अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. जमिनीमध्ये टाइम कॅप्सुल पुरली असं ऐकलं. वृत्तपत्रांमध्ये बातमी आली, फोटोही पाहिले. पुढे केव्हा तरी दूरच्या भविष्यात ही कालकुपी उघडली जाईल किंवा उघडली गेली तर विसाव्या शतकातले लोक कसे राहत होते, त्यांची संस्कृती, जीवनशैली कशी होती हे त्या भविष्यातल्या लोकांना समजेल अशी त्या मागची भावना. मला त्या गोष्टीचं फार नवल वाटलं. की का म्हणून कुणी तरी ती कुपी उघडेल आणि कुठच्या तरी इतिहासात माणसं कशी राहत होती, याचं कुणाला का कुतूहल वाटेल.. त्या वयात माझी भविष्याबद्दलची कल्पनाशक्ती १००-२०० वर्षांपलीकडे जाऊ शकत नव्हती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुदैवाने मी मोठी झाले, फक्त वयाने नाही, तर समजुतीनेही. जसजशी मोठी झाले तसतशी मला इतिहासाबद्दल कुतूहल वाटू लागलं आणि काळाच्या कित्येक कुप्या मला जागोजागी दिसू लागल्या. एका दूरचित्रवाहिनीवर काही कार्यक्रम फार सुंदर असतात. अनेक किल्ले, गड, ऐतिहासिक जागा, एकेक जागा म्हणजे किस्से, कहाण्या, खलबतं, कट-कारस्थानं यांनी खचाखच भरलेला खजिनाच. त्याच्यात भरून राहिलेला सगळा डेटा वाचण्याचा काही शोध उद्या विज्ञानाला लावता आला, तर आपण कदाचित वेगळाच इतिहास वाचू शकू! हा डेटा म्हणजे फक्त घटना नाही, तर त्याच्या सोबत आलेल्या भावना, विचार, कल्पना सगळंच. तर- त्या कार्यक्रमात एकदा बंगालचे जुने-जाणते सिनेमाटोग्राफर सुब्रतो मित्रा यांचा कॅमेरा दिसला. हाच तो कॅमेरा ज्याने आपल्याला सत्यजित राय यांचे अपु आणि दुर्गा दाखवले होते, शब्दांशिवाय त्यांच्या मनातली आंदोलनं, भावनांचे कल्लोळ जाणवून दिले होते! त्या वेळी त्या कॅमेऱ्याला जे जाणवलं, जे मिळालं, त्या फायली उघडता आल्या तर- किती समृद्ध होऊ आपण! किती असेल त्यात शिकण्यासारखं!

या गोष्टी आपल्याला आपल्या इतिहासाकडे घेऊन जात असतात. शाश्वताशी आपलं नातं जोडत असतात. त्या शाश्वताच्या प्रवाहात आपलं स्थान काय, त्याचं मूल्य काय हे ठरवणारा काळ पुढेच येणार आहे. पण आपण कुठून आलो हे जाणून घ्यायची ओढ याच्यामुळेच निर्माण होते. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपण एकटे नाही, तसंच स्वयंभूही नाही हे लक्षात येतं.

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशा खूप कालकुप्या असतात. परवा माझ्या वहिनीचा फोन आला, आईच्या कॉफी मूसची रेसिपी आहे का विचारायला- आणि मी आईची वही शोधायला माझा जुन्या गोष्टींचा कप्पा उघडला. कप्पा कसला, जादूची गुहाच ती. कुठचीही एक वस्तू उघडून पाहिली तरी त्याच्या भोवती असंख्य आठवणींचे पुंजके लगडलेले असतात. कधी त्या आठवणींमध्ये रमायला होतं, कधी उदासही वाटतं. व्हॉट्सअ‍ॅपवर जुन्या दिवसांच्या आठवणींचे कढ काढणारे मेसेजेस आले की मी ते ताबडतोब खोडून टाकते. ऊठसूट गेले ते दिवस म्हणत मी उसासे टाकत नाही. पण कधीतरी आईच्या रेसिपीच्या वहीसारखी एक कालकुपी उघडली जाते आणि गेलेल्या आयुष्याची सगळी फिल्मच जणू काही डोळ्यासमोर तरळू लागते.

आईच्या वहीत विचित्र नावांच्या रेसिपीज आहेत. सुलभाकाकूचं बिरडं, ताम्हणेकाकूचं मटण.. अमक्याचं भरीत, नीनाचं कालवण वगैरे. कधी अंडही न खाणारी माझी आई आमच्यासाठी सगळं काही करायची. ती एकटीच नाही, तिच्या पिढीतल्या किती तरी आया ते करायच्या. गोष्ट फार साधी वाटते, मांसाहारी स्वयंपाक हे फक्त उदाहरण आहे. पण आज हे लक्षात येतं की ती तिच्या जुन्या मतांना घट्ट चिकटून बसली असती तर पुढे आम्ही भावंडांनी ज्या भराऱ्या मारल्या त्या मारल्या असत्या का?

