मेघना वर्तक  meghana.sahitya@gmail.com

आजच्या वयस्कर आईवडिलांनीही आपल्या मुलांसारखं व्यवहारी व्हायची वेळ आली आहे का? आपण आपल्या मुलांमध्ये नको इतके गुंतून पडलो आहोत का?, मुलांना हवे ते लगेच द्या, त्यांना परदेशी पाठवायचे म्हणून आपल्या हौसेवर पाणी सोडा. मुलीला लग्नात लागतील म्हणून दागिने बनवून ठेवा. त्यांच्या नावावर प्लॉट, फ्लॅट घ्या. अशा प्रकारे जळी स्थळी काष्ठी पाषाणी या आईवडिलांना फक्त आणि फक्त मुलेच दिसतात. वेगात हरवलेल्या मुलांना आईवडिलांसाठीच वेळ नाही तर मग त्यांनी मागे ठेवलेल्या मालमत्तेसाठी वेळ घालवायला तरी फुरसत आहे का? त्यामागच्या त्यांच्या भावनांची त्यांना जाण आहे का?

98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!
misbehavior at toll booth where can you complaint how to deal with toll employees nhai fastag helpline
टोल नाक्यावरील कर्मचारी तुमच्याबरोबर चुकीच्या पद्धतीने वागले तर काय कराल? वाचा सविस्तर
1 to 7 April 2024 Weekly Horoscope
७ एप्रिलपर्यंत लक्ष्मी नारायणासह ३ राजयोग बनल्याने कर्क- कन्यासह ‘या’ राशी जगतील अच्छे दिन, १२ राशींचे भविष्य वाचा

दीपकला जाऊन आज आठ दिवस होत होते. कोपऱ्यात शांतपणे तेवणाऱ्या पणतीकडे सुचिता शून्य मनाने बघत होती. तिची मुले समीर आणि निशिता बाजूला बसली होती. समीर, निशिता दोघेही अमेरिकेत शिकायला म्हणून जी गेली ती तिथेच स्थायिक झाली. एक-दोन वर्षांनी कधीतरी धूमकेतूप्रमाणे उगवायची तेही आठ दिवसांसाठी. सून आणि जावई दोघेही अमेरिकी, त्यामुळे त्यांचा तर प्रश्नच नव्हता! दीपक-सुचिताला प्रथम वाईट वाटायचे, पण हळू हळू त्याचीही सवय होत गेली. पण आता सर्वच परिस्थिती बदलली होती. पंधरा दिवसांपूर्वी अचानकच दीपकची तब्येत बिघडली आणि आठ दिवसांत सर्व संपले. तो जाऊनही आता आठ दिवस उलटले होते. दोन्ही मुलांची अस्वस्थता वाढत होती. त्यांना परत जायचे वेध लागले होते..

समीरने विषय काढलाच, ‘‘आई मला आता बाबांच्या दहाव्या-बाराव्याला थांबता येणार नाही, कारण हे सर्व एवढे अचानक झाले की काही व्यवस्था न करताच मला यावे लागले. जायला लागेल नाहीतर करोडोंचे नुकसान होईल. इच्छा आहेच की थांबावे, पण..’’ सुचिताने निर्वकिार नजरेने त्याच्याकडे पाहिले, तिला हे अपेक्षित होतेच. भावाच्या बोलण्याचा आधार घेऊन निशिताने बोलायला सुरुवात केलीच. आई, मी दहाव्याला थांबते, पण तुझ्यासाठी. खरं तर आमचा या गोष्टींवर अजिबात विश्वास नाही. आपण त्या भटजींना एवढे पैसे देणार त्यापेक्षा कुठे गरजू संस्थेला देऊ. आणि आता तू एक कर इथले सर्व एकदा आवरून झाले की तिकडे आमच्याकडे ये थोडी विश्रांती घ्यायला, मला काही जास्त दिवस तुझ्यासाठी थांबता येणार नाही.

