scorecardresearch

मागे राहिलेल्यांच्या कथा-व्यथा : केळीचे सुकले बाग!

एकाची आत्महत्या मागे उरलेल्या कुणाकुणाच्या आयुष्यावर कसा परिणाम करेल हे सांगता येत नाही. या लेखाच्या पूर्वाधातल्या रमेशच्या आत्महत्येमुळे त्याच्या बायकोत ना काही फरक पडला, ना त्याच्या आईमध्ये. शेवटी जेव्हा त्या एकमेकांपासून वेगळय़ा झाल्या, तेव्हाच त्यांच्यात शांतता निर्माण झाली.

– डॉ. शुभांगी पारकर

एकाची आत्महत्या मागे उरलेल्या कुणाकुणाच्या आयुष्यावर कसा परिणाम करेल हे सांगता येत नाही. या लेखाच्या पूर्वाधातल्या रमेशच्या आत्महत्येमुळे त्याच्या बायकोत ना काही फरक पडला, ना त्याच्या आईमध्ये. शेवटी जेव्हा त्या एकमेकांपासून वेगळय़ा झाल्या, तेव्हाच त्यांच्यात शांतता निर्माण झाली. पण रमेशच्या प्रेयसीवर, प्रियावर मात्र ही आत्महत्या आघात करून गेली. इतकी, की आपण मागे का राहिलो आहोत, हा विचार तिला त्रास देऊ लागला.. तिच्या आयुष्याची बाग सुकत चालली होती, आत्महत्येचे विचार तीव्र झाले. पण.. पुढे काय झालं ते सांगणारा या कहाणीचा हा उत्तरार्ध.

भावनांच्या जाळय़ात अडकलेली नाती जोपर्यंत व्यवस्थित सुटत नाहीत तोपर्यंत त्या नातेसंबंधांना अर्थ राहात नाही. या भावनाकल्लोळात अनेक अशा निरगाठी असतात, त्या सुटता सुटत नाहीत. वैद्यकीय शास्त्रात आत्महत्या जरी जागतिक आरोग्याची समस्या मानली गेली असली, तरी आत्महत्येचा निर्णय हा एखाद्या व्यक्तीचा वैयक्तिक निर्णय असतो. त्यामुळे त्याविषयीचा वैयक्तिक त्रास समजून घेणं जितकं आवश्यक आहे, तितकेच त्या व्यक्तीशी निगडित इतर व्यक्तींच्या बाबतीतले संदर्भही समजून घेणं गरजेचं असतं.

भारतीय संस्कृतीत कुटुंबाला महत्त्व आहे. कौटुंबिक एकोपा एखाद्याला संकटकालीन परिस्थितीत भावनिक आणि नैतिक आधार देऊन सुरक्षित ठेवतो, पण आत्महत्त्येच्या संदर्भात कौटुंबिक कलह आणि अशांती ही नात्यांमध्ये क्लेश आणि असुरक्षितता निर्माण करून एक जोखीम बनून जाते. मनोरुग्णतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ वा समुपदेशक यांना कौटुंबिक कलहाचं विश्लेषण करून व्यक्तींचे वैयक्तिक अनुभव जाणून घ्यावे लागतात. त्यातल्या गुंतागुंतीची उकल करून कुटुंबाला आणि आत्महत्येचा विचार करणाऱ्या व्यक्तीला सखोल मार्गदर्शन करत कौटुंबिक स्तरावर हस्तक्षेप करायला लागतो.

