डॉ. शुभांगी पारकर

अल्कोहोल किंवा ड्रग्सच्या समस्यांमुळे भारतात दर तासाला एक आत्महत्या होत आहे. दारूच्या व्यसनाचं तीव्र स्वरूप, त्याबरोबरीनं येणारी नैराश्यासारखी लक्षणं आणि आत्महत्या यांचा जवळचा संबंध असल्याचं विविध संशोधनं सांगतात. मात्र कुटुंबीयांचा पाठिंबा, योग्य मार्गदर्शन आणि समुपदेशन यांच्या सहाय्यानं अशा आत्मघाती विचार करणाऱ्या मद्यपी व्यक्तीस त्या विचारांपासून परावृत्त करता येतं.

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…

अनेक आत्महत्यांमध्ये वा तशा प्रयत्नांमध्ये मद्यधुंदता महत्त्वाची भूमिका बजावते. जेव्हा बिकट समस्या त्रास देऊ लागतात, तेव्हा काही जण त्यापासून मानसिकदृष्टय़ा पळून जाण्यासाठी मद्याचा आधार घेतात. प्रश्न सुटत नाहीच, पण अनेकदा त्या नशेच्या अमलाखाली लोक आत्महत्या करतात, असा अनुभव आहे.    डॉक्टरांच्या मते असं का घडतं याचं कारण मद्यपान केल्यानं व्यक्तीत असणारा आत्मसंयम कमी होतो. नशेत असलेल्या लोकांना आपल्या अनेक निर्णयांचे फायदे आणि तोटे समजून घेणं आणि समस्यांवर उचित उपाय शोधणं जमत नाही. तुम्ही शांत आणि निवांत असताना तुमच्या मनात आत्महत्येचा विचार आला, तरीही त्या विचारांवर अंमल न करण्याचं तुमच्या मनाकडे आत्मनियंत्रण असतं. कारण तुम्ही तुमच्या अशा विध्वंसक कृतीचं विश्लेषण करू शकता. तुम्ही मदिरेच्या आहारी जाता, तेव्हा हे आत्मनियंत्रण निघून जातं, कौटुंबिक जबाबदारीची जाणीव लुप्त होते, तुम्ही सामाजिक सूज्ञता गमावून बसता. त्यामुळे मद्यपान केल्यानंतर तुमच्या मनात आत्महत्येचे विघातक विचार येऊ शकतात.  लोकांचा सर्वसामान्य विश्वास असा आहे, की मदिरापान केल्यावर मन हलकंफुलकं होतं आणि त्यामुळे मनावरचा ताण निघून जातो. पण वैद्यकीय अभ्यासानुसार मद्यपान करणारे लोक शांत वाटतात त्यापेक्षा जास्त उदासीन असतात. या दोन घटकांच्या संयोजनामुळे तुम्ही मद्यपान करत असता तेव्हा आत्महत्येचा धोका जास्त असतो. अल्कोहोल किंवा ड्रग्सच्या इतर समस्यांमुळे दर तासाला भारतात एक आत्महत्या होत आहे, यावरून हे प्रकरण किती गंभीर आहे याची  कल्पना येते.

