‘कॉफी हाऊस’ला येणाऱ्या मंडळींचं अत्यंत महत्त्वाचं वैशिष्टय़ म्हणजे त्यांच्यातलं ‘सहकार्य’!  त्यामुळे सर्वाच्या आपापल्या संस्था असूनही आमच्यात कंपूशाही नव्हती. ज्या जागेत सर्वप्रथम ‘मी विरुद्ध इतर’ ही भावना नाहीशी होऊन नाटय़सृष्टीतल्या परस्पर- सहकार्याची प्रथा सुरू झाली; ज्या जागेने मराठी प्रायोगिक रंगभूमीच्या बहरण्याला खूप मोठा हातभार लावला, त्या ‘निओ कॉफी हाऊस’ची नाटय़-इतिहासात कुठे दखल घेतली गेली नाही.

विद्यार्थीदशा संपवून नोकरी सुरू केली त्या सुमारास मी हुतात्मा चौकाजवळच्या ‘निओ कॉफी हाऊस’मध्ये जायला लागले. ते केवळ माझंच नाही तर वकील, शेर-बाजारातले दलाल, साहित्यिक, प्रायोगिक नाटकवाले अशा निरनिराळ्या प्रकारच्या माणसांचं आवडतं ठिकाण होतं. सर्वासाठी त्या जागेची प्रमुख आकर्षण होती तिथली शुद्ध कॉफी आणि (कॉफीप्रेमींनीच निर्माण केलेली) ‘कॉफी हाऊस संस्कृती’!

Former Zimbabwean cricketer Guy Whittle
Guy Whittall : धक्कादायक! माजी क्रिकेटरवर बिबट्याचा जीवघेणा हल्ला, कुत्र्याने वाचवला जीव, रक्ताने माखलेला फोटो व्हायरल
Senior police inspector Daya Nayak and Salman Khan
सलमान खानच्या घराजवळ गोळीबाराचं प्रकरण, एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक करणार तपास
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची अखेरची धडपड
a young man broke traffic rules while making reels
VIDEO : रील बनवण्याच्या नादात पठ्ठ्याने तोडले वाहतूक नियम, दिल्ली पोलिसांनी घडवली चांगलीच अद्दल

या संस्कृतीचा गुणविशेष म्हणजे लोक तिथे एक कप कॉफीच्या जोरावर कितीही वेळ, अगदी तासन्ताससुद्धा बसून कुठल्याही विषयावर मुक्तपणे (अशोक शहाणेंच्या शब्दात अद्वातद्वा) बोलू शकत! टेबलावर मूठ आपटत मोठमोठय़ाने वाद घातले तरी व्यवस्थापक आवाज कमी करायला किंवा उठून जायला सांगत नसत. वाद घालणारी माणसं एकमेकांच्या ओळखीची असण्याची मुळीच गरज नसे. एखाद्या गोष्टीविषयी दोन व्यक्तींनी दोन टोकांची मतं मांडायचा अवकाश की बाजूच्या टेबलावरची माणसं (वादाचा मुद्दा न समजताही) आपल्या खास मतासह वादात उडी घेऊन त्यात रंग भरणार, हे ठरलेलं! सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, वाद कितीही रंगला, आवाज कितीही वर चढले तरी प्रकरण कधी मारामारीपर्यंत जायचं नाही. बौद्धिक व अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर आधारलेल्या ‘कॉफी हाऊस संस्कृती’त हिंसा वा गुंडगिरीला मुळीच थारा नव्हता. आम्ही नाटकवाल्यांनी या संस्कृतीचा अगदी पुरेपूर फायदा घेतला!

