‘‘आईने मला सेंट कोलंबा या इंग्रजी नावाच्या, पण मराठी माध्यमाच्या शाळेत माँटेसरीत भरती केलं. ‘जॅक अ‍ॅण्ड जिल’, ‘लंडन ब्रिज इज फॉलिंग डाऊन’ अशा नर्सरी ऱ्हाइम्सऐवजी ‘ढुमढुमढुमाक’सारखी बडबडगीतं ऐकत, काऊचिऊच्या गोष्टी ऐकत मी मोठी होऊ लागले. या शाळेत पहिल्या इयत्तेपासून इंग्रजी भाषेची ओळख करून दिली जात असल्याने मी उत्तम द्विभाषिका होईन, याबद्दल आईला खात्री होती. पण झालं ते उलटंच.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठी भाषेशी माझं नातं लहानपणापासूनच गुंतागुंतीचं आहे. ते तसं असण्याचं मूळ माझ्या अगणित स्वभावदोषांत लपलं आहे, असं मी एक वेळ (नाइलाजाने) मान्य करीन. तरीही माझ्या नियंत्रणाबाहेर असलेल्या कित्येक गोष्टीदेखील या गुंतागुंतीला नक्कीच कारणीभूत आहेत, यात शंका नाही. उदाहरणार्थ माझ्या कुटुंबाची पाश्र्वभूमी, सभोवतालचं वातावरण, झालंच तर सांस्कृतिक, राजकीय घडामोडी इत्यादी, इत्यादी..

माझा जन्म झाला तो कारवारी, चित्रापूर सारस्वत (नुसतंच सारस्वत), कोकणी, आमची गेली, झालंच तर भानप (या शब्दाचा अर्थ अजून मला चकवतोय!) अशा अनेक वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या पण या लांबलचक नामयादीच्या मानाने अत्यंत अल्पलोकसंख्या असलेल्या समाजात. जन्मस्थान आईचं माहेर जिथे होतं, ते कर्नाटकातलं धारवाड गाव. वडील वाढले कर्नाटकच्याच गोकर्णजवळ. त्यामुळे दोन्ही बाजूंनी पिढय़ान् पिढय़ा मराठीच्या नावाने बोंब. घरी फक्त कोकणी बोलली गेली. तीही मालवणी, गोव्याची किंवा गौड सारस्वतांची नाही हं, तर प्युअर आमची गेली, पुलंच्या बटाटय़ाच्या चाळीतले हट्टंगडी बोलायचे ती कोकणी आणि बाहेरच्या जगात व्यवहाराची भाषा केवळ इंग्रजी. नाही म्हणायला काही र्वष मुंबईच्या शाळेत शिकून पुढे उच्च शिक्षणासाठी पुण्यात स्थायिक झालेल्या मामांना तशी बऱ्यापैकी मराठी येत होती. रोज घरी ‘सकाळ’ही येत असे. त्यांच्याकडे बालसाहित्यापासून ते विद्वत्तापूर्ण ग्रंथांपर्यंत अनेक तऱ्हेची पुस्तकं असली तरी ती सर्व होती इंग्रजीत. मराठी कथा, कादंबऱ्यांची पुस्तकं मी कधी पाहिली नाहीत. मुंबईला घरी आई-वडील दोघांचं इंग्लिश उत्तम. वडिलांना, काकांना मराठीचा गंध नाही. टाइम्स सोडून घरात दुसरं वर्तमानपत्र कधी आलं नाही. आता सर्वसाधारणपणे, अशा पाश्र्वभूमीवर आई-बापांनी मुलांना जवळपासच्या एखाद्या इंग्रजी शाळेत दाखल करून त्यांचं व आपलं आयुष्य सुकर होईल, अशी काळजी घ्यावी की नाही? पण माझी आई सर्वसाधारण नव्हतीच. त्यामुळे तिने तात्कालिक सोयीचा विचार करण्याऐवजी माझ्या भविष्याचाच विचार केला. वडील पोर्ट ट्रस्टमध्ये नोकरी करत असल्यामुळे मुंबईतच मुलगी लहानाची मोठी होणार, तेव्हा तिचा स्थानिक लोकांशी, त्यांच्या भाषेशी, संस्कृतीशी दुवा जोडणं अतिशय महत्त्वाचं आहे, निव्वळ इंग्रजी शाळेत शिकल्यास हे शक्य नाही, असं तिचं ठाम मत होतं. त्यामुळे तिने मला १९५० मध्ये घराच्या पलीकडेच असलेल्या सेंट कोलंबा या इंग्रजी नावाच्या पण मराठी माध्यमाच्या शाळेत माँटेसरीत भरती केलं. ‘जॅक अ‍ॅण्ड जिल’, ‘लंडन ब्रिज इज फॉलिंग डाऊन’ अशा नर्सरी ऱ्हाइम्सऐवजी ‘ढुमढुमढुमाक’सारखी बडबडगीतं ऐकत, काऊचिऊच्या गोष्टी ऐकत मी मोठी होऊ लागले. या शाळेत पहिल्या इयत्तेपासून मुलींना इंग्रजी भाषेची ओळख करून दिली जात असल्याने मी उत्तम द्विभाषिका होईन, याबद्दल आईला खात्री होती. पण झालं ते उलटंच.