सुचिताने तिच्याकडेही निर्विकार नजरेने पाहिले. मनातल्या मनात तिचे विचार चालू होते. ‘‘खरं आहे रे लेकरांनो, तुमची पिढी म्हणजे प्रॅक्टिकल, पूर्ण व्यवहारी. बाबांच्या नावाने कुठेतरी देणगी दिली की झाले. घरात पसारा नको, तुमचा अमूल्य वेळ जायला नको, आणि करोडोंचे नुकसानही व्हायला नको. अरे बाळांनो, पण आम्ही तेवढे व्यवहारी नाही रे! आमची भावनिक गुंतवणूक आहे प्रत्येक गोष्टीशी. बाबांचे दिवसवार सर्व मला नीट करायचे आहेत रे!’’ सुचिता हे प्रत्यक्षात बोलू शकली नाही. मात्र हे सांगितलं की, ‘‘तुम्ही परत जायच्या आधी एकदा आपल्या सर्व प्रॉपर्टी -मालमत्तेच्या वाटण्या करू या. सोनंनाणं, जमिनी, फ्लॅट सर्वच. तसे आम्ही मृत्युपत्र करून ठेवलेच आहे, पण तरीही कागदोपत्री व्यवहार पूर्ण करायला हवेत. पुन्हा तुम्ही एवढय़ा लांब गेल्यावर लवकर येणे होणार नाही.’’  तिने मुलांकडे पाहिले. समीरला आपल्या कपाळावरची आठी लपवता आली नाही, निशिताने मनातील बरेच दिवसांची आग ओकली. ‘‘आई, तरी आम्ही बाबांना सारखे सांगत होतो की जमिनी, प्लॉट्स घेऊन त्यात पैसे गुंतवू नका, नंतर ते निस्तरण्यासाठी सरकारी ऑफिसेस, त्यात खेटा घालायच्या महिनोमहिने, ती कागदपत्रं, वकील, आम्हाला निस्तरायला वेळ नाही. पण ऐकतील तर ते बाबा कसले.’’ निशिता अमेरिकेत एका मोठय़ा फायनान्स कंपनीत अधिकारी होती. एकदम प्रॅक्टिकल!

तिचं बोलणं ऐकून मात्र एवढा वेळ आवरून धरलेला बांध फुटला आणि सुचिता म्हणाली, ‘‘समीर अरे तूपण सांग तुझे प्रॅक्टिकल विचार. आम्ही प प करत पैसे जमवले. कधीही कसली हौसमौज केली नाही, अमेरिकेला तुम्हाला शिकायला पाठवले, आयुष्यभर स्वत:चे मन मारून राहिलो. तुमच्या दोघांच्या भोवतीच आमचं विश्व होतं. तुम्हाला आम्हाला भेटायला यायला जमत नाही, तेही आम्ही समजून घेतलं, तुमच्यावर जबाबदाऱ्या आहेत, पण त्यात आईवडिलांचीपण जबाबदारी असते हेही तुम्ही विसरून गेला आहात. तरी बरे, आम्ही आमची कोणतीही जबाबदारी तुमच्यावर टाकलेली नाही. उलट चार पैसे ठेवलेच आहेत. पण आता मला वाटते की हेपण आम्ही तुमच्यावर एक ओझेच टाकले आहे. आणि म्हणूनच दीपक नाही, पण ही चूक मी सुधारायची ठरवली आहे. तुम्हाला आणखी त्रास द्यायची इच्छा नाही. आमची सर्व मालमत्ता दान करायची असे मी ठरवले आहे. तुम्ही जाऊ शकता.’’

उद्वेगाने हे बोललेल्या सुचिताचा प्रत्येक शब्द माझ्या कानात घुमत होता. तिचा त्रास समजत होता. मुलांचीही ‘बाजू’ समजत होती. खरंच चूक कोणाची आहे? पुढची पिढी मेहनत करून प्रॉपर्टी, मालमत्ता तयार करते, का तर म्हातारपणाचा आधार म्हणून आणि मुलांसाठी सुद्धा! पण त्यांना ते जाणवतं का?