कॉफी हाऊसमध्ये नियमित येणाऱ्या नाटकवाल्यांपैकी बहुतेकजण – अमोल, दिलीप कोल्हटकर, जयराम हर्डीकर, दिलीप कुलकर्णी, विजय शिर्के इत्यादी – जवळपासच्याच निरनिराळ्या बँकांत नोकरीला असल्यामुळे दिवसभराचं काम संपल्यावर श्रमपरिहारासाठी तिथे यायचे. बाजूच्या ‘स्टेट बँके’तून तर प्रभाकर पाटणकर, अच्युत देशिंगकर, दिलीप खांडेकर, मनोहर तावडे अशी मोठी पलटणच येत असे. त्यात क्वचित आशा दंडवतेही असायची. शिवाय इतरत्र काम करणारे अशोक साठे, अच्युत वझे, मंगेश कुलकर्णी आणि मीदेखील तिथे हजेरी लावत असू. वास्तविक माझ्या कामाची जागा बॅलार्ड पियरला व घर गावदेवीला असल्यामुळे ‘कॉफी हाऊस’ घरच्या वाटेवर नसून चक्क उलटय़ा दिशेला होतं. पण तिथे निदान एक चक्क र मारल्याशिवाय मला राहवत नसे. वर उल्लेख केलेले रंगकर्मी हे माझे नाटय़क्षेत्रातले कुटुंबीयच होते. यातल्या प्रत्येकाचं मी काम केलेल्या प्रायोगिक नाटकांशी नातं होतं.. कधी सहकलाकार, कधी दिग्दर्शक तर कधी नाटककार म्हणून! यांपैकी शिर्के, दिलीप व मंगेश हे कुलकर्णी बंधू, मनोहर (मन्या) हे पुढे माझे, अमोलचे जिवलग मित्र झाले; आमच्या ‘अनिकेत’ या नाटय़-संस्थेचा महत्त्वाचा भाग बनले. दिलीप व शिर्केचं तर आमच्या सर्व चित्रपटांतदेखील अतिशय मोलाचं योगदान होतं.

‘कॉफी हाऊस’मध्ये येणाऱ्या आम्हा सर्वाचा मुख्य उद्देश घरी किंवा तालमीला जाण्यापूर्वी थोडा वेळ मजेत घालवणं हा असल्यामुळे टिवल्याबावल्या करणं, एकमेकांच्या फिरक्या घेणं हे सतत चालू असायचं. ते वातावरण इतकं गमतीशीर असायचं की नुकताच व्यावसायिक झालेला विक्रम गोखलेही वेळात वेळ काढून त्यात सहभागी व्हायचा आणि ‘थिएटर युनिटच्या’ नाटकात गुंतलेला अमोल तिथे भोज्जा करूनच पुढे ‘वालचंद टेरेस’ला तालमींसाठी जायचा! एनसीपीएतल्या कार्यक्रमांचा संयोजक वृंदावन दंडवतेदेखील अनेकदा येई व पत्नी आशाने खेचून नेईपर्यंत विनोद सांगण्याचा सपाटाच लावी. या सर्वाचा शिरोमणी होता, मंगेश! हुशारी, विनोदबुद्धी व जीभ तिन्ही अत्यंत तीक्ष्ण असलेला! वृंद्या व मंगेश समोरासमोर आले की वात्रटपणाला नुसता ऊत येई. कोणी गरीब शब्दकोटी केल्यास आम्ही गंभीरपणे ‘‘वाहवा, वाहवा’’ म्हणत माना डोलवायचो. कोणी केविलवाणा विनोद सांगितला की सगळे गुडघा चोळत ‘‘ओय ओय’’ असं कोरसमध्ये ओरडायचो! (अर्थात, तिथे ऐकलेले बहुतेक विनोद, मग ते गुडघी (पीजे) असोत वा नसोत, माझ्या डोक्यावरूनच जायचे!) पण तिथे असताना मला कॉलेजच्या वातावरणात पुन्हा गेल्यासारखंच वाटे.

