पुरुषी अस्मितेचे जड यम-नियम कळत नाहीत, पण तरीही ते पाळण्याचा अलिखित हुकूमनामा टाकूनही देता येत नाही, अशी विचित्र अवस्था अनेकदा होते पुरुषांची. पण त्यातून बाहेर काढणारे सशक्त हात जेव्हा हातात येतात तेव्हा ती एक ‘दास्तान’ होते… पुढे पुढे तर ते हातही सुटून जातात आणि उरतात फक्त आपले हात, दुसऱ्या एखाद्या ‘ढासळलेल्या’ पुुरुषाला शांतवणारी मिठी मारण्यासाठी.

प्रिय अंकित,

मी तुला पहिल्यांदा पाहिलं ते माझ्या शहरात. मुंबईत. तेव्हा अर्थातच मला हे ठाऊक असायचं काहीच कारण नव्हतं की, माझं जगणं इथून वेगळं वळण घेणार आहे. २०१२ वर्ष संपता संपता फार समृद्ध करून गेलं मला. लिंगभावाच्या कैदेतून मुक्त झालो मी. पुरुष असण्यापेक्षा अधिक माणूस झालो.

माणसं माणसांना सहेतूक वा अहेतूक कुठल्याही उद्दिष्टांनी का भेटेनात पण ती काही ना काही ठसा आपल्यावर उमटवून जातातच. माझ्या आयुष्यात तू आलास! तुझ्या भेटीपूर्वीचा मी आणि तुझ्या भेटीनंतरचा मी, अशी स्पष्ट भेदरेषा आता माझ्याजवळ आहे. अर्थातच या रेषेच्या अलीकडचा जो मी आहे, तो घडण्यात तुझा सिंहाचा वाटा आहे. अनेक नव्या नव्या गोष्टी तुझ्यामुळेच उगवून आल्यात म्हणण्यापेक्षा माझी स्वत:शी नव्यानं ओळख झाली, ही सर्वांत महत्त्वाची मिळकत. स्वत:विषयीचे सगळे भ्रम, भरती-ओहोटीचे टोकाचे खेळ खेळणारा अनात्मविश्वास, लोकापवादाचं भय, वेगवेगळ्या गोष्टींविषयी निष्कारण वाटणारी लाज, आपल्यावर सतत कुणाच्या तरी अदृश्य डोळ्यांचा पहारा असण्याचा तीव्र (गैर) समज – सगळ्या सगळ्यांतून अलगद हात धरून तूच बाहेर काढलंस मला. एक स्थिर, अविचल भूमी मिळवून दिलीस आणि एका रात्री अवचित निघून गेलास. कायमचा.

काय साम्य होतं आपल्या शरीरांमध्ये? आपली पावलं सारखी होती. तंतोतंत सारखी. त्यांचा रंग सारखा, बोटं सारखी, लांबी-रुंदी एकाही इंचानं कमी नाही की जास्त! दोघांच्याही पायांच्या घोट्यावर बारीकसा डाग. इतकंच काय, ‘एड़ियां फटने की त़कलीफ’ ही आपल्याला आपापल्या अनुवंशातून भेट मिळालेली. आणि हो, शूज विषयीची तीव्र अनासक्ती! दिल्लीत भेटलो तेव्हा जेऊन-खाऊन हॉटेलच्या रूमवर तंगड्या पसरून टीव्ही बघत होतो- तेव्हा अचानक लागलेला हा शोध! किती येड्यागत हसत सुटलो होतो! लूपच लागला होता… मॅडपणा नुसता! पण पावलांनी आपलं मैत्र घट्ट केलं!

