आपल्याकडे कुटुंब परिवार कुटुंबपद्धती यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण सशक्त समाज त्यानेच घडत असतो. हल्ली कुटुंब फार आखीवरेखीव चौकोनी-त्रिकोणी झाली असली तरी एकत्र कुटुंबाचे फायदे तरुणांच्या लक्षात येताहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोणतेही धन कुटुंबापेक्षा जास्त नाही. आपले वडील हे आपल्याकरिता सर्वोत्तम सल्लागार असतात. आईच्या मायेची सावली आकाशाएवढी असते. सुखदु:ख सांगण्याकरिता ऐकण्याकरिता भाऊ हा एकमेव भागीदार असतो. आपले कायम शुभ चिंतणारी बहीणच असते आणि जन्मभराची मैत्रीण फक्त बायकोच असू शकते. कुटुंबाबाहेर जीवन असू शकत नाही. तेथे जे प्रेम, विश्वास असतो तो फक्त तेथेच असतो. आयुष्यात पुढे पुढे जाण्यासाठी जी घाई केली, कुटुंबापासून दूर राहिलो त्यात कुटुंबातील आनंदाला आपण मुकलो आहोत. कुटुंब फार मागे सोडले, हे चिरागच्या आणि बायको रेवतीच्या लक्षात आल्यावर त्यांनी ते नम्रपणे आईला सांगितले आणि ते कुटुंबात परत आले. येथे कायदे नाहीत तर अनुशासन आहे. येथे भय नाही विश्वास आहे. आपला आनंद ज्यात आहे त्यातच सबंध कुटुंबाचा आनंद असतो. कुटुंबात सूचना दिल्या जात नाहीत तर एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती आहे. कुटुंबाचे दुसरे नाव प्रेम आहे. ते आपणही कुटुंबातील व्यक्तींना दिले पाहिजे.

बाहेरील लोकांप्रमाणे येथे संपर्क कॉन्टॅक्ट नसतो तर एकमेकांशी जिव्हाळ्याचे संबंध असतात. या सर्व गोष्टी कुटुंबापासून दूर राहिल्यानंतर त्यांना कळल्या. ‘ऊन ऊन खिचडी वर साजुकसं तूप वेगळं राहण्याचं आगळंच सुख’ या कवितेप्रमाणे रेवतीच्या लक्षात आलं कुटुंबात राहण्याचंच सुख आगळं असतं.

रेशम बरीच वर्षे शिक्षणानिमित्ताने घरापासून आईवडील, भाऊ  सगळ्यांपासूनच दूर राहिली होती. वसतिगृहाच्या ठरावीक जेवणाचा तिला कंटाळा आला होता. रोज नवीन छानसं खमंग खायला, कधी थोडंसं बरं नसेल तर औषध द्यायला, गरम मऊ भात द्यायला, पाठीवरून हात फिरवायला आई जवळ नसायची. फिजिक्ससारखा ड्राय विषय गंमतजंमत करीत शिकवायला दादा नसायचा. स्वत:च त्यात डोके खुपसून अभ्यास करावा लागे. एखादी गोष्ट आईने नाकारली तर घेऊन द्यायला बाबा नसायचे. पिकनिक खरेदी रेस्टॉरंटमध्ये जेवायला नेण्याचे लाड करायला बाबा नसायचे. अशा असंख्य बाबींना आपण मुकलो आहोत हे तिला फार जाणवायचे. एखाद्या सुटीच्या दिवशी मैत्रिणींबरोबर गप्पा मारताना या गोष्टींचा उल्लेख व्हायचाच.

सगळ्याच मुलींना माहीत होते की शिक्षण संपल्यानंतर घरचे लग्नासाठी आपल्यामागे लागणार आहेत. अशा वेळी आपण आपला जोडीदार कसा असावा याचा विचार करून ठेवला तर तो शोधताना सर्वाचेच काम सोपे होईल. रेशम म्हणाली ‘मला आईसारख्या सासूबाई, वडिलांसारखे सासरे, दादाप्रमाणे भावोजी, छोटीशी नणंद ज्या घरात आहे त्याच मुलाशी लग्न करायला आवडेल. बरीच वर्षे वसतिगृहात राहून कुटुंबात राहण्याचा आनंद मला मिळालाच नाही, तो सासरी गेल्यावर मिळविण्याचे ठरविले आहे.’ तुम्हालाही हे कुटुंबधन मिळत राहो, हीच या शेवटच्या लेखानिमित्ताने शुभेच्छा.

geetagramopadhye@yahoo.com

(सदर समाप्त)

मराठीतील सर्व मन वढाय वढाय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Family and its benefits
First published on: 31-12-2016 at 00:36 IST