 मागच्या लेखात (९ एप्रिल) रमेशच्या आयुष्याची झालेली होळी आपण वाचली. आईच्या आक्रस्ताळय़ा हट्टाखातर रमेशनं आपल्या प्रेमाची आहुती देऊन आईनं ठरवलेल्या मुलीशी- सुनंदाशी लग्न केलं आणि आगीतून फुफाटय़ात पडल्यागत त्याची अवस्था झाली. त्यातूनच त्यानं आत्महत्या केली. खरं तर त्याला सुनंदाशी लग्न करायचंच नव्हतं. आपली प्रेयसी प्रियाशी या विषयावर बोलताना ‘आपण पळून जाऊन लग्न करू या आणि दुसऱ्या शहरात संसार थाटू या’ असं मत त्यानं व्यक्त केलं होतं. पण मनातून तो चांगलाच हादरला होता. वाटतो तितका हा निर्णय सोपा नाही, याची त्याला जाणीव होती. त्याच्या आईमध्ये असलेलं क्रौर्य त्यानं इतकी वर्ष अनुभवलं होतं. ती कुठल्याही थराला पोहोचू शकते, याची त्याला खात्री होती. त्यानं प्रियाशी विवाह केल्यास ती क्रोधाच्या अवस्थेत आत्महत्या करून त्याला अडकवू शकते, अशीही शंका रमेशच्या वडिलांनी त्याच्याकडे व्यक्त केली होती. रमेशचा आत्मविश्वास ढासळला होता. आपल्या प्रेमाला विखारी शाप आहे, याची जाणीव ठेवून त्यानं प्रियाला समजावलं होतं. त्या दोघांच्याही मनात त्या वेळी निराशेच्या भरात आयुष्य संपवून टाकायचा विचार आलाही होता. किंबहुना जवळजवळ एक दिवस ते दोघं सोबत राहून आत्महत्येचा विचार करत होते.

 स्नेडमन या मानसशास्त्रज्ञानं पुन्हा पुन्हा एक महत्त्वाचा मुद्दा गंभीरपणे मांडला आहे, तो म्हणजे भयानक मानसिक वेदनांपासून मुक्त होण्याच्या भावुक गरजेतून आत्महत्या उद्भवत असते. रमेश आणि प्रियासारख्या ‘एक दूजे के लिये’ जगण्याचा विचार करणाऱ्या युवा प्रेमिकांनी विफल प्रेमाच्या नैराश्यातून आत्महत्येचा उपाय अनेकदा विचारात घेतला असेल आणि नाकारला असेल. या व्यक्ती प्रेमात भावुक झाल्या असल्या, तरी त्या वाहून गेलेल्या असतातच असं नाही. पण प्रेमातलं वैफल्य कधी कधी जगण्याची आंतरिक ऊर्जाच संपवून टाकतं. वास्तविकतेशी सांधलेला बौद्धिक जोम या अनुभवातून जाणाऱ्या व्यक्तींमध्ये कमी पडतो. अखेरीस त्यांचा दृष्टिकोन इतका संकुचित होतो, की आत्महत्येद्वारा या विरह यातनेतून मुक्त व्हायचा मार्ग ते स्वीकारतात. जसं रमेश आणि प्रियानं ठरवलं होतं. मात्र आत्महत्येनंतर आपली निर्भर्त्सना आणि हेटाळणी संपली असती याबद्दल दोघेही साशंक होते. रमेशच्या आईनं त्यांना शिव्यांची लाखोली कायम वाहिली असती. त्यापेक्षा एक आदरयुक्त विधायक आयुष्य का जगू नये, असा सजग प्रश्न तिनं रमेशला विचारला. ते दोघंही आत्महत्येच्या विचाराच्या अगदी जवळ असताना हा प्रगल्भ, विवेकनिष्ठ विचार त्यांना पुन्हा जीवनाच्या मार्गावर मागे घेऊन आला होता. त्या दोघांनाही आत्महत्येच्या विचारातला फोलपणा कळला होता. त्या वेळच्या विरहातल्या निराशेला शरण जाण्याचं त्यांनी नाकारलं, कारण त्यातून काहीही विधायक घडणार नाही ही सूक्ष्मदृष्टी त्यांना मिळाली होती. केवळ नाती संपवली तर प्रीतीचे भावबंध संपत नसतात, याची जाणीव प्रियाला होती. तिनंच रमेशला समजावलं होतं, की आपण आपलं व्यक्तिगत जीवन जगूया, पण एकमेकांच्या नात्यासाठी जिवंतपणे मरण्यात नक्कीच अर्थ नाही. तसं पाहिलं तर काही लोक एकमेकांच्या प्रेमात पडण्यासाठी असतात, पण एकमेकांबरोबर असण्यासाठी नसतात! एकंदरीत आपल्या प्रेमातल्या जगात जे महाभारत घडू शकेल, ते टाळण्याचा रमेश आणि प्रियाचा प्रामाणिक प्रयत्न कौतुकास्पद होता. जड अंत:करणानं त्यांनी आपल्या प्रेमाचा निरोप घेतला तो कायमसाठी.