नुकताच माझ्या मामीकडे घडलेला प्रसंग आठवला. मामीला दागदागिन्यांची खूप आवड होती. तसेच घरात पूजाअर्चा, धार्मिक कार्ये नेहमी असत. त्यासाठी तिने चांदीची भांडी, पूजेचे साहित्य, चौरंग, पाट अशा अनेक गोष्टी करून घेतल्या होत्या. तसेच विविध डिझाइनचे सोन्याचे सेट स्वत:साठी, मुलींसाठी म्हणून बनवून घेतले होते. प्रत्येक गोष्ट करताना ती हाच विचार करायची की लेकीसुनांना होतील वापरायला. घरात ठेवायला नको, चोऱ्यामाऱ्या होतात म्हणून तिने बँकेत मोठे लॉकर्सपण घेतले होते. आणि सर्व गोष्टी ती उत्तम प्रकारे सांभाळत होती. पण वयानुसार तिला ते होईना, त्यामुळे तिने त्याच्या वाटण्या करायचे ठरवले. तिने तिच्या मुलींना सांगितले की बघा गं, कोणाला कोणते नेकलेस आवडतात ते, बांगडय़ा, कानातले. म्हणजे त्याप्रमाणे मला माझ्या मृत्युपत्रात लिहून ठेवता येईल. तिला वाटले होते, मुली अगदी खूश होतील, पण मोठी मुलगी आपले ‘प्रॅक्टिकल’ विचार मांडत म्हणाली, ‘‘अगं आई, तुझे सर्व दागिने जुन्या फॅशनचे झाले आहेत. हल्ली असे कोणी घालत नाहीत गं. तू असं कर आम्हाला दे. ते मोडून आम्ही आम्हाला हवे तसे करून घेतो. नाहीतर कॅश ठेवून देऊ. उगीच लॉकर्सची भाडी कशाला भरायची एवढाली?’’ धाकटीनेपण तिची री ओढली. त्यांचे बोलणे मामीच्या हृदयाला घरे पाडून गेले. तिला आठवले, ‘तिच्या आजी-आईने जेव्हा त्यांची आठवण म्हणून एखादी गोष्ट दिली तेव्हा तिने ती कशी त्यांची आठवण म्हणून आजही जपून ठेवली आहे. यांना नाही का वाटत आपल्या आईची एखादी आठवण जपून ठेवावी?,’ पण या माझ्या भावना आहेत आणि त्याच मी मुलींकडूनही अपेक्षित करते हे मामीला जाणवत नव्हतं का?

काय होतंय नेमकं नात्यांमध्ये? व्यवहार की भावना यांच्यातला हा संघर्ष आहे का, यात मुलांच्याही काही गोष्टी पटतात तर काही वेळा त्यांच्या पालकांच्याही. मग यातला सुवर्णमध्य कसा गाठायचा? सुसंवादाचा पूल बांधायचा कधी आणि केव्हा? अशाच प्रकारचे एकेक प्रसंग डोळ्यापुढून सरकत होते आणि मन विचारांच्या भोवऱ्यात सापडले होते. आज घराघरातून मुले परदेशी जात आहेत. भौगोलिक अंतर, कामाचा ताण, रजा न मिळणे, तद्वतच परदेशातील आयुष्याची सवय झाल्याने भारतात मन न रमणे अशा अनेक कारणांमुळे परदेशी गेलेल्या मुलांचे भारतात येणे कमी झाले आहे. पण जी मुले आणि आईवडील, भारतात एकाच शहरात राहतात त्या मुलांनासुद्धा आईवडिलांसाठी वेळ असतोच असं कुठे आहे. किंवा आईवडिलांनी वाढवलेला ‘फापटपसारा’ आवरायला आवडत नाही. त्यांच्याही दृष्टीने आईवडिलांनी केलेली ही मोठी चूक असते. कित्येक घरात एखादे मूल परदेशी, एखादे भारतात असते. मग भारतातील मुलाला हे मालमत्तेचे व्यवहार बघायला लागतात. मग त्यावरून कुरबुरी चालू होतात. आईवडिलांना हवेनको ते आम्हीच बघायचे, औषधपाणी आम्हीच बघायचे, आम्ही का आमचा सर्व वेळ घालवायचा? मेहनत आम्ही करणार आणि बाकी सर्व आयते येऊन खाणार. हा त्यांचा दृष्टिकोन! परदेशातील मुलांना तसाही वेळ नसतोच. शेवटी ज्या आईवडिलांनी त्यांच्यासाठी कष्ट घेतले, सर्व काही मुलांसाठी म्हणून जपून ठेवले, त्या आई वडिलांच्या कष्टांची किंमत कोणालाच नसते. मुख्य म्हणजे भावनांची कदर नसते.

