लैंगिक संबंधासारखी नाजूक, आनंददायी गोष्ट एकमेकांच्या सहमतीनेच हवी तरच ती सुखकारक असते. जबरदस्ती, नवरेपणाचा मूलभूत हक्क इत्यादी गोष्टी त्यात आल्या, की नुसताच शारीरिक त्रास होत नाही तर नात्यातही गुंता होऊ  शकतो. मने दुरावतात. म्हणूनच नवरा आणि बायको यांच्यातही या विषयावर चर्चा हवी. एकमेकांना समजून घेणं हवं, तरच नवरा बायकोचं नातं कायम टिकून राहील.

रुपाली आणि तिचा नवरा उमेश- वय २२ आणि २६ वर्षे- दोघेही माझ्या कन्सल्टिंग रूममध्ये अगदी अवघडलेल्या मनोवस्थेत बसलेले. रुपालीने शरमेने मान खाली घातलेली आणि तिचा नवरा कशी सुरुवात करावी या गोंधळलेल्या मन:स्थितीत. जुजबी माहिती घेऊन मी त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला. दोघांचे नुकतेच लग्न झालेले होते- जेमतेम महिन्याभरापूर्वी. नव्याची नव्हाळी चेहऱ्यावर लपून राहत नव्हती; पण या नव्हाळीवर एका समस्येची छाया होती. लग्न थाटात झाले होते. दोन्ही घरे सुशिक्षित, सुखवस्तू होती. रुपालीचा नवरा तसा ठीकठाक वाटत होता. लग्न, रिसेप्शन, हनिमून प्रवास सगळे आटोपले होते, पण जे व्हायला पाहिजे होते ते होत नव्हते, खऱ्या अर्थाने शारीरिकदृष्टय़ा एक होणे जमत नव्हते. रुपालीला खूप त्रास होई; पण त्यामुळे तिचा नवरा रागावलेला, चिडलेला होता. तो म्हणाला, ‘‘डॉक्टर, मी चांगल्या संस्कारातील मुलगा आहे. लग्नाच्या आधी मी कधीच शारीरिक संबंध ठेवलेले नाहीत आणि ही आता सहकार्य करत नाही. म्हणते, ‘त्रास होतो, असे वाटते तू माझ्यावर रेप करतोयस.’ हा रेप आहे का? मला काय करावं ते नेमकं कळत नाही.’’

lucky number by date of birth
पैसा, पद, प्रतिष्ठा तुम्हाला कधी मिळणार? भाग्यांकावरून पाहा तुमचे लकी वर्ष
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!

मीरा वयाने २५ ची. एक मूल असलेली. सारखा अंगावर पांढरा स्राव जातो. खाज येते म्हणून नवऱ्यासह आलेली. तिला व्यवस्थित तपासले आणि योनीमार्गात ठेवायला गोळ्या लिहून दिल्या. तेव्हा तिने विचारले, ‘‘म्हणजे ७-१० दिवस संबंध ठेवायचा नाही ना?’’ मी म्हटले, ‘‘हो दहा दिवस अगदी संबंध नको.’’ तेव्हा तिच्या नवऱ्याने सगळे चूपचाप ऐकून घेतले. दोघेही बाहेर गेले. ५ मिनिटांनी पुन्हा मीरा आली. म्हणाली, ‘‘नवरा कुरकुर करतोय. असे कुठे असते का? डॉक्टर बदलू या म्हणतोय. आता कुठलाही डॉक्टर हाच सल्ला देणार ना? खरं सांगते, ही बळजबरी नको वाटते. माझ्यामुळे तुम्हालाही त्रास होईल, असे सांगितले तरी ऐकत नाही. माझे मी बघून घेईन म्हणतो. मी काय करू?’’

नीला नुकतीच बाळंत झाली. बाळ-बाळंतीण सुखरूप. १५ दिवसांनी तपासायला आली. म्हणाली, ‘‘त्रास काहीच नाही, पण नवरा म्हणतो, बस्स झाले आता बाळंतपण. लवकर घरी चल. मी काय म्हणते याचा अर्थ डॉक्टर तुम्हाला समजलाच असेल ना?’’ मी म्हटलं, ‘‘हो, पण प्रसूतीनंतर दीड महिना तरी शारीरिक संबंध नकोत.’’ नीला म्हणाली, ‘‘तुम्हीच सांगा ना त्यांना. अर्थात तुमचेही ऐकतील की नाही कुणास ठाऊक.’’