आपलं नातं काय, आपण का भेटलो, याचा मी अनेकदा विचार करत बसतो. उत्तर गवसत नाही. मात्र अचानक गुप्तधन हाती यावं तसा एक अमूल्य ठेवा तुझ्या रूपानं माझ्या ओंजळीत अलगद् आला. हा ठेवा हाती लागला नसता, तर आता मी कसा जगत असतो, हा विचार आधीच्या प्रश्नांची धूळ फुंकरीनं सहज उडवून लावतो. बव्हंशी पुरुष, पुरुषी अस्मितेच्या भ्रमात कायम जगत असतात. तेवढंच काय पण त्या अस्मितेच्या शेपटाला चिकटून येणाऱ्या अन्य कशाकशाच्या भ्रमांत कायम फसलेले असतात आणि त्यात कायम खूशही असतात. अर्थात यालाही सणसणीत अपवाद आहेतच आणि कासवाच्या गतीनं का होईना पण त्यात वाढ होत चाललीय ही समाधानाचीच बाब आहे! माझी त्या अपवादांमध्ये गिनती होऊ शकली ती तुझं संपूर्ण सहकार्य आणि भक्कम पाठिंब्यामुळेच.

पुरुषत्वाच्या काचणाऱ्या आणि न पेलणाऱ्या नाना बेड्यांतून जखडलेल्या मला, तू माझ्याही नकळत सहज मोकळा करत केलास. खरंतर पुरुषी अस्मितेचे जड यम-नियम कळतही नव्हते पण तरीही ते पाळण्याचा अलिखित हुकूमनामा टाकूनही देता येत नव्हता, अशी विचित्र अवस्था होती. मुळातच गुलामाला आपल्या गुलामीची जाणीवच झालेली नव्हती अशीच गत!

‘पुरुषार्थ गाजवणं’, ‘पुरुषानं पुरुषासारखं वागणं’ वगैरे म्हणतात, म्हणजे नेमकं कसं वागणं, हे मला आजही कळत नाही पण कुणाच्याही तोंडून हे शब्द ऐकले की मला त्याच्याबद्दल अपार कणव दाटून येते. चूक त्या व्यक्तीची नसते. तिच्याभोवती पडलेल्या या अदृश्य बेड्यांचं न पेलवणारं ओझं तिला टाकून देता येत नसतं आणि हे जोखड आहे, हे सांगणारंही तिला कुणी भेटलेलं नसतं. त्या व्यक्तीच्या बाबतीत मग मी तू होऊन बघण्याचा प्रयत्न करतो. कधी जमतं, अनेकदा हुकतं. चिडचिड होते. मग पुन्हा तू माझ्याबाबतीत धरलेला धीर, मला माझा बाहेर पडण्यासाठी शांतपणे दिलेला वेळ, पुढे केलेला मदतीचा भक्कम हात आठवतो.

तुला चिडचिड करताना पाहिल्याचं मला आठवत नाही. किमान माझ्या पुढ्यात तरी नाही. मग माझं चिडचिडेपण माघार घेतं. मी शांत होतो आणि माझा मदतीचा हात मी त्या व्यक्तीच्या पुढ्यात धरतो. तो तुझ्या हातांइतका भक्कम नाही, हे मला ठाऊक आहेच. माझ्या मर्यादांची मला चांगलीच जाणीव आहे पण होता होईतो आपण अधिकाधिक निर्दोष होण्याचा प्रयत्न करू, हा मी स्वत:लाच दिलेला शब्द आहे. तुझ्या शांत आणि ठाम आवाजात. कानांत त्याची आस राहाते. कधीतरी जमेल ते…

वेगवेगळ्या टप्प्यांवर फार गरज असते माणसाला मदतीची. मदतीची नसली तरी किमान सोबत असण्याची तरी. एवढं तरी आपण करू शकतोच. जसा तू माझ्यासाठी होतास. अजूनही आहेस, किंवा असं म्हणूया की आता मी, ‘तू’ होण्याच्या प्रक्रियेत आहे. रेग्यांची ‘आनंदभाविनी’ पुढे पुढे मोर येण्याची फिकीर न करता नाचत राहाते, मनातून आनंदी होऊन, अगदी तस्संच! जे जे हवं ते ते आपणच व्हायचं आणि एका सामर्थ्याच्या क्षणी द्वैताची वेस ओलांडायची.