आमच्या सोसायटीत राहणारे साने कुटुंब. त्यांची चार मुले. दोन मुलगे, दोन मुली. साने काकांनी फार वर्षांपूर्वी पुण्यात एक प्लॉट घेऊन ठेवला होता. वर्षांनुवर्षे ते एकटेच त्या प्लॉटची देखरेख करायचे, त्याचे कर भरायचे, सातबाराचे उतारे आणायचे. आईवडील मुलांना सांगायचे, ‘‘अरे, तुम्हीपण कधी त्या प्लॉटवर फेरी मारून या, कर भरा कधीतरी. पण प्रत्येक जण दुर्लक्ष करायचा. सर्वाना वाटायचे काय वडिलांनी नसते झंझट मागे लावलेय. गावापासून किती दूर, साधे वाहनपण येत नाही.

कोण तिथे राहायला जाणार आहे. मुली लग्न झालेल्या होत्या. त्यांनी आधीच सांगून टाकले, आम्हाला इंटरेस्ट नाही. कारण काय तर त्या जागेला किंमत नाही. त्यांचे भाऊ तर वडिलांना सारखे सांगत होते, ‘‘प्लॉट विकून टाका आणि पैसे आम्हाला वाटून द्या, कामे वाढवून ठेवलीत नुसती.’’ पण प्लॉट विकायच्या आधीच सानेकाका-काकू दोघेही गेले. आणि घडलं वेगळंच ..  बघता बघता शहरं वाढत गेली. तिथे आयटी कंपन्या सुरू झाल्या. त्या भागाचा रागरंगच बदलला. ज्या भागाला कोणी विचारत नव्हते तोच परिसर आज पुण्यातील ‘प्राइम एरिया’ म्हणून ओळखला जाऊ लागला. आणि जागेच्या किमती वाढत गेल्या. प्लॉट विकून टाका म्हणून जिवंतपणी बापाला बोलणारी, त्यांच्या चुका दाखवणारी मुले आज त्या जागेसाठी एकमेकांच्या ‘उरावर बसली’ आहेत. जागेची काय किंमत मिळणार म्हणून आईवडिलांना उपहासाने बोलणाऱ्या मुली कोर्टकचेऱ्या करून त्यावर आपला हक्क सांगत आहेत.

बदलत्या जगाप्रमाणे, मुलांच्या दृष्टिकोनातही बदल घडतो आहे. चांगल्या, मोठय़ा पगाराच्या नोकऱ्यांमुळे हाताशी पैसा खेळतो आहे, त्यामुळे हे जास्तीचे पैसे जरी हवे असले तरी त्यासाठी कष्ट करण्याची मात्र त्यांची तयारी नाही. आमच्या सुहास मामाची गोष्ट. त्याची सीएची फर्म होती. आणि शेअर बाजाराचे त्याला जबरदस्त वेड होते. रात्रंदिवस तो त्यात मग्न असायचा. त्यात त्याने खूप पैसे कमवले. चांगल्या चांगल्या कंपन्यांचे शेअर्स घेऊन ठेवले. दिवस-रात्र त्याची बेरीज-वजाबाकी चालू असायची. त्याचा एकुलता एक मुलगा कित्येक वर्षे परदेशातच होता. तो वडिलांना सारखे सांगायचा, ‘‘बाबा, तुम्ही यात पैसे गुंतवू नका. कोण बघणार आहे सर्व. मी तिथे लांब राहून मला दररोजच्या मार्केटची माहिती काढणे केवळ अशक्य आहे आणि मला त्यात इंटरेस्टपण नाही. शेअर तुमच्या हयातीतच विका आणि पैसे बँकेत ठेवा आणि मस्त जगा. म्हणजे मलापण मागाहून त्रास नको.’’ अलीकडेच मामा वारला. मामी आधीच गेली होती. मामाचा मुलगा परदेशातून आला. त्या शेअर्सची उस्तवारी करताना त्याच्या नाकात दम आला. मामांना अक्षरश: शिव्या देत देत त्याने सर्व मार्गी लावले. कारण त्याला पशांचा मोहही सोडवत नव्हता.

