नीलिमा किराणे

दोन माणसांमधले वाद, मग ते घरातले असोत की बाहेरचे. मनाला त्रास देणारेच असतात. त्यांच्या वादांत पडणं, त्या लोकांची समजूत घालणंही अनेकदा अशक्य ठरतं. कारण ते आपापल्या भूमिकांवर ठाम असतात. विशेषत: बाबा-मुलाच्या भांडणात आईची अवस्था अगदी दीनवाणी होऊन जाते. ‘सज्ञान माणसं अशी का वागतात?’ या प्रश्नाचा भुंगा मागे लागतो. अशा वेळी त्रास देणारे प्रश्नच बदलून पाहिले तर?

mp naresh mhaske marathi news
आनंद दिघेंप्रमाणेच मुख्यमंत्री शिंदे यांच्या काळात न्याय मिळाला – खासदार नरेश म्हस्के
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
parents children self reliant chaturang article
सांदीत सापडलेले : काळजी
gibbon monkey dance marathi news
विश्लेषण: गिबन माकड जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी चक्क नृत्य करते? काय सांगते नवे संशोधन?
Prajwal Revanna Rape Victime
Prajwal Revanna Chargesheet: ‘बलात्कार करताना पीडितेला हसायला सांगायचा’, प्रज्ज्वल रेवण्णाच्या विकृतीचा कळस
Numerology: Why People Born on 9, 18, and 27 Tend to Be Angry and Cause Self-Loss
‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांच्या नेहमी नाकावर असतो राग, रागाच्या भरात करतात स्वत:चे नुकसान
america parents punished for kids crime,
विश्लेषण: अल्पवयीन मुलांच्या गंभीर गुन्ह्यांसाठी पालकांनाच अटक? अमेरिकेतील दोन राज्यांचा अनोखा पायंडा… भारतात काय स्थिती?
vladimir putin in touch with india china brazil over ukraine war
अन्वयार्थ : पुतिन यांचे ‘मित्र’ !

सायली बऱ्याच वर्षांनी निवांतपणे माहेरी आली होती. सुरुवातीला परदेशातला नवीन जॉब म्हणून, नंतर आई-बाबाच तिच्याकडे चार महिने राहायला आले म्हणून आणि नंतर करोनाच्या साथीमुळे येणं लांबतच राहिलं. यंदा मात्र तिनं जमवलं आणि एकटीनं का होईना, तीन आठवडयांसाठी ती भारतात आली.

जुने मित्रमैत्रिणी, त्यांच्याबरोबर शाळा-कॉलेज, नंतर मिसळ-पावभाजी-मस्तानी मिळणाऱ्या ‘नॉस्टॅल्जिक’ ठिकाणांना भेटी वगैरे झाल्यावर तिला खरोखर ‘माहेरी’ आल्यासारखं वाटलं. सुरुवातीचे कौतुकाचे दिवस संपल्यानंतर मात्र जुन्या ओळखीचं एक अस्वस्थपण आतून जाणवायला लागलं. आपले बाबा आणि लाडका भाऊ निनाद यांचं ‘अजूनही’ पटत नाही हे तिला स्पष्ट दिसत होतं. एके दिवशी असाच एक जोरदार वाद होऊन बाबा आणि निनाद आपापल्या कामाला निघून गेले, तरी त्यांच्या चढलेल्या आवाजाचे पडसाद तिच्या मनात रेंगाळत राहिले. लग्नापूर्वीच्या साऱ्या आठवणी सायलीच्या डोळयांसमोरून सरकत गेल्या..  लहानपणापासून बाबांचे दोघंही लाडके, पण निनाद मोठा होत गेला, तसतसा बाप-लेकांतला संवाद बिघडत गेला. प्रेम, आपुलकी असूनही दोघांनाही एकमेकांचं काहीच पटत नसायचं. वादाला कुठलंही निमित्त पुरायचं. छान गप्पा चालू असताना अचानक हमरीतुमरी सुरू व्हायची. आईला चढलेले आवाज अजिबात सहन व्हायचे नाहीत. त्यामुळे ते दोघं जरा जास्त वेळ समोरासमोर असले की आईच कावरीबावरी व्हायची. भांडण सुरू झाल्यावर दोघांनाही समजावत ती घर शांत ठेवायचा प्रयत्न करायची. अति झाल्यावर, ‘काय करू गं यांचे वाद थांबवण्यासाठी?’ असं सायलीलाच हताशपणे विचारायची. सायलीला आठवलं, आपण लग्नानंतर परदेशी गेल्यावरही बापलेकांच्या भांडणांबद्दल आईची फोनवर तक्रार असायचीच. हल्ली मात्र बऱ्याच महिन्यांत आई त्याबद्दल बोलली नव्हती हे तिच्या अचानक लक्षात आलं.पण आई अजूनही रोज हे वातावरण सहन करतेय. हल्ली बोलली नाही, याचा अर्थ अंतरामुळे आपण परके होत गेलो का? आता सगळं सुरळीत झालंच असेल, असं सोयीस्करपणे गृहीत धरून आपणही आपल्या जगात रमून गेलो.. या जाणिवेनं तिला अपराधी वाटलं. 

