‘ययाती’बद्दल सांगता सांगता दुबे एकूण नाटय़कलेविषयी बोलायला लागले. अभिनय म्हणजे काय, नाटकात वाचा किती महत्त्वाची, हे सांगायला लागले. हातवारे करत अतिशय उत्कटतेने ते बोलत होते. मी (त्यातल्या कित्येक गोष्टी कळत नसतानाही) मंत्रमुग्ध होऊन त्यांच्या शब्दांची जादू अनुभवत होते.. आणि हळूहळू, अभिनय नुसता छंद न राहता नकळत माझ्या अस्तित्वाचा महत्त्वपूर्ण भाग बनत गेला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ती गोष्ट १९६७ मधली. मी चित्रा मुर्डेश्वर होते त्यावेळची. आदल्या वर्षी जागतिक सिनेमाशी ओळख झाली ते सोडल्यास, माझा त्यावेळी चित्रपटसृष्टीशी इतर कुठल्याही प्रकारचा संबंध नव्हता. नाटय़सृष्टीशी मात्र थोडा फार होता. अभिनयाची आवड बालपणापासूनच असल्याने मी काही नाटकांतून कामं केली होती, पण माझ्या लेखी अभिनय हा केवळ माझ्या अनेक छंदांपैकी एक छंद होता. १९६७ मध्ये, मला नाटक-चित्रपटापेक्षा वेगळ्याच गोष्टींचं महत्त्व अधिक वाटत असे. ‘सेंट झेवियर्स’ महाविद्यालयामध्ये, अर्थशास्त्र-संख्याशास्त्र असे विषय घेऊन मी बी.ए.च्या शेवटच्या वर्षांला होते. बी.ए. संपताच लग्न, त्यानंतर लगेच एम.ए., नि मग प्राध्यापकी करत संसार, अशी मध्यमवर्गीय सारस्वत मुलीला साजेशी उद्दिष्टं नजरेसमोर ठेवून वाटचाल करत होते. पण सहामाहीची परीक्षा तोंडावर आली असताना अचानक मला एक फोन आला आणि माझ्या आयुष्याने वेगळंच वळण घेतलं.

फोन सुलभा देशपांडेंची धाकटी बहीण आशा कामेरकरचा होता. मी राहात असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावर एका छोटय़ा हॉलमध्ये सुरेश खरेंच्या नाटकांच्या तालमी चालत. आशा तिथे तालमींना येत असल्यामुळे आमची ओळख होती. आशा म्हणाली, ‘‘सत्यदेव दुबेंनी आयएनटीसाठी ‘ययाती’ नावाचं कानडी नाटक हिंदीत बसवलंय. त्यात तू काम करशील का, असं त्यांनी विचारलंय. मूळ नाटक गिरीश कर्नाडांचं आहे.’’ नाटककाराचं नाव ऐकून मी भलतीच एक्साइट झाले. गिरीश कर्नाड माझ्याप्रमाणेच सारस्वत. शिवाय, आमच्या दोघांच्या कुटुंबांमध्ये जवळीक असल्याने मी लहान असल्यापासून त्याला ओळखत होते. तो माझा बालपणीचा हिरो होता म्हणा ना! त्याच्या नाटकात काम करायची संधी अशी आपणहून चालत यावी, हे मला खरंच वाटेना. आईवडीलही ही बातमी ऐकून खूश झाले. सत्यदेव दुबेंबद्दल मात्र मला ओ का ठो माहीत नव्हतं. गमतीची गोष्ट म्हणजे माझ्या आईनेच ती पुरवली. ‘काळा घोडा’जवळ असलेल्या आर्टिस्ट सेंटरमध्ये दुबेंचं ‘उच्चार व आवाजाची फेक’ या विषयावरचं व्याख्यान ऐकून ती फार प्रभावित झाली होती. दुबे अतिशय सर्जनशील व प्रयोगशील दिग्दर्शक असून, त्याच्या हाताखाली काम करायला मिळणं ही चित्रासाठी सुवर्णसंधी आहे, असं तिनंच वडिलांना पटवलं आणि मी ‘ययाती’त काम करण्यावर दोघांनीही शिक्कामोर्तब केलं.

