचारानं प्रभावित झाले. आणि त्यांनी दक्षाबेनपुढे सहजीवनाचा प्रस्ताव मांडला.

हा प्रस्ताव कदाचित दक्षाबेनच्याही  मनात होता. पण संकोचाच्या आवरणात लपलेला होता. तरीही यावर त्यांनी विचार केला. अमेरिकेतल्या आपल्या मुलांना त्यांनी याबद्दल सांगितलं. त्यांची मुलं रमणिकभाईंना पूर्वीपासून ओळखत होतीच. विचारविनिमय करून त्या दोघांनी या प्रस्तावाला मान्यता दिली. रमणिकभाईंच्या मुलांना मात्र हा प्रस्ताव स्वीकारणं कठीण गेलं. दक्षाबेनला जरी ती दोघंही लहानपणापासून ओळखत असली, तरी आपल्या आईची जागा तिला बहाल करण्याची कल्पना त्यांना रुचत नव्हती. तरी वडिलांच्या तब्येतीचा व्यावहारिक विचार करून ते प्रस्तावाला अनुकूल झाले. पण मयांकच्या डोक्यात वारसा हक्काचा किडा घुसला. दक्षाबेन लग्न करून घरात आली तर वडिलांच्या मागे त्यांच्या संपत्तीत आपल्याला कमी लाभ होईल, असं त्याला वाटायला लागलं. ‘दक्षाबेन तुमच्या संपत्तीसाठीच लग्न करतायत’ असं तो म्हणायला लागला. एकेदिवशी तर वादाच्या भरात त्यानं वडिलांवर हातसुद्धा उगारला.

दक्षाबेनना हे समजल्यावर त्यांना वाईट वाटलं आणि रागही आला. संपत्तीच्या वादातून स्वत:च्या नवऱ्याचा खून झालेला त्यांनी पाहिला होता. त्यापायी आयुष्याचा उन्हाळा अनुभवला होता. पोटच्या मुलांना त्या अंतरल्या होत्या. आता आयुष्यभर ज्यांना आईसारखा लळा लावला, त्यांच्याकडून संपत्तीच्या लालसेचा आरोप झाला होता. त्यांच्या अंगाचा तिळपापड झाला. त्या रमणिकभाईंकडे गेल्या आणि म्हणाल्या, ‘‘मला लग्न करायचं नाही. पण तुम्ही माझ्याकडे या. आपण जोडीनं पुढचं आयुष्य घालवू. तुमचा धंदा, घर, सगळं मुलांच्या नावावर करा आणि नि:शंक मनानं माझ्या घरी या. देवाच्या दयेनं माझी तब्येत उत्तम आहे. खंबीरपणे मी तुमचा हात हातात घेते. बघूच कोण काय म्हणतायत ते.’’ आणि खरोखरच रमणिकभाई त्यांच्या घरी आपला बाडबिस्तरा बांधून आले. त्यांचं घर मुलाला दिलं. धंद्यातला वाटा देऊन टाकला. त्यांची गावात दोन दुकानं होती. त्या दुकानांचं भाडं घेणं सुरू ठेवलं. दक्षाबेनला त्यांनी निक्षून सांगितलं, की ‘‘इथून पुढे अमेरिकेतल्या मुलांची मदत घ्यायची नाही. तुझं शिवणकाम आणि मला मिळणारं दुकानांचं भाडं, यात आपला चरितार्थ चालेल.’’ आयुष्यात पहिल्यांदाच दक्षाबेनच्या घरी घरकामाला बाई यायला लागली. दक्षाबेनचे कष्ट कमी करण्याचा हा रमणिकभाईंचा प्रयत्न होता.

गेली आठ वर्षं दक्षाबेन आणि रमणिकभाई एकत्र राहात आहेत. दोघं एकमेकांची पूर्ण काळजी घेतात. रमणिकभाईंचं खाणंपिणं, औषधं, त्या निगुतीनं सांभाळतात. घराला वरचा मजला काढून त्यांनी एक जास्तीची खोली बांधली आहे. मध्यंतरी रमणिकभाईंना करोना झाला. त्यांना या जास्तीच्या खोलीत विलगीकरणात राहाता आलं. दिवसातून वीस वेळा जिने चढून-उतरून दक्षाबेननं त्यांची काळजी घेतली. आता ते व्यवस्थित आहेत. दोघांच्या चेहऱ्यावर समाधान नक्कीच जाणवतं. दोघांनी एकमुखानं सांगितलं, की हा त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा काळ आहे. दक्षाबेन आता ७० वर्षांच्या आहेत. पण त्यांना कुठला आजार नाही. पाय बरीक आता बोलायला लागले आहेत. पण बेनचं म्हणणं असं, की ‘‘जोपर्यंत माझे हात चालत आहेत, तोपर्यंत मी ठाकठीक आहे.’’ खरंच, मी अवतीभोवती पाहिलं, तर ते छोटंसं घर कमालीचं नीटनेटकं होतं. अगदी खरकटी भांडीसुद्धा टोपल्याखाली झाकून ठेवली होती. त्या घरातल्या स्वच्छतेच्या सुगंधानं माझं मन प्रसन्न झालं.

दिवेलागण झाली. आम्ही निघालो. निघताना दक्षाबेनच्या हिमतीचं मी विशेष कौतुक केलं. त्यावर नम्रपणे ‘‘हिंमत देणारा तर वर आकाशात आहे,’’ असं म्हणून त्यांनी श्रद्धेनं हात जोडले!

 (लेखातील व्यक्तींची नावे बदलली आहेत.)

sarita.awad1@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jesthanche live in author sarita avad anubandh foundation marriage of seniors akp