शहरातून असे वेगवेगळे प्रसंग घडताना दिसत आहेत, त्याचप्रमाणे गावागावातून दिसतात. नुकतेच आम्ही कोकणात गेलो होतो. कोकणातील बागांतून िहडताना अनेक बागांवर ‘बाग विकणे आहे’ असे बोर्ड लावलेले दिसले. मी ते पाहून तेथील आजोबांना विचारले, ‘‘काय हो आजोबा, असे अचानक एवढय़ा बागांवर हे बोर्ड का लावले आहेत? ’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘एक काळ होता म्हणजेच जेव्हा आम्ही तरुण होतो, तेव्हा प्रत्येक जण मुंबई-पुण्याची, शहराची वाट धरत होता. तिथे रोजगार मिळत होता. प्रत्येक जण नशीब अजमावत होता. पण आमच्यासारखे मागे राहिले म्हणून आत्तापर्यंत या बागा सांभाळल्या गेल्या. पण आता पुढची पिढी शहराच्याही पुढे परदेशात गेली. आमची मुले वर्षांतून एकदा तरी येत आहेत, पण आता ही परदेशी गेलेली मुले तर चार-पाच वर्षांतसुद्धा फिरकत नाहीत. त्यांना आधीच आईबापांचे लोढणे झाले आहे, त्यात आता जमिनीचे नको आणि म्हणूनच त्यांनी आपल्या आईबापांना या जमिनी विकायला लावल्या आहेत. मिळेल त्या किमतीला या जमिनी विकत आहेत. आणि पैसे मुलांच्या खात्यात जमा होत आहेत.

नीताच्या घरी तर वेगळीच कथा. गेली पंधरा वर्षे ती, तिचा नवरा, मुले सर्व अमेरिकेत राहात आहेत. अधूनमधून ‘इंडिया’त परत जायचे विचार त्यांच्या मनात चालूच असतात. त्यामुळे नीताने वडिलांच्या मदतीने पुण्यात एक फ्लॅट विकत घेतला. त्या फ्लॅटची सर्व उस्तवारी वडील नित्यनियमाने करत होते. वडील मुंबईत, फ्लॅट पुण्यात, पण न कुरकुरता ते सर्व व्यवहार पार पाडत होते. फ्लॅटचे कर भरणे, छोटय़ामोठय़ा दुरुस्त्या हे पार पाडता पाडता जागा रिकामी न ठेवता त्यातूनही काही उत्पन्न होईल आणि मुलीला मिळेल या विचारांनी त्यांनी तो फ्लॅट भाडय़ाने दिला. त्यासाठी लागणारे लीज अ‍ॅग्रीमेंट न्यायालयात रजिस्टर्ड करणे, भाडय़ाचे व्यवहार करणे आदी सर्व वडील बिनबोभाट करत होते. मुलगी-जावईही खूश होते. भाडे मिळत होते आणि त्यासाठी त्यांना काहीच करावे लागत नव्हते. पण अचानकच वडिलांचा अपघाती मृत्यू झाला आणि बसलेली घडी विस्कटली. भाडेकरूंच्या तक्रारी, सोसायटीचे नियम, जावई-मुलीला तर वारंवार खेपा घालणे शक्य होत नव्हते. आत्तापर्यंत वडिलांच्या जिवावर फ्लॅटची देखभाल होत होती, पण आता ती झळ त्यांना लागू लागली. तेव्हा मृत वडिलांनाच शिव्या मिळायला लागल्या. ‘कोणी सांगितले होते फ्लॅट भाडय़ाने द्यायला. चार पैसे कमी मिळाले असते तरी चालले असते. नसता उपद्व्याप!’ असे उद्गार आईला ऐकवले जाऊ लागले. जोपर्यंत पैसे थेट खात्यात जमा होत होते, तोपर्यंत हे ‘उपद्व्याप’ नव्हते, पण आता नीताच्या दृष्टीने ती मोठी कटकट झाली आहे.