अनिताताईंचे एकदमच गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया करावी लागली. वयाच्या ४८ व्या वर्षी खूप रक्तस्राव व्हायचा. सगळे उपचार करून झाले, पण शेवटी शस्त्रक्रिया करावी लागली. आठव्या दिवशी अनिताताई आणि त्यांचे पती दोघेही तपासायला आले. त्यांच्या सगळ्या शंकांचे निरसन केले. आहार, पथ्य याविषयी सांगितले. अगदी निघताना सुरेशरावांनी विचारलं, ‘‘डॉक्टर ‘ते’ पथ्य किती दिवस? १५ दिवसांनी हरकत नाही ना?’’ खरे म्हणजे हा प्रश्न माझ्या मनात फारसा नव्हता, कारण दोघेही मध्यमवयीन. लग्नाला २५ वर्षे उलटून गेलेली. तेव्हा तेवढा समजूतदारपणा असेलच, पण हा माझा सोयीस्कर समज किंवा भ्रम होता. असो.

आता यापुढचे प्रकरण फारच निराळे. जरासे धक्कादायकही. विमलाबाई ७२ वर्षांच्या, त्यांचे पती ७५ च्या पुढचे, कदाचित ८० ही असतील, निवृत्त प्राध्यापक नामांकित कॉलेजमधील. विमलाबाई मुलीबरोबर आलेल्या. मुलगीही पंचेचाळिशीच्या आसपास. विमलाबाईंना योनीमार्गात खूप आग होत होती, दुखत होते. पांढरा स्राव जात होता म्हणून काठीचा आणि मुलीचा आधार घेत त्या आलेल्या होत्या. तपासल्यानंतर धक्काच बसला. खालची जागा लाल झालेली. शिवाय २-३ जखमा, पण ७२ वर्षांच्या बाईंना विचारणार तरी कसे? म्हणून थोडा वेळ गप्पच बसले. तेव्हा विमलाबाईंनी स्वत:हूनच सांगितले की, बळजबरीने लैंगिक संबंधामुळे हे झालेय. मुलीच्या समोरच सांगितले. ज्या नवऱ्याबरोबर जवळजवळ ५० वर्षे संसार केला, त्यांच्याविषयी अतिशय तिरस्काराने, हेटाळणीच्या स्वरात त्या बोलत होत्या. (गृहस्थ खूप व्यायाम करायचे, खाणेपिणे वेळच्या वेळी हवे. विमलाबाई म्हणाल्या, हा फिटनेस फक्त ‘त्या’ गोष्टीसाठी.) मी उपचार तर लिहून दिला. जे सांगायचे ते त्यांच्या पतीला सांगितलेही, पण विमलाबाई निराश झाल्या होत्या. म्हणाल्या, ‘‘यासाठी मी कुठे तक्रार करू?.

वर सांगितलेले एकही प्रकरण काल्पनिक नाही. सर्व सत्यकथा आहेत (अर्थात नावे बदललेली आहेत.) आणि हा काही माझ्या एकटीचाच अनुभव नाही. कमीअधिक प्रमाणात सर्वच स्त्रीरोगतज्ज्ञांना या प्रश्नाला सामोरे जावे लागते. माझा अनुभव जास्त म्हणून अशा घटनाही खूप आहेत गाठीशी.

खरे म्हणजे लैंगिक संबंध ही इतकी वैयक्तिक गोष्ट आहे, की तिची अशी चर्चा, चिरफाड कुणालाच नको असते; पण अशी वैयक्तिक गोष्ट जेव्हा एखाद्या व्यक्तीला म्हणजे स्त्रीलाच शारीरिकदृष्टय़ा त्रासदायक, क्लेशकारक होते, ज्यामुळे आरोग्यावर विशेषत: प्रजनन आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो तेव्हा ती तितकीशी वैयक्तिक, खासगी राहात नाही आणि राहूही नये. किमान डॉक्टरी सल्ला तरी घ्यावाच; पण त्याची चर्चा  स्त्रिया कुणाबरोबर करणार? मैत्रिणीला या गोष्टी सांगता येतातच असे नाही. मग काय करावे? डॉक्टरांना विचारणे हा उपाय आहे, पण त्यांच्याजवळ आम्ही पूर्णपणे व्यक्त होऊ  शकू का? आणि त्यांचा सल्ला आमचे जोडिदार मानतील का? हा अनेकींसमोर प्रश्न आहे.

