शर्मिला रणदिवे

‘‘दोन दिवस तुमच्या आयुष्यातले अतिशय महत्त्वाचे दिवस आहेत. एक तुम्ही जन्म घेता तो आणि दुसरा तुम्ही का जन्म घेतलात हे कळतो तो.’’ मार्क ट्वेनचं हे प्रसिद्ध वाक्य.

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
in Relationships Your self-esteem is in your hands
नातेसंबंध : आपला आत्मसन्मान आपल्या हाती!
There is no end to the songs of Dalits
गीतांचा भीमसागर… : दलितांच्या सुरांना अंत नाही!

 ‘मी का जगतेय?’ हा प्रश्न माझ्यासारखाच पन्नाशीच्या पुढच्या अनेकांना पडला असेल आणि या प्रश्नाचं झटपट उत्तर कुणालाच सापडत नसेल. विचार येतो, मी नसले, तर काय फरक पडणार आहे या जगात? काहीच नाही. मोठमोठे विद्वान गेल्यावर ‘जन पळभर म्हणतील..’ म्हटलं जातं. मग मी, माझ्यासारखे असंख्य तर सामान्य लोक. या विश्वाच्या पसाऱ्यातला एक बिंदूसुद्धा नाही! 

करोना परिस्थितीनं हिरावून घेतलेल्या कामाच्या संधी, त्यामुळे येणारं नैराश्य आणि त्यातूनही येणारा प्रश्न.. ‘मी का जगतेय?’ उत्तर आपणच शोधायचं आहे. आधी ‘कसं जगायचं’ या प्रश्नाचं. त्यातूनच कदाचित ‘का?’चंही उत्तर मिळेल. कसं जगायचं? रडतखडत? की आहे ती परिस्थिती मान्य करून? पन्नाशीनंतर साधारण सांसारिक जबाबदाऱ्या बऱ्यापैकी पूर्ण झालेल्या असतात. आयुष्यात बऱ्यापैकी स्थैर्य आलेलं असतं. बरीच वर्ष नोकरी/उद्योगधंदा करून झालेला असतो. मुलांची शिक्षणं वगैरे संपलेली असतात आणि मुलं आपापल्या पोटापाण्याला लागलेली असतात. आता यापुढेही मुलांची लग्नं, सुनामुलींची बाळंतपणं, हा विचार केला, तर ‘कारल्याचं बी पेर गं सूनबाई..’सारखं हे कधीही न संपणारं आहे. पण जगायला ठोस कारण नाही, म्हणून काय सामान्य माणसानं जगूच नये? ‘मी माझ्यासाठी जगते’ हे कारण दिलं, तर ते चुकीचं होईल का? मी सगळं सोडून (म्हणजे नोकरी) घरी बसायचं ठरवलं, तेव्हा आधी थोडासा ‘गिल्ट कॉम्प्लेक्स’ आला होता. म्हणजे ‘बाप रे! आता (लोकांच्या दृष्टीनं) काहीच न करता जगायचं?’ कारण नोकरी- व्यवसाय करणं यालाच आपल्याकडे ‘काही तरी करणं’ समजलं जातं. विचारा कुठल्याही गृहिणीला, ‘काय करतेस?’ या प्रश्नावर कसंनुसं हसत उत्तर येतं, ‘काहीच नाही!’.

पण नंतर मी विचार केला, कदाचित माझ्या सोडलेल्या जागेमुळे दुसऱ्या कुणाचं तरी आयुष्य मार्गी लागू शकेल. तेवढंच पुण्य माझ्या पदरात! त्यानंतर शांतपणे जरा आसपास बघून इतर सामाजिक भान जपण्याचा वगैरे विचार केला. तेव्हा माझं माझ्या कामवाल्या बाईकडे लक्ष गेलं. तिला मोबाइलवर फोन घेता येत होता, पण फोन करता येत नव्हता. कारण इंग्लिश नावं वाचता येत नव्हती. मग ठरवलं, आता वेळ आहे आपल्याला, तर तिला थोडंसं कामापुरतं तरी इंग्रजी शिकवू या. म्हणून केली सुरुवात. तिला सांगितलं, ‘‘बाई गं, फार नाही, तर फक्त तू तुझा अर्धा तास दे मला.’’ तिनं त्यावर ठामपणे, साफ नकार दिला. तरीही मी हरले नाही. तिचं काम चालू असताना, तिच्या मागे मागे फिरत, जमेल तितकं तिला तोंडी इंग्लिश शिकवायचा मी प्रयत्न केला. याचा परिणाम म्हणून ती महिनाभरानं काम सोडून गेली. माझ्याकडे बेताचं काम आणि हवी तेव्हा सुट्टी मिळत असूनसुद्धा! मग मी म्हटलं, ‘जाऊ दे.. आता आपण आपल्याचकरिता जगू या.’

