‘डिसेन्सी इज नॉट अ साइन ऑफ वीकनेस’ या इंग्रजी म्हणीप्रमाणे ‘एखाद्याचे नम्रपणे वागणे, बोलणे, सभ्यपणा हे सर्व त्याच्या दुबळेपणाचे लक्षण नसते’. खरं तर असंच वागणं प्रत्येकाचं कर्तव्य असतं, पण कधी कधी ‘मूर्ख, बावळट आहे झालं’ असा त्याचा अर्थ काढला जातो. दुसऱ्यांना न दुखावण्याच्या त्यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेणारे खूप जण असतात, पण म्हणून तो कोणाशीही आढय़तेने किंवा तोडून वागत- बोलत नाही. कोणाचाही अपमान करत नाही.
यासी ही एक खूप सभ्य, मऊ स्वभावाची युरोपिय मुलगी भारतात काही कामासाठी आली. एका मोठय़ा शहरातील उच्चभ्रूंच्या वस्तीत स्थायिक झाली. तिने सुंदर, चवदार चॉकलेट्स आणि छोटे चविष्ट केक्स बनवण्याचा कोर्स केला होता. कॉलनीमध्ये ओळखी वाढवून थोडी स्थिरस्थावर झाल्यावर तिने चॉकलेट्स, केक्सचे छोटेसे दुकान थाटले. घरी पदार्थ तयार करून ती दुकानात ठेवत असे. आपली कोणती चॉकलेट्स, केक्स लोकांना आवडतात हे जाणून घेण्याकरिता तिने चव पाहाण्यासाठी काही पदार्थ दुकानात ठेवले. चविष्ट, आकर्षक, वेगवेगळे फ्लेवर्स, आकार असलेले केक्स, चॉकलेट्स दोनेक तासांत फस्त होत, पण ऑर्डर एकही मिळत नसे. तिने कंटाळून टेस्टिंग बंद केलं. पैसे, कष्ट सगळंच वाया गेलं. आता मैत्रिणी तिला सांगू लागल्या, ‘‘तुझा बदामांचा, अक्रोडांचा केक किंवा रोस्टेड नट्स घातलेली चॉकलेट्स आम्हाला आवडतात.’’ कोणी काही करून आणायला सांगू लागल्या. ती आनंदाने मागण्या पूर्ण करू लागली, पण दुकानात लावलेल्या भावफलकाकडे काणाडोळा करायच्या. दहा जणींपैकी एकदोघी पैसे द्यायच्या, तेसुद्धा घासाघीस करून. ‘‘माझं नुकसान होतंय, वस्तूंचे पैसे द्या’’ हे सांगणं तिच्या स्वभावात नव्हतं. मैत्रिणींच्या गैरफायदा घ्यायच्या वृत्तीचा तिला राग येई, त्रास होई. एकदा तिने धाडस करून एक गंमत केली. सुटीच्या दिवशी हाय टी पार्टीसाठी सर्वाना आमंत्रित केलं. मैत्रिणी मुलांना घेऊन आल्या. थोडे पुरुष आले. चहा झाल्यावर तिने, ‘‘मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. कृपया ऐका.’’ आपल्या छोटय़ा भाषणात तिनं सांगितलं, माझ्या दुकानातून होणाऱ्या वस्तूंच्या विक्रीतून मला फायदा तर होत नाहीच, उलट तोटा होतोय. कारण तुम्ही सगळे माझे मित्र आहात, मी भिडेखातर पैसे लगेच मागत नाही. आपण सर्वानी वस्तू घेतल्यानंतर बोर्ड पाहून पैसे ताबडतोब दिले तर मला आनंद होईल.’’ हे ऐकून सगळे खजील झाले. आपण तिच्या सभ्यतेचा गैरफायदा घेतला, मोठी चूक केली. शेजारच्या मॉलमध्ये या वस्तू पंचवीस टक्के जास्त भाव देऊन आपण आणत होतो हे त्यांना माहीत होतेच. यासीची माफी मागत, परत असं होणार नाही याची खात्री त्यांनी दिली. आता तिला अपेक्षित फायदा होऊ लागला. सभ्यता सोडली नाही, पण तसे वागणे हा माझा दुबळेपणा नाही हे पटवून दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गीता ग्रामोपाध्ये
geetagramopadhye@yahoo.com

मराठीतील सर्व मन वढाय वढाय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Importance of gesture and behaviour
First published on: 25-06-2016 at 01:03 IST