शेवटचा पेपर उरकल्याबरोबर जवळजवळ धावत मी कँटीनकडे निघाले. परीक्षा संपली की ‘झेवियर्स’च्या कँटीनमध्ये भेट, असा निरोप दुबेंनी आशामार्फत पाठवला होता. एका थोर दिग्दर्शकाला पाहाण्यासाठी मी उत्सुक होते, त्याचबरोबर त्याच्या थोरवीचं दडपणही मनावर होतं. माझी सख्खी मैत्रीण नैमा मला मानसिक आधार देण्यासाठी सोबत आली. अर्थात तिचा खरा हेतू दुबेंची पारख करण्याचा  असावा. कँटीनच्या भल्यामोठय़ा लाकडी दरवाजामागून मी आत डोकावले. बाजूला एका टेबलावर कोकाकोला पीत, मेट्रोतला सिनेमा पाहावा की रीगलमधला, यावर वाद घालत असलेली काही मुलं सोडल्यास कँटीन रिकामं होतं. नाही म्हणायला लांब कोपऱ्यातल्या एका टेबलावर, अस्ताव्यस्त केस, चेहऱ्यावर दाढीचे खुंट, अंगावर चुरगळलेला जाळीजाळीचा टी-शर्ट अशा अवतारात एक इसम, अनेक दिवसांचा उपाशी असल्यासारखा बकाबका मटणचॉप खाताना दिसला. कँटीनमध्ये असलेल्या लोकांपैकी कुणीही थोर नाटय़दिग्दर्शकासारखं दिसत नव्हतं. दुबे खूप बिझी असणार, तेव्हा त्यांना उशीर होणं साहजिक आहे, असं म्हणत मी नैमाबरोबर कँटीनच्या बाहेर त्यांची वाट पाहात उभी राहिले. काही वेळाने मुलामुलींचा घोळका वाद घालत निघून गेला. कँटीनमध्ये सामसूम झाली, पटांगणातदेखील शांतता पसरली, तरी दुबेंचा पत्ताच नाही! मनात शंकाकुशंका डोकावू लागल्या. दुबेंना दुसरी अनुभवी अभिनेत्री मिळाल्याने मला भूमिका देण्याचा विचार त्यांनी बदलला तर नसेल? आदल्या वर्षी लालन सारंगबरोबर ‘सुंदर मी होणार’च्या हिंदी प्रयोगात बेबीराजेची भूमिका करून, हिंदी राज्य-नाटय़स्पर्धेत मी अभिनयाचं पारितोषिक मिळवलं होतं. पण दुबेंना ते माहीत नसेल ना!

नैमाने कुरकुर सुरू केली, तसा माझा धीर अधिकच खचला. सुदैवाने, दुबेदेखील ‘झेवियर्स’चा विद्यार्थी होता, असं काहीतरी आईनं म्हटल्याचं मला आठवलं आणि मी आत शेखसाहेबांकडे धाव घेतली. ते केवळ कँटीनचे मॅनेजर नव्हते, तर विद्यार्थ्यांचे सल्लागार आणि काळजीवाहकही होते. कँटीनमध्ये जेवत असलेल्या त्या माणसासारख्या माजी बेकार विद्यार्थ्यांना ते फुकट खायला देत. शेखसाहेबांकडे दुबेंची चौकशी केल्यावर त्यांनी शांतपणे कोपऱ्यातल्या ‘त्या’ माणसाकडे बोट दाखवलं. मला व नैमाला जबरदस्त धक्काच बसला. घरदार नसलेल्या भणंगासारखा दिसणारा हा माणूस दुबे होता? आईनं ज्याचं थोर दिग्दर्शक म्हणून भरभरून कौतुक केलं तो हा? आम्ही आ वासून त्याच्याकडे पाहात असतानाच तो इसम, सॉरी दुबे, आमच्या दिशेला वळले आणि आम्हाला जवळ येण्यासाठी त्यांनी खुणावलं. धक्क्यातनं बाहेर पडण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आम्ही दोघी त्यांच्यापाशी पोहोचलो आणि त्यांनी पुन्हा खुणेनेच दर्शवल्यावर खुच्र्या ओढून टेबलाभोवती कशाबशा बसलो. प्लेट बाजूला सारून समाधानाने ते सुस्कारले, ‘‘हम्मम, इट वॉज अ गुड लंच.’’ त्यावेळी संध्याकाळचे साडेपाच वाजले होते.

भेदक नजरेनं आमच्याकडे पाहात दुबेंनी अस्खलित इंग्रजीत स्वत:ची ओळख करून दिल्यावर आम्हा मुलींना आणखी एक धक्का! आमची नावं सांगताना मी तोंडातल्या तोंडात पुटपुटले. दुबेंनी लगेच मला दीर्घ श्वास घ्यायला लावून, स्पष्ट ऐकू येतील अशा पद्धतीत नाव पुन्हा सांगण्यास भाग पाडलं. त्याक्षणीच माझ्या नकळत माझे अभिनयाचे धडे सुरू झाले होते.

