आपलाच देश, आपलीच माणसं. आकाश तेच जमीनही सगळ्यांसाठी एकच. पण अनेकांच्या आयुष्यात येतं फक्त दु:खं, दारिद्र, वेदना. आपलीच माणसं नात्यांचे लचके तोडतात. परिस्थितीचा महिषासूर जेव्हा दृष्टांची साथ देत सत्प्रवृत्तीला गिळंकृत करू पाहतो.. समाजात अन्यायाचा तिमिर पसरतो. तेव्हा तो दूर करायला दुर्गा अवतार घेते. नि:पात करून टाकते, त्या दु:खांचा, वेदनांचा..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजच्या या खास ‘चतुरंग नवदुर्गा’ पुरवणीत तुमची भेट घडवतोय अशाच नऊ दुर्गाची ज्यांनी आदित्य, सूर्य बनून आपल्या प्रकाशानं भेदल्या भेदभावांच्या दऱ्या.. उजळून टाकली अनेक आयुष्यं. या दुर्गा आहेत तुमच्या आमच्यातल्याच! या आहेत, मोनिका साळवी. परिस्थितीमुळे मनोरुग्ण झालेल्या मोनिकानं त्यातून बाहेर पडल्यावर जगण्याचं भान हरवलेल्या, शरीरधर्मही विसरलेल्या स्त्रियांची अहोरात्र काळजी घेत प्रेमाचा आदर्श निर्माण केला आहे. बबिता पठाणेकर. बहुरूपी समाजातल्या मुलांच्या शिक्षणासाठी धडपडणाऱ्या, पालधारकांना ओळखपत्र मिळवून देणाऱ्या बबिताचं आयुष्य म्हणजे विकासाचं लखलखीत पान आहे. संगीता शेलार. फसवून वेश्याव्यवसायात ढकलल्या गेलेल्या संगीताने त्यातल्या शोषणाविरुद्ध आवाज उठवला. स्वत: त्यातून बाहेर पडल्या. काहींना रोजगाराचा मार्ग दाखवला तर काहींची लग्नं लावली.

रेणुका दहातोंडे, पतीमुळे एचआयव्हीची बाधा झालेल्या. एका क्षणी आयुष्याला स्वीकारून पाठी वळायचं नाही या निश्चयाने एचआयव्हीबाधित मुलांच्या आई झाल्या. तर रशिदाबी. भोपाळ वायुगळतीमुळे झालेल्या दुर्घटनेची शिकार ठरलेल्या रशिदाबींनी आपल्यासारख्या अनेकींना सोबत घेऊन राज्य, केंद्र शासन, सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचवून लोकांना न्याय मिळवून दिला. पार्वती राजगुडे, आहे ते जगणं नाकारून परिस्थिती बदलवण्याची हिंमत ठेवणाऱ्या पार्वती. त्यांनी गावात दारुबंदी घडवून आणली, महिलांन बचतीची सवय लावत रोजगाराची दिशा दिली. तर रेखा दावणे, नेज शिवपुरीमधल्या आपल्या गावातल्या स्त्रियांना त्यांनी आर्थिक सक्षम बनवत ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवा आयाम दिला. अशिक्षित असणाऱ्या भारतबाई देवकर यांनी तर तुळजापूरची स्वच्छता करण्याची मोहीम हाती घेतलीय. ती पूर्ण होईपर्यंत अनवाणी चालेन, असा त्याचा पण आहे. पूजा गायकवाड. समाजाच्या विकृतीचे भीषण चटके सोसलेल्या पूजाने अनेक मुलींना मानवी व्यापाराला बळी पडू देता त्यांना आपल्या पायावर उभं करत सन्मानाचं जगणं दिलं. या आहेत आजच्या नऊ दुर्गा. जी परिस्थिती त्यांच्यावर ओढवली त्याला इतरांनी बळी पडू नये. त्यांना आपले भोग भोगावे लागू नये म्हणून कणखर भूमिका घेणाऱ्या, प्रसंगी मनस्ताप सोसणाऱ्या पण आपल्या मायेची पाखर इतरांना देणाऱ्या.
या सगळ्यांना समाजासाठी खूप काही करायचं आहे, त्यांना त्यात यश येवो आणि आपला समाज सुजलाम् सुफलाम होवो, संपन्न होवो ही सर्वात्मका सर्वेश्वराजवळ प्रार्थना !

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meet loksatta nav durga
First published on: 17-10-2015 at 02:00 IST