मध्यंतरी मी ऐकलं की काही प्रगत देशांमध्ये एक फार विचित्र समस्या समोर आली आहे. ‘भावहीन चेहऱ्याची मुलं’ ही ती समस्या. काही कारणामुळे जी मुलं अनाथालयात आणली जातात- म्हणजे आई-बापांनी टाकलेली, अल्पवयीन मुलींच्या पोटी जन्माला आलेली, किंवा अन्य काही- अशी काही मुलं अगदी लहान वयातसुद्धा हसत नाहीत, रडत नाहीत, कुणी त्यांच्यासमोर गेलं तर तोंड फिरवतात.. कारण त्यांना तान्ह्य वयात प्रेम मिळालेलं नसतं. ही गोष्ट मी एका सेमिनारमध्ये ऐकली. बोलणारे वक्ते म्हणाले की जर आज आपण स्वत:ला एक भला माणूस मानत असलो, तर त्या मागे तुमच्या मागच्या पिढय़ांचं ऋण विसरू नका. तुम्ही पहिल्यांदा हसलात, पहिल्यांदा बोललात, पहिलं पाऊल टाकलंत, तेव्हा आनंदाने हसणारे, टाळ्या वाजवणारे, कौतुक करणारे कुणी तरी होते म्हणून तुम्ही आज आहात तिथे आहात! भूक लागल्यावर कुणी तरी तुम्हाला खाऊ घातलं, न्हाऊ-माखू घातलं, प्रेम दिलं म्हणून तुम्ही आज प्रेम करू शकता. ज्या मुलांना हे काहीच मिळालं नाही, त्यांना नातं जोडता येत नाही, प्रेम म्हणजे काय, विश्वास म्हणजे काय ते कळत नाही.

‘४०५ आनंदवन’ या माझ्या दूरचित्रवाणी मालिकेतले बाबा म्हणतात, ‘‘एका सकाळी स्कूलबस आली आणि तुला शाळेत घेऊन गेली असं झालं नाही. कुणी तरी तुला शाळेत घातलं, तुझे आजोबा शिकले, वडील शिकले म्हणून तू शाळेत गेलीस. त्या आजोबांना पणजोबांनी शाळेत घातलं होतं हे विसरू नकोस.’’ लहान वयात आई-वडिलांचं प्रेम हे बहुतेक वेळा गृहीतच धरलं जातं. पण कधी तरी अशी एखादी कालकुपी उघडली जाते आणि जाणत्या वयात त्या प्रेमाचं एक अत्यंत साधं रूप अकल्पितपणे समोर येतं.

पूर्वी घरांमध्ये कोठीची खोली असायची तशीच एक अडगळीची खोलीही असायची. त्यात आपल्या इतिहासाला जोडणारे असंख्य धागे असायचे. त्या खोलीची जागा मग माळ्याने घेतली, आता त्या खोलीची जागा माझ्या घरात फक्त एका कप्प्याने घेतली आहे. तो एक कप्पासुद्धा कधी कधी जड होतो. जागा पुरत नाही. अनेक वेळा वाटतं फेकून द्यावं हे सगळं आणि नवीन वस्तूंसाठी जागा करावी. पण तरी निग्रहाने मी तो विचार डोक्यातून काढून टाकते आणि माझी कालकुपी मी शाबूत ठेवते.

माझ्या भाच्या जेव्हा माझ्या घरी राहायला येतात तेव्हा त्यांना सगळी कपाट उघडून उचका-उचकी करायला आवडते. मी लहान असताना माझ्या काकूच्या घरी जाऊन तेच करायचे. मग सापडलेल्या प्रत्येक वस्तूची गोष्ट ऐकायची. ही बाहुली कुठली, हा स्कार्फ कुठून आला, हे फोटो कुठले, कुणी काढले, त्या वेळी मी कुठे होते, होते की नव्हते.. ‘‘तू खूप छोटी होतीस, तुला कडेवर घेऊन आम्ही शिवाजी पार्कवर गेलो होतो..’’ असं काहीतरी ऐकलं की मला भरून यायचं, अजाणत्या वयातही आपण कुणाचे तरी कुणी तरी आहोत याचा खूप आनंद व्हायचा. ‘सेन्स ऑफ बिलॉन्गिंग’ सारखे शब्द माहीत नव्हते पण जेव्हा हा शब्द मी ऐकला, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर हेच चित्र उभं राहिलं.

म्हणून माझ्या पुढच्या पिढीला मी प्रेमाने ते करू देते. जमतील तेवढय़ा गोष्टी मीही सांगते. तुझी आजी अशी होती, पणजी हे करायची.. तू लहान असताना आम्ही हे केलं.. त्याही गप्प राहून ते ऐकतात. कदाचित मला स्पर्श करून गेलेली भावना त्यांनाही स्पर्श करत असेल. तर मग हा खजिना, ही दौलत, त्यांचीही कवच कुंडलं बनतील आणि त्या आमच्यापेक्षाही उंच भराऱ्या मारतील..

प्रतिमा कुलकर्णी

pamakulkarni@gmail.com

chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व लाइफ इज ब्युटिफुल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kathakathan by pratima kulkarni in loksatta chaturang
First published on: 20-01-2018 at 00:37 IST