लैंगिक संबंधासारखी नाजूक, आनंददायी गोष्ट एकमेकांच्या सहमतीनेच हवी, तरच ती सुखकारक असते. जबरदस्ती, नवरेपणाचा मूलभूत हक्क इत्यादी गोष्टी त्यात आल्या, की नुसताच शारीरिक त्रास होत नाही, तर नात्यातही गुंता होऊ  शकतो. मने दुरावतात. क्वचित या सगळ्या गोष्टींची धास्तीच बसते. अशी एक रुग्ण यायची माझ्याकडे, जिचा नवरा तिच्याशी अगदी अतिरेकी (लैंगिक) वागायचा. ती म्हणायची, अंधार पडत चालला की माझा अगदी थरकाप होतो. यातील विकृत मनोवृत्तीची उदाहरणे सोडून देऊ  या; पण काही जणींच्या बाबतीत सामान्य लैंगिक संबंधसुद्धा अत्याचाराच्या पातळीवर होत असतील तर त्यावर उपाययोजना कोणती? कितीही कायदे केले तरी हा प्रश्न असा सहजासहजी सुटणार नाही आणि किती बायका कायदेशीर दाद मागतील? किती जणींना न्याय मिळेल?  पण हा खूप पुढचा प्रश्न आहे मुळात स्त्रीला ‘नाही’ म्हणण्याचा हक्क हवा. तो तिला मिळतो का? माझ्या शरीरावर माझाच अधिकार हवा. ही गोष्ट समाजमान्य व्हावी, निदान नवरामान्य व्हावी. कायदा करून समस्येची गुंतागुंत होऊ शकते. वैवाहिक आयुष्यही पणाला लागू शकते. मग कुटुंबसंस्थाही कमजोर होऊ शकते. स्त्रियांनाही संसार, कुटुंब, नवरा सर्व काही हवे आहे, पण नवराबायकोचे नाते पारदर्शक, प्रामाणिक, विश्वासाचे, मुख्य म्हणजे सन्मानाचे हवे. एकमेकांविषयी प्रेम तर असतेच, पण त्याबरोबर समंजसपणा, काळजी आणि जपणुकीचे वर्तन हवे. सगळेच नवरे वाईट वा अतिरेकी वागतात असा दावा इथे नक्कीच करायचा नाही. काही पुरुष खरोखरच समजूतदार भूमिका घेतातही आणि वागतातही.

मी काही कायदेतज्ज्ञ नाही. थोडीशी सामाजिक जाण असलेली, थोडे फार सामाजिक काम करणारी स्त्री रोगतज्ज्ञ आहे. गेली ४५ वर्षे माझा रोज निदान २० तरी स्त्रियांशी संबंध येतोय. सर्व कौटुंबिक, सामाजिक बदल मी उघडय़ा डोळ्यांनी जाणत्या मनाने बघतेय.  काही किमान गोष्टी पुरुषांनी स्वीकारणे, समजणे आवश्यक आहेत असे मला वाटते. जसे की जेव्हा डॉक्टर सांगतात, इतके दिवस लैंगिक संबंध ठेवू नका तेव्हा ते बंधन, पथ्य पाळायलाच पाहिजे. छोटय़ा शस्त्रक्रियतेनंतर, मोठय़ा शस्त्रक्रियतेनंतर, प्रसूतीनंतर, पाळीमध्ये संबंध नकोच, त्यामुळे स्त्रीच्या आरोग्यावर दूरगामी परिणाम होऊ  शकतो. मनावरही ओरखडे, चरे उठतात याचीही जाणीव हवी.

