scorecardresearch

आयुष्याचा अर्थ : ध्येयाच्या वाटेवरचा प्रवास!

‘आयुष्याचा अर्थ’ या विषयावर विचारमंथन केल्यानंतर मला जाणवलं, की मनुष्याचा जन्म कुठे होईल, कुठल्या कुटुंबात होईल हे त्याच्या हातात नसतं, पण त्यानंतरच्या सर्व गोष्टी त्याच्या हातात असतात.

आयुष्याचा अर्थ : ध्येयाच्या वाटेवरचा प्रवास!
आयुष्याचा अर्थ : ध्येयाच्या वाटेवरचा प्रवास!

शशिकांत वि. गद्रे

‘आयुष्याचा अर्थ’ या विषयावर विचारमंथन केल्यानंतर मला जाणवलं, की मनुष्याचा जन्म कुठे होईल, कुठल्या कुटुंबात होईल हे त्याच्या हातात नसतं, पण त्यानंतरच्या सर्व गोष्टी त्याच्या हातात असतात. या संदर्भात भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणत, ‘आयुष्याने तुम्हाला कोरा कागद, महत्त्वाचे रंग आणि कुंचला दिलेला असतो. चांगलं चित्र काढायचं की वाईट चित्र काढायचं हे तुमच्या हातात असतं.’

 आयुष्य म्हणजे एक दिनदर्शिका आहे अशी कल्पना केली, तर त्या कॅलेंडरच्या डिसेंबर महिन्यात मी सध्या आहे. (नुकतंच मी ८३ व्या वर्षांत पदार्पण केलं आहे.) मागे वळून पाहाताना माझ्या मनात असा विचार आला, की मला समज आल्यापासून आयुष्यात यशस्वी होण्याकरता जी तत्वं मी अनुसरली त्या तत्त्वांचा माझ्या मनात नकळत उगम झाला होता. पहिलं तत्व, जे माझ्या मनात घर करून राहिलं, ते म्हणजे- आयुष्यात आपल्यापुढे एक विशिष्ट ध्येय पाहिजे. शाळेत असताना मला खूप चांगले गुण मिळायचे आणि बऱ्याच वेळा पहिला नंबर यायचा. त्यामुळे शालेय जीवनात आणि कॉलेजमध्ये परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवणं हे माझं ध्येय झालं. मी सनदी लेखापाल झालो. त्यानंतर मी नोकरीची सुरूवात प्रथमश्रेणी अधिकारी म्हणूनच करेन हे माझं ध्येय झालं आणि जेव्हा मी आयुर्विमा महामंडळात प्रथमश्रेणी अधिकारी म्हणून रुजू झालो आणि ३२ वर्षांनंतर प्रादेशिक व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झालो तेव्हा मला ध्येयपूर्तीचं समाधान लाभलं. आतापर्यंत ध्येयपूर्ती झाल्यामुळे आपण आयुष्यात सतत यशस्वी व्हायला पाहिजे ही इच्छा मनात मूळ धरू लागली. यशस्वी होण्याकरता माझ्याकडे भरपूर सामुग्री होती. आई-वडिलांचे संस्कार, शाळेतल्या गुरुजनांची शिकवण, परीक्षेतल्या यशामुळे बक्षीस म्हणून मिळालेल्या पुस्तकांचं वाचन आणि अवांतर वाचन याचा मला पुढच्या आयुष्यात उपयोग झाला. त्या सर्व सुसंस्कारांना सुविचारांची जोड मिळाली. मला वाटतं, की संस्कृत श्लोकांमध्ये आणि सुभाषितांमध्ये जीवनाचं तत्त्वज्ञान ठासून भरलेलं आहे. लहानपणापासून माझ्यावर या श्लोकांचा व सुभाषितांचा विलक्षण प्रभाव पडला.

उदाहरणार्थ :  ‘शरीरं आद्यं खलु धर्मसाधनं’- म्हणजे आपलं शरीर सुदृढ असेल तरच आपण आपलं कर्तव्य चांगल्या तऱ्हेनं पार पाडू शकू.   ‘क्षणश: कणशश्चैव विद्यां र्अथ च साधयेत, क्षणत्यागे कुतो विद्या, कणत्यागे कुतो धनं’- वेळ जराही फुकट न घालवता ज्ञान मिळवावं आणि येणारा पैसा सोडून न देता व्यवस्थित अर्थार्जन करावं. संस्कृतच्या बरोबरीनं मी समर्थ रामदासांच्या मनाच्या श्लोकांचं मनन केलं. त्यामुळे आपण आयुष्यात चांगलंच काम केलं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे, वाईट विचारांना थारा देता कामा नये, हे माझ्या मनावर पक्कं ठसलं.

ध्येय गाठण्याकरिता या गोष्टींची आवश्यकता आहे- उत्कृष्ट नियोजन, त्याप्रमाणे कार्यवाही, दृढ आत्मविश्वास, अथक परिश्रम, तीव्र स्मरणशक्ती आणि सजग राहाणं. जीवनात यशस्वी होण्यासाठी मी खालील पाच सूत्रं अनुसरली – उत्कृष्ट शारीरिक, आर्थिक आणि मानसिक स्वास्थ्य जपणं   मनाचा समतोलपणा कधीही ढळू न देणं   इतरांनी आपल्याशी जसं वागावं अशी आपली अपेक्षा असते, त्याप्रमाणे आपण त्यांच्याशी वागावं.

 नेहमी विधायक कार्यच करीन आणि विघातक कार्य कधीही करणार नाही- हे सूत्र सतत अंमलात आणणं आपल्याला जे आवडतं ते मिळालं नाही, तर जे मिळेल ते आवडून घ्यायला पाहिजे. माझ्या कुटुंबीयांच्या संपूर्ण सहकार्यामुळे मी जीवनात आतापर्यंत यशस्वी झालो आणि तेदेखील आयुष्यात प्रगतीपथावर वाटचाल करत आहेत. मी आयुष्याचा अर्थ शोधताना शिकलेल्या आणि स्वत: आजमावलेल्या या काही गोष्टी. आपण यशस्वी झालो की दुसऱ्यांना मदत करून त्यांचं जीवन सुसह्य करू शकतो.

shgadre@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या