परवा ‘एनसीपीए’ला एका कार्यक्रमासाठी गेलो होतो. तिथे एक जुना मित्र अवचित भेटला. वयानं मोठा. मध्यंतरीच्या काळात अनेक अडचणींना तोंड दिलं त्यानं! सगळ्यांशी संपर्क तोडला होता. कशालाच दाद देत नसे. तो असा अचानक समोर आला. डोळे खोल गेलेले. चेहरा थकलेला. दोन मिनिटं ओळखायलाच लागली! मी गर्दीतून वाट काढत त्याच्यापाशी आलो आणि त्याला घट्ट मिठी मारली. ‘‘कसा आहेस?’’ विचारलं तर ‘‘शहाणा झालो आता’’, एवढंच म्हणाला. मला झटकन तू आठवलास. मला बोलायचं नाही हे तुला बरोबर कळायचं. तू शांत व्हायचास. नि:शब् द सोबत करायचास. ते समंजसपण कधीतरी वारशात मला मिळालं असावं, असं वाटतं. आताही त्या मित्रासोबत फक्त शांतपणे असावंसं वाटलं. नकोच प्रश्न आणि ती जागाही नव्हती आणि वेळही. त्याला बोलावंसं वाटेल तेव्हा तो बोलेल. आता, याक्षणी त्याची शांत सोबत करूया. नुसत्या असण्यानंही मोठा धीर येतो.

तरीही, एवढं घडलं तरीही एक प्रश्न उरतोच. तुला वाटली होती का अशा आधाराची गरज कधी असणार? निश्चितच असणार. त्याशिवाय का हे बळ मिळालं तुला? आपण स्वयंभू नसतो. कुणाकुणाकडून काय काय उचलत असतो. कदाचित माझं जगणं सुकर व्हावं म्हणूनच आपण भेटलो असू. ते काम पूर्ण करून नीरव पावलांनी निघून गेलास. अलगद हातांतून हात काढून घेतलेस. मी समूळ हादरलो. तुझे हात शोधत राहिलो. तळ्यात-मळ्यातचा जीवघेणा खेळ आपल्या आयुष्यात नव्यानं सुरू होणार की काय, या विचारानं भ्यायलो. जुन्या गोष्टी आपली अणकुचीदार नखं बाहेर काढू लागल्या. वेड लागायची पाळी आली. पण सावकाश सावकाश लक्षात येत गेलं, मोर गेला. आता आपणच मोर. मग तर उत्तरच सापडलं.

‘राग दोस जगबंध करत है इनको नास करेंगे,

मर्यो अनंत काल जें प्रानी सो हम काल हरेंगे।

तू अज्ञात मितीत वज्रासनात पावलं बांधून ‘दास्तानगोई’ (पर्शियन कथन कला प्रकार) खेळतोयस आणि मी इथे! वज्रासनात बांधलेली पावलं निसटत नाहीत. ती आधार देत राहातात कण्याला. तंतोतंत सारख्या असलेल्या पावलांनी आपल्यातलं मैत्र घट्ट केलं होतं अन् कधीतरी अस्तित्वात असलेली साम्य लुप्त झाली तरी चिरंजीव राहातात, यावर माझा तितकाच अढळ विश्वास आहे. आता मी रिता नाही. भरभरून अगदी दुथडी भरून वाहतो आहे. हे सारं तुझंच आहे आणि जोवर चेतना आहे तोवर सारा ऐवज त्या वजनानं आणि अदबीनं सांभाळेन. पुरुष असण्यापेक्षा कणाकणानं माणूस होत राहीन. आपली कुठेतरी पुन्हा भेट होईल तेव्हा निखळ माणूस म्हणून भेटेन, हा माझा शब्द आहे.

आनंदी रहा. भेटू लवकरच.

तुझाच –

अक्षय.

akshayshimpi1987@gmail.com