आपल्या मैत्रिणींनीही थोडेसे धीट व्हायला हवे. लैंगिक संबंधाबाबतीतील मौन सोडायला हवे. त्यावर समजूतीने चर्चा, विचारविनिमय करावा आणि या गोष्टीचा योग्य तऱ्हेने मुलांवर वेळीच संस्कार करायला हवा. स्त्री शरीराविषयी आदर आणि जबाबदारीची जाणीव हवी. ही नसेल तर मग बलात्कार, एकतर्फी प्रेम, अ‍ॅसिड हल्ला या गोष्टी मागील पानावरून पुढे चालूच राहतील आणि त्यात भर पडेल ती विवाहांतर्गत बलात्कारांची!

जेव्हा जेव्हा अशा गोष्टींची चर्चा होते तेव्हा पुरुषांचे एक हमखास, हुकमाचे समर्थन असते ते म्हणजे मुळात पुरुष हे थोडे शारीरिकदृष्टय़ा आक्रमक वृत्तीचे असतात. बहुपत्नीत्व ही नैसर्गिक ऊर्मी आहे वगैरे हे त्यांचे नेहमीचे लाडके संवाद असतात. खरे म्हणजे असे काही नसते, शिवाय पुरुषाला समृद्ध मेंदू दिलाय ना? तो विचार करण्यासाठी आणि माणसाने माणसासारखे वागण्यासाठी दिलाय ना? मग त्या मेंदूचा वापर प्रत्येक नवऱ्याने योग्यवेळी करायलाच हवा तसंच स्त्रियांनीही आपले नाते टिकवण्यासाठी योग्य ती काळजी घ्यायला हवी.

स्त्री-पुरुष नात्यामध्ये दोघांचीही भूमिका सारखीच महत्त्वाची आहे. आपल्याकडे स्त्रियांच्या लैंगिकतेविषयी स्त्रियांचाच दृष्टिकोन अनेकदा चुकीचा असतो. अनेक गैरसमजुतीही आहेत. जसे लैंगिक संबंधात स्त्री ही पॅसिव्ह असते, तिने पुढाकार घ्यायचा नसतो; फक्त मूल होण्यासाठीच लैंगिक संबंध हवेत. एक मूल झाले की लैंगिक संबंधांना महत्त्व नाही. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे चाळिशीनंतर लैंगिक संबंध आवश्यक नाहीत. अशा कितीतरी चुकीच्या समजुती आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लैंगिक संबंधांत आनंद घेणं ही आपल्या बहुतांशी स्त्रियांची मानसिकता नाही. तसे संस्कार त्यांच्यावर केलेले नसतात.

स्त्री-पुरुष नातं जर निकोप हवं असेल, तर लैंगिकतेविषयीच्या समजुती बदलायला हव्यात. ‘हे सगळं तेवढं गरजेचं नाही, मला अगदी नकोच वाटते’ हा चष्मा बदलायला हवा. तरच स्त्री-पुरुषाचं प्राचीनत्व असलेलं नातं चांगल्या तऱ्हेने टिकेल.

इतक्या नाजूक, अत्यंत खासगी विषयाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जाऊ  दे, बघू या, पुढचं पुढे इत्यादी वेळकाढूपणा नको. मुली-स्त्रियांनीच खासगीपणाचा आदर राखत यावर एकत्र येऊन चर्चा कराव्यात, आपापसात चर्चा घडवून आणाव्यात. लैंगिक संबंध, लैंगिकता यावर खुलेपणानं, निर्धास्तपणे बोलावं. न बोलण्याचा, मोघम बोलण्याचा, अप्रस्तुत, शरमेचा वगैरे विशेषणं लावून हा महत्त्वाचा विषय असा दुर्लक्षित करू नये. लैंगिक स्वास्थ्य टिकवायचं असेल, तर नात्यात मोकळेपणा हवा, स्त्री शरीराबद्दल आदर हवा. तिच्या मनाचाही विचार करायला हवा. तरच नवरा-बायकोचं सुंदर नातं सुंदरच राहील, टिकेलही.

लैंगिक संबंधातील खासगीपण जपत या प्रश्नाकडे पाहायला हवं आणि त्यासाठी मला वाटतं पुरुषांनीच पुढाकार घ्यावा. त्यांनी थोडं जरी वेगळ्या दृष्टिकोनातून या प्रश्नाकडे पाहिलं, विशेषत: माणुसकीच्या, समजुतीच्या चष्म्यातून तर कुठलाही कायदा करायची गरज पडणार नाही.

डॉ. सविता पानट

drsavitapanat@gmail.com