एकीकडे हा तर दुसरीकडे दुसराच अनुभव.  नुकताच दुबईच्या मत्रिणीचा फोन आला. ती सांगत होती, ‘‘मुंबईतील सर्व फ्लॅट्स, गावातील जमीन वगैरे आम्ही विकून टाकले आहे. आता जेव्हा मुंबईत यायचे होईल तेव्हा हॉटेल अपार्टमेंट घेऊन राहू. कारण आम्ही आता दुबईतच स्थायिक व्हायचे ठरवले आहे. व्यवसाय इथेच आहे आणि मुले दोन्ही ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला! त्यांना तर भारतात अजिबात यायचे नाही, मग कशाला घरेदारे घेऊन त्यांना व्याप करून ठेवायचा?’’ मी तिला विचारले, ‘‘दुबईत तुम्हाला काही सिटिझनशिप मिळत नाही स्थायिक व्हायला. इथले जीवन म्हणजे िवचवाचे बिऱ्हाड पाठीवर म्हणतात तसे, मग अचानक जावे लागले तर काय करणार?’’ त्यावर ती लागलीच उत्तरली, ‘‘असे म्हणता म्हणता एवढी वर्षे गेली. आता असे वाटते, मुलांवर हे ओझे लादण्याऐवजी सर्व विकून टाकलेले बरे. परत जायची वेळ आलीच तर बघू तेव्हाचे तेव्हा. हातात पैसे असतील तर तेव्हा घेऊ एखादी जागा. पण निदान मुलांच्या शिव्या तरी नकोत खायला. त्यांच्यासाठी बँकेत पैसे ठेवून दिले की झाले.’’ हे आणखीन एक वेगळेच टोक. मुलांच्या विचारांना खतपाणी घालणारे. आणि त्यासाठी टोकाचा निर्णय घेणारे.

खरेच, आजचा समाज, सर्व नवीन पिढी अशीच आहे का? तर नक्कीच नाही. प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. दररोजच्या जीवनात ही अशी अनेक उदाहरणे दिसत आहेत आणि विचार करायला भाग पाडतात. यात चूक कोणाची आहे? उत्तर, म्हटले तर सोपे आहे, म्हटले तर कठीण आहे. तुम्ही जसा चष्मा लावाल तसे दिसेल. कोणतीही गोष्ट सर्वार्थाने कधीही चांगली किंवा वाईट नसते. वय, जबाबदाऱ्या, आर्थिक, सामाजिक परिस्थिती, संस्कार अशा अनेक गोष्टींवर प्रत्येक व्यक्तीचे विचार अवलंबून असतात.

मुलांच्या विचारांचे क्षितिज रुंदावत आहे. त्यांना भावनेत गुंतून पडता येत नाही अनेकदा. हे बरोबर की चूक हा भाग वेगळा आहे. पण ही सत्य परिस्थिती आहे. त्यांचे विचार व्यावहारिक, प्रॅक्टिकल आहेत. एक घाव दोन तुकडे हा अनेकांचा स्वभाव आहे. जगाबरोबर त्यांना पुढे धावायचे आहे आणि त्यांनी तसे धावलेच पाहिजे, ही काळाची गरज आहे, तरच ते या स्पर्धेत टिकू शकतील आणि म्हणूनच त्यांना फापटपसारा नको आहे. तो आवरायला त्यांना वेळ नाही. आईवडिलांना भेटायलाच काय, त्यांच्या मृत्यूनंतरच्या अंतिम संस्कारांना यायला त्यांना वेळ नाही, (दहावे-बारावे वा श्राद्ध घालण्यावर तर अनेकांची श्रद्धाच नाही.) त्यामुळे मालमत्तेचे, प्रॉपर्टीचे व्यवहार करायला कोठून वेळ मिळणार? ते दहा खेपा कशा घालू शकतील? मग ते परदेशात असू देत किंवा भारतात! आज त्यांच्या आवडीनिवडी बदलल्या आहेत. विचार बदलले आहेत, मग ते घरदार असू दे, वा दागदागिने!