इंग्रजांना पळवून लावल्याच्या अत्यानंदात दुसऱ्या टोकाला जाऊन आदरणीय शिक्षणमंत्री बाळासाहेब खेरांनी सरकारी मदतीने चालणाऱ्या सेंट कोलंबासारख्या शाळेतून इंग्रजी भाषेलाच पळवून लावलं आणि आठवी इयत्तेपासून एबीसीडी शिकवण्याबाबत नियम लागू केला. अर्थात आठ-नऊ  वर्षांची होईपर्यंत भाषिक रस्सीखेचीचा मला त्रास झाला नाही. बालवर्गातच लागलेलं वाचनाचं वेड प्रचंड वेगाने वाढत होतं. त्या वेळी खास मुलांसाठी असलेली झाडून सगळी स्वतंत्र, अनुवादित, मराठी पुस्तकं मी अधाशासारखी वाचून काढली. सानेगुरुजी, भा. रा. भागवत, चिं. वि. जोशी इत्यादींची पारायणं केली. चौपाटीवरच्या बालभवन या मुलांच्या लायब्ररीतलं एकही पुस्तक सोडलं नाही. एकदा सुट्टीत पुण्याला गेले असताना वाचायला कुठलंही पुस्तक न मिळाल्यामुळे शेवटी ‘सकाळ’ उचलून, पहिल्या पानावरच्या मथळ्यापासून शेवटच्या पानावरल्या मुद्रण छपाईच्या तपशिलापर्यंत सबंध वर्तमानपत्र मी (एकही शब्द कळला नाही तरी) पालथं घातल्याची कथा मामा नेहमी सांगत. मोठय़ांची मराठी पुस्तकं वाचायला परवानगी नाही आणि इंग्लिश ओ का ठो येत नाही त्यामुळे वरच्यासारखं विथड्रॉवल सिम्प्टम्स् वारंवार दिसायला लागले. मला वाटतं, याच सुमारास मला इंग्लिशबद्दल प्रचंड आकर्षण वाटायला लागलं आणि माझं मराठीबरोबरचं ‘लव-हेट रिलेशनशिप’ सुरू झालं.

सुरुवातीला इंग्रजी भाषेएवजी, इंग्लिश शाळेत जाणाऱ्या मुलामुलींचा स्मार्टनेस- ज्यालाच मी हुशारी समजायचे- मला आकर्षित करी आणि त्रासही देई. त्यांच्या गणवेशावर तर मी फारच जळायचे. मराठी शाळेत पाठवून आईने माझ्यावर फार मोठा अन्याय केला, असं वाटून टिपं गाळल्याचं मला अजून आठवतं. खेरांच्या निर्णयामुळे बिचाऱ्या आईलाही वाईट वाटत होतं. रोज संध्याकाळी दोघींनी फिरायला जायचं आणि फिरताना फक्त इंग्लिशमध्ये बोलायचं असा नवा प्रकार तिने सुरू केला आणि गंमत म्हणजे ही भाषा बोलण्याची प्रचंड मनीषा बाळगूनही आईने ‘कम लेट्स गो’ म्हटलं की माझ्या पोटात गोळा! पुढे पालकांच्या प्रयत्नांनी आठवीपासून आमचं माध्यम इंग्रजी झालं. तरी इंग्लिश शाळेतल्या मुली शेक्सपियर वाचत असताना आपण संक्षिप्त चार्ल्स डिकन्सच वाचतोय, हा विचार नक्कीच सुखद नव्हता.

शाळेत असतानाच भाषेच्या राजकारणाची अंधूक जाणीव मला व्हायला लागली. पहिली गोष्ट जाणवली की आपल्या भाषेला लिपीच नाही. आजोबा कोकणी पत्र कानडी लिपीत लिहितात, वडील रोमनमध्ये, आई व मी देवनागरीत. कोकणी भाषेला स्वत:ची लिपी नाही म्हणजे तिचा दर्जा मराठीपेक्षा कमी आहे आणि याचा अर्थ आपण मराठी मुलींपेक्षा (निबंधात अधिक मार्क मिळवले तरी) कमी दर्जाच्या आहोत, अशी भावनिक समीकरणं मांडून न्यूनगंड ओढवून घेत, मी अधूनमधून भारी दु:खी होत असे. आजकाल मोबाइलवर लोक रोमनमध्ये मराठी मेसेज पाठवतात, तेव्हा हे आठवून हसू येतं.

