मला व्हॉट्स अ‍ॅपवर एक मेसेज आला. ‘तुम्ही आनंदात असाल तर आयुष्य सुंदर असते, पण तुमच्यामुळे इतरांना आनंद झाला तर आयुष्य सार्थक ठरते.’ पहिली ओळ मला तंतोतंत पटली. सर्व गोष्टी मनाप्रमाणे घडत असतील तर आपण आनंदात असतो. आयुष्य सुंदर आहे असं वाटतं! नोकरीत वरिष्ठ चांगले, कमाई चांगली, घरची माणसं समजूतदार असं सगळं असेल तर आनंदी आनंद गडे! शाळा कॉलेजमध्ये असाल तर अभ्यासात उत्तम प्रगती, चांगल्या भविष्याची खात्री असेल, त्यात मित्र-मैत्रिणी जिवाला जीव देणाऱ्या असतील तर दुधात साखर!
दुसरी ओळ वाचल्यानंतर मला एकटे राहणाऱ्या, संध्याकाळी क्लबमध्ये वेळ घालवणाऱ्या

अमृतकाकांची आठवण झाली. तिथे त्यांचा वेळ चांगला जाई, पण मन फारसं रमत नव्हतं. गरीब मुलांकरिता काहीतरी करावं या विचाराने ते जवळच असलेल्या एका वाडीवरील शाळेत गेले. दोन-तीन वेळा तिथे गेल्यावर आपण काय केले पाहिजे हे त्यांच्या लक्षात आलं. प्राध्यापकांची परवानगी काढून त्यांनी एका दुपारी पंचवीस मुलांना क्लबच्या हॉलवर आणलं. प्रत्येकाची माहिती विचारली. सर्वप्रथम मुलांना दोन जोडी कपडे दिले पाहिजेत. घरी अभ्यास घेणारे कोणी नाही, पण अभ्यासाची आवड आहे अशांचा अभ्यास घेतला पाहिजे. त्यातील काही मुलींना खेळ आवडतात, त्यांच्या प्रशिक्षणाची सोय केली पाहिजे. शिवण आवडणाऱ्यांना ते शिकण्याची सोय केली पाहिजे. पुढील आयुष्यात त्याचा उपयोग होईल, या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या. क्लबच्या सभासदांच्या मदतीने आपण ही कामं करू शकतो याची खात्री होती. केवळ टाइमपास म्हणून क्लबवर येणाऱ्या तरुण पिढीने काकांच्या विनंतीला मान देऊन मुलांचा अभ्यास घेण्यास सुरुवात केली. काही सभासदांनी शिवणक्लासच्या फीची जबाबदारी घेतली. काहींनी मिळून कपडय़ाची सोय केली. बघता बघता वर्ष गेलं, मुलांची प्रगती वाखाणण्यासारखीच होती. एकूण, मुलं आनंदात होतीच, पण त्यांचे शिक्षक, पालक, मदतीचा हात देणारे सगळ्यांनाच आनंद झाला, कौतुक वाटले. माझ्या छोटय़ाशा कामाने मी किती जणांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला या विचाराने काकांना धन्य वाटले. आयुष्य सार्थकी लागल्यासारखं वाटलं.

अमेरिकेत ‘हॅलोविन’ या सणाच्या दिवशी मुलं चित्रविचित्र पोशाख करून म्हणजे वाघ, भूत, परी, राक्षस अशी रूपं घेऊन घरोघरी जातात. घरातील सर्वाना शुभेच्छा देतात. मग त्यांना कँडीज मिळतात. हॅलोविनला मी एकदा कॅलिफोर्नियात होते. संध्याकाळी काही मुलांनी आमच्या समोर राहणाऱ्या वृद्ध जोडप्याच्या घराची बेल वाजवली.  मुलं शुभेच्छा देऊन कँडीज घेऊन पळाली. त्या अ‍ॅपल स्ट्रीटवर आणखी पाच-सहा वृद्ध जोडपी राहात होती. या मुलांच्या मनात काय आलं कोण जाणे? या आजी-आजोबांच्या बरोबर बुद्धिबळ, कॅरम असे बोर्डगेम खेळायला ती रोज त्यांच्याकडे जाऊ  लागली. हळूहळू त्यांना एकमेकांच्या घरी न्यायला सुरुवात केली. तिथे फार औपचारिकता पाळतात. पण मुलांनी वारंवार त्यांच्या भेटी घडवून त्यांच्यातील दूरस्थपणा कमी केला. त्यामुळे वृद्धांचं नैराश्य कमी झालं. ते आनंदात राहू लागले.
– गीता ग्रामोपाध्ये