पण आमच्या या अड्डय़ात केवळ थट्टामस्करी वा थिल्लर गप्पा नव्हत्या. मौजमस्ती करता करताच आम्ही एखाद्या नवीन संहितेचं किंवा प्रयोगाचं विच्छेदन करत होतो; नवेनवे प्रयोग करण्याचे बेत आखत होतो. ‘कुणीही, कितीही वेळ, कुठल्याही विषयावर वाद घालत बसावं’ या ‘कॉफी हाऊस’ संस्कृतीने, आम्हा तरुण नाटकवाल्यांसाठी विचारांची, कल्पनांची मुक्तपणे देवाण-घेवाण करता येईल अशा जागेची सोय केली. ‘छबिलदास’ किंवा ‘पृथ्वी थिएटर’च्या खूप आधी! या सोयीमुळे, भर रहदारीच्या रस्त्यावर असलेल्या त्या साध्यासुध्या उपाहारगृहात कित्येक नाटय़प्रकल्पांची बीजं रोवली गेली. कित्येकांच्या सर्जनशीलतेला खतपाणी मिळालं. त्यातल्या अधिकांश प्रकल्पांत मी त्यावेळी सहभागी होऊ  शकले, हे माझं सुदैव!

तिथे जमणाऱ्या अनौपचारिक गटातले वृंदावन दंडवते (‘राजाचा खेळ’, ‘बुट पॉलिश’), अच्युत वझे (‘षड्ज’, ‘चल रे भोपळ्या टुणुक टुणुक’) यांसारखे नाटककार केवळ नवीन विषय निवडण्यात समाधान मानण्याऐवजी, आशयाला अनुरूप भाषा, शैली, घाट यांचा नव्याने शोध घेत होते. अशा नव्या नाटकांचं आव्हान स्वीकारणारे अमोल पालेकर, दिलीप कोल्हटकर, अच्युत देशिंगकर यांसारखे तिथले दिग्दर्शक, नाटकाविषयींच्या परंपरागत कल्पना धुडकावत रंगमंचाचा अवकाश, नाटकांचं सादरीकरण यांच्या व्याख्याच बदलत होते. या कंपूत, वेगळ्या धाटणीच्या नाटकावर विश्वास असणारे, त्यांच्या निर्मितीत अथपासून इतिपर्यंतच्या प्रत्येक सर्जनशील प्रक्रियेत सहभागी होणारे अभिनेते होते. अभिनेत्री मात्र मीच तेवढी होते. (भक्ती बर्वे आम्हा सर्वाची मैत्रीण होती आणि तिनं ‘बुट पॉलिश’मध्ये कामही केलं, पण ती कॉफी हाऊसमध्ये नियमित येणाऱ्यांपैकी नव्हती.) शिवाय, विजय शिर्केसारखे उत्कृष्ट निर्मिती-संयोजक, अशोक साठेंसारखे दिग्दर्शक व प्रकाश-संयोजकही आमच्यात होते. आम्हा सर्वाचे अनुभव वेगवेगळे! काहींना विजयाबाई मेहतांचं मार्गदर्शन लाभलं होतं, तर काहींना दुबेंचं! कुणी पारंपरिक नाटकातून धडे गिरवून मग प्रायोगिक नाटकांकडे वळले होते, तर काहींचा पहिल्यापासूनच प्रायोगिकतेकडे ओढा होता.

‘कॉफी हाऊस’ला येणाऱ्या मंडळींचं आणखी एक (माझ्या मते, अत्यंत महत्त्वाचं) वैशिष्टय़ म्हणजे त्यांच्यातलं ‘सहकार्य’! तिथे खेळीमेळीच्या वातावरणात एकत्र वेळ घालवल्याने आमच्यात आत्मीयता निर्माण झाली होती. त्यामुळे सर्वाच्या आपापल्या संस्था असूनही आमच्यात कंपूशाही नव्हती.

सत्तरीच्या सुरुवातीला मराठी प्रायोगिक नाटय़सृष्टीच्या अग्रभागी असलेल्या  मुंबईच्या ‘रंगायन’मध्ये व पुण्यातल्या ‘पीडीए’मध्ये फाटाफूट होऊन (अनुक्रमे) ‘आविष्कार’ व ‘थिएटर अकॅडमी’ या संस्थांची स्थापना झाली. माझ्या आठवणीप्रमाणे, मूळ संस्था व नवी संस्था यामध्ये कडवी चढाओढ सुरू होऊन त्यातल्या ज्येष्ठ रंगकर्मीमध्ये त्यावेळी फार तणाव निर्माण झाले. अशा दूषित वातावरणात ‘कॉफी हाऊस’ला जमणारे मात्र एकमेकांशी अतिशय मैत्रीत सहकार्य करत होते.. स्वत:च्या संस्थेपलीकडे जाऊन इतर संस्थांच्या नाटय़निर्मितीत सर्वतोपरी साहाय्य करत होते.