‘‘आई, अजूनही यांचे तसेच वाद? एरवी दोघंही इतके समंजस. मग एकमेकांसमोर आले की यांचं काय बिनसतं गं? कशी सहन करतेस तू हे वातावरण? एवढयात बोललीही नाहीस माझ्याशी?’’ तिच्या अस्वस्थ प्रश्नांवर आई सहजपणे हसली. पूर्वीच्या हताशपणाचा मागमूसही त्यात नव्हता.

‘‘जाऊ दे गं, त्यांचं नेहमीचं आहे. होतात थोडया वेळानं नॉर्मल. मी लक्षही देत नाही आणि त्रासही करून घेत नाही आता.’’

‘‘घरात शांती नसते म्हणून पूर्वी रडायचीस. एवढा बदल कसा घडला तुझ्यात?’’ सायलीनं नवलानं विचारलं.

‘‘अगं, ‘या बापलेकांचं नातं असं का? कधी सुधारणार?’ या प्रश्नांनी मला किती तरी वर्ष छळलं. तुला ते माहितीय. वाद झाल्यावर मी दोघांनाही गोंजारायला जायचे, पण दोघंही हट्टी. कधीच चूक मान्य करणार नाहीत स्वत:ची. ‘सॉरी’ म्हणणार नाहीत एकमेकांना. ‘माझंच बरोबर’चा हेका सोडणार नाहीत. मी ‘बफर’! दोन्हीकडून धक्के खात मी दोघांचंही ऐकून घेणार. कधी समजावणार, कधी रागावणार..’’

‘‘आठवतंय मला.’’

‘‘दोन वर्षांपूर्वी एकदा त्यांच्यात अशीच कसल्या तरी फालतू कारणावरून खडाजंगी झाली. त्या दिवशी आईला- तुझ्या आजीला बरं नसल्याचा निरोप आल्यामुळे मला गावी जायची घाई होती. कामं निपटण्याच्या नादात यांच्या भांडणाकडे मी लक्ष दिलं नाही. आईसाठी पंधरा दिवस तिकडेच राहावं लागलं, तेव्हा मात्र माझ्या मनाला हे दोघं नीट राहात असतील ना? याचा घोर लागला होता. परत आल्यावर बघते तर मात्र दोघंही मजेत. अधूनमधून थोडी नॉर्मल फटकेबाजी होती, तेवढीच. माझ्या मध्यस्थीविना त्यांचं काही नडलं नव्हतं. आपल्या पोळया करणाऱ्या मंगलाबाई म्हणाल्या, ‘वहिनी, तुम्ही नसताना वाद अगदी कमी. एकमेकांचं बघत होते दोघं. घर शांत होतं.’ मला बरं वाटलं. मी नसल्यामुळे त्यांना जबाबदारीची जाणीव झाली, एकमेकांची किंमत कळली, असं वाटलं. पण शब्दश: दुसऱ्या दिवशीपासून येरे माझ्या मागल्या!’’  ‘‘मग? झापलंस दोघांना?’’ 

‘‘नाही. त्या दिवशी मी स्वत:लाच नव्यानं काही प्रश्न विचारले. ‘यांचं दोघांचं नातं त्यांना व्यवस्थित हँडल करता येऊ शकत होतं, तर मग मी इतकी वर्ष कशासाठी ताण घेत राहिले?’ जरा पेटतंय असं वाटलं की पाणी घेऊन विझवायला का धावत राहिले? निनाद लहान होता, शिंगं फुटण्याच्या वयात होता, तेव्हा त्यांच्यामध्ये पडून घरात शांती ठेवणं ठीक होतं. पण आता दोघंही मोठे, सज्ञान असतानाही मी तशीच ‘आईगिरी’ का करतेय? वर्षांनुवर्ष दोघांचंही लहान मुलांसारखं वागणं बदलत नसेल, तर तेच तेच समजावण्यात मी किती वेळ आणि शक्ती वाया घालवायची? ’’

 ‘‘मग लक्षात आलं, त्यांनी भांडत राहायचं आणि मी समजावत राहायचं, या पॅटर्नची तिघांनाही इतकी सवय झालीय, की अजूनही भूमिका तशाच राहतात. वेगळं वागणं सुचतच नाही. मग आणखी एक प्रश्न पडला, ‘हे गेली पंधरा वर्ष असंच चालू आहे, याचा अर्थ, आणखी कितीही वर्ष चालू राहू शकतं. म्हणजे हा ताण आपण आयुष्यभर असाच झेलत राहणार का? मला तरी आता हे नक्की नकोय. मग करायचं काय?’ उत्तर आलं, आपल्या रक्तात भिनलेली भूमिका, सवयीचं वागणं बदलायचं.’’