रमेशनं प्रियाच्या प्रगल्भ साथीनं आणि आश्वासनानं त्यांच्या घरातलं महाभारत टाळलं. जडावलेल्या मनानं त्यानं एकाच या जन्मी जणू दुसऱ्या जगात शांतपणे प्रवेश केला. पण.. रमेशच्या दुर्दैवी आयुष्यात शांतता आलीच नाही.  त्याची आई आणि पत्नी या दोन क्रूर व्यक्तींच्या विळख्यात तो पूर्ण सापडला. त्याचा अपरिमित मानसिक छळ झाला. त्याची सहनशीलता हीच या दुष्टचक्रात त्याचा गुन्हा ठरली होती. Tolerance becomes a crime when applied to evil! सहनशीलतेलाही मर्यादा असतातच. त्या मर्यादेनंच रमेशचा बळी घेतला.

 एखाद्याचा अंत दुसऱ्या व्यक्तीसाठी काय परिणाम घेऊन येईल सांगता येत नाही. रमेशचा अंत सुनंदासाठी नव्या जीवनाची सुरुवात होती! सुनंदाला रमेशच्या घरावर पूर्ण ताबा हवा होता. पण ते घर रमेशच्या वडिलांचं असल्यानं सुनंदाला त्यांना घराबाहेर काढता आलं नाही. रमेशचे वडील पिळवटून निघाले होते. त्याच्या आईचा जीवही तळमळत होता. पण म्हणतात ना, स्वभावाला औषध नसतं. निराशेनं त्याची आई अधिक चिडू लागली होती. तिचा संताप, आक्रमकपणा विकोपाला पोहोचला होता. सुनंदा आणि रमेशची आई रमेशच्या बारा दिवसांच्या शोककाळातसुद्धा जे काही तमाशे करीत होत्या, ते पाहून शेजारीपाजारीही थक्क होत होते. त्या दोघी एकमेकींना रमेशच्या मृत्यूसाठी दोष देत होत्या. त्यांच्यात नुसती शिवीगाळ नाही, तर मारामारीही होत होती. शेवटी मामा-मामीच्या मदतीनं त्यांनी तिला तिच्या माहेरी धाडलं. त्याच वर्षी सुनंदाचं गावातल्या एका व्यक्तीबरोबर लग्न लावून देण्यात आलं. त्यामुळे इकडे रमेशच्या आईवडिलांची मात्र बिनबोभाट सुटका झाली. रमेशशिवायचं आयुष्य त्यांनी स्वीकारलं.