आमची स्वत:ची ‘अनिकेत’ ही संस्था असूनही मी अच्युत वझेच्या ‘उन्मेष’ संस्थेसाठी दिलीप कोल्हटकरच्या दिग्दर्शनाखाली ‘षड्ज’मध्ये काम केलं. अच्युत देशिंगकरने ‘निनाद कला केंद्र’साठी बसवलेल्या ‘आजचा कार्यक्रम..’ या नाटकात दिलीप कुलकर्णी, अमोल, मी, दिलीप खांडेकर असे निरनिराळ्या संस्थांशी संलग्न असलेले कलाकार होते. ‘उन्मेष’च्या ‘चल रे भोपळ्या..’ नाटकाचा अमोल दिग्दर्शक होता. शिवाय, शिर्के व मन्याच्या ‘अमल थिएटर्स’ने केलेल्या ‘एक अंडे फुटले’ या नाटकाचं नेपथ्यही त्याचंच होतं. ‘अनिकेत’च्या ‘गोची’ नाटकात तर ‘कॉफी हाऊस’मधल्या अनेक मित्रांचा निरनिराळ्या प्रकारे सहभाग होता. त्या काळात बऱ्याचदा दोन संस्थांच्या नाटकांचे एका तिकिटातदेखील आम्ही प्रयोग केले. या सर्व निर्मितींनी मराठी प्रायोगिक नाटय़सृष्टीवर आपला ठसा उमटवला. इथल्या बहुतेक व्यक्तींची नाटकांच्या इतिहासात कुठे ना कुठे नोंद झाली. पण ज्या जागेत सर्वप्रथम ‘मी विरुद्ध इतर’ ही भावना नाहीशी होऊन नाटय़सृष्टीतल्या परस्पर- सहकार्याची प्रथा सुरू झाली; ज्या जागेने मराठी प्रायोगिक रंगभूमीच्या बहरण्याला खूप मोठा हातभार लावला, त्या ‘निओ कॉफी हाऊस’ची मात्र नाटय़-इतिहासात कुठे दखल घेतली गेली नाही.

१९७४ मध्ये ‘आविष्कार’ने सर्व प्रायोगिक संस्थांसाठी ‘छबिलदास नाटय़गृह’ उपलब्ध करून दिलं, जिथे नाटकवाल्यांचा नवा अड्डा स्थापन झाला. शिवाय हळूहळू प्रायोगिक रंगकर्मीसाठी व्यावसायिक नाटकं, चित्रपट, दूरदर्शन इत्यादींचे दरवाजे खुले झाले. आणि, ‘कॉफी हाऊस’ला तासन्तास घालवणाऱ्यांची संख्या घटायला लागली. ‘अनिकेत’च्या तालमींसाठी घराजवळच असलेल्या माझ्या ‘सेंट कोलंबा’ शाळेचा हॉल मिळवल्याने, माझ्या छोटय़ा लेकीचं संगोपन, प्राध्यापकी, तालमी, हे सर्व मला जमायला लागलं. पण त्याचबरोबर माझंही ‘निओ कॉफी हाऊस’ला जाणं खूप कमी झालं. एकदा गेले, तेव्हा एकही ओळखीचा चेहरा न दिसल्यानं खट्टू झाले, एकटी बसून कॉफी प्यायले नि परतले.

‘कॉफी हाऊस’ला जमणाऱ्या आमच्यातले जयराम हर्डीकर, दिलीप कुलकर्णी, दिलीप खांडेकर, प्रभाकर पाटणकर आज नाहीत. हयात असलेल्यांपैकी कोणी तिथे फिरकत नाही. पण तिथे आम्हाला जे मिळालं.. निखळ आनंद, दृढ एकात्मतेची भावना, नव्या नाटय़ाविष्कारांसाठी प्रेरणा.. ते आमच्या स्मृतीत अजून कायम आहे.

चित्रा पालेकर chaturang@expressindia.com