म्हणूनच आईवडिलांनी व्यवहारी व्हायची वेळ आली आहे का? हे प्रत्येकाने ठरवायला हवय. चूक आपलीच आहे का? आपण आपल्या मुलांमध्ये नको इतके गुंतून पडलो आहोत का? आपले विश्व म्हणजे फक्त मुले आणि त्यांच्याभोवतीच फिरत आहे का? अनेकदा एकुलते एक मूल असल्याने जे हवे ते लगेच द्या, त्यांना परदेशी पाठवायचे म्हणून आपल्या हौसेवर पाणी सोडा. त्यांना जागा घेऊन द्यायची म्हणून स्वत:वर खर्च करू नका, मुलीला लग्नात लागतील म्हणून दागिने बनवून ठेवा. त्यांच्या नावावर प्लॉट, फ्लॅट घ्या, आपण राहू आयुष्यभर छोटय़ा जागेत. शेअर्स घेताना तिसरे नाव एकेक मुलाचे घालू, त्यांना पुढे ते सहजगत्या मिळतील, अशा प्रकारे जळी स्थळी काष्ठी पाषाणी आपल्याला फक्त आणि फक्त मुलेच दिसतात. त्यासाठी आपण सर्वस्व देतो, आणि अपेक्षाही ठेवतो! पण आताच्या घडीला ते रास्त आहे का? मुले आपल्याला वृद्धपणी आधार देतील, ही कल्पनाही आता मोडीत निघू लागली आहे. मग भले ती मुले परदेशांत असो वा भारतात. म्हणूनच काळाबरोबर बदलणे गरजेचे आहे.

कदाचित आपल्या आधीच्या पिढीने आपल्यावर असे संस्कार घडवले असतील आणि म्हणून आपणही त्याच प्रवाहातून वाहत आहोत का, हा विचार करायची खरेच गरज आहे. खरे तर आजच्या वृद्ध पिढीनेही काही प्रमाणात हेच केले होतेच की. कोकणातून शहराकडे आणि आता शहरातून परदेशाकडे असा हा प्रवाह वाहत आहे. ही पिढी जेव्हा शहराकडे आली तेव्हा त्यांच्याही पाठी गावी सोडून आलेले कुटुंब होते आणि त्यांच्याकडे बघायला यांना वेळ नव्हता. आता या बदलत्या प्रवाहाच्या वेगात मुलांनाही पाठी बघायला वेळ नाही. फरक एवढाच आहे, आधीच्या पिढीने नाती जपली, भावना जपल्या, ऋणानुबंध घट्ट करायचे प्रयत्न केले, पण आजची पिढी जास्तीत जास्त व्यवहारी होताना दिसतेय.

मला या समस्त आईवडिलांना सांगावेसे वाटते, ‘माझे मूल’ या शब्दकोशातून बाहेर यायला हवे. मुलांना त्यांचे विश्व त्यांना स्वत:च निर्माण करू द्यायला हवे. त्यांना आपल्या कुबडय़ांची आवश्यकता नाही. आपले मूलही आपल्या या प्रेमाच्या विळख्यात गुदमरत आहे हे ध्यानात घ्यायला हवे. स्वत:चा विचार करत भावनेच्या कुंपणातून बाहेर पडायला हवे. मुलांना उत्तम शिक्षण दिलेत, त्यांच्या पंखात उडण्याचे बळ दिलेत, स्वत:च्या पायावर उभे केलेत, त्यांच्यावर संस्कार केलेत हीच त्यांची मालमत्ता आहे, हीच त्यांच्यासाठी आईवडिलांची ठेव आहे. त्यांचे ते कमवायला समर्थ आहेत. तुम्ही जे कमावले आहे, त्याचा तुम्हीच उपभोग घ्या. त्यांच्याकडून कसलीही अपेक्षाही ठेवू नका. त्यांनाही तुमच्याकडून यापेक्षा जास्त अपेक्षा ठेवू देऊ नका. समाजात अनेक गरजू मुले आहेत, संस्था आहेत. त्यांनाही तुमच्या संपत्तीची गरज आहे. कदाचित अशी थोडीफार उदाहरणे समाजात घडली तर या नवीन पिढीतील ‘अशा’ मुलांचे डोळे उघडतील आणि त्यांच्या लक्षात येईल की, केवळ व्यवहारी आयुष्य जगता येत नाही. त्याला भावनेची किनार असावी लागते, तरच आयुष्य सुखकर होते. आईवडिलांच्या ‘माये’साठी नैतिक जबाबदारीही घ्यावी लागते. त्यांचे जे ऋण आहे ते फेडावे लागते. अशा वेळी काही मुले अशीही असतील की कोणत्याही अपेक्षेशिवाय ते मातापित्याची सेवा करतील, त्यांच्या भावना जपतील आणि इंटरनेटच्या जगातील ‘श्रावणबाळ’ ठरतील.

chaturang@expressindia.com