  मात्र रमेशच्या मृत्यूचा, तोही आत्महत्येनं झालेल्या मृत्यूचा सर्वात मोठा आघात झाला तो प्रियावर. रमेशच्या मृत्यूची बातमी त्याच्या चाळीत राहणाऱ्या प्रियाच्या एका मैत्रिणीकडून प्रियाला कळली. ती दु:खानं वेडीपिशी झाली. तिनं लग्नही केलं नव्हतं. समजूतदारपणानं आणि भीषण परिस्थितीचा अंदाज आल्यानं तिनं आपल्या प्रेमाची आहुती दिली होती. पण मनानं ती उदास होती. तिची झोप, भूक सगळंच उडालं होतं. रमेशला टाळण्यासाठी तिनं ती नोकरीही सोडली होती. काही दिवसांनी ती दुसऱ्या ठिकाणी कामावर रुजू झाली. तिच्याही घरी तिच्या लग्नाची बोलणी चालली होती, पण ‘नवीन नोकरी आहे, थोडं थांबून लग्न करते’ असं तिनं सर्वाना सांगितलं होतं. रमेशच्या आणि तिच्या नात्यातला आवेग तिला तिचं प्रेम विसरू देत नव्हता. जो काही वेगळा व्हायचा निर्णय रमेश आणि तिनं घेतला, तो व्यावहारिक शहाणपणा होता, पण भावनांचा चक्रव्यूह कणखर होता. ‘आपलं प्रीतीचं विश्व टिकणार नाही, आपलं जग वेगळं आहे,’ हे बुद्धीला जरी पटत होतं, तरी ‘दिल हैं के मानता नही’ अशी प्रियाची मन:स्थिती होती. तिला असाहाय्य, अनिश्चित वाटत होतं. तिला सतत रडू यायचं आणि कधी कधी तिचे हुंदके कुठेही असली तरी आवरायचे नाहीत. सदैव टवटवीत, आनंदी असणारी प्रिया अगदी कोमेजली होती. कुणाला भेटायची नाही, आपल्याच विश्वात हरवलेली होती. ती कायम थकलेली, सुकलेली दिसत होती. तिला नैराश्य आलं होतं. ज्या असाहाय्य उपद्रवी परिस्थितीत तिनं स्वत:वर संयम ठेवून निर्णय घेतला होता, तो तिला कधी रुचलाच नव्हता. आपलं प्रसन्न विश्व त्या प्रीतीच्या सरणाबरोबर संपलं, असं तिला आता वाटत होतं. ‘जसजसे दिवस जात होते, तसं तसं आपण त्या प्रीतीच्या लाटेतून बाहेर येऊ,’ असं जे प्रियाला पूर्वी वाटत होतं, तसं होत नव्हतं. आठवणींची ताकद प्रभावी होती. प्रियासारख्या प्रगल्भ व्यक्तीलाही आपल्या भावनांवर मात करता येत नव्हती. कवि अनिल यांच्या शब्दांत- ‘केळीचे सुकले बाग असुनियां पाणी’ अशी प्रियाची मन:स्थिती झाली होती. तिला उपचार चालू केले होते. तिच्या मनात आत्महत्या करण्याचे विचार जरी येत नसले, तरी प्रियाला आपण या जगात नसतो तर बरं झालं असतं असं सतत वाटत होतं. त्यात रमेशच्या आत्महत्येमुळे तिचं दु:खं अधिकच वाढलं होतं. डोळय़ांची पापणी लवली की रमेशचा शांत, धीर देणारा चेहरा तिच्या नजरेसमोर तरळून जात होता. प्रिया सैरभैर झाली होती. वचनबद्धतेनं दोघांनी मिळून प्रेमाची आहुती दिली आणि हे काय विचित्र घडलं! प्रियालाही आत्महत्या करायची जबर इच्छा होऊ लागली.

  जेव्हा ती आमच्याकडे उपचारासाठी आली तेव्हा तिनं प्रामाणिकपणे आमच्यासमोर कबूल केलं, की ‘आता माझा माझ्यावर ताबा नाही राहिला डॉक्टर. मी काय करीन हे सांगू शकत नाही.’  तिला खूप अपराधी वाटत होतं. आपल्या प्रेमात धैर्य नव्हतं का? आपण घाबरलेले होतो का? आपलं प्रेम मिथ्या होतं का? असे अनेक प्रश्न तिच्या मनात थैमान घालत होते. आधीसुद्धा तिनं रमेशबरोबर आत्महत्या करायचा विचार केला होता. पण आज ‘आपण का जिवंत आहोत’ याची तिला घृणा वाटत होती. आपण भ्याड वागलो का? काय चुकलं आपलं? आपण का मागे राहायचं? प्रियाच्या मन:स्थितीचं सखोल विश्लेषण करणं आवश्यक होतं. बहुतेक लोकांसाठी आत्महत्येचा आवेग अल्प कालावधीसाठी असतो. पण प्रियाचं नैराश्य, तिचे आधीचे आत्महत्येचे विचार आणि तिच्या प्रियकराचा आत्महत्येनंच झालेला मृत्यू, हे पाहता तिची स्थिती नाजूक आणि गंभीर होती. आत्महत्येचा धोका तीव्र होता. आम्ही तिला रुग्णालयात दाखल करून घेतलं. नैराश्यावरील उपचार चालू ठेवले. मानसोपचार चालू केले, तिला बोलतं केलं. तिच्या विचारांत दिसणारी तिची अपराधीपणाची भावना, विरह भावना व्यक्त करू दिल्या. त्यासंबंधी तिच्या मनात असलेल्या अविवेकी विचारांवर तिला मात कशी करता येईल हे शिकवलं. तिला हैराण करणारी तिची भावुकता आणि आवेग नियंत्रणात आणण्यास तिला मदत केली. हळूहळू तिची वैचारिक क्षमता वाढली आणि सारासार विचार करत ती संकटातून बाहेर आली.

pshubhangi@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mage rahilelyanchya katha vyatha author dr shubhangi parkar suicide life silence ysh

ताज्या बातम्या