    बावीस वर्षांच्या अमितला ‘इमर्जन्सी’ कक्षातून व्यसनमुक्ती विभागात पाठवलं होतं. त्यानं आपल्या मनगटावर बऱ्यापैकी खोल घाव केला होता आणि त्यामुळे त्याच्या भावानं त्याला रुग्णालयातील आपत्कालीन विभागात आणलं होतं. त्या वेळी त्याचा तीव्र क्षोभ होत होता. त्याच्या मैत्रिणीशी अलीकडेच त्याचं कडाक्याचं भांडण झालं होतं. या मैत्रिणीशी त्याचं लग्न ठरलं होतं, पण त्याची अलीकडे वाढलेली दारूची सवय, अनियंत्रित वर्तन आणि त्यामुळे नोकरी गमावणं या बऱ्याच गोष्टींमुळे ती प्रचंड अस्वस्थ झाली होती. गेल्या दोन महिन्यांपासून त्याच्यात नैराश्याची लक्षणं विकसित झाली होती. त्याचबरोबर त्याचा एकांतपणा वाढू लागला होता, त्यात निद्रानाश जडला आणि भूक कमी झाली होती. तो नोकरीला जाण्याऐवजी दिवसभर झोपून राहायचा. मैत्रिणीबरोबरच्या भांडणामुळे तो आपल्या बहिणीलाही दोष देत होता, कारण त्याची मैत्रीण त्याच्या बहिणीची मैत्रीण होती. तो आपल्या बहिणीला म्हणायचा, ‘‘मी त्या निर्दयी बाईचे तुकडे तुकडे करीन. मी मरायच्या आधी ती या जगातून गेलेली असेल.’’ पूर्वीच्या आत्महत्येच्या प्रयत्नांचा आणि भांडणात इतरांवर हल्ला केल्याचा त्याचा पूर्वेतिहास होता, ज्यामुळे त्याला पोलिसांनी पूर्वी पकडलंही होतं. त्याच्या बहिणीनं माहिती दिली, की तो खरंतर अतिशय चांगला मुलगा आहे, तसा वागतोही तो रोज, पण दारू प्यायल्यावर त्या नशेत तो असा बेधुंद होतो आणि वाहावत जातो. आम्ही घेतलेल्या अमितच्या मुलाखतीत तो अलीकडे घडलेल्या घटना आणि त्याची वागणूक, याबद्दल ठाम दिसला नाही. त्याचा हात तीक्ष्ण शस्त्रानं कापला गेला होता, यामागे असलेला आत्महत्येचा इरादा तो साफ नाकारत होता. परंतु तरीही त्याबद्दल त्याच्या मनात कुठेतरी द्वैत असल्याचं तो कबूल करत होता. अल्कोहोलचं व्यसन आणि संबंधित आत्महत्या, आत्महत्येची विचारसरणी आणि आत्महत्येचे प्रयत्न, हे आज जगात सार्वजनिक आरोग्याचे अत्यंत चिंतेचे विषय आहेत. कारण अल्कोहोलच्या वापरामुळे त्या व्यक्तींची योग्य निर्णय घेण्याची क्षमता कमजोर होते, प्रतिबंध कमी होतो आणि भावनिक आवेगात वाढ होते. कार्ल मेनिंगर या सुप्रसिद्ध मनोचिकित्सकानं आत्महत्येच्या (क्रोनिक सुसाइड) आणि जाणूनबुजून स्वत:ला हानी पोहोचवणाऱ्या वृत्तीसाठी व्यसनाला एक केंद्रीय घटक (फोकल) म्हणून संबोधलं होतं.

  अमेरिकेतील आत्महत्याग्रस्तांपैकी जवळजवळ एक चतुर्थाश लोक आत्महत्येच्या वेळी दारूच्या नशेत होते, असं एका नवीन अभ्यासात आढळून आलं आहे. जे लोक दारूच्या नशेत आत्महत्या करतात, त्यांच्यात इतर सर्वसाधारण लोकांपेक्षा अतिहिंसक मार्गानं- उदा. बंदूक वापरणं, उंचीवरून पडणं किंवा गळफास लावून घेणं, या मार्गानी आत्महत्या करण्याची शक्यता जास्त दिसून येते. आत्महत्या करून मृत्यू पावलेल्या ५८,००० लोकांच्या रक्तातील अल्कोहोल पातळीचं या संशोधकांनी विश्लेषण केलं. यातील २२ टक्के लोक आत्महत्येच्या वेळी अतिमद्यधुंद अवस्थेत असल्याचं त्यांना आढळलं. त्यात २४ टक्के पुरुष आणि १७ टक्के स्त्रिया होत्या. आत्महत्या केलेल्यांपैकी जवळजवळ निम्म्या लोकांना दारूचं व्यसन किंवा मद्यपानाची समस्या होती किंवा आत्महत्येशी संबंधित वर्तनाचा इतिहास होता, असं या अभ्यासात आढळून आलं. तीन चतुर्थाशांना निदान झालेल्या मानसिक आरोग्य समस्यांचा इतिहास होता. तरुण, अमेरिकी भारतीय, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातील किंवा कमी शिक्षण असलेल्यांमध्ये दारूशी संबंधित आत्महत्यांचं प्रमाण जास्त होतं. एक आडाखा असाही आहे, की जीवनातील मोठय़ा, जटिल ताणतणावांना किंवा संकटांना तीव्र प्रतिसाद देणाऱ्या या व्यक्ती होत्या, ज्यांनी आत्महत्येच्या काही तासांआधीच बंदूक विकत घेतली होती, मद्यपान केलं होतं आणि अल्कोहोलमुळे त्यांच्या मनावरचा तोल गेला होता. खरंतर आत्महत्या करून मरता येणं शक्य व्हावं म्हणून ते जास्त प्रमाणात मद्यपान करत, बेधुंद, बेकाबू होत होते. यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे, तो म्हणजे महाविद्यालयात जाणाऱ्या तरुणांच्या, कुटुंबाला व्यथित करणाऱ्या आत्महत्या आणि नशेचा प्रादुर्भाव. एका तरुणाची आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी वाचत असताना असं दिसून आलं, की त्याच्या मनातली अपराधीपणाची भावना त्याला आत्महत्येच्या मार्गावर घेऊन गेली. त्याला कॉलेजच्या मित्रांबरोबर दारूचं व्यसन लागलं होतं आणि अत्यंत हुशार असलेल्या त्या मुलाची अभ्यासात पार घसरगुंडी झाली होती. त्याच्या दारूच्या व्यसनामुळे घरी सगळेच अस्वस्थ होते. सगळय़ांची त्याच्याबद्दलची उदात्त स्वप्नं धुळीला मिळाली होती. हे सगळं लक्षात येत असताना तो मात्र दारूच्या भोवऱ्यात पुरा अडकला होता. आपण कुचकामी झालो आहोत आणि कुटुंबावर भार बनून राहिलो असल्यानं या जगण्याला आता काही अर्थच उरलेला नाही, असा उल्लेख त्यानं चिठ्ठीत केला होता. त्या दिवशी व्यसनामुळेच त्याची घरात खडाजंगी झाली होती. घरात दारू पिऊन कुणालाही काही कळू न देता तो बाईकवरून अत्यंत वेगानं निघाला आणि अपघातात त्याचं निधन झालं. अर्थात ती जाणीवपूर्वक केलेली आत्महत्याच होती. आपण आपल्या कुटुंबावर ओझं असल्याच्या भावनांचा आणि अल्कोहोलच्या वापराचा परस्परसंवादी प्रभाव विशेषकरून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रासंगिक ठरू शकतो.

अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी ताणतणावांचा सामना करण्यासाठी जास्त प्रमाणात अल्कोहोलचं सेवन करतात, तेव्हा त्यांना नकारात्मक सामाजिक परिणामांचा सामना करण्याची वेळ येते. उदाहरणार्थ- अल्कोहोलच्या व्यसनामुळे कायदेशीर परिणाम किंवा शैक्षणिक नुकसान भोगाव्या लागणाऱ्या या विद्यार्थ्यांना कुटुंबाकडून आर्थिक मदत किंवा भावनिक समर्थनाची सतत मागणी करावी लागते. त्यामुळे कुटुंबात अनेक वेळा ते भुईला भार असल्याची धारणा वाढू शकते. अल्कोहोलच्या वापराच्या या विविध सामाजिक समस्यांसह आपण इतरांवर ओझं असल्याच्या भावनांमुळे नैतिक खच्चीकरण होऊन त्यांच्यात आत्महत्येचा धोका वाढू शकतो. अलीकडील संशोधन असंही सूचित करतं, की आपण कुटुंबावर भार झालो आहोत, या हताश जाणिवेबरोबर, आपल्या विसंबण्याजोग्या नात्यांतसुद्धा एक प्रकारचा गढूळ दुरावा आला आहे, आपण एकटे पडलो आहोत, हे अत्यंत ठळक भावनिक भय मदिरेत बुडून, आपली कौटुंबिक जबाबदारी विसरून गेलेल्या लोकांमध्ये सातत्यानं दिसतं. आईनं घराबाहेर काढलं, भावंडं विचारत नाहीत, बायको घर सोडून गेली, मुलं ऐकत नाहीत, अशा अनेक मनाविरुद्ध घडणाऱ्या घटना या लोकांच्या जीवनात आत्महत्येपूर्वी घडलेल्या दिसून येतात. अभ्यासातून असं दिसून आलं आहे, की ज्या लोकांना अल्कोहोलची समस्या आहे त्यांच्यात आत्महत्येचं प्रमाण इतरांपेक्षा दहा पट जास्त आहे.

