हरीश सदानी
बी.टेक. होऊन चारचौघांसारखी उत्तम नोकरी व सधन आयुष्य सोडून वंचित लोकांसाठी काम करायला प्रेरित झालेला आणि समाजकार्याचं रीतसर प्रशिक्षण घेऊन त्यात पूर्णवेळ उतरलेला तरुण म्हणजे प्रशांत आनंद. विकासापासून दूर रानावनात राहाणाऱ्या भटक्या समुदायांचा अभ्यास तर त्यांनी के लाच, पण  त्यांच्यासाठी काम करायला सुरुवात 
केली. शिक्षण व आरोग्यासाठीचं त्यांचं हे काम विस्तारत जाऊन त्यास स्त्री-पुरुष समानतेविषयीच्या जनजागृतीचा आयामही लाभला. त्या प्रशांत आनंद यांच्याविषयी..

इयत्ता दहावी किंवा बारावीमध्ये शिकणाऱ्या मुलांना शिक्षणाबरोबरच वेध लागलेले असतात ते भावी आयुष्यासाठीच्या करिअरच्या दिशांचे. आपल्या अंगभूत क्षमतांना, कौशल्यांना वाव देऊ शकेल असं, आपला कल जिथे आहे तिथे नेणारं अनुरूप करिअर काहींना लगेच सापडतं, तर काही जणांना बऱ्याच स्थित्यंतरांतून जावं लागतं.

environment, elections, nations,
चारशे कोटी विसरभोळे?
The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
Rejuvenation of water bodies Uran
वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी पाणवठे पुनर्जीवित

सामाजिक विकासाच्या व्यापक क्षेत्रात आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार अनेक जण शिरकाव करतात. कु णी व्यावसायिक समाजकार्याविषयी पदवी वा पदव्युत्तर शिक्षण घेऊन सुरुवात करतं, तर कु णी व्यवस्थापन किंवा कला-वाणिज्य-विज्ञान शाखेतील अभ्यासक्रम  सोडून इतर कोणत्या विषयांत अभ्यास पूर्ण करून सामाजिक क्षेत्रात उतरतं. डेहराडूनच्या प्रशांत आनंद यांना अशाच शिक्षणाबरोबर काही स्थित्यंतरांना सामोरं जावं लागलं. अंतरीच्या हाकेला जागून त्यांनी समाजकार्याच्या क्षेत्रात वंचितांचं राहाणीमान उंचावेल, त्यांचं जगणं समृद्ध होईल, यासाठी वेळ, श्रम व कौशल्यांची गुंतवणूक केली. यातून जे साध्य झालं, ते खूपच आश्वासक आणि उभारी  देणारं आहे.

डेहराडूनमध्ये बारावीपर्यंत शिक्षण घेऊन आपल्या परिवाराच्या मार्गदर्शनानं प्रशांत यांनी कोलकाताच्या विश्वभारती विद्यापीठातून २००५ मध्ये ‘बी.टेक.’ची (अभियांत्रिकी) पदवी घेतली. बी.टेक.च्या शेवटच्या वर्षांला असताना दिल्लीतील ‘आयबीएम’ या माहिती तंत्रज्ञान कंपनीत त्यांची नोकरीसाठी निवड झाली. सुमारे दोन वर्ष तिथे काम के ल्यावर प्रशांत यांना ‘सनलाइफ इन्श्युरन्स’ या अजून एका मोठय़ा कंपनीत काम करण्याची संधी मिळाली. या कंपनीत ५ वर्ष काम करत असताना समाजात अवतीभोवती घडणाऱ्या गोष्टींशी जोडून घेणं त्यांना जरुरीचं वाटलं. दिल्लीतील सिलामपूर व वाल्मिकी वस्ती झोपडपट्टीत दोन समुदायांबरोबर फावल्या वेळेत काम करताना तिथली मुलं आणि स्त्रियांना भेडसावणारी दैनंदिन जीवनातली आव्हानं त्यांना उमजू लागली. प्रस्थापित रूढी-परंपरांमार्फत त्यांचं व्यवस्थेकडून कसं शोषण होतं ते समजू लागलं. याबद्दल आणि आपल्या बालपणी प्रशांत यांना आलेल्या पितृसत्तेच्या धारणा, जातीव्यवस्था व आर्थिक दमनाच्या अनुभवांबद्दल ते चिंतन करू लागले. उबदार कार्यालयात बसून काम करताना भोवतालच्या या वास्तवानं एक प्रकारची अस्वस्थता त्यांना जाणवू लागली. एखाद्या दुकानात, शाळेत किंवा रुग्णालयात गेलं असता मुली व स्त्रियांना येणाऱ्या कटू अनुभवांनी त्यांच्या जाणिवा अधिक प्रखर होऊ लागल्या. एक व्यक्ती खरंच प्राप्त परिस्थितीत बदल घडवू शकते का? आणि तो बदल काय असू शकतो?, यावर ते अवलोकन करू लागले. काही वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांचं निधन झालं होतं. अंतर्मनात चाललेल्या मंथनाविषयी ते आपल्या आई व दोन बहिणींशी बोलले. वंचित मुलं आणि समुदायांबरोबर काम करण्याविषयी त्यांचे विचार व संभाव्य आव्हानं यासंबंधीही संवाद केला. त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातून समाजकार्याचं २ वर्षांचं पदव्युत्तर शिक्षण घेतलं.