वर्गातल्या ५० मुलींत घरी वेगळी भाषा बोलणाऱ्या आम्ही फक्त दोघी-तिघीच होतो. घरी गेल्यावर आमचं भाषाविश्व बदलायचं. मराठीपासून तुटायचं, बाकीच्या मुलींचं मात्र ते विश्व अबाधित राहायचं. मराठी भाषेवर माझं प्रेम असलं तरी माझ्यापुरती ती पुस्तकातली भाषा होती. माझ्या रोजच्या जगण्याशी त्या भाषेचा, तिच्यातल्या वाक्यांचा, शब्दांचा संबंध नव्हता. ज्या शब्दात मी सहजपणे आनंद, दु:ख व्यक्त करत असे, हट्ट किंवा भांडणं करत असे, ते शब्द मराठी नव्हते. हे जाणवलं तेव्हा वाटलं आपण मैत्रिणींपेक्षा वेगळ्या आहोत, कदाचित त्यांच्या दृष्टीने परक्या असू आणि हेही की शेवटी परक्या भाषेतच शिकायचं तर इंग्लिशमध्ये का नाही?

शाळकरी जीवन संपेस्तोवर टेबल टेनिसच्या निमित्ताने निरनिराळ्या जातीधर्माच्या माणसांशी मैत्री झाली. त्यांच्याशी संवाद साधायचा तर घाबरत, अडखळत का होईना इंग्लिश बोलण्याला पर्याय नव्हता. माझं अनुभवविश्व सर्व बाजूंनी विस्तारायचा मला ध्यास लागला. बोहरा, पारसी, कॅथलिक मुली सख्ख्या मैत्रिणी झाल्या. फरोख, माल्कम नावाची मुलं मानलेले भाऊ! इंग्रजी साहित्य वाचण्याचा सपाटाच सुरू केला (जो आजवर चालूच आहे) आणि मी मराठी भाषेकडे, माणसांकडे हट्टाने पाठ फिरवली. पण विरोधाभास असा की अखेर मराठी मुलाच्या प्रेमात पडले आणि मराठीविषयीची अढी या प्रेमगंगेत वाहून गेली.

मराठी प्रायोगिक नाटकांच्या निमित्ताने मराठीतले अनेक थोर नाटककार, लेखक, कवी यांच्या संपर्कात आले. या भाषेची श्रीमंती पाहून डोळे दिपायला लागले. परभाषिक मित्रमैत्रिणींमध्ये, अति जोशात मराठी साहित्याचा प्रचार करू लागले आणि नेमका पुन्हा राजकारण्यांनी घोळ घातला. राजकीय लाभापोटी मराठीचं अपहरण केलं, तिचं सक्तीच्या भाषेत परिवर्तन करण्याचा चंग बांधला आणि बिगरमराठी माणसांच्या मनात मराठी भाषेविषयी प्रेम निर्माण करण्याच्या माझ्या प्रयत्नावर पाणी पडलं. मराठी माणूस आणि इतर यातली दरी वाढत गेली. कोकणीतदेखील बॉम्बेला पूर्वीपासून मुंबईच म्हणायचे, असं मी एकदा इतरांसमोर म्हटलं तेव्हा ‘ही राजकारणात शिरली की काय?’ असं प्रश्नचिन्ह त्यांच्या चेहऱ्यावर उमटलं.

आज जागतिकीकरणाचा, मोबाइल अ‍ॅप्सचा जमाना चालू आहे. नवनवी सॉफ्टवेअर्स आपापल्या भाषांसहित उगवत आहेत. अख्ख्या जगात तत्काळ लोकप्रिय होणाऱ्या या इन्स्टंट भाषांच्या चढाईपुढे टिकाव धरण्याच्या धडपडीत, पारंपरिक भाषांमधली समीकरणेही नव्याने मांडली जात आहेत. सर्व भाषांकडे समान दुर्लक्ष होत असल्याने त्यामध्ये समानता निर्माण झाली आहे. खरं तर माझी भाषा श्रेष्ठ की तुझी, अशा रोजच्या व्यवहाराशी संबंध नसलेल्या गोष्टींचा विचार करण्यासाठी २४ गुणिले ७ धावणाऱ्या माणसांना वेळ तरी कुठेय? या नव्या वातावरणात जगताना, वावरताना मीदेखील वर्षांनुवर्षे मला सतावणाऱ्या भाषेसंबंधीच्या भावनिक गुंतागुंतीला बाजूला सारलंय. इंग्रजी व मराठी अशा दोन्ही भाषा मी आता आपल्याच मानते. दोन्ही भाषा चिकार वाचते, बोलते. अजूनही जुन्या सवयीनुसार मधूनच डोकावणाऱ्या न्यूनगंडाकडे दुर्लक्ष करत बिनधास्तपणे लिहितेही. झालंच तर अन्य भाषिक स्नेह्य़ांबरोबर गप्पा मारताना, जीएंच्या कथा,

आरती प्रभू -ढसाळांच्या कविता वाचता न आल्यामुळे त्यांच्या आयुष्यात कशी उणीव राहिली आहे, हे सांगितल्यावाचून मला राहवत नाही आणि मराठीचा हट्ट धरून माझ्या आयुष्यातील ही उणीव दूर केल्याबद्दल आईचे आभार मानल्यावाचूनही..

पण परदेशी स्थायिक झालेल्या माझ्या मुलीशी मात्र मी नेहमी फक्त तिच्या-माझ्या मायबोली कोकणीतूनच बोलते!

चित्रा पालेकर  chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व लगोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chitra palekar article on language
First published on: 21-01-2017 at 01:54 IST