शांत समुद्र कुशल खलाशी बनवत नाही. उत्तम खलाशी होण्यासाठी खवळलेल्या समुद्रातच प्रशिक्षण घेतले पाहिजे, कारण, प्रवास करताना समुद्र नेहमीच शांत असेल असे नाही. मग जर कधी अशांत समुद्रातून इच्छितस्थळी जाण्याची वेळ आली तर आपला टिकाव लागणार नाही. कठीण परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तशा प्रसंगातून जाणं आवश्यक असतं तेच आपल्याला नवनवीन धडे शिकवत असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुनील आणि सविता या भावंडांच्या आधीच्या पिढ्यांनी भरपूर संपत्ती मागे ठेवली होती, त्यामुळे दोघांचे बालपण अगदी ऐषारामात गेले होते. जे मागतील ते समोर हजर व्हायचे. कधी कशाची कमतरता, उणीव आई-वडिलांनी भासू दिली नाही. शेती, कारखाने, सावकारी या सगळ्यांतून पैशाचा ओघ कायम सुरू असायचा. मुलांना गरिबी हा शब्दच माहीत नव्हता. वर्षातून एकदा परदेशवारी व्हायची. मौजमजेचे दिवस होते. पण त्याचवेळी अभ्यासाकडे दुर्लक्षच होत आहे, त्याची गरज आहे, हे कुणाच्या गावीही नव्हतं म्हणजे शिक्षणाची जरूर आहे हा विचारही कोणी केला नव्हता. त्यामुळे शिक्षणाच्या नावाने शंख होता. हळूहळू दिवस बदलत होते. सावकारीवर बंदी आली. कुळकायदे आले. थोडी शेती गेली. शेतीतील ज्ञान नसल्याने उत्पन्न कमी झाले. कारखाने नोकरांच्या जिवावर चालायचे, आता पूर्वीप्रमाणे प्रामाणिक नोकर मिळेनासे झाले. नुकसान होऊ  लागले. साठवलेली गंगाजळी किती दिवस पुरणार? सुनील तर कावराबावरा झाला. त्यातच वडील गेले. सविताचे लग्न झाले, त्यात परत वारेमाप खर्च झाला. जुना वाडा, नोकरचाकर काढून टाकले. आता पैसे कमाविण्याकरिता हातपाय मारले पाहिजेत, पण कुठे आणि कसे? नशिबाने थोडी साथ दिली. जिच्याशी प्रेमविवाह  केला, तिला परिस्थिती जाणीव होती. कष्ट केले पाहिजेत, सुनीलला कामाची सवय लावली पाहिजे, हे ओळखून तिने बँक कर्ज, उधारी यातून भांडी, काचसामान याचे दुकान स्वत:साठी, तयार कपडय़ांचे दुकान सुनीलसाठी सुरू केले. दुकान वेळेवर उघडणे, होलसेल बाजारातून खरेदी, हिशेब, ग्राहक सांभाळणे सुनीलला फार अवघड होत असे. बायकोचे कष्ट पाहून लाज वाटे, हुरूपही येई. फार सुखासीन दिवस काढले, शिक्षण अर्धवट सोडले ते आता नडते आहे. तरी स्वकमाईचा आनंद मोठा होता. हळूहळू सगळे सावरले. गेलेले वैभव परत येणे अवघड होते. पण, परिस्थितीशी झगडून वाट तरी सुकर करता आली.

मराठीतील सर्व मन वढाय वढाय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Overcome the situation
First published on: 08-10-2016 at 01:03 IST