  आतापर्यंत आयुष्यात जी विविध प्रकारची कामं केली, त्यात काही वर्ष एका शाळेतही नोकरी केली. ‘या मुलांचं पुढे कसं होणार?’ असं शाळेतल्या बऱ्याच मुलांबद्दल वाटायचं. तसं माझ्या शिक्षकांनापण एके काळी वाटतच होतं, की ‘या मुलीचं पुढे काहीच होणं शक्य नाही.’ पण झालं आपलं काही तरी आणि फार काही वाईट नाही झालं. तर मलाही उत्सुकता आहे, ती मुलं पुढे काय करतात ते बघण्याची. (काही तरी छानच करणार तीही खात्रीपण आहेच.)

माझ्या आयुष्याचा प्रवास ‘बैलगाडी ते विमान’ असा झाला. मला आता उत्सुकता आहे येणाऱ्या बदलांची. मला माझ्या खिशाला परवडेल एवढं जग बघायचं आहे. नवीन नवीन अनुभव गोळा करायचेत. अनुभव गोळा करताना, माझ्याकडून लोकांना जमेल तितकी मदत करायची आहे. (आणि काहीच नाही, तर हे अनुभव गोळा करताना, माझ्याकडून अर्थव्यवस्थेला चालना तरी नक्कीच मिळेल!)

 मी अधूनमधून केलेल्या लिखाणाला कधीकधी अचानकपणे प्रतिसाद मिळतात, ‘खूप आवडलं’ किंवा ‘अगदीच आम्हाला याच्याशी रीलेट करता आलं’, ‘वाचताना मजा आली’ असे प्रतिसाद मिळाले, की आपण कुणाच्या तरी आयुष्यात दोन-तीन मिनिटांचा का होईना, आनंद निर्माण करू शकलो, हे वाचून बरं वाटतं. मग असा थोडासा आनंद निर्माण करण्याकरिता, स्वत:च्या आणि दुसऱ्याच्याही आयुष्यात, जगायला काय हरकत आहे?

मार्क ट्वेनच्या वाक्याचा विचार केला तर वाटतं, अरे! या ‘का?’चं उत्तर आपल्याला अजून सापडलंच नाहीये. म्हणजे अजून दुसरा महत्त्वाचा दिवस आपल्या आयुष्यात आलाच नाहीये; पण बऱ्याचदा लक्षात येतं, आपण एवढी वर्ष जगलो, पण त्यातले किती क्षण आपण स्वत:करिता दिले? नुसतं वाचण्याकरिता जरी जगायचं म्हटलं, तरी अख्खं आयुष्य कमी पडेल. थोर लोकांनी एवढं चांगलं साहित्य निर्माण करून ठेवलं आहे, चांगली पुस्तकं, चांगले सिनेमे, हे सगळं बघायला, वाचायला एक आयुष्य पुरणार नाही. स्वत:करिता आनंदात जगणं म्हणजे मला नाही वाटत फार स्वार्थीपणाचा विचार आहे. अर्थात स्वत:करिता जगत असताना परमार्थ झाला तर साधायचाच आहे.

एका छान कवितेच्या काही ओळी आहेत,  

‘त्या घरटय़ातून पिल्लू उडावे

दिव्य घेऊनी शक्ति

आकाशाचे पंख असावे

उंबरठय़ावर भक्ति’

तर उडालेल्या पिल्लांकरिता उंबरठा म्हणूनही  जगायचं आहे!

sharmilaranadive@gmail.com