मद्यपानाच्या समस्येवर उपचार घेतलेले चाळीस टक्के लोक किमान एकदा तरी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं कबूल करतात. दारू पिऊन संघर्ष करणाऱ्या आणि आत्महत्येचा विचार करणाऱ्या व्यक्तींनी मद्यपान सोडल्यास आत्महत्येचा धोका कमी असतो. मद्यपानाचा सामना करणाऱ्या लोकांमध्ये नैराश्य असेल तर आत्महत्येचा धोका अधिक असतो. आत्महत्या केलेल्या ८० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांचा इतिहास केवळ दारूचा गैरवापरच नाही, तर त्याबरोबर असलेला नैराश्याचा आजार हादेखील आहे. बरेच लोक तणावात, नैराश्यात, चिंता किंवा इतर मानसिक आजार, व्यक्तिमत्त्व विकार किंवा एखाद्या आघाताचा सामना करण्याचा प्रयत्न करत असताना, समस्या आणि ताण विसरण्याच्या केविलवाण्या प्रयत्नात जास्त प्रमाणात मद्यपान करतात. मद्यपानामध्ये अशा व्यक्तींचा नाश करण्याची शक्ती आहे, ज्यांना पूर्वी कधीही आरोग्य समस्यांचा इतिहास नव्हता. परिणामी, जेव्हा एखादी व्यक्ती त्याला आरोग्याशी संबंधित वा इतर समस्या असताना अल्कोहोलचा प्रयोग कुबडी किंवा समस्येशी प्रतिकार करण्यासाठी म्हणून करते, तेव्हा शेवटी ती त्या मादक पिंजऱ्यात फसून स्वत:चा जीव घेण्याची शक्यता जास्त असते. बहुतेक प्रकरणांमध्ये दीर्घ मुदतीचा अल्कोहोलचा गैरवापर आत्महत्येचा विचार अधिक वारंवार आणि अधिक प्रखर बनवतो. त्यानंतर आत्महत्येच्या प्रयत्नांची शक्यता वाढते. मद्यप्राशन करत असलेल्या अशा व्यक्ती, ज्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला किंवा आत्महत्येमुळे जे मृत्यू पावले, त्यांच्यात मुख्यत्वेकरून जीवनातील तणावपूर्ण घटना, विशेषत: परस्पर अडचणी, सामाजिक आधाराचा अभाव, एकटं राहाणं, अत्यंत आक्रमकता/ आवेग, नकारात्मक मानसिकता, निराशा, तीव्र मद्यपान, कोकेनसारखी इतर व्यसनं, आर्थिक चणचण, बेरोजगारी, गंभीर वैद्यकीय आजार, आत्मघाताचा संशय व्यक्त करणारा संवाद आणि आधीचं आत्मघाती वर्तन, अशा गोष्टी प्रामुख्यानं आढळतात. जोडीदाराबरोबर सातत्यानं विवाद आणि तंटे मद्यपी व्यक्तींमध्ये त्यांच्या आत्मघाती वर्तनाशी तीव्रतेनं संबंधित आहेत. मद्यपी व्यक्तींमध्ये या जोखमीच्या ज्ञात घटकांवर आधारित आत्महत्यांचा आढावा घेतला पाहिजे.

याव्यतिरिक्त अल्कोहोलचा गैरवापर सामान्यत: आत्महत्येस कारणीभूत ठरू शकणाऱ्या अनेक मानसिक आजारांमध्ये, विशेषत: बायपोलर डिसऑर्डर, स्किझोफ्रेनिया आणि मुख्य म्हणजे नैराश्य, यात जोखमीचा गंभीर घटक ठरतो. या विकारांत मेंदूतला ‘केमिकल लोच्या’ आणि आनुवंशिकता खूप महत्त्वाची ठरते. अल्कोहोल अशा अनेक मानसिक रोगांची लक्षणं तीव्र करतं, म्हणून या व्यसनाधीन व्यक्तींमध्ये उद्भवणाऱ्या इतर मानसिक आजारांचेसुद्धा व्यसनाधीनतेबरोबर वेळीच उपचार झाले, तर आत्महत्येचा धोका नक्कीच कमी होऊ शकतो.

लवचीकता, आत्मसन्मान आणि चिकाटी वाढवणाऱ्या कौशल्यांसह, कठीण परिस्थितीशी सामना करण्याची कौशल्यं विकसित करणं, असे काही महत्त्वाचे घटक वैद्यकीय उपचारांबरोबर मद्यपींमध्ये आत्महत्येचा धोका कमी करू शकतात आणि लोकांना दारूविकारांपासून बरं होण्यासाठीही मदत करू शकतात. कुटुंब आणि मित्रपरिवाराचा भावनिक आधार, नैतिक आधार, पुनर्वसनाची संधी आणि आशावादी दृष्टिकोन, या सगळय़ा गोष्टींचा व्यसनाधीन व्यक्तीला आत्महत्येपासून रोखण्याबरोबरच व्यसनाधीनता कमी करण्यासाठीही फायदा होईल.

 आयुष्य कठीण आहे, पण अनमोलही आहे. निराश न होता प्रवास चालू ठेवायचा, तो आयुष्याचा निखळ आनंद घेण्यासाठी. जावेद अख्तर यांच्या भाषेत, ‘कभी ढूँढ लेगा ये कारवाँ, वो नई जमीन नया आसमान!’

pshubhangi@gmail.com