२०१७ मध्ये एक पाठय़वृत्ती मिळाल्यामुळे आसाममधील ‘मिसिंग’ जमातींबरोबर काम करत असताना, त्यांची संस्कृती, राहाणीमान समजून घेताना, शासकीय व स्वयंसेवी संस्थांकडून या समुदायांच्या प्रश्नांना मिळणाऱ्या प्रतिसादामधून प्रशांत यांना खूप शिकायला मिळालं. आपल्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारण्यासाठी त्यांनी २०१८ मध्ये थेट हिमालयात भ्रमण करायला सुरुवात केली. कॉर्बेट व राजाजी राष्ट्रीय अभयारण्याजवळ, विकासाच्या परिघाबाहेर दूरवर असलेल्या ‘वनगुज्जर’ भटक्या जमाती व ‘टौनग्या’ या जंगलांमधील समुदायांचं जगणं प्रशांतना जवळून पाहाता आलं. देशातील विविध भागांत विखुरलेल्या टौनग्या वा तुंग्या समुदायातील लोकांना ब्रिटिशांनी स्वत:च्या फायद्यासाठी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला उत्तराखंडच्या वरील भागात वसाहत करण्यासाठी बोलावलं. जंगलातील लाकडं तोडण्यापासून इतर वेठबिगारीची कामं करण्यासाठी त्यांचा पद्धतशीर वापर करून त्यांना मूलभूत गोष्टींपासून वंचित ठेवलं गेलं. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही  त्यांची परिस्थिती तशीच असल्याचं प्रशांत यांनी अनुभवलं. साक्षरता व संख्याज्ञानाच्या अभावामुळे महामार्गावर दिसणारे, बसवरचे फलकही वाचू न शकणाऱ्या, दूध उत्पादनाची नेमकी निर्मिती किती लिटर आहे ते न समजल्यामुळे आर्थिक व्यवहार नीट न जमलेल्या वनगुज्जर समुदायाची पीछेहाट कशी  होत आहे, ते प्रशांत यांना समजलं. प्रत्यक्ष त्यांचं जगणं पाहून, त्यावर  संशोधन, मनन करून, प्रशांत यांनी या समुदायांसाठी दीर्घकाळ काम करण्याचं पक्कं केलं. त्यांच्यासह समाजकार्याचं शिक्षण घेणाऱ्या तान्या खेरा या मैत्रिणीबरोबर त्यांनी ‘समानता फाउंडेशन’ची जुलै २०१८ मध्ये स्थापना केली. या वंचित समुदायांमध्ये मूलभूत शिक्षण, आरोग्य व अन्य संसाधनं पोहोचवणं, त्यांना ते परवडू शकेल यासाठी त्यांच्या क्षमता विकसित करणं, या बाबींना प्राधान्य देऊन त्यांनी कामाला सुरुवात केली.

६ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांना शिक्षणाची गोडी वाटावी म्हणून त्यांची ‘गोजरी’ ही बोलीभाषा समजून त्यांच्या भाषेत संवाद करण्यासाठी स्थानिक युवकांना प्रशिक्षित करून त्यांना पाठय़वृत्ती देण्यात आली. हे युवक जंगल, प्राणी व इतर  स्थानिक बाबींचा संदर्भ देऊन कथाकथन करू लागले. साक्षरतेचं प्रमाण कमी असल्यामुळे अधिकाधिक चित्रं असलेली पुस्तकं, वर्कशीट्सची निर्मिती प्रशांत यांच्या चमूनं केली. मुलांच्या भाषेत संवाद करण्याबरोबरच हिंदी, इंग्रजीचंही ज्ञान व्हावं म्हणून या शैक्षणिक साधनांमध्ये काही मजकूर हिंदी-इंग्रजीमध्ये समाविष्ट करण्यात आला. ‘स्वास्थ्य की वर्णमाला’, ‘एबीसीडी ऑफ हेल्थ’, यांसारख्या समुदायांची संस्कृती, परंपरा, यांचे संदर्भ घेऊन तयार केलेल्या साहित्यामुळे प्रशांत यांना त्यांचा विश्वास लवकर संपादन करता आला. ४० पुस्तकं सहज मावू शकतील अशा वॉटरप्रूफ बॅगा तयार करून खांद्यावर घेत फिरती वाचनालयं कार्यरत केल्यानं मुलांसाठी अभ्यास रंजक होऊन त्यांचा आत्मविश्वास दृढ होण्यास हातभार लागला. गेल्या तीन वर्षांत १५ स्थानिक युवक-युवतींना पाठय़वृत्ती देऊन, त्यांच्यात नेतृत्वगुण विकसित करून, त्यांच्यामार्फत सुमारे ५४० मुलांपर्यंत पोहोचण्यात व त्यांना प्राथमिक शिक्षण देण्यात ‘समानता फाउंडेशन’ला यश मिळालं आहे. करोनाच्या काळात सोप्या भाषेत विषाणू, टाळेबंदी, महासाथ यांसारख्या शब्दांमागील संकल्पना समजावून, असलेल्या परिस्थितीत कसं सक्षम व्हायला हवं यासाठी मार्गदर्शक  पुस्तिका, भित्तीचित्रं, यूटय़ूबवरील लघुपट यांद्वारे समुदायांमध्ये प्रबोधन केलं जात आहे. शिकण्याच्या पायऱ्या निश्चित करून सक्षम मुलांना शासनानं सुरू केलेल्या वन विद्यालयांमध्ये प्रवेश मिळण्यासाठी संस्था दरवर्षी प्रयत्न करत आली आहे.

लहान मुलांबरोबरच किशोरवयीन मुली, स्त्रियांचे गट तयार करून त्यांना कृतीशील बनवण्यासाठी प्रशांत व त्यांचे साथी विशेष लक्ष घालत आहेत. मासिक पाळी, सामुदायिक आरोग्य व इतर मुद्दय़ांवर त्यांच्याशी संवाद करून, तुलनेनं कमी प्रमाणात असलेल्या- पण तरीही प्रचलित अशा पुरुषसत्ताक, पारंपरिक कार्यपद्धतींवर (जसं की- वस्तीच्या सभांमध्ये स्त्रियांचा सहभाग नगण्य असणं) प्रश्न उपस्थित के ले जात आहेत.  कुटुंबांच्या अन्नसुरक्षेचा प्रश्न निकाली लागावा व कुपोषणमुक्तीस हातभार लागावा म्हणून प्रशांत यांनी स्त्रियांबरोबर पोषण-परसबाग यांसारखे प्रयोग केले. पारंपरिक हस्तकला व कौशल्यं समुदायातील स्त्रियांना देण्यासाठी ते सध्या प्रयत्नशील आहेत. सध्या वनगुज्जर व टौनग्या समुदायांतील १४ गटांमधील २५० मुली व स्त्रियांबरोबर काम चालू आहे. पुरुषांबरोबरही स्त्री-पुरुष समता, पुरुषत्व, या मुद्दय़ांवर दीर्घ काम करण्याचा प्रशांत यांचा मानस आहे. त्यासाठी अर्थसहाय्य मिळवण्यासाठी त्यांचा प्रयास चालू आहे.

छानछोकीचं शहरी आयुष्य, जगणं सोडून साधेपणानं, तरीही समाधानानं प्रशांत वन्य- समुदायांबरोबर जगत आहेत. पिढय़ान्पिढय़ा वंचित राहिलेल्या समूहांना कमी न लेखता त्यांची संस्कृती, जगण्याच्या पद्धती नीट समजून, टप्प्याटप्प्यानं त्यांच्याबरोबर दीर्घकाळ काम केलं तर तेही परिवर्तनाच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, हे ३७ वर्षांच्या ध्येयवादी प्रशांत व त्यांच्या चमूनं दाखवून दिलं आहे. समानशील समाजासाठी त्यांच्या भावी प्रयत्नांना सदिच्छा!

प्रशांत आनंद saharsh267@gmail.com