दुबेंनी ‘ययाती’ नाटकाबद्दल बोलायला सुरुवात केली. प्रथम राजा ययातीची पौराणिक कथा थोडक्यात सांगितली. मग गिरीश कर्नाडने त्या कथेतून आधुनिक विचार कसे मांडलेत, ते समजावलं. कथेत, शुक्राचार्याच्या शापामुळे सुखासक्त ययातीला ऐन उमेदीत वृद्धत्व प्राप्त होतं. उ:शाप मिळाल्यावर ययाती ते वृद्धत्व आपला मुलगा पुरू याला देऊन त्याचं तारुण्य स्वत: घेतो. नाटकात या प्रसंगी, पुरूची पत्नी चित्रलेखा पतीच्या तारुण्यावर तिचा हक्क असल्याचं जाहीर करून ययातीला जाब विचारते. पुरूच्या तारुण्याबरोबर स्वत:चाही स्वीकार करण्याचं सासऱ्याला आव्हान देते. अशा मनस्वी चित्रलेखेची भूमिका मला करायची आहे, हे ऐकून मी आनंदून गेले. (शिवाय, माझं पाळण्यातलं नाव चित्रलेखा असावं, हादेखील एक छान योगायोग होता!)

‘ययाती’बद्दल सांगता सांगता दुबे एकूण नाटय़कलेविषयी बोलायला लागले. अभिनय म्हणजे काय, नाटकात वाचा किती महत्त्वाची, हे सांगायला लागले. हातवारे करत अतिशय उत्कटतेने ते बोलत होते. मी (त्यातल्या कित्येक गोष्टी कळत नसतानाही) मंत्रमुग्ध होऊन त्यांच्या शब्दांची जादू अनुभवत होते.. आणि हळूहळू, अभिनय हा नुसता छंद न राहता नकळत माझ्या अस्तित्वाचा महत्त्वपूर्ण भाग बनत गेला.

‘‘दुबे, सात वाजले, कँटीन बंद करायचंय.’’ शेखसाहेबांचा आवाज कानावर पडला, तेव्हा कुठे मी भानावर आले. नाटकात मुळीच रस नसलेली  नैमादेखील गुंग झाली होती.

दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता, मला तालमीला नेण्यासाठी दुबे गावदेवीला आमच्या घरी आले. निदान आज तरी ते व्यवस्थित दाढी करून स्वच्छ कपडे करून येतील, अशी मी मनोमन आशा करत असतानाच बेल वाजली आणि रात्री कँटीनमध्ये झोपून थेट आल्यासारखे दिसणारे दुबे दरवाजात हजर! कसंबसं हसून मी त्यांचं स्वागत करणार एवढय़ात, माझ्या पलीकडे उभ्या असलेल्या आईकडे पाहात ‘‘हॅलो, मिसेस मुर्डेश्वर’’ असं उबदार आवाजात म्हणून त्यांनी एक आजन्म चाहती मिळवली. दुबेंच्या अवताराकडे आईचं लक्षही गेलं नाही.

मला ‘ययाती’त भूमिका देण्याआधीच दुबेंनी ते नाटक बसवलं होतं. त्याचे जे थोडे प्रयोग झाले, त्यात चित्रलेखाचं काम आशा करत असे. काही कारणास्तव तिला पुढचे प्रयोग शक्य नसल्याने, दुबे मला त्या भूमिकेसाठी तयार करणार होते. ते प्रथम माझ्या एकटीच्या तालमी आठवडाभर घेतील व माझे ‘प्रवेश’ बसले की मग सर्व कलाकारांबरोबर संपूर्ण नाटकाची तालीम होईल, असं वेळापत्रक आईला सांगून दुबे लगेच म्हणाले, ‘‘तालीम तिची एकटीची आहे म्हणून तुम्ही काळजी करूनका. ‘‘शी इज सेफ विथ मी. शिवाय आमची तालीम फक्त सकाळीच असेल.’’ दुबेंचा तो अतिगंभीर आश्वासक सूर ऐकल्यावर फुटलेलं हसू दाबत आईने मान डोलावली आणि एकदाचे दुबे व मी घरून निघालो. दुबेंबरोबर तालीम करण्यासाठी मी अतिशय उत्सुक असले तरी त्यांच्या एकूण अवतारामुळे, त्यांच्यासोबत गावदेवीतल्या रस्त्यांवरून जायला मी मुळीच उत्सुक नव्हते. पण ‘‘तालमीची जागा लांब नाही, आपण चालत जाऊ’’, असं त्यांनी म्हटल्यावर ‘‘नको, नको, टॅक्सीने जाऊ.’’ म्हणण्याचा मला धीर झाला नाही. शेवटी, ओळखीचं कोणी भेटू नये, अशी मनातल्या मनात प्रार्थना करत मी दुबेंबरोबर चालायला लागले..

 

चित्रा पालेकर

chaturang@expressindia.com 

मराठीतील सर्व लगोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is acting yayati chitra palekar
First published on: 18-03-2017 at 03:40 IST