‘‘खरंच की!’’ सायलीलाही आता काही तरी उलगडत होतं.

‘‘मग प्रश्न आला, ‘या दोघांच्या वादांमध्ये माझी जबाबदारी किती?’ यांना दोघांना वादविवाद करून जिंकण्यात मोठेपणा वाटतो. एरवी कुठलेही निर्णय घेताना त्यांना माझी फारशी गरज पडत नाही. म्हणजे असंही माझ्या हातात काय आहे? त्यांच्या नात्याची जबाबदारी माझी कशी? त्यांना त्यात बदल हवासा वाटला, विचार करावासा वाटला, तर ते करतील. त्यांचं नातं जसं आहे त्याची किंवा ते बदलण्याची जबाबदारी त्यांचीच आहे.’’

‘‘अगदी बरोबर.’’ सायलीला पटलं.

‘‘मग पुढचा प्रश्न आला, ‘जबाबदारी माझी नसेल तर मला इतका कशाचा त्रास होतोय?’ या प्रश्नाच्या उत्तराला मात्र मला बराच वेळ लागला, पण सापडलं. ‘चित्रपटात, कथा-कादंबऱ्यांत अशा छान नात्याची चित्रं रेखाटलेली असतात. माझ्याही मनात बाप-लेकाच्या संवादी नात्याची तशी एक कल्पना आहे. मला हवंय तसं सहज, शांत नातं त्यांच्यात नाहीये याचा मला त्रास होतोय, म्हणून मी जिवापाड धडपडतेय.’ पण माझ्या आणि त्यांच्या मनातल्या नात्याच्या व्याख्याच जर वेगवेगळया असतील, तर मी कितीही त्रास करून घेऊन काय बदलणार आहे? इतके वेळा समजावूनही त्यांना बदलावंसं वाटत नाही, याचा अर्थ त्यांना बदलायचंच नाहीये किंवा माझ्यासाठी नात्यातला समंजस संवाद जेवढा महत्त्वाचा आहे तेवढा त्यांच्यासाठी नाहीये. कदाचित दोन पुरुषांच्या नात्यात स्वत:चा इगो सुखावणं जास्त महत्त्वाचं असेल. काहीही कारण असो, दोन सज्ञान माणसांनी एखाद्या विषयात लहानच राहायचं ठरवलं असेल आणि मला त्रास होण्याशी त्यांना काही घेणंदेणं नसेल, तर त्रास करून घेण्याचा माझा प्रॉब्लेम मलाच सोडवायला हवा! मला चढलेले आवाज सहन होत नाहीत ही त्यातली महत्त्वाची गोष्ट. त्यामुळे मी दरवेळी कासावीस होत होते. आईगिरीच्या सवयीमुळे, समजूत घालत राहून त्यांना ‘अटेन्शन’ देत  होते. त्यातून नकळत त्यांचा इगोच कुरवाळला जात होता! हे उत्तर बुद्धीला पटल्यानंतर मात्र मी त्यांच्या वादांत मध्ये पडून समजावणं बंद केलं. गरज वाटते तेव्हा माझा मुद्दा एक-दोन वाक्यांत एकदा अवश्य सांगते, पण ‘पटलंच पाहिजे’चा आग्रह नसतो. आता हताश वाटत नाही, कारण समजून उमजून त्यातून बाहेर पडलेय. गंमत म्हणजे, तेव्हापासून मला चढलेल्या आवाजांचा त्रास होईनासा झाला आणि गंमत म्हणजे, मी दुर्लक्ष करायला लागल्यावर त्यांच्या भांडणाचा वेळ आणि ‘फ्रीक्वेन्सी’ही कमी झाली.’’

‘‘वा. मस्तच!’’ सायलीला मज्जाच वाटली.

‘‘तर सायली, मेंदूला एवढं घुसळल्यानंतर मला माझ्याकडूनच मिळालेलं उत्तर सोप्या शब्दांत असं होतं- ‘दोन सज्ञान माणसांचं ‘बेबीसिटिंग’ करणं बंद कर! तू तुझं आयुष्य जग. त्यांच्या वागणं आणि परिणामांच्या जबाबदारीचं त्यांना पाहू देत!’ तसा अजूनही कधी कधी, ‘मेरे बेटे और पतीका रिश्ता मेरे सपनेवाले रिश्ते जैसा क्यूं नहीं?’ असा प्रश्न पडतो.. पण गरगरणाऱ्या विचारचक्राची इतिश्री झालीय!’’ आई हसत म्हणाली.

‘‘माझ्या डोक्यात नवं चक्र सुरू केलंस आई! माझ्या घरातल्या कोणकोणत्या ‘अॅ डल्टस्’चं बेबीसिटिंग मी करतेय ते शोधावं लागणार आता!’’ हसण्याची उकळी आवरत सायली म्हणाली.

neelima.kirane1@gmail.com